मराठवाडा: विद्यमान महाराष्ट्र राज्यातील एक भूप्रदेश. याच्या भौगोलिक सीमा निश्चित नसून निरनिराळ्या कालखंडात त्या बदलत गेल्या, तसेच यातील प्रदेशांची नावेही बदलत गेली. १९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा  असे सर्वसाधारणत: संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ. लोकसंख्या: ९७,२६,८४० (१९८१).

ऋग्वेदातील  दक्षिणापथात, महाभारतातील दंडकारण्यात आणि रामायण व मत्स्यपुराणातील दक्षिमापथात मराठवाड्याचा प्रदेश सामावलेला होता. महाभारतकाळापासूनच मराठवाड्याच्या निरनिराळ्या भागांस वेगवेगळी नावे होती असे दिसते. उस्मानाबाद जिल्ह्यांचा काही भाग कुंतल देशात, तर औरंगाबादचा काही भाग मूलकात आणि नांदेड व बीड या जिल्ह्यांतील काही भाग अश्मकातप्राचीन काळी सामावलेला होता. अश्मकाचा समावेश सोळा जनपदांमध्ये होता व त्याचा उल्लेख अष्टाध्यायीत आणि अंगुत्तरनिकायमध्येही आढळतो.

ऐतिहासिक द्दष्टया मराठवाडा हे नाव फारसे जुने नाही. १८६४च्या कागदपत्रांत या प्रदेशाला मराठवाडी असे संबोधल्याचे आढळते. पुढे मराठवाड्याचेच मराठवाडा झाले. मराठी भाषिक बहुसंख्य असलेल्या निजामाच्या संस्थानातील या प्रदेशाला हे नाव दिले गेले होते.

भौगोलिक रचना: मराठवाड्याच्या उत्तरेस महाराष्ट्र राज्याचे बुलढाणा आणि जळगाव हे दोन जिल्हे आणि पश्चिमेला नाशिक व अहमदनगर जिल्हे येतात. दक्षिणेकडे सोलापूर आणि कर्नाटकातील गुलबर्गा व बीदर हे जिल्हे आहेत तर पुर्वेला आंध्र प्रदेश राज्याचे कामारेड्डी, निझामाबाद व आदिलाबाद जिल्हे आणि महाराष्ट्र राज्याचे यवतमाळ व अकोला हे जिल्हे आहेत.

मराठवाड्याचा प्रदेश मुख्यत्वे बेसाल्ट या काळ्या खडकाचा बनलेला आहे. मराठवाड्याचे दक्षिण पठार समुद्रसपाटीपासून सरासरी ३८१ मी. उंचीचेआहे. प्राकृतिक द्दष्टया मराठवाड्याचे दोन भाग पडतात: पटारी प्रदेश व सखल प्रदेश. बालाघाटाच्या रांगा परभणी जिल्ह्यातून जातात व पुढे उस्मानाबाद जिल्ह्यात शिरून त्याचे दोन प्रदेशिक भाग करतात: (१) ईशान्य आणि पूर्वेकडील पठार, (२) नैर्ऋत्य व द. भागातील सखल प्रदेश. पर्वतांची तिसरी रांग औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांची  विभागणी पटार व सखल प्रदेशामध्ये (पयानघाट) करते. बालाघाट, जालना डोंगर आणि अजिंठ्याचे डोंगर हे या प्रदेशातील प्रसिद्ध डोंगर होत.

या प्रदेशातील गोदावरी, पुर्णा आणि मांजरा (पुराणातील वंजुला आणि लोकभाषेतील वांजरा) या नद्या मोठ्या व महत्वाच्या आहेत. उस्मानाबाद वगळता गोदावरी नदी मराठवाड्याच्या चारही जिल्ह्यांतून वाहते. गोदावरीच्या खोर्‍यातील गाळाची जमीन कित्येक मीटर खोल आहे. या नैसर्गिक सुपीकतेमुळेच अश्मयुगापासून मराठवाड्याकडे मानव आकृष्ट झाल्याचे दिसते. पैठण येथे जायकवाडी हा मोठा प्रकल्प बांधण्यात आला आहे. तेथेच  कर्नाटकातील वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर श्रीज्ञानेश्वर उद्यानही  तयार होत आले आहे. या प्रदेशात वरील तीन मोठ्या नद्यांशिवाय इतर अनेक नद्या व उपनद्या आहेत. हवामान किंचित उष्ण व कोरडे असून पाऊस सरासरी ८० सेंमी. पडतो.

