मरुमक्कतायम् : (मरुमक्कट्टायम्). मरुमक्कतायम् या तमिळ शब्दाचा अर्थ सामान्यपणे भाचे व भाच्यांमार्फत चालत आलेला वारसा, असा होतो. दक्षिण भारतात मुख्यत: मलबार, कोचीन, त्रावणकोर या भागांतील नायर जमातींमध्ये ही रूढी आढळून येते. तसेच मलबारमधील भोपल्यांचा वारसाक्रमही याच रूढीने ठरतो. या जमातींत स्त्रीप्रधान समाजरचना असून स्त्रियांकडून वारसा मोजणे किंवा प्राप्त होणे. हे यांच्या वारसा पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. नायरांमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात असून विवाहाला फारसे महत्त्व दिले जात नाही. स्त्रीने वाटेल त्या पुरुषाबरोबर वाटेल तितका वेळ राहण्याची प्रथा या समाजरचनेत असून त्या सहवासाला ‘संबंधम्’ असे म्हणतात. तथापि पुढे १८९६ च्या मलबार मॅरेज अँक्टने या वरील पद्धतीला प्रतिबंध बसला. तसेच मद्रास मरुमक्कतायम् कायद्यान्वये ( १९३२ ) पहिले लग्‍न झाले असताना दुसरे लग्‍न केल्यास ते बेकायदेशीर ठरते. मरुमक्कतायम् कायद्याने रूढीप्रमाणे केलेला विवाह कायदेशीर ठरविण्यात येऊन नोंदणीची तरतूद करण्यात आली मालमत्तेविषयीच्या हक्कांचे योग्य नियमन व संरक्षण करण्यात आले.

मरुमक्कतायम् कायद्यान्वये चालणाऱ्या या जमातींतील एकत्र कुटुंबपद्धतीला ‘तरवाड’ संज्ञा असून त्यात विस्तृत कुटुंबाचा समावेश होतो. स्त्री आणि पुरुष यांना मालमत्तेत समान वाटा असतो. तरवाडमध्ये जन्मलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांचा त्या मालमत्तेवर या कायद्यानुसार सारखाच हक्क असतो. या कुटुंबातील कोणाही एकाचा मृत्यू झाल्यास त्याचा/तिचा मालमत्तेतील हिस्सा त्या कुटुंबातील इतर सर्व हयात व्यक्तींच्याकडे उत्तराधिकाराने प्रक्रांत होतो. स्त्री स्वत:च्याच तरवाडमध्ये राहते; नवऱ्याच्या तरवाडमध्ये जात नाही. आंतरजातीय विवाहाची पद्धतीही रूढ आहे.

तरवाड कुटुंबातील कर्त्या पुरुषास ‘कर्णवान’ म्हणतात व तो हयात नसल्यास कर्त्या स्त्री-प्रमुखाला ‘कर्णवती’ म्हणतात. तरवाड कुटुंबाची तसेच कुटुंबाच्या मालकीची जंगम व स्थावर मालमत्तेची व्यवस्था पाहणे इ. कामे कर्णवान करतो. मालमत्ता विकणे, गहाण टाकणे किंवा भाड्याने देणे वगैरे अधिकार कर्णवानला असून त्याने वर्षातून एकदा कुटुंबातील सर्व कनिष्ठ सदस्यांना सर्व मालमत्तेच्या हिशोब देण्याची पद्धती आहे. कर्णवानच्या हातून कुटुंबाच्या मालमत्तेची नासधूस किंवा गैरवापर केला गेला, तर त्याच्यावर दावा दाखल करता येत नसे. परंतु १९३२ च्या मरुमक्कतायम् कायद्यातील कलम ३३ व ३४ मध्ये केलेल्या सुधारणांमुळे कर्णवानच्या या अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या. तसेच या जमातींच्या वारसा हक्कांचे नियमन १९५६ च्या हिंदु वारसा कायद्यातील कलम ३७, १७ यांप्रमाणे करण्यात आले.

संदर्भ : Aiyar, N. Chandrasekhara, Ed., Mayne’s Treatise on Hindu Law and Usage, Madras, 1953.

गाडगीळ, श्री. वि.; सागडे, जया