मसाले : खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक व स्वादिष्ट बनविण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात, त्यांना ‘मसाले’ असे म्हणतात. मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढविणे व तो जास्त काळ टिकविणे (उदा., लोणचे) हेही उद्देश असू शकतात. काही मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा उपयोग आसवे, अर्क, सायरप इ. तयार करण्यासाठी करण्यात येतो. सामान्यतः वनस्पतींची मुळे मूलक्षोडे (जमिनीत आडवी वाढणारी , जाडसर खोडे, उदा., आले, हळद वगैरे) साली पाने फळे बिया फुले इ. भाग वाळवून मसाले म्हणून वापरतात. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढिलिंबाची पाने इ. पदार्थ तसेच वाळवून चूर्णरूप करून वा द्रव अर्करूपात वापरतात. काही मसाल्याच्या पदार्थांचे संश्लेषित (कृत्रिम) अर्कही आता तयार करण्यात आलेले आहेत. मसाल्याचे पदार्थ एकएकटे वा मिश्रणाच्या रूपात वापरले जातात. या पदार्थांत पोषणमूल्य जवळजवळ नसल्यामुळे त्यांचा ‘अन्न’ या संज्ञेत समावेश होऊ शकत नाही.

पाश्चिमात्य देशांत खाद्यपदार्थ तयार करताना वा शिजविताना जे मसाल्याचे पदार्थ (उदा., मिरी, मिरची, हळद इ.) वापरतात त्यांना ‘स्पाइसेस’ असे म्हणतात, तर तयार झालेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करताना जे पदार्थ त्यात मिसळण्यात येतात (उदा., चटणी, सॅलड, ड्रेसिंग इत्यादींत वापरण्यात येतात) त्यांना ‘कौंडिमेंट्स’ म्हणतात. कोथिंबीर, काळी मिरी इ. मसाल्याच्या पदार्थांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार दोन्हींत करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत या दोन्हींना मसाल्याचे पदार्थ असेच संबोधिलेले आहे.

बहुतेक मसाल्याचे पदार्थ सुवासिक वा झोंबणाऱ्या वासाचे असतात. या पदार्थांना असणारा विशिष्ट वास हा त्यात असणाऱ्या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) वा अबाष्पनशील तेलांमुळे येतो. रासायनिक दृष्ट्या मसाल्याच्या पदार्थांत कार्बोहायड्रेटे (स्टार्च, सेल्युलोज, शर्करा इ. द्रव्ये) जास्त प्रमाणात असून कमी जास्त प्रमाणात प्रथिने, टॅनिने, रेझिने, रंगद्रव्ये, खनिजे (लोह, गंधक, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, क्लोरीन इ.) आणि बाष्पनशील तेले हे प्रमुख घटक आढळून येतात.

बहुतेक मसाल्याचे पदार्थ ज्या वनस्पतींपासून मिळवितात त्या वनस्पती बहुतकरून उष्ण कटिबंधातील (आशिया, आफ्रिका व अमेरिका या खंडातील) प्रदेशांत आढळतात.

इतिहास : मानवाला अतिप्राचीन काळापासून माहीत असलेल्या व्यापारांपैकी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार हा एक आहे. या व्यापाराच्या मार्गाचे वर्णन त्या काळातील आशियातील संस्कृतीच्या इतिहासवर्णनात आढळते. आग्नेय चीन व अरबस्तान यांमध्ये हा व्यापार खुष्कीच्या आणि समुद्रकिनाऱ्या किनाऱ्याने होत असे. दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे, आले (सुंठ) व हळद हे मसाल्याचे पदार्थ पूर्वेकडील लोकांना फार प्राचीन काळापासून माहीत होते तसेच ते लोक या पदार्थांचे उत्पादन , वापर व व्यापारही करीत असत.

इ. स. पू. सु. २००० च्या सुमारास मध्यपूर्वेत दालचिनी व तमालपत्र हे मसाल्याचे पदार्थ आले असावेत. बायबलमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. त्या काळी मसाल्याच्या पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर व व्यापार फायद्यात चालत असे. मसाल्याच्या व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या देणगी-करांचा वाटा सॉलोमन राजाच्या (इ. स. पू. सु. ९७३–९३३) वार्षिक उत्पन्नात असे. दालचिनी व तमालपत्र मध्यपूर्वेत अरबांनी आणल्यानंतर, त्यांनी त्यांच्या उगमस्थानाबद्दल गुप्तता राखली व त्यांच्या निर्मितीविषयी अनेक दंतकथा प्रसारित केल्या. मात्र थोरले प्लिनी (इ. स. पहिले शतक) यांना या दंतकथा पटलेल्या नव्हत्या. स्ट्रेबो (इ. स. पू. ६४?–इ. स. २०?) यांनी Geographyया आपल्या ग्रंथात अरबांच्या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराविषयी उल्लेख केलेला आहे.

नौकानयन कौशल्य, मॉन्सून वारे इत्यादींच्या सखोल अभ्यासामुळे अरबांनी इ. स. पू. काळी समुद्रमार्गे मसाल्यांच्या बेटांकडे (इंडोनेशियातील सेलेबीझ व न्यू गिनी याच्या दरम्यानच्या मोलकाझ बेटांकडे) प्रवास केला. त्याच सुमारास चिनी लोक समुद्रमार्गे या बेटांकडे गेले होते. त्या काळी श्रीलंका हे मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराचे प्रमुख व मध्यवर्ती स्थान होते.

टॉलेमी राजांच्या काळात (इ. स. पू. ३२३–इ. स. पू. ३० ) ईजिप्त व भारत यांच्यात व्यापारास सुरुवात झाली. रोमन लोकांनी त्यात वाढ केली. इ. स. पू. ३३२ च्या सुमारास ईजिप्तमध्ये ॲलेक्झांड्रिया बंदराची स्थापना झाली व लौकरच ते मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराचे एक केंद्र बनले. या बंदरातूनच रोममध्ये मसाल्याचे पदार्थ प्रथम पाठविले गेले. भारताबरोबरच रोमचा व्यापार इ. स. सहाव्या शतकात बंद पडला, मात्र अरबांचा चालू होता. याही काळात श्रीलंकेला महत्त्वाचे स्थान होते. इ. स. दहाव्या शतकात व्हेनिसचा उदय झाला व लौकरच ते मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. तेराव्या शतकात या व्यापारात व्हेनिसची मक्तेदारी होती. तेथून मसाल्याचे पदार्थ यूरोपमध्ये सर्वत्र जात. पंधराव्या शतकात तेथील मसाल्याचा व्यापार भरभराटीस पोहोचला होता. आग्नेय चीन, ईस्ट इंडीज, श्रीलंका व भारत येथून मसाल्याचे पदार्थ ॲलेक्झांड्रिया-व्हेनिस मार्गे यूरोपात जात असत.

यूरोपियनांना मसाल्याच्या पदार्थांचे उगमस्थान माहीत होते पण बहुतेक व्यापार अरबांच्या मार्फत होत असे तसेच या व्यापारातील व्हेनिसचे महत्त्व कमी करणे अशक्य झाले होते. तुर्कांनी कॉन्स्टॅंटिनोपल (इस्तंबूल) शहर १४५३ मध्ये जिंकल्याने यूरोप व आशियामधील व्यापाराचा खुष्कीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पूर्वेकडील मसाल्याच्या प्रदेशांकडे जाण्यासाठी (विशेषतः भारताकडे) समुद्रमार्गे जाण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न झाले. या प्रयत्नांत पोर्तुगीजांना प्रथम यश आले. १४९८ मध्ये वास्को द गामा भारतात कालिकत येथे आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होपमार्गे येऊन पोहोचले आणि १५०१ मध्ये पेद्रू आल्व्हारीश काब्राल यांनी लिस्बनला मसाल्याचे पदार्थ नेले. यानंतर डच लोक मसाल्याच्या बेटांकडे समुद्रमार्गांनी गेले.

मसाल्याच्या पदार्थांना यूरोपमध्ये बाजारभाव वाजवीपेक्षा जास्त मिळे व नफाही जास्त होत असे. यामुळे यूरोपमधील बरीच राष्ट्रे या व्यापारात उतरली. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधून काढल्यानंतर एक शतकभर त्यांची या व्यापारावर पकड होती. पुढे इंग्रज आणि डच या व्यापारात आले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मिऱ्याच्या व्यापाराची मक्तेदारी डच लोकांकडे होती. यामुळे बऱ्याच यूरोपियन राष्ट्रांनी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपन्या स्थापन केल्या. १६०० मध्ये ब्रिटिश, १६०२ मध्ये डच व १६६४ मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्या स्थापन झाल्या. यामुळे पोर्तुगीज या व्यापारात मागे पडले. ही स्पर्धा शेवटी एकोणिसाव्या शतकात संपली. या शतकात ब्रिटिशांनी भारत व श्रीलंकेमधील व्यापारात, तर डचांनी ईस्ट इंडीजच्या बऱ्याच भागामधील व्यापारात वर्चस्व मिळविले. या स्पर्धेमुळे व्हेनिस शहराची मसाल्याच्या व्यापारातील मक्तेदारी संपविण्यात यूरोपियन राष्ट्रांना यश मिळाले. अठराव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेची संयुक्त संस्थाने या व्यापारात उतरली. तेथील सेलेम, बोस्टन व न्यूयॉर्क ही बंदरे मसाल्याच्या व्यापारासाठी प्रसिद्धीस आली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मसाल्याचा व्यापार स्थिर झाला व लंडन हे शहर त्याची प्रमुख बाजारपेठ झाली. १९७० च्या सुमारास त्याची जागा न्यूयॉर्कने घेतली.


