मॅंचेस्टर-१ : ग्रेट ब्रिटनच्या लँकाशर परगण्यातील कापडउद्योगाचे मोठे केंद्र व महत्त्वाचे व्यापारी बंदर. मँचेस्टर ही औद्योगिक क्रांतीने जन्म दिलेली नगरी होय. लोकसंख्या ४,५८,६०० (मध्य–१९८२), महानगरीय लोकसंख्या २५,९४,७७८ (१९८१ जनगणना). ग्रेट ब्रिटनमधील अतिशय दाट लोकवस्तीच्या भागाचे मँचेस्टर हे केंद्र आहे. अर्वेल, मेडलॉक, अर्क व टीव या नद्यांवर हे शहर बसलेले आहे. याच्या पूर्वेला पेनाइन आल्प्सची पर्वतश्रेणी व उत्तरेस रॉझेनडेल सुळका आहे.
रोमनांनी इंग्लंडवर स्वामित्व मिळविल्यानंतर मेडलॉक व अर्वेल या दोन नद्यांच्या संगमाशेजारी एका वालुकाश्माच्या पठारावर एक किल्ला बांधला (इ. स. ७८–८६). तिसऱ्या शतकात तो अधिक बळकट करण्यात येऊन त्यामध्ये अनेक इमारती बांधण्यात आल्या. रोमनांनी या वसाहतीचे नाव ‘मॅन्क्यूनीअन’ (डोंगराळ प्रदेश) असे ठेवले होते त्यावरूनच शहराला सांप्रतचे नाव मिळाले असावे. रोमनांनंतर चौथे ते आठवे शतक अशा ५०० वर्षांच्या काळात या ठिकाणी कोणाचीच स्वारी झाली नाही. ९१९ मध्ये वेस्ट सॅक्सन राजा एडवर्ड द एल्डर याने नॉर्स लोकांपासून संरक्षण व्हावे म्हणून येथील किल्ला व त्याच्या परिसरात आपले काही सैन्य ठेवले. याच सुमारास मँचेस्टरचा विकास अर्क व अर्वेल या दोन नद्यांच्या संगमावर सुरू होत गेल्याचे आढळते. तेराव्या शतकापासून मँचेस्टरचे खेडेगावातून शहरात संक्रमण होऊ लागले. सोळाव्या शतकाच्या सुमारास लोकरीच्या व्यापारात अती महत्त्व पावलेले नगरपालिकीय शहर म्हणून मँचेस्टर उदयास आले. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात येथून लंडनमार्गे अन्य यूरोपीय देशांना लोकरीचे कापड निर्यात केले जाई. १६२० च्या सुमारास लिनन व सूत यांचे मिश्रण असलेल्या ‘फ्युस्टिअन’ या नव्या कापड प्रकारामुळे कापड उद्योगाला मोठी चालना मिळाली.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात (१७६० पासून पुढे) ग्रेट ब्रिटनमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मँचेस्टरचा विकास झपाट्याने होत गेल्याचे दिसून येते. १७६२ मध्ये ‘ब्रिजवॉटर’ हा पहिला कालवा मँचेस्टरला जोडण्यात आल्याने वर्स्ली येथून स्वस्त भावाने कोळसा आणणे सुलभ झाले. १७७६ च्या सुमारास या कालव्याचा विस्तार होऊन मँचेस्टर हे मर्सी आणि लिव्हरपूल यांच्याशी जोडण्यात आले. यायोगे बाल्यावस्थेतील कापडउद्योगाच्या आयातनिर्यात व्यापाराला चालना मिळाली. मँचेस्टरची पहिली कापडगिरणी १७८०–८५ च्या दरम्यान सुरू झाली. १८३० च्या सुमारास येथे ९९ सूतगिरण्या होत्या. लिव्हरपूल-मँचेस्टर ही जगातील पहिली आधुनिक रेल्वे १८३० मध्ये सुरु झाली आणि १८५० च्या सुमारास शहराच्या आधुनिक रेल्वेयंत्रणेचा बराचसा भाग पूर्ण झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मँचेस्टरचा विविधांगी आर्थिक विकास होत गेला. कापडनिर्मिती केंद्राऐवजी व्यापार व वित्तीय उलाढाली यांचे केंद्र म्हणून अधिक प्रमाणात ते ओळखले जाऊ लागले. कापडयंत्रांच्या उद्योगातूनच अनेक विशेष प्रकारचे अभियांत्रिकीय उद्योग येथे विस्तारत गेले. उत्पादित मालामध्ये वाफेची एंजिने आणि आगगाडीचे डबे, युद्धसामग्री, यांत्रिक हत्यारे, विद्युत्सामग्री इत्यादींचा अंतर्भाव होता. ६० किमी. लांबीचा मँचेस्टर कालवा १८९४ मध्ये जहाज वाहतुकीस खुला झाल्यामुळे मर्सी या नदीमुखखाडीद्वारा मँचेस्टर आयरिश समुद्राला जोडण्यात आल्याने इंग्लंडचा संपर्क जागतिक बाजांरपेठांशी अधिक आला. १९१० च्या सुमाराला मँचेस्टर हे ग्रेट ब्रिटनमधील चौथे महत्त्वाचे बंदर बनले.
