मशीद : मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ. मुस्लिम लोक सामुदायिक रीत्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी म्हणजेच नमाज पढण्यासाठी मशिदीमध्ये एकत्र जमतात. मशीद हा शब्द ‘मस्जिद’ या अरबी शब्दापासून बनला आहे. अरबी भाषेत मस्जिद या शब्दाचा ‘सजदा करण्याची म्हणजेच मस्तक व गुडघे जमिनीला टेकवून प्रणाम करण्याची जागा’ असा मूळ अर्थ आहे. इस्लाममध्ये ईश्वराची प्रार्थना करताना सजदा करण्याची पद्धत असल्यामुळे इस्लामी प्रार्थनास्थळाला सजदा करण्याची जागा या अर्थाचे मस्जिद (मशीद) असे नाव मिळाले आहे.
दिवसातून पाच वेळा प्रार्थना करणे हे प्रत्येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्य मानले जात असल्यामुळे इस्लाममध्ये पवित्र प्रार्थनास्थळ म्हणून मशिदीला अत्यंत महlत्त्वाचे स्थान आहे परंतु प्रार्थनेसाठी मशीद अपरिहार्य मात्र नाही. ‘सगळे जग मला मशीद म्हणून देण्यात आले आहे,’ या पैगंबराच्या वचनातून हाच आशय सूचित होतो. ‘प्रार्थनेची वेळ झाली असता आपण जेथे असू, तेथूनच प्रार्थना करावी आणि ते स्थळ हीच आपली मशीद होय,’ या प्रख्यात वचनातूनही हेच सूचित होते. प्रसंगी प्रार्थनेसाठी मशीदीत जाता आले नाही तरीही प्रार्थना केली पाहिजे, हे यातून स्पष्ट होते. असे असले, तरी प्रार्थना करण्यासाठी मशिदीत जाण्यामुळे समुदायाबरोबरचे बंधुत्व दृढ होत असल्यामुळे मशिदीचे विशेष महत्त्व आहेच. व्यक्तिगत स्वरूपात घरीच प्रार्थना करण्याच्या कृतीविषयी नापसंती दर्शविणारी वचनेही ⇨हदीसमध्ये आढळतात, ती त्यामुळेच. घरी केलेल्या एका प्रार्थनेचे फळ एका प्रार्थनेइतके, घराजवळच्या मशिदीतील एका प्रार्थनेचे फळ पंचवीस प्रार्थनांइतके आणि जामा (जामी) मशिदीतील एका प्रार्थनेचे फळ पाचशे प्रार्थनांइतके मिळते, असे मानले जाते. गावातील मध्यवर्ती अशा प्रमुख मशिदीला जामी मशीद म्हणतात आणि मुस्लिम लोक−विशेषतः शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी−मोठ्या संख्येने तेथे जमतात. बक्रईद वगैरे सणांच्या प्रसंगीही लोक सामुदायिक प्रार्थनेसाठी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने जमत असतात.
सध्या जगभर असंख्य मशिदी आढळत असल्या, तरी त्यांपैकी चार मशिदी अधिक महत्वपूर्ण आहेत. मक्केची मशीद ही इतर सर्व मशिदींपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. ईश्वराचे निवसस्थान मानला जाणारा ⇨ ⇨काबा त्या मशिदीतच आहे. त्यामुळेच मुस्लिमांच्या दृष्टीने ⇨⇨मक्का हे सर्वांत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. या मशिदीला ‘मस्जिद अल्-हरम’ (पवित्र मशीद) असे म्हणतात. जगातील कोणत्याही मशिदीत वा अन्य ठिकाणी प्रार्थना करीत असताना या मशिदीच्या दिशेला तोंड केले जाते, यावरून या मशिदीचे महत्त्व स्पष्ट होते. या मशिदीच्या खालोखाल महत्त्वाची म्हणून ⇨⇨ मदीना येथील मशीद विख्यात आहे. तिच्या पायाची पहिली वीट स्वतः ⇨⇨मुहंमद पैगंबरांनी रचली होती आणि तिच्या जवळपासच त्यांची कबर आहे. या मशिदीला ‘मस्जिदउन्-नबी’ (प्रेषिताची मशीद) असे म्हणतात. ‘मस्जिद अल्-अक्सा’ म्हटली जाणारी जेरूसलेम येथील मशीदही महत्त्वाची मानली जात असून पैगंबरांनी तेथूनच स्वर्गारोहण केले, अशी इस्लामच्या अनुयायांची श्रद्धा आहे. मदीनेच्या आग्नेयीस सु. पाच किमी. वर असलेल्या कुबा येथे पैगंबरांनी पहिली मशीद बांधली होती, तीही महत्त्वाची मानली जाते.