उपयोग : प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग औषधे म्हणून, पवित्र तेले व मलमे तयार करण्यासाठी आणि कामोत्तेजक पदार्थ म्हणून करण्यात येत होता, असे उल्लेख आढळले आहेत. त्यांचा वापर धर्मगुरू पूजेत व जादुटोण्यासाठीही तर विलासप्रिय रोमन सरदार मद्याला स्वाद आणण्यासाठी, स्नानाचे पाणी सुगंधित करण्यासाठी, शरीर लेपनासाठी व धूप म्हणून जाळण्यासाठीही करीत असत. चीन, सुमेर, ॲसिरिया, ईजिप्त, ग्रीस, रोम इ. संस्कृतींत मसाल्याच्या पदार्थांचा वापर रोगोपचारासाठी करीत असत. हिपॉक्राटीझ,गेलेन व पेडॅनिअस डायस्कारिडीझ हे वैद्य त्यासाठी प्रसिद्ध होते. इ. स. पहिल्या शतकात थोरले प्लिनी यांनी Historia Naturalisया ग्रंथात त्या काळी माहीत असलेल्या रोगांवर वापरण्यात येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची रोग बरे करण्याची शक्ती व काळ यांचे वर्णन केले आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या रोगनिवारणातील वापरात पुढे सुधारणा होऊन तो मध्ययुगात व आधुनिक काळाच्या आरंभापर्यंतही बराच प्रचलित होता. मानवाने मसाल्याचा वापर खाद्यपदार्थांत कधीपासून केला हे ज्ञात नाही. मद्यनिर्मितीत व तेलासाठी तीळ फार पूर्वीपासून वापरीत असत. तसेच कांदा व लसूण यांचा वापर फार पूर्वीपासून अन्नाचा एक घटक व मसाल्याचे पदार्थ म्हणून करण्यात येत होता. प्राचीन ग्रीक लोक बऱ्याच मसाल्याच्या पदार्थांचा वापर खाद्यपदार्थ व पेये स्वादिष्ट करण्यासाठी करीत असत. इतर देशांतून आयात केलेल्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर फक्त श्रीमंत वर्गच करीत असे. तेराव्या शतकात मार्को पोलो यांना चीनमध्ये श्रीमंत लोक मसाल्यातील मांसपदार्थ खात असलेले आढळले पण गरीब लोक यासाठी लसणाचा वापर करीत असत. यूरोपमध्ये खाद्यपदार्थ खवट होणे, खराब होणे इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच स्वादिष्ट करण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करण्यास हळूहळू सुरुवात झाली. मध्ययुगापर्यंत बरेच मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थात वापरण्यात येऊ लागले. पूर्वेकडील देशांतून येणारे मसाल्याचे पदार्थ त्यांच्या किंमतीमुळे श्रीमंत लोकांच्याही आवाक्याबाहेर होते पण मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार जसजसा प्रगत होत गेला, तसतसे हे स्वरूप पालटू लागले आणि तिखट, सुवासिक मसाल्याचे पदार्थ गरीब-श्रीमंत लोक सारख्याच प्रमाणात वापरू लागले.

मसाल्याच्या पदार्थांचे आधुनिक उपयोग जास्त करून खाद्यपदार्थातच करण्यात येतात. संस्कारित मांस, विविध सॉसेज, सॉस, शिर्का (व्हिनेगार), लोणची, चटण्या, बिस्किटे, पेये, मेवामिठाई आदि खाद्यपदार्थ उद्योगांत मसाल्याच्या पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. मसाल्याचे पदार्थ व त्यांपासून काढण्यात येणारी तेले ॲबसिंथ, ॲनिसेट, बेनिडिक्टीन, क्रीम-द-मेंथ यासारखी अल्कोहॉलयुक्त पेये तयार करण्यात येणारी बाष्पनशील तेले, सुवासिक द्रव्ये, सौंदर्यप्रसाधने, दंतधावने, स्नानाचे साबण व सुवासिक तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. मसाल्याच्या पदार्थांचा औषधी वापर पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. भारत व इतर आशियाई राष्ट्रे यांमध्ये अद्यापिही मसाल्याच्या पदार्थांचा औषध म्हणून त्यांचा वापर मर्यादित प्रमाणात करण्यात येतो.

तयार करण्याची कृती : वनस्पतींच्या विविध भागांपासून मसाल्याचे पदार्थ तयार करण्यात येत असल्याने ते तयार करण्याच्या कृतीतील प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. पाने, साली, फुले व फळे यांपासून तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांच्या कृतीत साफसफाई करणे, सूर्यप्रकाशात वा कृत्रिम उष्णतेने वा दोन्ही पद्धतींनी वाळविणे, सुकविणे वा प्रतवारी करणे इ. प्रक्रियांचा समावेश असतो तर फळांच्या आतील बियांचा (उदा., तीळ, जिरे, ओवा) वापर मसाले म्हणून करण्यात येत असेल तर कापणी, मळणी, साफ सफाई, वाळविणे, प्रतवारी करणे इ. प्रक्रियांचा समावेश असतो. मिरची, कोथिंबीर, पुदिना इ. हिरव्यागार स्थितीत वापरता येतात तसेच ते पदार्थ वाळवून, चूर्ण करूनही वापरतात. कोथिंबीरीची पाने तशीच व वाळवून वापरतात, तर तिच्या बिया (धने) कापणी, मळणी, सफाई, वाळविणे, प्रतवारी करणे इ. प्रक्रिया करून वापरतात. आले तसेच वापरतात किंवा ते शिजवून (प्रक्रिया करून) व वाळवून केलेली सुंठ या स्वरूपातही वापरतात. हळद शिजवून-वाळवून वापरतात. कांदा-लसूण हे पदार्थ थोड्या प्रमाणात वाळवून वापरण्यात येतात.

मसाल्याचे पदार्थ दळून चूर्णरूप करतात. चूर्ण तयार करणे हा एक खास उद्योग झालेला आहे. साली व मुळे यांचे चूर्ण करण्यास योग्य होतील इतपत लहान तुकडे करणारी पातीयुक्त कर्तन यंत्रे वापरतात. चूर्ण करण्यासाठी विविध प्रकारांची दळण यंत्रे वापरतात. ह्या यंत्रांत दळताना जादा उष्णता निर्माण होऊ देत नाहीत. नाही तर मसाल्याच्या पदार्थांतील महत्त्वाची व सुवासिक बाष्पनशील तेले कमी होतात. हे पदार्थ दळल्यावर चाळतात व ते एकजीव होण्यासाठी विशिष्ट मिश्रक यंत्राचा वापर करतात.

मसाल्याच्या पदार्थांचा अर्क योग्य बाष्पनशील विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) वापरून काढतात. ह्या अर्कात बाष्पनशील तेले, विद्राव्य (विरघळणारी) रेझिने व मसाल्यातील इतर घटक द्रव्ये आढळतात. हे अर्क संहत करून (विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवून) द्रवरूप मसाले तयार करतात. बाष्पनशील तेले व ओलिओरेझिने विविध प्रकारे व योग्य प्रमाणात मिसळून संश्लेषित अर्क तयार करतात. द्रवरूप मसाले बाटल्यांत भरून योग्य प्रकारे बंद व आवेष्टित करून बाजारात विक्रीस पाठवितात.

सर्व प्रकारचे मसाल्याचे पदार्थ नेहमी शुष्क, आरोग्यदृष्ट्या स्वच्छ, कृंतकरोधी (उंदरांसारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून सुरक्षित) व शीत जागेत साठवितात. मसाल्याच्या पदार्थांत बुरशीची व कीटकांची वाढ होऊ नये म्हणून साठवणीच्या जागी आर्द्रता व तापमान योग्य प्रकारे नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. 

दळण्यापूर्वी मसाल्याचे पदार्थ जास्त काळ साठवू नयेत कारण त्यांतील बाष्पनशील द्रव्ये हळूहळू निघून जातात. दळलेले मसाले उघडे ठेवू नयेत ते घट्ट डब्यात साठवावेत नाही तर त्यांतील बाष्पनशील व स्वादकारक घटक उडून जातात. 

