महारुख : (१) पान, (२) फुलोरा, (३) पुं-पुष्प, (४) स्त्री-पुष्प (परिदले काढलेले), (५) फळांचा झुबका, (६) सपक्ष फळ ( अर्धा भाग काढून टाकलेले), (७) बी.

महारुख : (वारुळ हिं. लिंबडो, महारुक गु. मोटो अर्डुसो क. दोढुमर, हेळबेवू सं. महानिंब, अटरुष इं. ट्री ऑफ हेवन लॅ. एलिअँथस एक्सेल्सा कुल-सिमरूबेसी). या भव्य, सुंदर व पानझडी वृक्षाचा महानिंब असा उल्लेख जुन्या संस्कृत वैद्यक ग्रंथांत (धन्वंतरि-निघंटु आणि राजनिघंटु) आला असून हा मूळचा भारतीय आहे. याचे शास्त्रीय वर्णन प्रथम विल्यम रॉक्सबर्घ यांनी १७९५ मध्ये केले. याच्या एलिअँथस या प्रजातीत सु. ८ जाती असून त्यांपैकी भारतात चार आढळतात. बिहार, छोटा नागपूर, मध्य प्रदेश व गुजरात येथे आणि गंजम, विशाखापटनम् व दख्खन वगैरे भागांतील दाट जंगलात हा वृक्ष सापडतो शिवाय हा श्रीलंकेतही आहे. हा सु. १८–२४ मी. उंच व जलद वाढणारा असून त्याचा घेर १·८–२·४ मी. असतो. साल फिकट करडी-भुरी व खरबरीत असते. पाने मोठी (२५–७५ सेंमी. लांब) , संयुक्त, एकाआड एक, समदली पिच्छाकृती (दलांची संख्या सम असून मांडणी पिसासारखी) दले अल्प संमुख (थोडी समोरासमोर) असून त्यांच्या ८–१४ जोड्या असतात. प्रत्येक दल १०–१५ सेंमी. लांब, तळाशी तिरपे व दातेरी ती विविध आकारांची असतात. फुले पिवळट, लहान, बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी एकाच झाडावर) असून ती फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पानांच्या बगलेतील शाखायुक्त फुलोऱ्यावर [परिमंजरी ⟶ पुष्पबंध] येतात. फुलांत संदले ५, पाकळ्या ५, बाहेर वळलेल्या व सुट्या पुं-पुष्पात १० केसरदले (उभयलिंगीत २–३) व वंध्य-अल्पविकसित किंजपुट स्त्री-पुष्पात वंध्य केसरदले व २–५ भागी किंजपुट असतो [⟶ फूल]. फळे उन्हाळ्याच्या शेवटी येतात ती सपक्ष (पंखयुक्त), १–५ च्या झुबक्यात मोठी, शुष्क, पातळ, पिंगट, रेषाकृति-आयत (४–६ X १ –१·३ सेंमी.) व एकबीजी असतात. फळाच्या मध्यावर एक चपटे बी असते इतर सामान्य शारीरिक लक्षणे सिमरूबेसी कुलातील वनस्पतींप्रमाणे असतात या कुलाचे जुने नाव सिमॅरूबेसी आहे [⟶ लोखंडी हिंगण].

महारुखचा डिंक (बसोरा किंवा हॉग गम) शेवग्याच्या डिंकासारखा लालसर असतो. लाकूड प्रथम पिवळट पांढरे असून नंतर करडे दिसते ते हलके, नरम असून तेवढेसे टिकाऊ नसते. खोकी, आगकाड्या, ढोल, तराफे, मासे पकडण्याच्या जाळ्यांचे तरंड (तरंगण्यास मदत करणारे तुकडे), नावा, तलवारीच्या मुठी, खेळणी इत्यादींसाठी या लाकडाचा उपयोग करतात. पाने जनावरांना चारा म्हणून घालतात, साल सुगंधी असून ती भूक मंद झाल्यावर देतात ती शक्तिवर्धक, ज्वरनाशक, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), उद्वेष्टननाशक (आचके थांबविणारी), स्तंभक (आकुंचन करणारी) असते ती खोकला, दमा, अतिसार, आमांश इत्यादींवर देतात. साल व पाने प्रसूतीनंतर शक्तीची वाढ होण्यास चांगली असतात.

गुग्गुळधूप : (क. हेम्मर लॅ. ए. मलबॅरिका). हा महारुख-सारखा वृक्ष (कधी ३० मी. उंच) त्याच्याच प्रजातीतील असून कोकण आणि उ. कारवारच्या जंगलात, तसेच प. घाटात व खाली कन्याकुमारीपर्यंत आणि ब्रम्हदेश व श्रीलंकेतही आढळतो. याच्या करड्या सालीवर डिंकासारख्या राळेचे लाल कण विखुरलेले आढळतात. सालीवर चिरा पाडल्यास त्यांतून चिकट सुगंधी राळ बाहेर येते ती सुकल्यावर ठिसूळ बनते, ती काळसर उदी किंवा करडी व लवचिक असते. ती जमा करून तिचा उपयोग देवळात धूपाकरिता व अगरबत्त्या बनविण्यास करतात. ह्या वृक्षाच्या हलक्या व नरम लाकडाचा उपयोग महारुखप्रमाणे विविध प्रकारे करतात. सॅटिनचे कापड रंगविण्यास पानांपासून काढलेला काळा रंग उपयुक्त असतो. याची सुगंधी, तुरट व कडू साल ज्वरनाशक असते राळ जुनाट कफ विकार व आमांश यांवर देतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials. Vol. I, Delhi, 1948.

            2. Kirtikar, K.R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol.I, Delhi 1975.

            3. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.            ४. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५. 

 

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.