महाबळेश्वर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिस्थान व सातारा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,०६० (१९८१). हे साताऱ्याच्या वायव्येस ५३ किमी. व पुण्यापासून नैर्ऋत्येस १२१ किमी. अंतरावर आहे. पश्चिम घाटाच्या सह्यपर्वरांगांमधील एका विस्तृत सपाट पृष्ठभागाच्या सोंडेवर स. स. पासून १,३७२ मी. उंचीवर महाबळेश्वर वसले आहे. सिंदोला टेकडी हे येथील सर्वोच्य (१,४३५.६ मी.), तर कॉनॉट शिखर (१,४१५.५ मी.) हे दुसरे उल्लेखनीय शिखर होय. मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम याने १८२८ मध्ये साताऱ्याच्या राजाकडून जागा मिळवून तेथे या गिरिस्थानाची स्थापना केली. त्याच्या नावावरूनच याला ‘माल्कमपेठ’ असे नाव पडले.
महाबळेश्वरचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२३ सेमी. असून जुलैमध्ये तेथे सर्वाधिक पाऊस पडतो. हिवाळ्यातील सरासरी तपमान १७.४० से., तर उन्हाळ्यातील सरासरी तपमान ३२.२० से. असते. ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान आल्हाददायक बनते. मार्च ते मे या काळात पर्यटकांची जास्त वर्दळ असते.
भरपूर पर्जन्यामुळे महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर दाट वनश्रींनी वेढलेला असून अनेकविध वनस्पतिप्रकार येथे आढळतात. त्यांत जांभूळ, ओक, हिरडा, अंजन, आंबा, बेहडा, वरस, कारवी यांचे प्रमाण असून आर्थिक या महत्त्वाच्या आहेत. जंगलात बिबट्या, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, वानर, माकडे इ. प्राणी व वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. महाबळेश्वरच्या पक्ष्यांमध्ये बुलबुल, स्परफाउल, बर्ड ऑफ पॅरडाइज, सोनेरी हळदी, पाण कावळा, सुतार पक्षी, सारिका पक्षी, कोकिळा तसेच हनीसकर यांसारखे विविध प्रकारचे पक्षीही दिसून येतात.
शहरापासून उत्तरेस सु. चार किमी. वर जुने क्षेत्र महाबळेश्वर आहे. यावरून या गिरिस्थानाला महाबळेश्वर हे नाव पडले. महाबळेश्वराच्या मंदिराजवळ कृष्णाबाई व अतिबलेश्वर (विष्णू) ही दोन मंदिरे आहेत. कृष्णाबाई मंदिरात कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री ह्या पाच नद्यांची उगमस्थाने दर्शविली जातात. तीन मीटर अंतरावर या पाच नद्यांचे पाणी एकत्र येऊन एका गोमुखातून एका कुंडात पडते व त्यातून दुसऱ्या कुंडात जाते. याला ‘ब्रम्हकुंड’ असे म्हणतात. याशिवाय दर बारा वर्षांनी प्रकटणारी भागीरथी व दर ६० वर्षांनी प्रकटणारी सरस्वती या दोन नद्या वरील पंचनद्यांच्या दोन्ही बाजूंस असल्याचे भाविक मानतात. महाबळेश्वर अथवा अतिबलेश्वर ही नावे ‘महाबल’ व ‘अतिबल’ या दोन बलवान व शूर अशा राक्षस बंधूंवरून आली, अशी आख्यायिका आहे. फाल्गुन महिन्याच्या वद्य पक्षात पाच दिवस कृष्णाबाईचा उत्सव, आश्विन महिन्याच्या वद्य पक्षात दहा दिवस नवरात्र व माघ महिन्यात सात दिवस शिवरात्री, असे तीन उत्सव दरवर्षी होतात. येथे माणिकबाई व गंगाबाई हिंदू आरोग्यधाम आहे.