मँचेस्टरच्या उत्तरेस व पूर्वेस त्याची औद्योगिक उपनगरे पसरलेली आहेत. बोल्टन, बरी व रॉचडेल ही उत्तरेला, तर ओल्डॅम, ॲश्टन-अंडर-लाइन व स्टॉकपोर्ट ही पूर्वेला वसलेली कापडउद्योगाची उपनगरे होत. अर्लमजवळील शिपकनॅल येथे खनिज तेल रसायनोद्योग, ट्रॅफर्ड पार्क व सॉल्फर्ड येथे विद्युत् अभियांत्रिकीय उद्योग आणि पूर्व मँचेस्टर विभागात यंत्रावजारे, हत्यारे व धातूंचे जोडकाम यांचे उद्योग एकवटले आहेत. अर्वेल व्हॅली येथे विद्युत् रसायनोद्योग, अर्क येथे रंगोद्योग व कापड वस्त्रोद्योग विकास पावले आहेत.
मँचेस्टरच्या महानगरीय विभागात मोठ्या स्वरूपाचे आर्थिक बदल घडून आल्याचे जाणवते. १९२० च्या सुमाराला सु. चार लक्ष कामगार गुंतलेल्या कापडउद्योगाला सांप्रत ओहोटी लागल्याचे दिसते. त्या काळी केवळ या एका उद्योगावर संबंध शहराचे आर्थिक जीवन निर्भर होते. सूतउद्योगापासून कृत्रिम धागा उत्पादनउद्योगाकडे व रसायनोद्योगाकडे संक्रमण झाले आहे. रसायनोद्योगात मुख्य भर परिष्कृत रसायने व औषधे यांच्या उत्पादनावर असून त्याकरिता ऑल्डर्ली येथे संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. कागदनिर्मिती व मुद्रणउद्योग मात्र मोठ्या प्रमाणावर येथे विकसित झाले आहेत, त्यामुळे मँचेस्टर हे लंडननंतरचे या उद्योगाचे दुसऱ्या क्रमांकाचे केंद्र बनले आहे. व्यवसाय, वित्तव्यवहार व बँकिंग, प्रशासन व सामान्य व्यक्तिगत सेवाउद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. तथापि त्याकरिता प्रशिक्षित व अर्हताप्राप्त कर्मचार्यांची आवश्यकता भासत आहे. किरकोळ व घाऊक व्यापाराचे मोठे केंद्र तसेच प्रादेशिक सेवाकेंद्र म्हणूनही मँचेस्टर सुविख्यात आहे. येथे बँक ऑफ इंग्लंड व नॉर्दर्न स्टॉक एक्स्चेंज यांची प्रत्येकी एक शाखा असून एक शाही प्रांतिक न्यायालय आहे. मँचेस्टरपासून दक्षिणेस १६ किमी. वर रिंग्वे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हवाई मालवाहतुकीच्या बाबतीत त्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. मँचेस्टर बंदरातून खनिज तेल, इमारती लाकूड, अन्नपदार्थ, कापूस व सर्वसामान्य माल यांची आयात, तर उत्पादित वस्तूंची निर्यात होते.
