मॅनॅटी (ट्रायकेकस मॅनॅटस)मॅनॅटी : स्तनी वर्गाच्या सायनेरिया गणातल्या ट्रायकेकिडी कुलातील जलचर प्राणी. सस्तन प्राणी असूनही जलचर (मुख्यत्वे समुद्रात राहणारा) असल्यामुळे याच्या शरीराचा आकार माशाप्रमाणे असतो. ट्रायकेकिडी कुलात ट्रायकेकस ही एकच प्रजाती असून त्याच्या ट्रा. मॅनॅटस, ट्रा. इनंग्विस आणि ट्रा. सेनेगलेन्सिस या फक्त तीन जाती आहेत. अमेरिकेचा नैर्ऋत्य किनारा, टेक्ससचा पश्चिम किनारा, ॲमेझॉन आणि ओरिनोको या नद्या, पश्चिम आफ्रिकेतील नद्या आणि चॅड सरोवर या भागांत मॅनॅटी वैपुल्याने आढळतात. हे खाड्या आणि संथ वाहणाऱ्या  नद्यांतील गढूळ पाण्यात सापडतात.

मॅनॅटीचे शरीर लांबट व गोलसर असते. डोके लहान व मुस्कट साधारण चौकोनी असते. वरच्या ओठाचे दुभंगून दोन भाग झालेले असतात व प्रत्येक भाग स्वतंत्रपणे हालचाल करू शकतो. याचा उपयोग चिमट्याप्रमाणे अन्नपदार्थ उचलून तोंडात घालण्यासाठी होतो. नाकपुड्या लहान व मुस्कटाच्या पुढच्या टोकावर असतात डोळे लहान असतात बाह्यकर्ण नसतात. पुढच्या पायांचे परांमध्ये (फ्लिपरमध्ये) व मागच्या पायांचे शेपटीमध्ये परिवर्तन झालेले असते. शेपटी अखंड व गोलसर असते. परांवर नखांचे अवशेष दिसतात. वरच्या ओठावर राठ मिशा असतात तसेच राठ पण आखूड केस सर्व शरीरावर विखुरलेले असतात. लांबी २·५ ते ४ मी. व वजन अदमासे २७० ते ९०० किग्रॅ. असते. कातडी सु. ५ सेंमी. जाड व खरबरीत असते. तिच्यावर बारीक बारीक उंचवटे व खळगे असतात. रंग फिकट राखी ते काळ्यापर्यंत कुठल्याही छटेचा असतो.

मॅनॅटीचे एक कुटुंब साधारणतः एकत्र पोहोत असते परंतु वार्षिक स्थलांतराच्या वेळी १५ ते २० मॅनॅटी एकत्र येऊन गटागटाने थंड पाण्यातून उबदार पाण्यात जातात. हे मंद, भित्रे व बुजरे असतात.

मॅनॅटी संपूर्णपणे शाकाहारी आहेत. हे समुद्रातील, मचूळ पाण्यातील व गोड्या पाण्यातील पाणवनस्पती सारख्याच आवडीने खातात. चौथ्या किंवा पाचव्या वर्षी ते वयात येतात. गर्भावधी १५२ ते १८० दिवसांचा असतो व बहुतेक एक किंवा क्वचित दोन पिले जन्माला येतात. पिले गुलाबी रंगाची असतात. नर व मादी दोघेही पिलांची काळजी घेतात. पिले सु. दोन वर्षे आईबरोबर असतात. मादीच्या स्तन ग्रंथी छातीवरील परांच्या जवळच शरीराच्या खालच्या बाजूवर असतात. स्तनाग्रे असतात. पिलाला दुग्धपानासाठी मादी आपल्या परांनी अलगद स्तनाजवळ धरते. या मानवासारख्या वागणुकीमुळेच याला मॅनॅटी हे नाव पडले आहे.

जोशी, लीना