मराठवाड्यातील पैठण, भोकरदन, देवगिरी, तेर यांसारखी ठिकाणे प्राचीन काळी व्यापारी मार्गावर होती. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथात पैठण व तेर ही ठिकाणे एका मार्गाने भडोचला जोडली होती, असे म्हटले आहे. दुसरा मार्ग चाळीसगाव, वेरूळ. औरंगाबादमार्गे पैठणहून सोपार्‍यापर्यंत, तर प्रतिष्ठानला उज्जैनशी जोडणारा मार्ग अजिंठा, बहाळ आणि बर्‍हाणपूरद्वारे जात होता. व्यापारउदिमाच्या संबंधात मराठवाडा फारसा गतिशील होता असे म्हणता येत नाही. तेर, देवगिरी, पैठण, भोकरदन ही काय ती या बाबतीतील महत्वाची व्यापारकेद्रें होत.

इतिहास: पुरातत्वज्ञांच्या मतानुसार मराठवाड्यात मानवाची वस्ती सु. ७०.००० वर्षापासून आहे. १८६५ मध्ये वायने या भूगर्भशास्त्रज्ञाला पैठणजवळ मुंगी येथे मध्यपराश्मयुगीन दगडी हत्यारे मिळाली.  महाराष्ट्रात मिळालेली ही पहिली अश्मयुगीन हत्यारे होत. मानवाने स्थिर जीवनास प्रारंभ केला, तोव्हापासून मराठवाड्यात त्याचे अस्तित्व आढळते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील आद्य शेतकर्‍याची वस्ती श्रीज्ञानेश्वरांच्या जन्मगावी, अपेगाव येथेच, पुरातत्वज्ञांना आढळून आली. उत्खननात तेथे ताम्रपाषाणयुगीन घरांचे अवशेष, रंगीत खापरे, धान्ये आणि दगडी हत्यारे मिळाली. या वस्तीचा काळ इ. स. पू. १५६४ असा कार्बन-१४ पद्धतीने टरविण्यात आला आहे.

पुराणातील वर्णनानुसार मराठवाड्याच्या काही भाग नंदांच्या साम्राज्यात असावा असे दिसते. नव-नंदडेरा म्हणजे नांदेड असेही मानले जाते. ज्ञानकोशकारांच्या मते पैठण ही त्यांची दक्षिणेकडील राजधानी होती. पुढे अशोकाच्या लेखातून पेतनिकांचा म्हणजेच पैठणवासियांचा उल्लेख आढळतो.

मराठवाड्याला महत्व आले ते ⇨सातवाहन वंशाच्या कारकीर्दीत. दक्षिमेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या राजकुलाने मराठवाड्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत स्थान मिळवून दिले, तसेच साहित्यात आणि कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यास प्रवृत्त केले. पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली. अजिंठा येथील पहिल्या गटातील व पितळखोरे येथील लेणी याच काळातील होत.

गौतमीपुत्र सातकणींने नहपान आणि कर्दमकासारख्या शत्रूंना पराभूत करून महाराष्ट्राला वाचविले. हाल या राजाने गाथासप्तशतीसारखा तत्कालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब असलेला ग्रंथ संपादित केला.

सातवाहनांनंतर मराठवाड्याच्या काही भागावर ⇨वाकाटकांनी राज्य केले त्यांच्या कारकीर्दीत अजिंठ्याच्या काही लेण्यांत चित्रकाम झाले.


वाकाटकांनतर चालुक्य वंशाच्या राजांचा मराठवाड्याशी संबंध आला. त्यानंतर ⇨राष्ट्रकूट घराण्याने ७४४ ते ९७३ पर्यंत येथे राज्य केले. त्यांची एक उपराजधानी नांदेड जिल्ह्यांतील कंधार येथे होती. वेरूळ येथील अद्वितीय लेणी यांच्या कारकीर्दीत खोदली गेली.