⇨ इमाम हा मशिदीतील प्रार्थनेचा प्रमुख असतो. तो काबाच्या दिशेला तोंड करून ⇨ नमाज पढतो आणि बाकीचे लोक त्याच्या पाठीमागे राहून त्याच्या कृतीचे अनुकरण करतात. काबाची दिशा समजावी म्हणून मशिदीच्या मक्केकडील भिंतीमध्ये एक मिहराब (कोनाडा) असते आणि इमाम तिच्याकडे तोंड करून नमाज पढतो. मोठ्या मशिदीतून खुतबा वा धर्मोपदेश देण्यासाठी स्वतंत्र असा खातीबही (धर्मोपदेशकही) असतो. तो मिंबर म्हटल्या जाणाऱ्या एका चबुतऱ्यावरून धर्मोपदेश देतो. मशिदीमध्ये एक ⇨ मुअज्जिनही असतो. तो मशिदीच्या मनोऱ्यावरून अजान (बांग) देतो म्हणजेच लोकांना नमाजासाठी बोलावतो. मशिदीत इतर सेवकवर्गही असतो.
इस्लाममध्ये मूर्तिपूजा निषिद्ध असल्यामुळे मशिदीत प्रतिमा, मूर्ती वगैरे असत नाहीत. परंतु कुराणातील वचने मात्र भिंतीवर सुंदर अक्षरांत कोरलेली असतात. प्रार्थनेच्या वेळी गरीब-श्रीमंत वगैरे प्रकारचा कोणताही भेदभाव केला जात नाही. प्रार्थनेपूर्वी हातपाय धुण्यासाठी मशिदीत पाण्याची व्यवस्था केलेली असते. स्त्रियांना मशिदीत येण्यास तत्त्वतः मनाई नाही परंतु त्यांनी घरीच नमाज पढणे इष्ट मानले जाते. इस्लाममधील वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या मशिदी असल्याचे आढळते.
पूर्वी राजे, सरदार वगैरे लोक मशिदी बांधून त्यांचा खर्च चालवीत असत. सध्या इस्लामी राष्ट्रांतून मशिदींचा खर्च सरकारकडूनच केला जातो. इतर ठिकाणी लोकांच्या देणग्यांतून हा खर्च केला जातो. अशा देणग्यांचा एक ⇨ वक्फ नावाचा निधीही असतो. मशीद बांधणे हे पुण्यप्रद मानले जाते. मशीद बांधणारासाठी ईश्वर स्वर्गामध्ये घर बांधील, अशा अर्थाचे प्रेषितांचे वचन आहे. मशिदींचा उपयोग धार्मिक उद्दिष्टांबरोबरच कमीअधिक प्रमाणात राजकीय, लष्करी, सामाजिक, शैक्षणिक इ. अन्य उद्दिष्टांच्या पूर्तीसाठीही केला जात होता, असे इतिहासावरून दिसते. अजूनही काही बाबतींत ते केला जात असल्याचे आढळते.
साळुंखे, आ. ह.