मसाल्याचा प्रकार (पदार्थ) व आवेष्टन प्रकार यांवर मसाला वापरण्यायोग्य स्थितीत साठविता येण्याचा कालावधी अवलंबून असतो. तयार करण्याच्या दिवसापासून धातूच्या डब्यातील पातळ तुकड्यांच्या स्वरूपातील मसाले १२ महिने, कागदी पुठ्ठ्याच्या खोक्यातील मसाले (अखंड) १८ महिने, धातूच्या डब्यातील दळलेले मसाले २४ महिने व काचेच्या बाटल्यांतील मसाले ३६ महिने इतके टिकतात. त्यानंतर त्यांतील स्वादकारक घटक हळूहळू उडून जातात. 

ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी व उद्योगाचे नियमन करण्याच्या दृष्टीने निर्यातदार, आयातदार व उत्पादक यांच्याकरिता मालासंबंधीची काही मानके (प्रमाणभूत गुणधर्म वा नियम) ठरविणे अत्यावश्यक आहे. हे सर्वमान्य असले, तरी मसाल्याच्या पदार्थांच्या बाबतीत काही देशांतच अशी मानके प्रचारात आहेत. तथापि अधिकाधिक देशांत अशी मानके ठरविण्याकडे आता कल दिसून येत आहे. मानकांत ठरविलेल्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांच्या कमाल व किमान मर्यादांमुळे हलक्या दर्जाच्या व भेसळयुक्त मालापासून ग्राहकाला संरक्षण मिळू शकते. 

व्यापार : मसाल्याच्या पदार्थांच्या वनस्पती त्यांच्या मूलस्थानांशिवाय योग्य हवामानाच्या इतर प्रदेशांत हल्ली लागवडीत असलेल्या आढळून येतात. उदा., आले मूळचे आग्नेय आशियातील आहे पण हल्ली जगातील अनेक देशांत त्याची लागवड होते. मिरची ही मूळची मध्य अमेरिकेतील असली, तरी आता सर्वत्र लागवडीत आहे. जगातील अनेक भागांत मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन होत असले व ते वाढलेले असले, तरी ते अत्यधिक नाही कारण या पदार्थाचा वापरही जगभर मोठ्या प्रमाणात होत आहे.

 


कोष्टक क्र. १ काही महत्त्वाच्या मसाल्याच्या पदार्थाची माहिती

पदार्थाचे नाव 

वनस्पतीचे नाव व तिच्या व तिच्या कोणत्या भागापासून मिळवितात, प्रक्रिया, मूलस्थान व लागवडीचे प्रदेश 

स्वादकारक घटक 

गुणधर्म 

उपयोग 

अजमोदा*

एपियम ग्रॅव्हिओलेन्स या वनस्पतीचे पक्व व वाळविलेले फळ मूळचे यूरोपमधील, इंडोनेशिया, भारत, द. फ्रान्समध्ये लागवड भारतात पंजाब, द. भारत, उत्तर प्रदेश व हिमालयाच्या पायथ्याशी लागवड.

सेलिनीन

लहान आकारमानाचे व करड्या रंगाचे बी वैशिष्ट्यपूर्ण व उग्रवास काहीशी कडवट चव.

टोमॅटो केचप, सूप, सॅलड, भाज्या, चीज, मांस, मासे इ. अन्नपदार्थांत स्वादासाठी अजमोदा टॉनिकचा प्रमुख घटक.

ॲनिस बी (ॲनिसीड)

पिंपिनेल ॲनिसियम या वनस्पतीचे पक्व आणि सुकविलेले फळ मूळचे भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील स्पेन, मेक्सिको, नेदर्लंड्स, रशिया, बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया, तुर्कस्तान. टांझानिया इ. भागांत लागवडीत भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, ओरिसा येथे लागवड.

ॲनेथॉल

गोड व ज्येष्ठमधासारखा स्वाद इतर गुणधर्म शहाजिऱ्याप्रमाणे.

केक, मेवामिठाई, पेये, मद्ये इत्यादींत स्वादासाठी.

आले*

झिंजिबर ऑफिसिनेल या वनस्पतीचे मूलक्षोड ओल्या स्वरुपात तसेच प्रक्रिया करून, सुकवून व चूर्ण करून, सुंठ या स्वरुपातही वापरतात. भारत, जमेका, नायजेरिया, सिएरा लेओन, केन्या, ग्वातेमाला इ. ठिकाणी लागवड भारतात महाराष्ट्र, केरळ उ. प्रदेश व आंध्र प्रदेश येथे लागवड.

झिंजिबेरीन

सुसाह्य व मसालेदार वास झोंबणारा व तिखट स्वाद विभागपरत्वे स्वादात फरक आढळून यतो.

जिंजर एल व जिंजर बिअर या पेय निर्मितीत बेकरी उत्पादने, मेवामिठाई, लोणची, सॉस, मांस, करी पावडर इ. खाद्यपदार्थात, तसेच औषधांत.

ऑरेगॅनो

लिपिया ग्रॅव्हिओलेन्स व ऑरिगॅनम व्हल्गेर या वनस्पतींची वाळविलेली पाने मेक्सिको व भूमध्य सामुद्रिक प्रदेशात लागवड.

कार्व्हेक्रॉल

तीव्र वास तिखट, उग्र व कडवट स्वाद.

मिरचीच्या चूर्णात मेक्सिकन व इटालियन अन्नपदार्थांत स्वादासाठी.

ऑलस्पाइस

पिमेंटा ऑफिसिनॅलिस या वनस्पतीची पक्व व सुकविलेली फळे मूळची वेस्ट इंडीज व दक्षिण अमेरिका येथील मेक्सिको, ग्वातेमाला, हाँडुरस, वेस्ट इंडीज बेटे येथे लागवड फळे हिरवी असताना तोडतात किंचित किण्वन (आंबविण्याची क्रिया) करून सूर्यप्रकाशात वाळवतात.

यूजेनॉल, सिनिओल

दिसण्यास काळ्या मिऱ्यासारखे लालसर-करडा रंग लवंग, काळी मिरी, जायफळ, दालचिनी व वेलदोडा यांच्या मिश्रणासारखा स्वाद म्हणून नाव.

लोणची, भाज्या, सास, सूप इ. खाद्यपदार्थात स्वादासाठी.

ओवा*

कॅरम कॉप्टिकम या वनस्पतीचे पक्व व सुकविलेले फळ मूळची ईजिप्त येथील भारत, पाकिस्तान, इराक व इराण येथे लागवडीत तसाच वा चूर्ण स्वरुपात वापरतात.

कार्होन

थायमॉलासारखा वास

तिखट खाद्यपदार्थात, मिश्र मसाल्यात इत्यादी.

कंकोळ (कबाबचिनी*)

क्युबेबा ऑफिसिनॅलिस या वनस्पतीची पक्व व सुकविलेली फळे मूळची ईस्ट इंडीजमधील भारत (कर्नाटक), थायलंड, श्रीलंका, ईस्ट इंडीजमध्ये लागवड.

क्युबेबीन अल्कलॉइट व बाष्पनशील तेल-सॅबिनीन.

कडवट, तिखट व उग्र वास मसालेदार व सुवासिक चव.

मांस, मासे इ. खाद्यपदार्थांच्या स्वादासाठी.

 


कोष्टक क्र. १. (पुढे चालू)

 

 

 

 

 

कढिलिंब*

मुराया कोनिजी या वनस्पतीची ओली व सुकी पाने भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. भागांत आढळते.

कोनिजीन ग्लुकोसाइड.

तीव्र वास, काहीशी तुरट, कडवट चव.

चटण्या, आमटी (सांबार), भाज्या इत्यादींना स्वाद आणण्यासाठी.

कांदा*

ॲलियम केपा या वनस्पतीचे आवरणयुक्त कंद मूळची इराण व सभोवतालच्या प्रदेशातील भारत, अर्जेंटिना, रूमानिया, रशिया, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली इ. भागांत लागवड तसाच अथवा वाळवून चूर्ण करून वापरतात.

अलिल प्रोप्रिल डायसल्फाइड.

विशेष उग्र वास, चव तिखट.

भाज्या, मिश्र मसाले, चटण्या इ. खाद्यपदार्थात स्वादासाठी.

कारळा*

ग्विझोशिया ॲबिसिनिका या वनस्पतीची फक्व व सुकविलेली फळे मूळची उष्ण आफ्रिकेतील भारत, इथिओपिया, पूर्व आफ्रिका व वेस्ट इंडीजमध्ये लागवडीत.

काळ्या रंगाचे बी

चटण्या, मिश्र मसाले इत्यादींत स्वादासाठी.

केशर*

क्रॉकस सॅटायव्हस या वनस्पतीच्या सुकविलेल्या किंजल्कांपासून (स्त्री-केसरांच्या टोकांपासून) मूळची आशिया मायनर स्पेन, ईजिप्त, ग्रीस, तुर्कस्तान येथे लागवड भारतात काश्मीरमध्ये लागवड.