कल्याणी चालुक्याच्या काळातील शंभरांहून अधिक शिलालेख नांदेड उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांतून मिळतात. या राजांनी याच जिल्ह्यांतून कलापूर्ण मंदिरे उभारली. सहाव्या विक्रमादित्याच्या काळात विद्यास्थाने व महाघटिकस्थाने (महाविद्यालये) यांना अनुदान दिले गेले. मराठवाड्याच्या काही भागावर कलचुरींना व त्यांच्या वंशजांनी सु. वीस वर्षे राज्य केले, असे अभिलेख सांगतात.

मराठवाड्याला ⇨यादव घराण्याच्या काळात अत्यंत महत्व आले. यादव वशातील पाचव्या भिल्लमाने ११७५ मध्ये देवगिरी येथे राजधानी हलविली आणि तेथे देवगिरी किल्ला बांधला. यादवकाळात मराठवाड्याची सर्व क्षेत्रांत, विशेषत: संगीत, कला, वाङ् मय इत्यादींत, प्रगती झाली.  यादवकालीन अनेक मंदिरे मराठवाड्यात असून ती हेमाडपंती या नावाने प्रसिद्ध आहेत. हेमाद्री तथा हेमाडपंत हा बहुश्रुत विद्वान यादवांच्या दरबारी होता. याने चतुर्थर्गचिंतामणी हा बृह् द् ग्रंथ  लिहिला. रामचंद्र (१२७१ ते १३११) हा यादवांचा शेवटचा राजा मराठवाडा याच्या काळात परमोत्कर्षाला पोहोचला होता.

देवगिरीच्या वैभवामुळे मोहित होऊन अलाउद्दीन खल्जीने दक्षिणेवर स्वारी केली. रामचद्र यादवला पराभव पतकरून अपमानास्पद तह करावा लागला. पुढे मलिक काफूरने देवगिरीवर आक्रमण केले. त्यात देवगिरी पडली. यादवांचे साम्राज्य लयास गेले.

खल्जीनंतर दिल्लीच्या गादीवर तुघलक आले. त्यांपैकी ⇨मुहम्मद तुघलकाने देवगिरी येथेच दिल्लीची राजधानी हलविवी देवगिरीचे नाव दौलताबाद केले. तुघलकानंतर मराठवाड्याचा बराचसा भाग बहमनी राज्यात समाविष्ट झाला. १५३८ मध्ये बहमनी राज्याची पाच शकले झाली आमि मराठवाड्याचा प्रदेशही आदिलशाही, इमादशाही, तुत्बशाही, बरीदशाही आणि निजामशाही यांत विभागला. पुढे  १६३३ मध्ये शहाजहान या मोगल राजाने दौलताबाद जिंकले. त्याचा मुलगा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार म्हणून काही काळ येथे होता. यानंतर आसफजाही घराण्याचे म्हणजे हैदराबादच्या निजामाचे १७२४ पासून मराठवाड्यावर आधिपत्य होते. मराठ्यांनी निजामाविरूद्धच्या अनेक लढायांत पालखेड (१७२८), उदगीर (१७६०), राक्षसभुवन (१७६३), खर्डा (१७९५) इत्यादींत निजामाचा पराभव केला. १७९५ मध्ये मराठवाड्याचा प्रदेश निजामाने सुपूर्द केला होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर त्यावर पुन्हा निजामाने ताबा मिळविला. ग्रजांच्या आश्रयाने निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले [“हैदराबाद संस्थान]. स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निजामविरोधी चळवळींना जोर चढला होता. रझाकारासारख्या धर्मवेड्या मंडळींनी मराठवाड्यातील प्रजेचा अनन्वित छळ केला. तथापि मराठवाड्यातील नानल, श्रीनिवासराव बोरीकर, मुरलीधरराव कामतीकर, मुकूंदराव पेडगावकर, दिगंबरराव बिंदू, शामराव बोधनकर,स. कृ. वैशंपायन, भगवानराव गांजवे, हुतात्मा पानसरे , हुतात्मा एकलारे, दामोदर पांगरेकर, माणिकचंद पहाडे, बाबासाहेब परांजपे, वाघमारे, फुलचंद गांधी, देवीसिंग चौहान, पंडितराव बोकील, काशीनाथराव वैद्य, बेथुजी, बाबुराव कानडे, हनुमंत बेंडे, श्री. के. गोळेगावकर मेलकोटे, जमलापुरम् केशवराव, गोविंदभाई श्रॉफ, अच्युतराव देशपांडे, काशिनाथराव वैद्य, अनंतराव भालेराव इ. मंडळीनी निर्धाराने प्रतिकार केला.

