मॅमथ केव्ह : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी केंटकी राज्यातील लूइझव्हिल शहराच्या नैर्ऋत्येस १६० किमी. वरील मॅमथ केव्ह नॅशनल पार्क या राष्ट्रीय उद्यानातील एक विशाल व आश्चर्यजनक गुहा. चुनखडीच्या टेकडीच्या कपारींतून अम्लयुक्त पाणी झिरपून भूपृष्ठाखाली बनलेली ही गुहांची एक मालिका आहे. तिच्या काही भागाचे अद्याप संशोधन व्हावयाचे आहे परंतु २४० किमी.च्या संशोधित भागात, भूस्तरीय हालचालींमुळे छोटी विवरे, घुमट, खाचखळगे, मार्ग, नद्या, तलाव इ. तयार झाले असून पर्यटनाच्या दृष्टीने ही गुहा विकसित करण्यात आली आहे. ती पाच वेगवेगळ्या स्तरांत विभागलेली असून तिला प्रमुख दोन प्रवेशद्वारे आहेत. आतील स्तरावर सु. १९ किमी. लांबीचे हमरस्ते बांधण्यात आले आहेत. भूपृष्ठाखालील सर्वांत खालच्या स्तरातून एको नदी वाहत जाते. तिच्या प्रवाहमार्गावर ऐकू येणाऱ्या प्रतिध्वनीमुळे नदीला हे नाव पडले. सुमारे ८ सेंमी. लांबीचे वैचित्र्यपूर्ण रंगहीन आंधळे मासे तिच्या पात्रात सापडतात. ही नदी शेवटी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या ग्रीन नदीला मिळते. येथे नौकानयनाचीही सोय आहे. या गुहेतील खडकांचे आकार व रंग वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
मॅमथ केव्हमधील तारांकित आकाशासारख्या भासणाऱ्या भव्य छताची ‘स्टार चेंबर’ तसेच येथील ‘चीफ सिटी’ म्हणून ओळखला जाणारा लंबवर्तुळाकृती भाग इ. ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. गुहेच्या शोधाविषयी मतभेद आहेत. तेथे सापडलेली पादत्राणे, छोटी हत्यारे, दिवे, ममी इ. अवशेषांवरून इतिहासपूर्वकाळापासून अमेरिकन इंडियनांना ती ज्ञात असावी, तसेच ती त्यांचे संकेत स्थळ असावी, असे एक मत आहे. काही अभ्यासकांच्या मते १७९८ मधील एका दस्तऐवजावरून येथील गोऱ्या रहिवाशांना मॅमथ केव्हचा शोध लागला असावा. हचिंझ नावाच्या एका शिकाऱ्यास १८०९ मध्ये प्रथम या गुहेचा शोध लागला असावा, असेही एक मत आहे.
मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यानात आणखीही काही गुहा आहेत. १९७२ साली मॅमथ केव्ह आणि फ्लिंट रिज या दोन गुहा एकमेकींशी संलग्न असल्याचे संशोधकांना आढळले. मॅमथ-फ्लिंट रिज ही जगातील सर्वांत जास्त लांबीची गुहा असून तिची लांबी सु. ३२० किमी. आहे.
पंडित, भाग्यश्री