पिक्रो-क्रोसीन

गडद पिवळट लाल रंग, तीव्र वास, तसेच काहीसा कडवट व उत्तेजक वास.

अन्नपदार्थ, मेवामिठाई इत्यादींत स्वादासाठी, तसेच औषधांत.

खसखस

पॅपॅव्हेर सोम्निफेरम (अफू*) या वनस्पतीचे सुकविलेले बी तुर्कस्तान, इराण, भारत व चीन या भागांत लागवड.

सुसह्य वास अफूच्या झाडापासून मिळते पण अफूइतके मादक नाही.

पाव, पेस्ट्री, भाज्या, खिरी इ. खाद्यपदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी.

खोबरे

कोकॉस न्यूसिफेरा (नारळ*) या वनस्पतींच्या फळातील ओला वा सुकविलेला मगज (गर) मूळची आग्नेय आशियातील हिंदी व पॅसिफिक महासागरांतील बेटांत नैसर्गिक आणि भारताची पश्चिम व पूर्व किनारपट्टी व श्रीलंका येथे लागवडीत.

ओले खोबरे दोन-तीन दिवसांत खवट होते. चव गोड

ओले खोबरे भाज्या, खाद्यपदार्थ यांवर पेरण्यासाठी सुके खोबरे काप वा चूर्ण रुपात चटण्या, मिश्र मसाले इत्यादींत स्वादासाठी.

जायफळ* व जायपत्री

मिरिस्टिका फ्रॅग्रॅन्स या वनस्पतीचे पक्व व सुकविलेले बी बीवरील जाळीदार अध्यावरणास जायपत्री व आतील भागास जायफळ म्हणतात. जायपत्री व जायफळ सुकवून बाजारात येते. मूळची मोलकाझ बेटातील उष्ण कटिबंधीय देशांत लागवड.

पायनीन, मिरिस्टिसीन, कॅम्फेन.

जायफळाला गोड, मसालेदार उग्र वास व तिखट चव, जायपत्रीला तिखट, कडवट व उग्र वास आणि रंग पिवळट करडा ते नारंगी.

बेकरी उत्पादने, गोड मेवा मिठाई, केक, पेये इत्यादींत वापर.

जिरे*

क्युमीनम सायमियम या वनस्पतीचे पक्व व सुकविलेले फळ मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील द. युरोप, उ. आफ्रिका, आशिया, मेक्सिको इ. भागांत लागवड, भारतात बंगाल व आसाम यांखेरीज इतर राज्यांत लागवडीत.

क्युमिम आल्डिहाइड.

चपटे, लांबट अंडाकृती व पिवळट करडे बी तीव्र कडवट व विशिष्ट वास व स्वाद.

द. अमेरिकी खाद्यपदार्थ, काही चीज प्रकार, कोबीचे लोणचे इत्यादींत स्वादासाठी, तसेच मिश्र मसाल्यांत.

टॅरॅगॉन

आर्टेमिसिया ड्रॅकुन्क्युलस या वनस्पतीची सुकविलेली पाने व फुलांचे शेंडे मूळची पश्चिम आशियातील फ्रान्स, स्पेन येथे लागवड.

उग्र, सुवासिक, तिखट व ॲनिससारखा वास.

शिर्का, सॅलड, लोणची, चटण्या, मांस, मासे इ. खाद्यपदार्थात स्वादासाठी.


कोष्टक क्र. १ (पुढे चालू)

तमालपत्र

सिनॅमोमम तमाला (तमाल*) या वनस्पतीची सुकविलेली पाने.

सिनॅमिक आल्डिहाइड

वैशिष्ट्यपूर्ण सुवास

मिश्र मसाल्याचा एक घटक म्हणून.

तीळ*

सिसॅमम इंडिकम या वनस्पतीचे पक्व, सुकविलेले पूर्ण बी मध्य अमेरिका, चीन, ब्राझील, ईजिप्त इ. ठिकाणी लागवड भारतात मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व महाराष्ट्र भागांत लागवड.

सिसॅमीन

लहान व अंडाकार बी टरफलयुक्त बी मळकट पांढरे, टरफल काढल्यावर मोत्यासारखा पांढरा, बाजारात टरफलहीन रूपातही येते.

पावावर पसरण्यासाठी, बिस्किटे, कुकीज, मिठाई यांत, तसेच मिश्र मसाल्याचा एक घटक.

थाइम

थायमस व्हलॉरिस व था. झायगीस या वनस्पतींची सुकविलेले पाने व फुलांचे शेंडे. ताजीही पाने वापरतात. मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील स्पेन, फ्रान्स इ. भागांत नैसर्गिक वाढ अमेरिकेत लागवड अखंड वा चूर्ण रुपात वापरतात.

थायमॉल

पाने सुकल्यावर वाळतात, करडसर हिरवा रंग सुवासिक, उग्र व तिखट स्वाद.

टोमॅटो, मांस, मासे इत्यादींचे खाद्यपदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी.

दगडफूल (शैवाफ*)

शैवाक वनस्पती सुकवून चूर्ण रुपात वापर.

मिश्र मसाल्याचा घटक

दालचिनी*

सिनॅमोमम कॅसिया या वनस्पतीची सुकविलेली साल. कॅशिया या नावानेही ओळखतात मूळची द. चीन, ब्रह्मदेश, व्हिएतनाम व इंडोनेशिया येथील.

सिनॅमिक ऑल्डिहाइड

तुकड्याच्या आणि चूर्ण रुपात लालसर करडा रंग सुवासिक गोड व उग्र वास आणि चव.

दोन्ही प्रकारच्या दालचिनीचा उपयोग मिश्र मसाल्याचा एक घटक, भाजलेल्या खाद्यपदार्थात, मेवामिठाईत, लोणची, मसालेदार सॉस, मिश्र मसाला (करी), गोळ्या, औषधे इत्यादींत स्वादासाठी.

 


कोष्टक क्र. १ (पुढे चालू)

सिनॅमोमम झेलॅनिकम या वनस्पतीचे खोड व फांद्या यांची सुकविलेली साल. सिलोनी दालचिनी या नावाने प्रसिद्ध मूळची श्रीलंकेतील ब्रह्मदेश, मलेशिया, भारत द. अमेरिका, वेस्ट इंडीज इ. ठिकाणी लागवड.

 

तुकड्याच्या वा चूर्ण रुपात करड्या रंगाचे चूर्ण. वास व स्वा द कॅशियापेक्षा मंद, बाष्पनशील तेलाचे प्रमाण जास्त.

 

 

धने व कोथिंबीर*

कोरिअँड्रम सॅटायव्हम या वनस्पतीची हिरवी व सुकविलेली बी (धने) मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील अर्जेटिना, भारत, मोरोक्को, यूगोस्लाव्हिया, रुमानिया इ. ठिकाणी लागवड भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व बिहार येथे लागवड.

कोरिअँड्रॉल (लिनॅलूल)

पाने हिरवी, मंद वासाची बी पिवळट करड्या रंगाचे, वास मंद, चव गोड व सुवासिक.

पाने भाज्या, तिखट खाद्यपदार्थ इत्यादींत स्वादासाठी बी चूर्ण रुपात व अखंड स्थितीत मांस, मासे इत्यादींच्या खाद्यपदार्थात स्वादासाठी मिश्र मसाल्याचा एक घटक.

नाकेशर (नागकेशर)

ऑक्रोकार्पस लाँगिफोलियम (सुरंगी*) या वनस्पतीच्या सुकविलेल्या फुलांच्या कळ्या भारतात पश्चिम किनारपट्टीत लागवड.

आकार लवंगेप्रमाणे रंग काळसर थंड.

गरम मसाल्यात मिश्र मसाल्याचा एक घटक बंगालमध्ये नागचाफा (मेसुआ फेरिया) या वनस्पतीची सुकविलेली फुले नागकेशर (नागसुरा) म्हणून अद्यापिही वापरतात.


कोष्टक क्र. १ (पुढे चालू)

 

 

 

 

 

पार्स्ले

पेट्रोसेलिनम क्रिस्पम या वनस्पतीची सुकविलेली पाने व फळे मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशांच्या डोंगराळ भागातील बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, प. जर्मनी, हंगेरी व स्पेन येथे लागवड.

सुसह्य, मंद वास.

मांस, मासे इत्यादीच्या प्रक्रियित खाद्यपदार्थात.

बडीशेप*

फीनिक्युलम व्हल्गेर या वनस्पतीचे पक्क व सुकविलेले बी. मूळची भूमध्ये सामुद्रिक प्रदेशातील अर्जेंटिना, लेबानन, प. जर्मनी, ब्राझील, ग्रीस, फ्रान्स, इटली, चीन, डेन्मार्क इ. ठिकाणी लागवड भारतात महाराष्ट्र, पंजाब, आसाम व गुजरात येथे लागवड.

