महापात्र, नित्यानंद : (१९१२ − ). ओडिया कवी, कादंबरीकार व कथाकार. प्रख्यात ओडिया कवी लक्ष्मीकांत महापात्र यांचे नित्यानंद हे पुत्र. नित्यानंदांचा जन्म बलसोर जिल्हातील भद्रक ह्या गावी झाला. इंग्रजी शाळेतील आपले शिक्षण मध्येच सोडून देऊन त्यांनी स्वातंत्रचळवळीत उडी घेतली. लक्ष्मीकांत महापात्र यांनी सुरू केलेल्या डगोरा ह्या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. लेखनाव्यतिरिक्त पत्रकारिका आणि राजकारण ही त्यांनी आपली कार्यक्षेत्रे निवडली.
स्वतःचे नाव लोकांस कळू नये म्हणून त्यांनी ‘अवधूत’, ‘अनाम’, ‘संघमित्र’, ‘नि. म.’ इ. टोपणनावे धारण करून काव्य, कथा, कादंबरी इ. प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांच्या ग्रंथांची विसांवर भरते. त्यांत मरम (१९३७), पांचजन्म (१९४७), कलारदी (१९५४) हे काव्यसंग्रह मुल (१९३५), जीअंता मणिश (१९४६), जीवनर लक्ष्य (१९४६), हिडमाटि (१९४८), पिरति पथ खसडा(१९५१), मंगहद (१९५५) ह्या कादंबऱ्या एगारटा (१९४७) व क्षणिका (१९४८) हे कथासंग्रह यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)