यादवकालापासूनच महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. साताऱ्याच्या राजाकडून येथील सृष्टिसौंदर्याचे वर्णन ऐकल्यावरून जनरल लॉडविक याने १८२४ मध्ये या भागाची पायी फिरून पाहणी केली. १८२६ मध्ये जनरल ब्रिग्ज याने येथे एक कुटी उभारली व साताऱ्याच्या महाराजांना साताऱ्यापासून येथपर्यंत रस्ता बांधण्यास प्रवृत्त केले. १८२७ मध्ये मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम याने येथे युरोपीय सैनिकांकरिता एक रुग्णालय बांधले. १८२८ मध्ये मॅल्कम पुन्हा येथे आला. येताना त्याने डॉ. विल्यम्सन याला आणले आणि येथील हवामानाच्या परिस्थितीचा अहवाल त्याची येथेच नेमणूक केली. सरकारकडून भाजीपाला उत्पादनात चिनी गुन्हेगारांचा उपयोग करून घेण्यात येऊ लागला. काही कालावधीतच एक प्रसिद्ध गिरिस्थान म्हणून माल्कमपेठ (महाबळेश्वर) भरभराटीस आले. मॅल्कम याने ही जागा साताऱ्याच्या महाराजांकडून दुसऱ्या एका जागेच्या मोबदल्यात घेतली. कोळी, धनगर, धावड व कुळवाडी या येथील मूळच्या जमाती आहेत. चिनी व मलायी कैदी ठेवण्याकरिता येथे १२० कैदी राहतील एवढा कैदखाना बांधण्यात आला होता. येथील कैद्यांनी बटाट्याची व विलायती भाजीपाल्यांची लागवड ऊर्जितावस्थेत आणली. १८६४ मध्ये हा कैदखाना बंद करण्यात आला.
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची आवडती अशी अनेक सौंदर्यस्थळे (पॉइंट्स) आहेत. उदा., आर्थरसीट (स. स. पासून उंची १,३४७.५ मी.), एल्फिन्सन पॉइंट (स. स. पासून उंची १,२७५ मी.) सिडनी किंवा लॉडविक पॉइंट (१,२४० मी), बाँबे पॉइंट, कार्नाक, फॉकलंड, सासून, बॅबिंग्टन (१,२९४ मी.), केट्स पॉइंट, सिंदोला, विल्सन पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर, वेण्णा लेक (सरोवर), प्रतापसिंह उद्यान, वेण्णा किंवा लिंगमळा धबधबा ही महाबळेश्वर येथील सौंदर्यस्थळे असून प्रतापगड, मकरंदगड, कमळगड, पाचगणी ही परिसरातील सौंदर्यस्थळे आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ त्यांच्या नावांनीच ही सौंदर्यस्थळे ओळखली जातात. बाँबे पॉइंटवरून सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यास पर्यटक विशेष उत्सुक असतात. आर्थरसीटपासून ६० मी.खाली असलेला झरा (टायगर स्पिंग), केट्स पॉइंट येथील नाक खिंड (नीडल होल), वेण्णा सरोवरातील नौकाविहार व जवळच असलेला लिंगमळा धबधबा (१५२ मी.) व त्याचा परिसर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत.
येथील फ्रेअर हॉल १८६४ मध्ये बांधण्यात आला असून त्यात ग्रंथालय व वाचनालय आहे. येथे महाबळेश्वर क्लब, पारशी जिमखाना, हिंदू जिमखाना इ. असून टेबल-टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांच्या सोयी आहेत. अलीकडे येथे स्केटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहे, बेकविथ स्मारक इ. वास्तू येथे आहेत. स्ट्रॉबेरी, रासबेरी ही येथील वैशिष्ट्यपूर्ण फळे होत. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी तसेच मुरंबे व जेलीसाठीही प्रसिद्ध आहे. गहू, नाचणी, वरी, तांदूळ, सातू, कोबी, तांबडे बटाटे, गाजरे ही कृषिउत्पादने येथे घेतली जातात. कॉफीचीही लागवड करण्यात आलेली आहे. शासनातर्फे सिंकोनाच्या झाडांची लागवड करण्यात आली, परंतु ती विशेष यशस्वी झाली नाही. येथे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. (स्था. १९४१). प्रामुख्याने तांबेरा-प्रतिबंधक गव्हाच्या जाती शोधून काढण्यासाठी हे संशोधन-केंद्र कार्य करते. येथे तीन मधुमक्षिकागृहे आहेत. त्यांपैकी एक खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे, तर ‘मधुकोश’ व ‘मधुसागर’ ही दोन सरकारी संस्थांमार्फत चालविली जातात. आकर्षक नक्षीकाम केलेल्या पांढरीच्या काठ्या तयार करणे, पर्यटकांची घोड्यांवरून रपेट मारण्याची होस पुरविणे, पर्यटकांसाठी हॉटेल व राहण्याच्या सोयी उपलब्ध करून देणे इ. व्यवसाय येथे चालतात. पर्यटकांसाठी राज्य शासनातर्फे हॉलिडे कँपचीही (विश्रामधाम) सोय आहे. १८६७ मध्ये येथील नगरपालिकेची स्थापना झाली. पर्यटकांपासून नगरपालिकेला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. महाबळेश्वर-पाचगणी विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून ‘सुंदर महाबळेश्वर योजने’ला गती मिळाली आहे.
चौधरी, वसंत
“