महांति, सुरेंद्र : (२८ ऑक्टोबर १९२०− ). प्रसिद्ध ओडिया कथा-कादंबरीकार, समीक्षक, राजकारणपटू व पत्रकार. जन्म कटक जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे. पदवी न घेताच महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते लेखक व पत्रकार म्हणून काम करू लागले. राजकारणातही ते सक्रियपणे भाग घेतात. राज्यसभेचा (१९५१−५६) व लोकसभेचे (१९५६−६२) ते सदस्य होते. ऑब्झर्व्हर या इंग्रजी साप्ताहिकाचे (१९४५−४७) तसेच जनता (१९४७−५१), गणतंत्र (१९५१-५६) आणि कलिंग (१९६४−७३) या साप्ताहिकाचे व दैनिकाचे ते संपादक होते.

त्यांनी कथा, कादंबऱ्या, साहित्येतिहास, समीक्षा इ. प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या विसावर भरते. नील शैल ह्या त्यांच्या कादंबरीस १९७० मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कारही लाभला. त्यांची लेखनशैली स्वतंत्र असून ती प्रवाही, काव्यात्म पण त्याचसोबत उपरोधिक व चित्रमयी अशी आहे. आधुनिक शहरी व ग्रामीण जीवनाची विविध अंगे त्यांनी आपले कथाविषय म्हणून निवडली आहेत आधुनिक ओडियातील एक श्रेष्ठ कथालेखक म्हणून त्यांचा लौकिक आहे. यांच्या कथेतील सूचकता, व्यापक दृष्टी, सूक्ष्म उपरोध आणि बौद्धिक आवाहन विशेष लक्षणीय आहे. काही कथांतून त्यांनी ओरिसातील वाङ्मयीन व राजकीय दांभिकतेवर उपरोधपूर्ण कठोर प्रहार केला आहेत तर काही कथांतून जीवनाचे मूलभूत प्रश्न मांडले आहेत. राजकारणात त्यांचा बराच वेळ खर्ची पडत असल्याकारणाने अलीकडे त्यांचे कथा व इतर लेखन रोडावले आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कृती अशा : कथा−मोहनगरीर रात्री (१९५०), कृष्णचूड (१९५१), रुटी ओ चंद्र (१९५४), शेष कविता (१९५५) कादंबरी−नील शैल समीक्षा−फकीरमोहन-समीक्षा (१९५५), ओडिया साहित्यर इतिहास (पूर्वार्ध−१९६४) इत्यादी. १९७९ मध्ये त्यांना कुलवृद्धा या कृतीसाठी १०,००० रुपयांचा ‘सारळा पुरस्कार’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)