फिंकोन

बी लहान व पिवळट करडे, सुसह्य, सुवासिक व गोड वास.

लोणची, बेकरी पदार्थ, मासे इ. अन्नपदार्थांत स्वादासाठी औषधांत.

बदियान (बादल)

इलिसियम व्हेरम (स्टार ॲनिस) या वनस्पतीचे सुकविलेले फूल मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील स्पेन, मेक्सिको, नेदर्लंडस, तुर्कस्थान, रशिया इ. भागांत लागवड भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, ओरिसा येथे लागवड.

ॲनेथॉल

सुसह्य वास गोड आणि सुवासिक चव.

लोणची, मेवामिठाई, मांस इ. खआद्यपदार्थात स्वादासाठी मिश्र मसाल्यांत.

बे

लॉरस नेविलीस या वनस्पतीची सुकविलेली पाने. मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील पोर्तुगाल, तुर्कस्तान इ. भागांत लागवड.

सिनिओल

कडवट चव मंद पण सुवासिक वास.

मांस, मासे इत्यादीं च्या खाद्यपदार्थात.

मरवा*

ऑरिगॅनम मॅजोरॅना या वनस्पतीची सुकविलेली पाने क्वचित फुलांसह पाने वापरतात मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील चिली, फ्रान्स, पेरू अमेरिका इ. ठिकाणी लागवड.

मिथिल चॅव्हिकॉल

सुवासिक वास उग्र व किंचित कडवट स्वाद.

भाज्या सॅलड, मांस सूप इ. खाद्यपदार्थात स्वादासाठी.

मिरची*

कॅप्सिकम वंशातील अनेक जातींच्या वनस्पतीचे प्कव व सुकविलेले फळ, अपक्व रूपातही वापरतात मूळची उष्ण कटिबंधी अमेरिकेतील

कॅप्सिसीन या बाष्पनशील तेलामुळे.

   
 

भोपळी मिरची : पक्व, लाल व सुकविलेली फळे तशीच वा चूर्ण रूपात वापरतात. बल्गेरिया, हंगेरी, मोरोक्को, स्पेन, यूगोस्लाव्हिया इ. भागांत लागवड भारतात कमी प्रमाणात लागवड.

 

सह्य व सुवासिक स्वाद पण कमी तिखट स्वाद, गोड व मंद चव.

मांस, सूप, कोंबडी, सॅलड ड्रेसिंग, भाज्या इ. खाद्यपदार्थांत स्वादासाठी केचप व सॉसचा प्रमुख घटक.

 

लाल मिरची : पक्व, लाल व सुकविलेली फळे तशीच वा चूर्ण रुपात वापर ब्राझील, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, सारावाक, श्रीलंका इ. भागांत लागवडीत.

 

उग्र व तिखट वास तिखट चव.

भारतात मोठ्या प्रमाणात वापर, भाज्या, मांस, मासे, चटण्या इत्यादींत.

 

हिरवी मिरची : अखंड, तुकडे, अर्क रूपात वापर.

 

तिखट चव तिखट व उग्र वास.

खाद्यपदार्थांच्या स्वादासाठी अल्प प्रमाणात औषधात.


कोष्टक क्र. १ (पुढे चालू)

 

 

 

 

 

मिरी*

पायपर नायग्रम या वनस्पतीची फळे मूळची भारत व मलेशियातील आफ्रिका, भारत, थायलंड, फिलिपीन्स, मलेशिया इ. ठिकाणी लागवड.

पायपरिडीन

   
 

काळी मिरी : अपक्क व सुकविलेली फळे.

 

विशिष्ट व तीव्र वास

लोणची, तिखट खाद्यपदार्थांत वापरतात.

 

पांढरी मिरी : पक्व झाल्यावर काढतात योग्य किप्वन, चोळणे व धुणे आदि प्रक्रिया करून व टरफल काढून तयार करतात. अखंड वा चूर्ण रुपात वापरतात.

 

उष्ण व तिखट स्वाद झोंबणारी चव.

 

मेथी*

ट्रायगोनेला फीनम-ग्रीकम या वनस्पतीचे पक्व सुकविलेले बी मूळची द. यूरोप व आशियातील भारतात मोठ्या प्रमाणात तर ईजिप्त, फ्रान्स, इराण, लेबानन, मोरोक्को, इथिओपिया येथे अल्प प्रमाणात लागवड.

ट्रायगोनेलीन

बी लहान व पिवळट-करडे सुसह्य, कडवट व विशिष्ट वास व स्वाद.

मिश्र मसाल्याचा एक घटक चटण्या इ. खाद्यपदार्थांत स्वादासाठी.

मोहरी*

त्रॅसिका नायग्रा, त्रॅ. जुंसिया या वनस्पतींची पक्व व सुकविलेली फळे काळी, तर ब्रॅ. आल्बाची फळे पांढरी वा पिवळट मूळची यूरेशियातील पण सर्वत्र लागवडीत भारतात पंजाब, उत्तर प्रदेश व तमिळनाडू येथे लागवड बी : प्रक्रियित मोहरी व सुके चूर्ण या रुपांत वापर.

सिनिग्रीन

बी लहान, गोल आणि कठीण, दळून पाण्यात मि स ळ ल्या स तीक्ष्ण व असह्य (दाहयुक्त) वास आणि ति ख ट चव पांढऱ्या मोहरीत बाष्पनशील तेल जास्त असते.

लोणची, तयार मसाले, मिश्र मसाले, तिखट खाद्यपदार्थ इ. पदार्थात स्वादासाठी.

रोझमेरी*

रोझमेरीनम ऑफिसिनॅलीस या वनस्पतीची सुकी पाने रानटी अवस्थेत भूमध्य सामुद्रिक प्रदेशात आढळते तशीच या चूर्ण रूपात वापरतात फ्रान्स, स्पेन, अमेरिका व यूगोस्लाव्हिया येथे लागवड.

पिक्रीन, बोर्निओल, सिनिओल.

तीव्र, मंद व सुवासिक वास कडवट चव.

मांस, मासे, कोंबडी इत्यादींच्या खाद्यपदार्थात स्वादासाठी.

लवंग*

यूजेनिया कॅरियोफायलाटा या वनस्पतींच्या न उमललेल्या व सुकविलेल्या कळ्या मूळची उष्ण कटिबंधी प्रदेशातील झांजिबारमध्ये ९०% उत्पादन चीन, इंडोनेशिया, टांझानिया, मलेशिया इ.ठिकाणी लागवडीत भारतात केरळ व निलगिरी येथे लागवड अखंड वा चूर्ण रूपात वापरतात.

यूजेनॉल

गडद लालसर तपकिरी रंग, तीव्र सुवास उग्र, तिखट व मसालेदार चव.

बेकरी उत्पादने, मिठाई, चॉकोलेट, गोड सायरप, फळांची लोणची, मांस इ. खाद्यपदार्थांत वापर तेलाच्या रूपातही वापर.

लसूण*

ॲलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदिकेच्या पाकळ्या (कुड्या) अर्जेटिना, चीन, बल्गेरिया, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका इ. भागांत लागवडीत.

 

तीव्र व जोरदार पण आकर्षक वास,

सॉस, चटण्या, लोणची इत्यादींत वापर.


कोष्टक क्र. १ (पुढे चालू)

 

 

 

 

 

वेलदोडा*

इलेटॅरिया कारडॅममॲमोमम वंशातील वनस्पतींची पक्व व सुकविलेली फळे मूळची भारतातील आग्नेय भारत, श्रीलंका, ग्वातेमाला इ. भागात लागवडीत वापराच्या वेळी अखंड वा सोलून बी वापरतात.

लिमोनीन

लालसर करडा रंग सुवासिक व सुसह्य वास उग्र व कापूरसदृश स्वाद.

मसाल्यासाठी हिरवट करड्या रंगाचे वेलदोडे वापरतात मेवामिठाई, केक, पेस्ट्री, लोणची, इ. खाद्यपदार्थात वापरतात.

शहाजिरे*

कॅरम वंशातील वनस्पतीचे पक्व व सुकविलेले फळ मूळची यूरोप आणि प. आशियातील डेन्मार्क, नेदर्लंडस, पोलंड, लेवानन, इथिओपिया व रशिया येथे लागवडीत. भारतात बिहार, ओरिसा, पंजाब व आंध्र प्र दे श येथे लागवडीत.

कार्व्होन

करडा रंग सुसह्य वास सुवासिक, उग्र आणि काहीसा तीक्ष्ण स्वाद.

काळा पाव, बटाटे, भाज्या, कोबी इ. खा द्य प दा र्था त तसेच कुमेल या मद्यात स्वादासाठी

शेपू*

ॲनेथम ग्रॅव्हिओलेन्स या वनस्पतीचे पक्व व सुकविलेले बी भारत, चीन इंगेरी, अमेरिका, मे क्सि को येथे लागवडीत अखंड वा दळून वापरतात.

