मविलन : केरळ राज्यातील एक आदिम जमात. ही जमात मुख्यतः मलबारमधील चिरक्कल तालुक्यात तसेच कननोर जिल्ह्यातील कननोर व तालिपरंब तालुक्यांत आढळते. यांची लोकसंख्या १०,१५१ (१९७१) होती.
मविलन धाडशी व राकट असून जाड भुवया, कुरळे केस, किंचित दुमडलेले ओठ, पसरट नाक आणि गर्द तपकिरी वर्ण ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्रीपुरुष दोघेही अर्धनग्न असतात. मविलथी (मविलन-स्त्री) कपड्या अभावी आपला उरोभाग उघडाच ठेवते. स्त्रीपुरुषांना आभूषणांची विशेष आवड आहे. स्त्रिया विशेषतः नाक, कान यांत अलंकार घालतात. कानातील अलंकारांना थोडा म्हणतात. पुरुष डोक्यावर सुपारीच्या झाडाच्या सालीपासून बनविलेली विशिष्ट प्रकारची टोपी घालतात.
मविलन जमातीत दोन मुख्य समूह आहेत : (१) तुलूमार किंवा तुलुमन (तुलू राज्यातील प्राचीन लोक तुलूमविलन वा एड-मविलन) व (२) चिंगत्तान (सिंहाच्या हृदयाचे लोक). तसेच त्यांच्या ३० पोट जमाती असल्याचा उल्लेख आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शिकार व जंगलातील औषधी वनस्पती गोळा करून विकणे हा होता तथापि त्यांच्या या भटक्या जीवनापासून त्यांना परावृत्त करण्याचे प्रयत्न शासनातर्फे गेल्या १५-२० वर्षांत झाले. त्यामुळे मध, मुळे, फळे गोळा करणे तसेच लाकूड तोडून जळण विकणे हे व्यवसाय ते करतात. काही मविलन बुरूडकाम व शेतमजुरी करतात. काही जंगलखात्यात हत्ती सांभाळण्यासाठी माहूत म्हणूनही राहतात.
ही जमात पूर्णतः मांसाहारी असूनही जनावरांचे विशेषतः गाय, बैल, रेडा इ. प्राण्यांचे मांस ते निषिद्ध मानतात. ते अपभ्रंश तुलू भाषा बोलतात. त्यांची वस्ती आठ ते दहा झोपड्यांची असून ती मुख्यत्वे जंगलात आढळते. त्यांच्या झोपड्या पूर्वाभिमुख असून बांबू आणि झाडांच्या फांद्यांपासून बनविलेल्या असतात. छप्पर गवताचे किंवा पानांचे असते. झोपड्या जमिनी सपाट असून त्यांना ‘मापूर’ वा ‘चित्तरी’ म्हणतात. झोपड्यांत बांबूच्या चटया ते वापरतात. पूर्वी ते अन्न संकलनार्थ सतत भटकत असत पण अलीकडे ते स्थिर वस्ती करून राहू लागले आहेत.
मुले-मुली वयात आल्यानंतर विवाह करतात. विवाहसमारंभ वधूच्या घरी साजरा होतो. वधूमूल्याची प्रथा रूढ असून ते ऐपतीप्रमाणे २ ते ११ रुपयांपर्यंत देतात. जातीतील विवाहास मान्यता असून अन्य कुळातील विवाह निषिद्ध मानले जातात. बहुपत्नीकत्वाची चाल रूढ आहे. ही पितृसत्ताक जमात आहे. नियोगपद्धतीने झालेली संतती मविलनांना मान्य नाही. रजस्वला आलेल्या मुलीला पाच दिवस स्वतंत्र झोपडीत ठेवतात. मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी त्याचे कान टोचून नामकरणविधी उरकतात.
मविलन जडप्रामाणवादी असून हिंदू धर्मातील देवदेवतांची पूजा करतात. हे लोक विशेषतः चट्टियूर भगवती देवीला भजतात. यांच्यात पंचायत असते. पंचायत प्रमुखाला चिंगन (सिंह) म्हणतात. त्याला व त्याच्या पत्नीस–चिंगथी-सर्व समारंभात मानाचे स्थान असते. या लोकांना लोकगीते आणि लोकनृत्याची विशेष आवड आहे.
मविलन मृतास स्नान घालून नवीन कापडात गुंडाळतात व तोंडात भाताचा घास ठेवून दक्षिणेकडे तोंड करून पुरतात. मृताचा मुलगा त्याचे सर्व अंत्यसंस्कार करतो. तो नसल्यास हे काम पुतण्या करतो. अशौचात असलेली स्त्री निधन पावल्यास तिचे सर्व अंत्यसंस्कार स्त्रियाच करतात. पुरुष अशा स्त्रियांच्या प्रेताला स्पर्शही करीत नाहीत कारण त्यांना भुताखेतांची भीती वाटते. मृताचे थडगे वस्तीच्या पूर्वेस कधीही येऊ देत नाहीत. मृताशौच काहीजण सात दिवस, तर काही जण पंधरा दिवस पाळतात. मृताशौच समाप्तीच्या दिवशी भोजनावळ घालून मृतात्म्यास नैवेद्य देतात.
संदर्भ : Luiz, A. A. D. Tribes of Keral, New Delhi. 1962. Thurston Edgar, Castes Tribes of Southern India, Vol. V. Madras, 1965.
शेख रुक्साना
“