महादेशजनक हालचाली : ज्यांच्यामुळे मुख्यत्वे पृथ्वीचे कवच वरखाली होऊन हजारो चो. किमी. च्या म्हणजे खंडा−उपखंडाएवढ्या क्षेत्रावर परिणाम होतो, त्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाचे स्वरूप बदलते आणि पर्वत, पठारे, द्रोणी इ. प्रचंड भूमिरुपे निर्माण होतात म्हणून या प्रक्रियेला महादेशजनन म्हणतात. ह्या हालचाली अतिशय मंदपणे घडून येतात त्यांच्यामुळे खडकांना सहसा घड्या पडत नाहीत आणि पडल्यास तर त्या अगदी सौम्य स्वरूपाच्या असतात.

पृथ्वीच्या इतिहासात भूकवचाच्या हालचाली अनेकवार घडून आल्या आहेत. त्या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात : (१) गिरिजनक : यांच्यामुळे खडकांना घड्या पडून व ते वर उचलले जाऊन पर्वतरांगा निर्माण होतात [उदा., हिमालय ⟶गिरिजनन]. (२) महादेशजनक : गिरिजनक हालचालींप्रमाणे भूकवचनाच्या अरुंद व लांबट पट्ट्यात घडून न येता स्थिर अशा ढालक्षेत्रातील विस्तृत प्रदेशात घडतात. तसेच गिरिजननाशी निगडित असणारी अंतर्वेशने (शिलारस घुसण्याची क्रिया) व तीव्र रूपांतरण (तापमान आणि दाब यांच्यातील बदलाने खडकांत बदल होण्याची क्रिया) या क्रिया महादेशजननाशी निगडित नसतात.

कित्येकदा महादेशजनक हालचालींमध्ये भूकवचाला लांब भेगा पडून त्याचे ठोकळ्यासारखे भाग विभंगाने (तडे पाडण्याच्या क्रियेने) वर किंवा खाली सरकतात. सापेक्षतः वर सरकलेल्या ठोकळ्याचे पर्वत वा पठार होते, तर खचलेल्या भागात खंदकासारख्या दऱ्या वा द्रोणी तयार होतात.

भारतातील दख्खनचे पठार, तिबेटचे पठार, कोलोरॅडो पठार, आफ्रिकेतील पठारी प्रदेश, पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या [खंदकासारखा आकार असणाऱ्या दऱ्या ⟶खचदरी], ऱ्हाईन खचदरी, हडसन उपसागर इ. महादेशजनक हालचालींची उदाहरणे होत. आफ्रिकेतील खचदऱ्याप्रमाणे तांबडा समुद्र आणि एडनचे आखात हेही खचलेले प्रदेश आहेत. तथापि या प्रदेशात खंडीय भूपट्ट सरकून समुद्रतळ विस्तरणाची क्रिया होत आहे [⟶ भूपट्ट सांरचनिकी].

महादेशजनक हालचालींमुळे निक्षेपणात (गाळ साचण्याच्या क्रियेत) खंड पडून थरांमध्ये प्रादेशिक (मोठ्या) प्रमाणावर विसंगती व सागरी भागात प्रतिक्रमणी निक्षेप (समुद्र मागे हटताना साचणारे गाळ) यांसारख्या संरचना निर्माण होतात. महादेशजनक हालचाली घडून येण्याचे कारण अजून नीटसे स्पष्ट झालेले नाही परंतु भूकवचाखालील प्रवारणात (भूकवच व गाभा यांच्यातील सु. २,९०० मी. जाड भागात) घडून येणाऱ्या बदलांमुळे त्या होतात, असे एक मत आहे. काही भूवैज्ञानिकांच्या मते महादेशजननाची मोठी चक्रे ओळखता येऊ शकतात.

पहा : कवच विरूपण गिरिजनन भूविज्ञान.

गाडेकर, दि.रा.