मँचेस्टरने उदारमतवादी चळवळींमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘अँटि-कॉर्न लॉ लीग’ ही चळवळ धान्यावरील जकात कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १८३८ मध्ये मँचेस्टर येथे स्थापण्यात आली. रिचर्ड कॉबडेन (१८०४–६५) व जॉन ब्राइट हे या चळवळीचे खरे प्रवर्तक. धान्यावरील जकातकायदे ब्रिटिश सरकारने देशातील शेतकऱ्यांना परकीय स्पर्धेपासून संरक्षण लाभावे म्हणून केले होते. तथापि त्यामुळे गरीब लोकांचे, पावासारख्या त्यांच्या नित्याच्या खाद्य वस्तू महागल्यामुळे फार हाल होऊ लागले. याकरिता १८४६ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॉबर्ट पील (१७८८–१८५०) याने धान्यावरील जकातकायदा रद्द करून खुल्या व्यापारास प्रोत्साहन दिले. मँचेस्टर शहरातच एकोणिसाव्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ विचारवंत यांचा गट वा समूह एकत्र जमत असे रिचर्ड कॉबडेन, जॉन ब्राइट हे या संप्रदायामधील आघाडीचे विचारवंत असून शासनाने निर्हस्तक्षेपाचे धोरण अवलंबावे तसेच खुल्या व्यापाराला पाठिंबा द्यावा इ. त्यांची मते होती. हाच संप्रदाय पुढे ‘मँचेस्टर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या नावाने नावारूपास आला व व्यापार, उद्योग, शासन यांच्यापुढील समस्यांच्या निराकरणाचे कार्य करू लागला.
शैक्षणिक क्षेत्रातही मँचेस्टर प्रथमपासूनच प्रसिद्ध आहे. ‘ओएन्स कॉलेज’ (स्था. १८५१ सांप्रत व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर) हे इंग्लंडमधील मोठ्या नागरी विद्यापीठांचे केंद्र बनले होते. ‘मँचेस्टर ग्रामर स्कूल’ म्हणजे इंग्लंडमधील माध्यमिक शाळांच्या विकासाचा एक आदर्श नमुना म्हणून प्रसिद्धी पावले होते. मँचेस्टर गार्डियन हे उदारमतवादी व प्रभावी वृत्तपत्र येथेच १८२१ मध्ये सुरू झाले. पुढे हे वृत्तपत्र लंडनला नेण्यात आले व द गार्डियन याच नावाने लंडन व मँचेस्टर अशा दोन्ही शहरांतून प्रसिद्ध होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धात लंडनप्रमाणेच मँचेस्टरवरही प्रचंड प्रमाणात बाँबवर्षाव होऊन शहराचे अतोनात नुकसान झाले होते.
मँचेस्टरमध्ये अनेक ग्रंथालये असून जॉन रायलँड्स लायब्ररी (स्था. १८९९), चॅथॅम लायब्ररी (स्था. १६५३) ही प्रमुख ग्रंथालये आहेत. चॅथॅम लायब्ररी ही यूरोपातील पहिल्या मुक्त ग्रंथालयांपैकी एक समजली जाते. मँचेस्टर हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. जॉन डाल्टन (१७६६–१८४४). अर्नेस्ट रदरफर्ड (१८७१–१९३७) व नील्स बोर (१८८५–१९६२) या वैज्ञानिकांनी याच शहरात आणवीय भौतिकीविषयक संशोधन कार्य केले. मँचेस्टरपासून २४ किमी. वरील जॉड्रेल बँक येथे जगामधील सर्वांत मोठ्या रेडिओ ज्योतिषशास्त्रीय वेधशाळांपैकी एक असून तेथे १९५७ पासून एक प्रचंड रेडिओ दूरदर्शक कार्य करू लागला. रशियाच्या स्पुटनिक–१ ह्या पहिल्या अवकाशउपग्रहाचे मार्ग-निरीक्षण करून या वेधशाळेने संबंध जगभर प्रसिद्धी मिळविली होती. जॉड्रेल बँक वेधशाळा मँचेस्टर विद्यापीठाचा संशोधन व अध्यापनविभाग म्हणून कार्य करते. मँचेस्टर येथे अनेक कलावीथी असून चार्ल्स हॅली (१८१९–९५) या जर्मन-ब्रिटिश वाद्यवृंद निर्देशक व पियानो वादकाने १८५७ मध्ये स्थापिलेला ‘हॅली ऑर्केस्ट्रा’ हे सिंफनी वाद्यवृद संगीतजगतात सुविख्यात आहे. १९५८ मध्ये या वाद्यवृंदाची शताब्दी समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. थोर राजनीतिज्ञ व पंतप्रधान रॉबर्ट पील याचे स्मारक येथे असून समीक्षक टॉमस डे क्विन्झी (१७८५–१८५९) यांचे मँचेस्टर हे जन्मग्राम होय.
गद्रे, वि. रा.
“