भारत सरकारने १३ ते १७ सप्टेंबर १९४८ मध्ये पोलिसकारवाई करून निजामाला शरण आणले आणि हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठवाडा द्वैभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आला आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा एक घटक प्रदेश म्हणून सामाविष्ट झाला.

महत्वाची स्थळे : गंगथडी हे महाराष्ट्रातील अत्यंत सुपीक प्रदेशात असून नागरीकरणाच्या  प्रारंभाच्या द्दष्टीने ⇨पैठण,  ⇨तेर, ⇨भोकरदन, ⇨दौलताबाद अशी काही नगरे उल्लेखनीय आहेत. गोदेच्या तीरावरील पैठण नगरीस तीर्थक्षेत्राचे महत्व लाभले. येथील उत्खननात मिळालेल्या मृण्मयमूर्ती आणि शिल्पे यांवरून रोम, ग्रीस इत्यादींशी पैठणचा व्यापारी संबंध असावा असे स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील भोकरदन नगर सातवाहनांच्या काळी भरभराटीस आले हे पैठण ते उज्जैन या व्यापारी मार्गावर होते.

मराठवाडा प्रसिद्ध आहे तो अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांमुळे, येथील ज्योतिलिंगांमुळे आणि संतभूमि या नात्याने. अजिंठा, वेरूळच्या लेण्यांत शिल्पकाम असले, तरी ही जगप्रसिद्ध आहेत ती येथील भित्तीचित्रांमुळे. अजिंठ्याच्या क्र.१६ च्या लेण्यातील मृत्यु शय्येवरील राणी, क्र. १ मधील पद्मपाणि, वज्रपाणि, काळी राणीइ. चित्रे अप्रतिम आहेत. यांशिवाय मराठवाड्यात औरंगाबाद, धाराशीव, खरोसे, आंबेजोगाई, सोयगाव, पितळखोर इ. ठिकाणी लेणी आहेत.

मराठवाडा संतभूमी म्हणून प्रसिद्ध असून तेथे काही तीर्थक्षेत्रेही आहेत. औंढा नागनाथ (जि. परभणी), घृष्णेस्वर (जि. औरंगाबाद), परळी वैजनाथ (जि. बीड) ह्या तीन ठिकाणी ज्योतिलिंगे आहेत  तर आंबेजोगाई येथील योगेश्वरी, माहूर येथील रेणुका आणि तुळजापूरची तुळजाभवानी या देवीही प्रसिद्ध आहेत. येथे नवरात्रात विशेष यात्रा भरतात. याशिवाय हेमाडपंती म्हणून असलेली सु. मंदिरे मराठवाड्यात आहेत.

नांदेड येथे गुरू गोविंदसिंगांचे समाधिस्थान व मोठा गुरूद्वारा आहे. देवगिरी, नळदुर्ग, परांडा येथील किल्लेही प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद येथील ताजमहालच्या धर्तीवर बांधलेला बिबीका मकबरा प्रवाशांचे आकर्षण आहे.

ज्ञानेश्वरादि भावंडे, नामदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार,जनाबाई, जगमित्र नागा, सेना न्हावी (बीदर), जनार्दन स्वामी, भनुदास, एकनाथ, समर्थ रामदास ही सर्व संतांची मांदियाळी मराठवाड्याच्या  भूमीत जन्मलेली. अर्वाचीन काळात ही परंपरा नाथसंप्रदायी गुंडामहाराज, समर्थ संप्रदायी श्रीधरस्वामी येथपर्यंत आणता येते. यांशिवाय गीतार्णवकार दासोपंत, आदिकवी मुकूंदराज, शिवकल्याण, भास्करभट्ट बोरीकर, कृष्णादास, जनीजनार्दन, गोपाळनाथ, मध्वमुनी, अमृतराय, उद्धवचिद् घन,  वामनपंडित ही सर्व कवी मंडळी मराठवाड्याची.

देगलूरकर, गो. ब.