वास्तुरचना : मशिदीची मांडणी साधारणपणे चौरसाकृती किंवा आयताकृती असते. मशिदीमधील उघड्या जागेला ‘सहन’ म्हणतात. सहनाच्या मधोमध पाण्याचा हौद असतो. मशिदीच्या मक्केच्या दिशेकडील भिंतीला ‘किब्ला’ असे म्हणतात. या भिंतीत मध्यभागी अर्धगोलीय कोनाडा-‘मिहराब’–असतो. मिहराबवर अल्प प्रमाणात सुबक नक्षीकाम करून त्याला शोभा आणली जाते. मिहराबलगत उजवीकडे इमामाच्या धर्मोपदेशासाठी ‘मिंबर’ नामक चबुतरा असतो. हा मिंबर लाकूड, हस्तिदंत, संगमरवर वा अन्य प्रकारच्या पाषाणात कोरीव काम करून बनविलेला असतो. मिहराब व मिंबर यांवर किब्ला-भिंतीला लागून एक मंडप असतो त्याला ‘लिबान’ असे म्हणतात. राजघराण्यातील लोक व स्त्रिया यांच्यासाठी असलेल्या खास जागेस ‘मक्सूरा’ म्हणतात. बारीक नक्षीच्या जाळ्या वापरून हा भाग अलग केलेला असतो. सहनाच्या इतर भिंतींना कमानपंक्तीयुक्त ओवऱ्या असतात त्यांना ‘रिबाक’ म्हणतात. सुरुवातीच्या काळात मशिदीची बाहेरची भिंत किल्ल्याप्रमाणे मजबूत व कमीत कमी खिडक्यांची असे. कालांतराने त्यावर कमानी उभारण्यात आल्या. मशिदीची संपूर्ण वास्तुयोजना उंच चौथऱ्यावर केलेली असते. मशिदींना तीन प्रमुख प्रवेशद्वारे असून, बाहेर पायऱ्यांचे रुंद जिने असतात. नमाजासाठी बांग देणाऱ्या मुअज्जिनचा आवाज लांबवर पोहोचावा, या दृष्टीने मीनाराची रचना केलेली असते. लिबान हा रिबाकपेक्षा जास्त उंच, तर मीनार हा लिवानहून उंच असतो.
ऐतिहासिक आढावा : सुरुवातीच्या मशिदींत चौकाचा वापर अरब घरांच्या नमुन्यावरून झाला असावा. प्रारंभीच्या काळात मुहंमद पैगंबरांनी स्वतः बांधलेल्या मशिदीत सर्वसाधारण मशिदीच्या उपरनिर्दिष्ट घटकांचा अभाव होता. नंतर उमर व उस्मान या खलिफांनी पहिला वालिद याने उभारलेल्या दमास्कस येथील भव्य मशिदीत (७०५-७१५) स्तंभ, घुमट, पाण्याचा हौद व मीनार या घटकांचा वापर प्रथम केला गेला. यानंतर हा प्रकार पश्चिम आशियात रूढ झाला. मक्केचा गाबा व जेरूसलेम येथील गिरिघुमट (डोम ऑफ द रॉक इ. स. ६८७-६९१) या दोन महत्त्वाच्या मशिदी वगळता अन्य सर्व मशिदींत वरील वास्तुघटक सामान्यतः आढळतात.
इस्लाम धर्माचा प्रसार अरेबियातून पश्चिमेकडे स्पेनपर्यंत तर पूर्वेकडे भारतातून चीनपर्यंत जसजसा होत गेला तसतसे स्थलकालानुरूप मशिदीच्या वास्तुशैलीत बदल होत गेले. हे बदल प्रामुख्याने पुढील पाच प्रादेशिक वास्तुसंप्रदायांत विभागता येतात : (१) ईजिप्त व सिरिया, (२) उत्तर आफ्रिका व स्पेन, (३) पर्शिया, (४) तुर्कस्तान आणि (५) भारत.
प्रारंभीचा काळ : कैरोनजीक एल् फुस्टॅट येथील अम्रची मशीद (सु. ६४२), मदीना येथील वालिदच्या कारकीर्दीतील मशीद (सु. ७०८) व कैरो येथील इब्ज तुलूनची मशीद (८७६-७९) ह्या प्रारंभकाळातील प्रमुख मशिदी होत. दमास्कसची उमय्या कारकीर्दीतील भव्य मशीद व जेरूसलेमची ‘मस्जिद अल्-अक्सा’ (सु. ७६०) यांमध्ये ख्रिस्ती वास्तुसामग्रीचा वापर करण्यात आला. मुस्लिम वास्तुकारांनी सर्व प्रदेशांतील बांधकामपद्धतींचे अनुकरण आपल्या वास्तुनिर्मितीमध्ये केले. टोकेरी कमीनी, शोभिवंत नक्षीकाम केलेले घुमट, कमानीयोजनेतील गुंतागुंतीच्या समृद्ध रचना इ. घटकांनी मशीद–वास्तूला आगळेपणा व वैविध्य प्राप्त झाले. मीनाराच्या संयोजनात त्यांचे आकार, उंची, मुख्य वास्तूशी असलेला संबंध इ. बाबींमध्ये विशेष प्रयोग झाले. मशिदीच्या वास्तुयोजनेत मीनाराला सुसूत्र असे स्थान प्राप्त झाले. कैरोमधील सुलतान हसन याने उभारलेली मशीद (सु. १३६२) तीमधील मद्रसा आणि उंच, भव्य मनोरे या वैशिष्ट्यांमुळे उल्लेखनीय ठरते.
