मॅग्डेबर्ग : पूर्व जर्मनीतील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, औद्योगिक व व्यापारी शहर आणि अंतर्देशीय नदीबंदर. हे बर्लिनच्या नैर्ऋत्येस १२५ किमी. अंतरावर एल्ब नदीवर वसलेले आहे. लोकसंख्या २,८९,३०० (३० जून १९८१). ⇨ शार्लमेनने मॅग्डेबर्गची इ. स. ८०५ मध्ये स्थापना केली. ९६८ मध्ये ते आर्चबिशपचे केंद्र बनले. तेराव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान ‘हॅन्सिॲटिक लीग’ या सुविख्यात व्यापारनगरसंघाचे महत्त्वाचे व सामर्थ्यवान सदस्य म्हणून मॅग्डेबर्ग ओळखले जाई. १५२४ मध्ये धर्मसुधारणा आंदोलनाला त्याने पठिंबा दिला होता. तीस वर्षांच्या युद्धकाळात (१६१८–४८) २० मे १६३१ रोजी जर्मन जनरल काउंट पापेनहाइम (१५९४–१६३२) व प्रशियन जनरल काउंट टिली (१५५९–१६३२) यांच्या नेतृत्वाखालील कॅथलिक सम्राट फर्डिनांटच्या सैनिकांनी या शहराला वेढा घालून त्याचे अतोनात नुकसान केले. शहरात पसरलेल्या प्रचंड आगीमध्ये सु. २५,००० माणसे (शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सु. ८५%) मरण पावली. वेस्टफेलियाच्या तहानंतर (१६४८) शहराची पुनर्रचना करण्यात आली व पुढे तेथील व्यापारही वाढला. प्रॉटेस्टंट पंथाच्या पहिल्या विस्तृत इतिहासाचे संपादन द मॅग्डेबर्ग सेंच्युरीज या ग्रंथनामाने सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात याच शहरात करण्यात आले. फ्रेंचांनी मॅग्डेबर्गचा १८०६ मध्ये ताबा घेतला, तथापि १८१४ मध्ये ते प्रशियाला पुन्हा मिळाले. दुसऱ्या महायुद्धातही बाँबवर्षावामुळे शहराची खूपच हानी झाली १९४५ मध्ये ते अमेरिकेच्या ताब्यात होते. महायुद्धानंतर ते पूर्व जर्मनीमध्ये समाविष्ट करण्यात येऊन शहराची पुनर्रचना करण्यात आली.
विपुल साखर-बीट पिकणाऱ्या प्रदेशात वसलेले हे शहर पूर्व जर्मनीतील साखर-बीट व कासनी (चिकोरी) यांच्या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असून तृणधान्ये, पोटॅश, खते, वैरण, कोळसा व लाकूड यांचीदेखील ही मोठी बाजारपेठ आहे. शहराच्या आसमंतातच पोटॅश व लिग्नाइट यांच्या खाणी आहेत. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात मॅग्डेबर्गचा औद्योगिक व व्यापारी अशा दोन्ही स्तरांवर विविधांगी विस्तार होत गेला. सांप्रत हे शहर अन्नप्रक्रिया, साखर उत्पादन व पीठउद्योग, तसेच धातुकाम व अवजड अभियांत्रिकी उद्योग यांचे केंद्र बनले आहे. यांशिवाय कागद, कापड व वस्त्रे, रसायने, बीर, खते, संश्लिष्ट तेले, पोलादाची यंत्रसामग्री, मोटारी, यारी, उच्चालक, शिवणयंत्रे, सिमेंट, काच ही येथील अन्य उत्पादने होत.
मॅग्डेबर्ग हे सहा प्रमुख लोहमार्ग व सात महत्त्वाचे हमरस्ते यांचे प्रस्थानक आहे. मिटलँड कालव्याने ऱ्हाईन नदीशी व अन्य कालव्यांनी बर्लिनशी मॅग्डेबर्ग जोडले गेल्यामुळे ते देशातील सर्वांत महत्त्वाचे अंतर्गत बंदर बनले आहे. शहरातील भव्य, ऐतिहासिक वास्तूंमध्ये अकराव्या शतकातील ‘चर्च ऑफ अवर लेडी’ (१०७०) हे रोमनेस्क चर्च व तेराव्या शतकातील गॉथिक कॅथीड्रल (१२०९) यांचा अंतर्भाव होतो. शहरात तांत्रिक व वैद्यकीय शाळा आहेत.
गणित व यामिकी या शास्त्रांमध्ये कार्य करणारे व प्रथम हवा-पंप निर्माण करणारे (१६५०) प्रसिद्ध जर्मन भौतिकीविज्ञ ओटो फोन गेरिक (१६०२–८६) यांचे हे जन्मस्थान होय. हवेचा प्रचंड दाब दर्शविण्यासाठी गेरिक यांनी तांब्याच्या दोन अर्धगोलांमधील हवा काढून टाकली व मोठ्या प्रयत्नांनीही ते अलग करता येत नसल्याचे प्रात्यक्षिक याच शहरात करून दाखविले. त्यामुळे हे अर्धगोल ‘मॅग्डेबर्गचे अर्धगोल’ म्हणून ओळखले जातात. गेओर्ख फिलिप टेलेमान (१६८१–१७६७) हा प्रसिद्ध जर्मन संगीतकार व बॅरन फोन फ्रीड्रिख स्ट्यूबेन (१७३०–९४) हा प्रशियन जनरल यांचेही हे जन्मस्थान होय. स्ट्यूबेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात जॉर्ज वॉशिंग्टनचा विश्वासू युद्धसल्लागार म्हणून कामगिरी बजावली.
गद्रे, वि. रा.