ॲनेथॉल

शहाजिऱ्यासारखा पण मंद स्वाद गडद काळा रंग.

सूप, प्रक्रियित मांस, सॉसेज इ. खाद्यपदार्थात वापर.

सब्जा*

ऑसिमम बॅसिलिकम या वनस्पतीची सुकविलेली पाने व कोवळे देठ फ्रान्स व इतर भूमध्य सामुद्रिक प्रदेश, अमेरिका, इ. भागांत लागवड.

मिथिल चॅव्हिकॉल लिनॅलूल.

उग्र, गोड पण तिखट स्वाद व वास.

मांस, मासे, चीज, भाज्या इ. खाद्यपदार्थात वापर.

सॅव्होरी

सॅट्यूरिया हॉर्टेन्सिस या वनस्पतीची सुकविलेली पाने व फुलांचे शेंडे फ्रान्स, स्पेन, अमेरिका, यू गो स्ला व्हि या येथे लागवड.

फार्व्हेक्रॉल

करडसर हिरवट रंग तीव्र, उग्र व सुंगधी वास जळजळीत चव.

भाज्या, मांस, मासे, कोंबडी इ. खाद्यपदार्थात.

सेज*

सॅल्व्हिया ऑफिसिनॅलीस या वनस्पतीची सुकविलेले पाने भूमध्य सामुद्रिक प्रदेश, अमेरिका, रशिया येथे लागवड अखंड वा चूर्ण रूपात वापरतात.

थुजोन

करडसर हिरवी तीव्र, मांस, कोंबडी, मासे इ. उग्र पण किंचित कडवट वास.

मांस, कोंबडी, मासे इ. खाद्यपदार्थ.

हळद*

कुर्कुभा लाँगा या वनस्पतीची शिजविलेली व सुकविलेली मूळक्षोडे चीन, भारत, इंडोनेशिया, श्रीलंका इ. भागांत लागवड.

कुर्कुमीन

रंग पिवळा वास मातकट व मिऱ्या सारखा उग्र, सुवासिक व किंचित कडवट स्वाद.

लोणची, मिश्र मसाले, भाज्या इ. खाद्यपदार्थ.

हिंग*

फेरुला या वंशातील वनस्पतींपासून मिळणारे रेझीन इराण व आफगाणिस्तान येथे लागवड.

असारेसिनोटॅनॉल

तीक्ष्ण व कडू चव तीव्र व लसणासारखा वास.

सॉस, मिश्र मसाले, लोणची, भाज्या इ. खाद्यपदार्थांत.


*या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीही अधिक माहितीसाठी पहाव्यात.

हवामान, अक्षांश, तापमान, जमीन, पाऊस यांत तसेच शेतीच्या मशागतीच्या, वाळविण्याच्या, प्रक्रियांच्या व साठवणीच्या पद्धतींत विविध प्रदेशांनुसार फरक पडत असल्याने एकाच प्रकारच्या मसाल्याच्या गुणवत्तेत फरक आढळून येतात.

मसाल्याचे पदार्थ उत्पादकांकडून सरळ खरेदी करून वा मध्यस्थामार्फत खरेदी करून ते जागतिक बाजारपेठेत पाठविण्यात येतात. न्यूयॉर्क, लंडन, हँबर्ग व ॲम्‌स्टरडॅम ह्या बंदरांतून हा व्यवहार करण्यात येतो.

मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार वाढविणे, त्यात सुलभता आणणे व त्याचे नियमन करणे या दृष्टीने भारतातील स्पाइसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अमेरिकन स्पाइस ट्रेड ॲसोसिएशन आणि पश्चिम जर्मनीतील Faverband der Gewiirzindustrie या संस्था कार्य करीत आहेत.

मसाल्याच्या पदार्थांची आयात झाल्यावर त्या त्या देशाच्या खाद्यपदार्थ कायद्यानुसार भेसळ, जंतू व अन्य संसर्ग यांसाठी त्यांची तपासणी करण्यात येते. संसर्ग झालेल्या मालावर संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच योग्य प्रक्रिया करून मग तो पुढे पाठविला जातो. मसाल्याचे पदार्थ बहुतेक नंतर चूर्ण करून विकण्यात येतात.

भेसळ : मसाल्याच्या पदार्थांच्या भरमसाट किंमतीमुळे त्यांच्यात विविध प्रकारे भेसळ होते. तीमुळे शरीराला गंभीर स्वरूपाचे अपाय होण्याची शक्यता असते.भेसळीसाठी अपायकारक पदार्थाचा सर्रास वापर होतो (उदा., विटिकरीची पूड, रंगीत लाकडाचा भुसा, घोड्याची लीद इ.). तसेच मसाल्याच्या पदार्थातील तेले व ओलिओरेझिने काढून घेतल्यावर राहिलेला शेष भाग चांगल्या मालात मिसळून विकण्यात येतो. हळदीतील भेसळ ओळखण्यासाठी ती पाण्यात टाकून मग तीत हायड्रोक्लोरिक अम्ल मिसळतात. याने येणारा लाल रंग हळद शुद्ध असल्यास जातो नाहीतर तसाच राहतो. मिरचीची पूड जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्यास तीत भेसळ आहे, असे मानतात.शुद्ध केशर पाण्यात विरघळते पण सहज मोडत नाही मात्र त्यात रंगविलेले मक्याच्या कणसावरील तंतू असल्यास ते सहज मोडतात व पाण्यात विरघळत नाहीत. [⟶ भेसळ].

वर्गीकरण : मसाल्याच्या पदार्थांचे वर्गीकरण करणे फार अवघड आहे, कारण त्यांच्या उपप्रकारांतील फरक सुस्पष्टपणे दाखविणे कठीण आहे. तथापि वनस्पतीचा कोणता भाग मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जातो, त्यावरून त्यांचे वर्गीकरण खोड, साल, फुले (व कळ्या), फळे, बिया, पाने, संपूर्ण वनस्पती इ. प्रकारांत करता येते. प्रस्तुत नोंदीत याप्रमाणेच वर्गीकरण करण्यात आले आहे.

मसाल्याच्या पदार्थांचे सर्वसाधरणपणे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते : (१) मूलक्षोड : आले, सुंठ, हळद इ. (२) साल : दालचिनी इ. (३) फुले व कळ्या : लवंग इ. (४) फळ : ऑलस्पाइस, मिरची, मिरे, जिरे, धने इ. (५) बिया : ओवा, खसखस, वेलदोडा, जायफळ, मोहरी, तीळ इ. (६) पाने : सब्जा, कोथिंबीर, पुदिना, काढिलिंब, थाइम, बे, सॅव्होरी इ. (७) कंद : लसूण, कांदा इ. (८) रेझीन : हिंग (रेझीन, डिंक व अन्य पदार्थांचे मिश्रण) व (९) संपूर्ण वनस्पती : दगडफूल.

नेहमी वापरात असलेल्या व काही महत्त्वाच्या मसाल्याच्या पदार्थांची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिलेली आहे.

मिश्र मसाले : वर वर्णन केलेल्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर फार पूर्वीपासून होत आलेला आहे तथापि आधुनिक काळात त्यांचा वापर पूर्वीसारख्या (म्हणजे खाद्यपदार्थ तयार करण्यापूर्वी आवश्यक ते मसाल्याचे पदार्थ एकत्रित करून चूर्ण रूपात वापरणे) करणे वेळेभावी शक्य होत नाही. ह्यासाठी बाजारात असे मसाले तयार स्वरुपात मिळतात. पाश्चिमात्य देशांत व भारतातही असे तयार मसाले बाजारात उपलब्ध आहेत. अशा मसाल्यांना विविध नावे असून विभागपरत्वे त्यांच्या घटकांच्या प्रमाणात वा क्वचित घटकांतही फरक आढळून येतो. मात्र अशा मसाल्यांचा स्वाद ताज्या मसल्यांपेक्षा कमी असतो.

पाश्चिमात्य देश व भारत यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही मिश्र मसाल्यांची नावे व त्यांतील घटक पदार्थ यांची माहिती कोष्टक क्र. २ मध्ये दिलेली आहे.


कोष्टक क्र. २. मिश्र मसाले व त्यांचे घटक

मिश्र मसाल्याचे नाव 

घटक पदार्थ 

पाश्चात्त्य मिश्र मसाले : 

 

(१) ॲपल पायचा मसाला 

दालचिनी, लवंग वा ऑलस्पाइस, आले, जायफळ वा जायपत्री. 

(२) बार्बेक्यू 

मिरची (सायेनी वा रेड पेपर), जिरे, लवंग वा ऑलस्पाइस, लसूण. 

(३) हँमबर्गर सिझनिंग 

ऑलरपाइस वा लंवग, अजमोदा, कांद्याची पूड, पांढरे मिरे, सेज. 

