मलहोत्रा, जनरल ओमप्रकाश : (? ऑगस्ट १९२२− ). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. नोव्हेंबर १९४१ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखानाविभागात कमिशन. काही दिवस देवळालीच्या तोफखाना-विद्यालयात लष्करी शिक्षक. नोव्हेंबर १९५० ते १९५७ या काळात तोफखान्याच्या वेगवेगळ्या दलांचे मुख्याधिकारी (कमांडर) राहिले. त्यानंतर वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. जून १९६२ ते जुलै १९६५ या कालात भारतीय दूतावास मॉस्को (रशिया) येथे त्यांनी राजदूताचे सैनिकी सहायक म्हणून काम केले. ऑगस्ट १९६५ ते जानेवारी १९६६ दरम्यान तोफखाना ब्रिगेडचे प्रमुख असताना भारत-पाकिस्तान युद्धात संदेश पत्रिकेतील उल्लेखाचा मान प्राप्त झाला. त्यानंतर त्यांची पहाडी ब्रिगेडचे मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. नोव्हेंबर १९६७ साली त्यांना मेजर जनरलचा हुद्दा प्राप्त झाल्यावर दोन वर्षे त्यांनी पायदळ डिव्हिजनचे नेतृत्व केले. सप्टेंबर १९६९ मध्ये पूर्व आघाडीवर चीफ ऑफ स्टाफ म्हणून एका कोअर मुख्यालयात त्यांची नियुक्ती झाली. १९७२ मेपर्यंत हे कार्य केल्यावर त्यांना लेफ्टनंट जनरलचा हुद्दा मिळाला व त्यांची पंजाबमध्ये एका कोअरवर नेमणूक करण्यात आली.
इ. स. १९७४ मध्ये दक्षिणी कमान पुणे येथे त्यांची कमान मुख्याधिपती (जनरल ऑफिसर कमाडिंग इन चीफ) म्हणून आणि पुढे जानेवारी १९७७ मध्ये भूसेनाध्यक्षाचे दुय्यम म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांना परमविशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले. १ जून १९७८ साली ते भूसेनाध्यक्ष ह्या उच्च हुद्यावर पोहोचले. ते अकरावे भूसेनाध्यक्ष होते. आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सेना व सैनिक यांच्याकरिता अविरत प्रयत्न केले. ३१ मे १९८१ रोजी ते निवृत्त झाले. सध्या (१९८३) ते भारताचे इंडोनेशियामधील राजदूत आहेत.
पित्रे, का. ग.
“