मलपुलया : केरळ राज्यातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यतः पालघाट जिल्ह्यात आढळते. त्यांची लोकसंख्या २,९८२ (१९६१) होती. मलपुलयांत कुसंब, करवशी व पांपू असे तीन पोटभेद आढळतात. ही जमात मागासलेली असून जंगलातून अन्नसंकलन करत भटकते. याशिवाय शिकार, मासेमारी व शेती हे त्यांचे प्रमुख उद्योगधंदे होत. शिकारीत कुत्र्याचे साहाय्य त्यांना होते. मलपुलया हे केरळमधील इतर आदिवासींच्या तुलनेने उंच आहेत. तपकिरी काळा वर्ण, मध्यम बांधा, अरूंद कपाळ आणि बसके नाक ही त्यांची काही प्रमुख नेग्रिटो वंशसदृश शारीरिक वैशिष्ट्ये होत.त्याच्या झोपड्या इतर जमातींच्या मानाने अधिक मजबूत व रेखीव असतात. झोपड्यांच्या भिंती मातीच्या असून त्या जमिनीपासून उंच केलेल्या चौथऱ्यावर बांधलेल्या असतात. ते मुलामुलींची लग्ने वयात आल्यानंतर करतात. रजस्वला आलेल्या मुलीला १४ दिवस अशौच मानून स्वतंत्र झोपडीत ठेवतात. लग्नात वधूमूल्य देण्याची प्रथा असून लग्नविधी रात्री वधूच्या घरी साजरा करतात. आते-मामे भावंडांच्या विवाहास अग्रक्रम देण्यात येतो. मलपुलयांतील पूर्वापार चालत आलेली मातृसत्ताक कुटुंबपद्धती बदलली असून पितृसत्ताक पद्धती रूढ झाली आहे. त्यांच्यात बहुपत्नीत्वाची चाल आहे.
मलपुलयांमध्ये नैतिकतेला फार महत्व दिले जाते. अंजनाड येथील मलपुलयांमध्ये व्यभिचारी व्यक्तीस मुल्लूमरूक्कूच्या झाडास बांधून १२ फटक्यांची शिक्षा देतात. स्त्री ही मलपुलयांमध्ये अपवित्र मानली गेली असल्यामुळे स्त्रियांना पूजाविधीस बंदी असून धार्मिक समारंभाच्या वेळी त्यांना कोणतेच अधिकार नसतात.
काली, मरीअम्मा, चपलम्मा, कलुपारम्म व मरयूर येथील अरगलिनाचई इ. देवतांना ते भजतात. सुगीच्या हंगामात पीक कापण्यापूर्वीच्या रात्री मलपुलया पूर्वजांची पूजा करतात आणि रेडा बळी देतात व नाचगाण्यांनी रात्र जागवतात.
संदर्भ : Iyer, L. A. Krishna, Social History of Kerala : the Pre-Dravidians,
शेख, रूक्साना
“