(४) इटालियन सिझनिंग 

सब्जा,मरवा, ऑरेगॅनो, रोझमेरी, सॅव्होरी. 

(५) मिन्समिंट 

दालचिनी, लवंग वा ऑलस्पाइस, जायफळ वा जायपत्री,  

(६) पेस्ट्री 

दालचिनी, लवंग वा ऑलस्पाइस, जायफळ वा जायपत्री, वेलची, ॲनिस बी,साखर. 

(७) कोंबडी 

पांढरे मिरे, सेज, ऑरेगॅनी, रोझमेरी, सॅव्होरी. 

(८) लोणचे 

ऑलस्पाइस, बे, वेलची, कॅसिया, मिरची, लवंग, आले, जायपत्री, मोहरी, काळे मिरे. 

भारतीय मिश्र मसाले : 

 

(१)लोणचे 

हिंग, मोहरी (डाळ वा सबंध), मेथी, कांदे, लसूण, हळद, हिरवी मिरची, सुकी मिरची पूड इत्यादी. 

. 

(२)चहाचा मसाला 

काळे मिरे, लवंग, दालचिनी, सुंठ, वेलदोडा, जायफळ. 

(३)दुधाचा मसाला 

जायफळ, वेदोडा, केशर, बदाम, पिस्ते. 

(४)गरम मसाला 

काळे मिरे, जायपत्री, खखस, वेलची धने, नाकेशर, लवंग, मिरची, तिरफळ, तमालपत्र इत्यादी. 

(५)गोटा मसाला (आमटी, भाजी इत्यादींसाठी) 

तिरफळ, धने, सुके खोबरे, तीळ, नाकेशर, लवंग, जिरे. 

यांशिवाय काळा मसाला, माशाचा मसाला, इडलीसांबार मसाला इ. प्रकारांचे तयार मिश्र मसाले बाजारात मिळतात.


ओलिओरेझिने : काही वेळा मसाल्यांचे पदार्थ वापरण्याऐवजी त्यांच्यापासून काढलेली ओलिओरिझिने वापरणे सोयीचे व फायद्याचे ठरते कारण ती एकसंघ असून सामान्यतः ती मसाल्याच्या पदार्थांच्या १/५ ते १/२० इतक्या अत्यल्प प्रमाणात वापरता येतात. ओलिओरेझिने ही द्रवरूप व रंगीत असतात पण त्यांच्या अत्यल्प प्रमाणातील वापरामुळे खाद्यपदार्थांना त्यांचा रंग येत नाही.

क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बनसारखे बाष्पनशील विद्रावक दळलेल्या मसाल्याच्या पदार्थावर ओततात. खाली जमा होणारा विद्राव गोळा करून त्याचे निर्वात ऊर्ध्वपातन [⟶उर्ध्वपातन] करून विद्रावक अलग करतात व त्याचा परत वापर करतात. राहिलेला भाग म्हणजेच ओलिओरेझीन होय. मात्र त्यात मूळ मसाल्याच्या पदार्थाचे सर्वच स्वाद येत नाहीत. काही मसाल्याच्या पदार्थांपासून मिळणारी सर्वच ओलिओरेझिने ही स्वादासाठी वापरली जातात असे नाही. त्यांपैकी काही (उदा., भोपळी मिरची व हळद यांपासून मिळणारी) रंगासाठी वापरतात.

ओलिओरेझिने ही त्याच मसाल्याच्या पदार्थापासून मिळणाऱ्या बाष्पनशील तेलापेक्षा वेगळी असतात. काही वेळा ओलिओरेझीनात बाष्पनशील तेले मिसळण्यात येतात.

मसाल्याची तेले : काही वेळा काही मसाल्याचे पदार्थ तसेच न वापरता, त्यांच्यापासून काढण्यात येणाऱ्या बाष्पनशील तेलांच्या स्वरूपात वापरले जातात. ही तेले तयार करण्याच्या पद्धती जटिल आहेत. मसाल्याच्या पदार्थांपासून ती अल्प प्रमाणात मिळतात त्यामुळे ति किंमतीच्या दृष्टीने मौल्यवान असतात. जयफळ, आले, मिरी, लवंग, अजमोदा, वेलदोडा इ. मसाल्याच्या पदार्थापासून ही तेले बनवितात. [⟶⟶ बाष्पनशील तेले].

भारतीय उद्योग : फार प्राचीन काळापासून मसाल्याच्या पदार्थाबद्दल व त्यांच्या व्यपाराबद्दल भारत प्रसिद्ध आहे. हा व्यापार खुष्कीच्या मार्गानी अरबी व्यापाऱ्यांमार्फत यूरोपशी चाले. पंधराव्या शतकात हा मार्ग बंद झाल्यावर यूरोपियन लोकांनी भारताकडे येण्याचे सागरी मार्ग शोधून काढले.

भारत हे मसाल्याच्या पदार्थांचे आगर समजण्यात येते. मिरी, मोहरी, वेलदोडा, मिरची, आले व सुंठ, हळद, अजमोदा, धने, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, दालचिनी, केशर, मेथी, लवंग इ. विविध मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन भारतात करण्यात येते. काही मसाल्याच्या पदार्थांच्या बाबतीत भारताचा एकाधिकार आहे. जागतिक उत्पादनाच्या ३०-४०% मिरी, ५०% आले (सुंठ), ६०% मिरची,% हळद व ६०% वेलदोडे यांचे उत्पादन भारतात होते. त्यापैकी बराच भाग अखंड, चूर्म, मिक्ष मसाले, तेले व ओलिओरेझिने

कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाच्या मसाल्याच्या पदार्थाच्या पिकांखालील भारतातील क्षेत्र व त्यांचे उत्पादन (क्षेत्र हजार हेक्टरांत व उत्पादन हजार टनांत).

पदार्थ 

१९७०-७१

१९७५-७६ 

१९७९-८० 

क्षेत्र 

उत्पादन 

क्षेत्र 

उत्पादन 

क्षेत्र 

उत्पादन 

काळी मिरी 

१२०.०० 

२६.२० 

१११.९३ 

२५.५७ 

११०.७२ 

२७.७० 

वेलदोडा 

७५.४ 

३.१७ 

 

३.०० 

९२.७ 

४.५० 

मिरची 

७८३.४ 

५२०.४ 

७३९.८ 

५२६.१ 

८३६.३ 

५१०.९ 

आले 

२१.५९ 

२९.५९ 

२७.२० 

४५.१५ 

४०.३५ 

७२.९६ 

हळद 

८०.६ 

१५०.७ 

७१.८ 

१३५.२ 

१०५.०० 

२३५.४ 

धने 

२७२.३ 

१०१.२ 

२४२.४ 

९२.७ 

२६३.७ 

९०.७ 

लसूण 

 

 

३९.८ 

११०.९ 

५९.२ 

२०५.६ 

ह्या स्वरूपांत निर्यात करण्यात येतो. तसेच त्यांचा देशांतर्गत वापरही बराच आहे. हिंगासारख्या काही मसाल्याच्या पदार्थाची भारतात आयात करण्यात येते. कोष्टक क्र. ३ मध्ये काही महत्त्वाच्या मसाल्याच्या पदार्थाखालीली क्षेत्र आणि त्यांच्या उत्पादनाची आकडेवारी दिलेली आहे.

भारतात मिश्र मसाले तयार करण्याचे लघु-उद्योग स्वरूपाचे कारखाने असून त्यातून प्रतिवर्षी सु. २,००० टन विविध प्रकारांचे मिश्र मसाले तयार करण्यात येतात. मसाल्याच्या पदार्थापासून तेले व ओलिओरेझिने अल्प प्रमाणात तयार करण्यात येतात.


भारतीय मसाल्याचे पदार्थ हे गुणवत्तेच्या दृष्टीने उत्कृष्ट असल्याने त्यांना जगातील बहुतेक देशांतून मागणी आहे. अखंड, चूर्ण, मिश्र मसाले, तेले व ओलिओरेझिने या स्वरुपांत मसाल्याच्या पदार्थाची भारतातून निर्यात करण्यात येते. सी कस्टम ॲक्टप्रमाणे मसाल्याच्या पदार्थाची निर्यात करण्यापूर्वी ॲगमार्क व भारतीय मानके यांप्रमाणे प्रतवारी करणे अत्यावश्यक ठरविण्यात आले आहे.

मिरी, मोहरी, मिरची, सुंठ, हळद, धने, लसूण, कांदा पूड, मेथी, वेलदोडा, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, जिरे, ॲनिस इ. मसाल्याचे पदार्थ मिरी, आले, वेलदोडा, अजमोदा यांची तेले आणि मिरी, मिरची, आले, हळद, मेथी, आजमोदा यांची ओलिओरेझिने यांची निर्यात मुंबई, कोचीन, मद्रास, मंगलोर, कालिकत, कलकत्ता व तुतिकोरिन ह्या बंदरांतून करण्यात येते. तेले व ओलिओरेझिने ही मुख्यतः अमेरिका, प. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदर्लंड्स, जपान, स्वीडन व डेन्मार्क ह्या देशांना पाठविली जातात.