मूरिश मशिदी : उत्तर आफ्रिका व स्पेन येथील मुसलमानास ‘मूर’ व त्याच्या मशीद प्रकारास ‘मूरिश’ असे म्हटले जाते. प्रचंड आकार, मोठे घुमट, एकमेकांत गुंतलेल्या टोकेरी कमानी, दगड-विटांवरील नाजुक नक्षीकाम तसेच चुन्याच्या गिलाव्यावरील उत्थित नक्षीकाम ही मूरिश मशिदींची वैशिष्ट्ये होत. स्पेनमधील कॉर्दोव्हा येथील मशीद (७८५) आणि अल्जीरियामधील ट्लेमसेन येथील भव्य मशीद (१०८२ पुनःस्थापना ११३६) ह्या उल्लेखनीय आहेत. कॉर्दोव्हाच्या मशिदीच्या लिवानामधील असंख्य खांब हे तिचे खास वैशिष्ट्ये म्हणता येईल.
इराणी मशिदी : इल्फाहान, ताब्रीझ, रेझाईया, नाइन येथील मशिदी उल्लेखनीय आहेत. पर्शियन (इराणी) मशिदींत चकचकीत मुलाम्याच्या लाद्यांवर ‘कूफीक’ शैलीतील सुलेखनाचा वापर करून नक्षीकाम केले आहे. तसेच अलंकरणात द्राक्षाच्या वेली, पानेफुले, पुष्पपात्रे इ. आकृतिबंध व सजावटीदाखल विटांचे अर्धवर्तुळाकृती खांब यांचा वापर केला आहे. या मशिदींच्या वास्तुशैलीचा भारत व अफगाणिस्तान येथील मशिदींवर व अलंकरणावर प्रभाव पडला. सलग व प्रमाणबद्ध आकार आणि त्यावर अनेकरंगी मुलायम लाद्या वापरून केलेले नक्षीकाम हे या शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य होय. या वास्तूवरील घुमट प्रचंड असे. घुमटाचा आकार कांद्याप्रमाणे मध्यभागी फुगवटा असलेला असून तो नक्षीकामाने संपूर्ण मढविलेला असे. हे पर्शियन वास्तुशैलीचे वैशिष्ट्य होय.
तुर्की मशिदी : तुर्की धार्मिक वास्तुकलेवर सेल्जुक कालखंडात (११वे-१३वे शतक) पर्शियन शैलीचा व पुढे ऑटोमन साम्राज्यकाळात, विशेषतः १४५३ मध्ये त्यांनी इस्तंबूल जिंकल्यावर बायझंटिन वास्तुशैलीचा प्रभाव विशेषेकरून दिसून येतो. आयोनियन (ग्रीक) शैलीचेही संस्कार त्यात आढळतात. कोन्या, नायसीआ, बुर्सा येथील मशिदींचा या संदर्भात निर्देश करता येईल. ‘हॅगीया सोफिया’ चे आणि अन्य ख्रिस्ती चर्चवास्तूंचे मशिदींत रूपांतर करण्यात आले. परस्पराधिष्टित अनेक घुमटांचा वापर हे बायझंटिन शैलीवैशिष्ट्य या मशिदींत दिसून येते. सुलतान बेयझीदची मशीद (१४९७), इस्तंबूलची सुलेमानी मशीद (१५५०-५७) आणि एदिर्ने येथील सुलतान सलीमची मशीद (१५७०-७४) या खास वैशिष्ट्यपूर्ण तुर्की मशिदी होत. या तुर्की शैलीतल्या अनेक सुंदर मशिदींचा वास्तुविशारद सिनान हा होता. लिवानावरील कमानयुक्त छते, अनेक लहान-मोठ्या घुमटांची रचना व उंच सडपातळ मीनारांची निमुळती टोके ही या शैलीची वैशिष्ट्ये होत.
