महाराज्यपाल (गव्हर्नर-जनरल) : ब्रिटिश साम्राज्यांतर्गत विविध वसाहतींत व वसाहतींचे स्वराज्य लाभलेल्या राष्ट्रकुलातील देशांत शासकीय कार्यकारी राज्यप्रमुखास गव्हर्नर-जनरल (महाराज्यपाल) म्हणत. भारतात ब्रिटिश अंमलास सुरूवात झाल्यावर १७७३ च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या नियामक कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भारतीय मुलखाच्या शासन प्रमुखास महाराज्यपाल ही संज्ञा रूढ झाली. सुरूवातीस १८३४ पर्यंत बंगालमधील ‘फोर्ट विल्यम किल्ल्याचा गव्हर्नर-जनरल’ म्हणूनच हे पद सर्वांस ज्ञात होते. पुढे लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या वेळी ते ‘गव्हर्नर-जनरल’ असे झाले. त्यावेळी त्याची नियुक्ती ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या मान्यतेने करण्यात येई. कंपनीच्या अंमलात बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षास व नंतर भारत मंत्र्यास हा जबाबदार असे. १८५८ नंतर कंपनीकडील शासनव्यवस्था सम्राज्ञीच्या अखत्यारीत गेली आणि त्यास राजप्रतिनिधी−व्हाइसरॉय ऑफ इंडिया−हा आणखी एक संलग्न हुद्दा देण्यात आला आणि ब्रिटिश सम्राज्ञीचा तो प्रत्यक्ष प्रतिनिधी समजण्यात येऊ लागला. १९५० मध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर महाराज्यपाल या पदाची समाप्ती झाली. १७७४ ते १९५० दरम्यान अस्थायी नियुक्त्या धरून हिंदुस्थानात एकूण ४७ महाराज्यपाल झाले. त्यांपैकी वॉग्न हेस्टिंग्ज (कार. १७७४−८६) हा पहिला महाराज्यपाल असून चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९४८−५०) हे अखेरचे महाराज्यपाल होते.

ग्रेट ब्रिटनच्या सम्राटाचे आधिपत्य मानणाऱ्या ब्रिटिश राष्ट्रकुलातील देशांत महाराज्यपाल हा सम्राटाचा प्रतिनिधी असून संसदीय लोकशाहीच्या तत्त्वानुसार तो देशाचा वैधानिक प्रमुख असतो. त्याची नियुक्ती संबंधित देशाच्या शासनाच्या शिफारशीनुसार ग्रेट ब्रिटनचा सम्राट व राजा करतो.

ओक, द. ह.