भारतातून निर्यात करण्यात येणाऱ्या मसाल्याचे पदार्थ व त्यांपासून मिळणारे पदार्थ यांची आकडेवारी कोष्टक क्र. ४ मध्ये दिलेली आहे.

मसाल्याच्या पदार्थाच्या वनस्पतींबद्दलचे संशोधन कासारगोड येथील सेंट्रल प्लँटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट आणि प्रादेशिक व उपसंशोधन केंद्रांतून करण्यात येते. पिकांच्या मळणीनंतरचे तांत्रिक व प्रक्रियात्मक संशोधन म्हैसर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व तिच्या प्रादेशिक संस्थांतून करण्यात येते.

मसाल्याच्या पदार्थांच्या विकासासाठी केंद्र सरकारने इंडियन स्पाइसेस डेव्हलपमेंट कौन्सिल या मंडळाची स्थापना केलेली आहे. हे मंडळ सध्याच्या योजनांचे नूतनीकरण व नवीन योजना आखणे हे कार्य करते. ह्या योजनांची कार्यवाही कालिकत येथील डिरेक्टोरेट ऑफ कोको, ॲरिकानट अँड स्पाइसेस डेव्हलपमेंटतर्फे होते. सध्या (१) नव्या पन्हेरी बागा स्थापन करून त्यांमार्फत पन्नियार-१ या मिऱ्याच्या संकरित जातीच्या मुळांचे उत्पादन व वाटप करणे (२) लवंग आणि जायफळ यांच्या रोपांची निपज व वाटप (३) जादा उत्पादन देणाऱ्या आल्याच्या जातीचे बियाणे तयार करणे इ. योजना कार्यान्वित आहेत.

भारतातून निर्यात होणाऱ्या मसाल्याच्या विविध पदार्थाच्या गुणवत्ता, आवेष्टन इत्यादींबद्दल मार्गदर्शन, निर्यातीबद्दल योग्य सल्ला व देखरेख यांसाठी ऑक्टोबर १९६० मध्ये स्पाइसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलची स्थापना कोचीन येथे करण्यात आली. मसल्याच्या विविध पदार्थाबद्दल योग्य सल्ला देण्यासाठी व त्यांच्या विषयीच्या विविध अडचणींवर 

कोष्टक क्र. ४ भारतातून निर्यात करण्यात येणारे मसाल्याचे पदार्थ (वजन टनांत व किंमत हजार रुपायांत)

मसल्याचे पदार्थ 

१९७५-७६ 

१९८०-८१ 

१९८१-८२ 

वजन

किंमत

वजन

किंमत

वजन

किंमत

मिरी

२४,१६८s.८४

३,३८,१०२.९४

२५,३३६.८०

३,६८,४३८.१०

२०,६०७.९०

२,७९,८३७.०३

वेलदोडा (लहान)

१,८६१.००

१,८६,५८६.००

२,३३६.८८

३,४४,९५५.५७

२,३८५.९३

३,११,१०६.२५

वेलदोडा (मोठा)

४३.३०

७२४.८०

१५९.८३

३,३४६.०९

९७.२३

१,९८५.६९

मिरची पूड

१,७२३.९०

१८,४७८.००

७,६२९.४५

५०,०७९.२४

४,६५९.२४

४२,०५९.६९

आले (सुंठीसह)

४,७७४.५०

४०,५७१.००

५,५५०.२४

२९,२३१.५८

४,७१७.८०

३९,५२२.७०

हळद

१२,०१०.८०

४२,५२१.००

११,४३८.३६

६०,३९३.१४

११,९८५.९१

५१,७४२.६७

धने

७४३.७०

३,२९०.००

१,६४८.५३

९,७४३.९६

१,७२९.१५

१२,३३३.४४

सांबार चूर्ण

१,२८३.५०

११,७१०.८०

२,२३८.९८

२१,७३०.८३

१,८०५.००

२०,०१८.०७

जिरे

१,५६३.००

१४,७१२.००

६,७६१.१२

७४,७११.३४

६,४०५.४३

६५,५३१.१३

अजमोदा

२,३००.००

१२,४३६.००

१,६६७.१२

८,३२८.५३

१,६६८.०६

११,१७०.४३

बडीशेप

६५३.००

५,८०२.००

१,०३८.१०

७,५१२.९४

१,०३३.४२

८,८७४.३३

मेथी

१,३६७.००

३,६२१.००

३,०८५.१३

११,८८५.९९

३,२४१.४६

१३,३९९.८१

लसूण

१,०३४.००

२,८७३.००

६,२८९.१६

१८,७८९.९१

६,१०६.६५

२६,५०५.६०

ॲनिस

४.५३

२३.००

१.६०

१७.५०

१.००

८.१०

कॅसिया

५७६.००

३,१४२.००

६९५.६५

५,७१५.४४

५६७.५५

७,२९०.०१

तमालपत्र

८.९०

१३६.००

२२४.९६

४७६.१०

८७.४६

२५८.६५

जायफळ

२.००

२९.५२

०.३१

९.७१

इतर मसाले

३,२८३.९०

१०,७८७.००

६९७.५०

५८५१.७२

१,०९६.९५

६,६०५.५३

मसाल्याची तेले

२६.६९

१,१६२.७०

१२.९३

४,८२२.८५

१६.५९

४,९५४.४३

ओलेओरेझिने

४८.६१

५,१९३.१०

१४८.८७

२१,७६१.६८

१६६.७६

२६,२६१.०८

एकूण

५७,४७५.१७

७,०१,८७३.३४

७६,९६३.२१

१०,४७,८२०.०३

६८,३७९.८०

९,३२,४५६.३५


खास करून लक्ष देण्यासाठी मंडळाने पुढील आठ उपसमित्या नेमल्या आहेत : (१) मिरे, (२) वेलदोडे, (३) मिरची, (४) आले, (५) हळद, (६) इतर मसाले, (७) सांबार चूर्ण व लापश्या (पेस्ट), (८) तेले व ओलिओरेझिने. याउपसमित्या उत्पादक, प्रक्रियक व निर्यातदार यांना सल्ला देतात. मंडळाचे कार्य दोन प्रकारांचे आहे : (१) सल्ला देण्याचे व (२) व्यवस्थापकीय. मसाल्याच्या पदार्थाच्या निर्यातीसंबंधी मंडळाने ठरविलेल्या धोरणांसंबंधी केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक संस्था आणि संबंधित स्थानिक अधिकारी यांना मंडळ सल्ला देते. मंडळाच्या व्यवस्थापकीय कामांत मसल्याविषयी नियतकालिके प्रसिद्ध करणे, भारतात व परराष्ट्रांत जाहिराती करणे, चर्चासत्रे, व्यापारविषयक विचारणा, अडचणी व त्यांचे निवारण इत्यादींचा अंतर्भाव होते.

स्पाइसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे स्पाइसेस न्यूजलेटर (मासिक) व इंडियन स्पाइसेस (त्रैमासिक) कलिकत येथील डिरेक्टोरेट ऑफ कोको, ॲरिकानट अँड स्पाइसेस डेव्हलपमेंटतर्फे इंडियन कोको, ॲरिकानट अँड स्पाइसेस जर्नल (त्रैमासिक) आणि कासारगोड येथील इंडियन सोसायटी फॉर प्लँटेशन क्रॉप्स, सेंट्रल प्लँटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे जर्नल ऑफ प्लँटेशन (षण्मासिक) ही मसाल्याच्या पदार्थाविषयी माहिती देणारी नियतकालिके भारतात प्रसिद्ध होतात.

मसल्याच्या पदार्थाचे नमुने घेणे (आय एस १७९७), काळी मिरी (आय एस १७९८) आणि मसाल्यांच्या पदार्थाची इंग्रजी, हिंदी व वनस्पतिवैज्ञानिक नावांची यादी (आय एस १८७७) अशी मानके मसाल्याच्या पदार्थासाठी भारतीय मानक संस्थेने तयार केलेली आहेत.

पहा : खाद्यपदार्थ उद्योग मसाल्याची पिके स्वादकारके.

संदर्भ :  1. Aiyadurai, S.G. Review of Research on Spices and Cashewnut, Eranakulam, 1966.

             2. American Spices Trade Association, A Glossary of Spices,

             3. Maheshwari, P. Umraosingh, Dictionary of Economic Plants In India, New Delhi,

             4.Parry. J.W .Spices, 2 Vols., New York, 1969

             5.Rosengarten, F. Jr., The Book of Spices, Edingburgh, 1969.

जोशी, लांबा चिन्मुळगुंद, वासंती रा. मिठारी, भू.चि.