भारतीय मशिदी : भारतातील मशीदनिर्मितीचे साधारणपणे बाराव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत सुलतानशाही व नंतरचे मोगल साम्राज्य हे दोन महत्त्वाचे कालखंड होत. कुतुबमीनार-जवळील ‘कुव्वतुल इस्लाम’ या आद्य मशिदीची बांधणी (११९३-११९७) अनेक जैन व हिंदू मंदिरांचे दगड वापरून करण्यात आली. इस्लाम धर्मात प्राण्यांच्या व मानवी आकृत्या निषिद्ध असल्याने वास्तुकारांनी स्तंभावरील व दगडांवरील सर्व आकृत्या तासून टाकल्या. तसेच केवळ स्तंभ व तुळई या स्थापत्यपद्धतीचे ज्ञान असलेल्या भारतीय वास्तुशिल्पज्ञास खऱ्या कमानींची बांधणी ठाऊक नसल्यामुळे, सुरुवातीच्या या मशिदींत एकावर एक दगड रचून कमानी बांधल्याचे दिसून येते. त्यांत साहजिकच अस्सल कमानीचा जोर व हलकेपणा दिसत नाही. परंतु पुढे १२९६च्या सुमारास दिल्ली येथे ‘अलाई दरवाझा’ बांधण्यात आला आणि तेव्हापासून खऱ्या कमानींचा वापर सुरू झाला. अलाउद्दीन खल्जी (कार. १२९६–१३१३), तुघलक (१३२०–१४१३), सय्यद (१४१४–५१), लोदी (१४५१–१५२६) व सूर (१५४०-५५) या सुलतानशाहीच्या काळात दिल्ली येथे ‘जमातखाना’ (१२९६–१३१६), खिरकी (सु. १३७५), कलान (१३८७), मोथ-की-मशीद (सु. १५०५) इ. मशिदी तर अजमीर येथे ‘अढाई दिनका झोपडा’ (सु. १२०५) ही मशीद तसेच इतर अनेक प्रादेशिक शैलींच्या मशिदी बांधल्या गेल्या. जौनपूर, माळवा, गुजरात व बंगाल येथे त्या त्या प्रादेशिक शैलींच्या अनेक मशिदी बांधल्या गेल्या. त्यांतील जौनपूरची अटाला (१३७७–१४०८) बंगालमधील पंडुआ येथील अदीना (१३६९) व गौर येथील बारा सोना (१५२६) गुजरातमधील अहमदाबाद येथील जामी (१४२४), राणी सिप्री (१५१४), सिद्दी सय्यद (१५७२-७३) व चांपानेक येथील जामी मशीद (१४५८), मांडू येथील जामी मशीद (१४४०) इ. उल्लेखनीय आहेत. बंगालच्या मशिदी विटांच्या व तिरप्या छपरांच्या तर गुजरातमधील मशिदी दगडी, नाजुक जाळ्यांच्या, कोरीव शिल्पालंकृत आणि मांडू येथील मशिदी मजबूत व तिरकस भिंतींच्या असत. गुलबर्गा, विजापूर, हैदराबाद व श्रीनगर येथे प्रादेशिक शैलीतील मशिदींचे बांधकाम अनुक्रमे दगड, विटा व लाकूड या माध्यमांचा वापर करून करण्यात आले. आग्र्याची ‘मोती मशीद’ (१६४८-५५) हा मोगल वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना होय. टिपू सुलतानाने उभारलेली ‘मस्जिद-इ-अला’(१७८६-८७) श्रीरंगपटण येथे असून दगडी बांधकाम, अष्टकोनी जाड मीनार, खांब व तुळ्यांची रचना या घटकांतून दक्षिणी शैलीचा परिणाम दिसतो. आग्रा व फतेपुर सीक्री येथील मशिदींवर पर्शियन वास्तुशैलीचा खास प्रभाव जाणवतो.
पहा : इस्लामी वास्तुकला.
कान्हेरे, गो. कृ. मुळीक, शं. ह.
संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture (Islamic Period), Bombay, 1959.
2. Desai, Ziauddin, Mosques of India, Delhi, 1966.
3. Gibb, H. A. R. Kramers, H. J. Ed. Shorter Encyclopedia of Islam, Leiden, 1961.
4. Hill, Derek Graber, Oleg, Islamic Architecture and its Decoration, A. D. 800–1500, London, 1964.
“