मन्नन : भारतातील एक वन्य आदिवासी जमात. त्यांची वस्ती केरळ राज्यातील मुख्यत: क्विलॉन, कोट्टयम आणि पालघाट या जिल्ह्यांतल्या डोंगरी प्रदेशांत आढळते.कर्नाटक राज्यातही तुरळक प्रमाणात त्यांची वस्ती आहे. त्यांची एकूण लोकसंख्या ४,२७० होती (१९७१). मन्नन हे मनू (पृथ्वी) आणि मनुशियान (मानव) या दोन शब्दांचे अपभ्रष्ट रूप आहे. म्हणून मन्नन स्वत:ला भूमिपुत्र (पृथ्वीचे मुलगे) मानतात. वरियलकीझ मन्नन, गोपूरा मन्नन व तलमाला मन्नन ही त्यांची प्रदेशपरत्वे नावे आहेत. त्यांच्यात मन्नन आणि मारवान असे दोन मुख्य गट आहेत.
प्रथम उंची, पिंगट काळा वर्ण, कुरळे केस आणि सुद्दढ अंगकाठी ही त्यांची काही शारीरिक वैशिष्टये असून स्त्रिया आकर्षक व बांधेसूद असतात. सुरूवातीस हे लोक अर्धनग्न अवस्थेत भटके जीवन व्यतीत करीत होते. परंतु अलीकडे अधुनिकीकरणाचा परिणाम यांच्यात आढळतो. स्त्री-पुरूष दोघेही अंलकार वापरतात. स्त्रिया हातांत विपुल प्लॅस्टिकच्या अथवा पितळी बांगड्या घालतात. कपाळ व नाक यांवर गोंदून घेण्याची रूढी असून पुरूष मानेभोवती लाल व पांढर्या रंगाचा पट्टा गुंडळतात.
मन्ननांची वस्ती विखुरलेल्या पालांतून असते. झोपडीत दोन भाग असतात. झोपड्या वेत, बांबू यांपासून बनविलेल्या असून जंगलातील हिस्त्र पशूंपासून संरक्षण मिळावे, म्हणून वस्तीसाठी माचण बांधतात.
काही मन्ननांना जंगलातील औषधी वनस्पतींची चांगली माहिती आहे, तथापि स्थिर वस्तीमुळे ते पोडू पद्धतीची फिरती शेती सोडून स्थायिक स्वरूपाची शेती करू लागले आहेत. काही मन्नन शेतमजुरी करतात. तर काही रानातील मध, डिंक वगैरे गोळा करून विकतात. परिकाम व नाभिकचा व्यवसायही ते करतात. मासेमारी व शिकार हेही जोडधंदे मन्ननांमध्ये आढळतात.
मन्नन हे मांसाहारी असून रानरेड्याचे मांस खातात. परंतु गोमांस व गाईचे दूध निषिद्ध मानतात. त्यांच्या आहारात मुख्यत: भात व कंदमुळे यांचा समावेश असतो. नारळ मात्र ते खात नाहीत. नारळ खाल्ल्यास वाघ आणि हत्ती आपल्यावर हल्ला करतील, अशी त्यांच्यात समजूत आहे. बहुतेक मन्नन मद्यपान करतात. घरगुती वापरात ते मृद् भांडी आणि नारळाची करवंटी वापरतात.
मुलेमुली वयात आल्यानंतर विवाह होतात. रजस्वाला स्त्रीस फारसा प्रतिबंध नसतो. ती फक्त अन्न शिजवत नाही. जननाशौच तीस दिवस पाळतात. विवाहाचा प्रस्ताव वरपक्षाकडून येतो. आते-मामे भांवडांतील विवाहास प्राधान्य दिले जाते, यांची युवागृहे प्रसिद्ध असून तेथे तरूण मुला-मुलींचे घनिष्ठ संबंध येतात, परंतु विवाहपूर्व वा विवाहोत्तर व्यभिचारास दंड व फटके अशा दोन्ही शिक्षा दिल्या जातात. काही मन्ननांत सेवाविवाहाची चाल असून विवाहपूर्वी भावी जावई सासर्याकडे काम करतो. विवाहात ताली (मंगळसूत्र) बांधणे हा महत्वाचा विधी असून विवाहानंतर नवदांपत्य स्वतंत्र झोपडीत राहते मन्ननांमध्ये एकप्नीत्वाची रूढी आहे. पहिल्या पत्नीस अपत्य झाले नाही, तर दुसरा विवाह करतात. घटस्फोट आणि पुनविंवाह क्वचित आढळतात. मातृसत्ताक कुटूंबपद्धती प्रचलित असल्यामुळे मातेकडून मुलीकडे वारसा जातो. त्यामुळे स्त्रियांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
बहुतेक मन्नन हिंदू देव-देवतांना भजतात. विशेषत: कालीमाता व षष्ठा या देवता अधिक लोकप्रिय असून कालीमातेस ते देवींची देवतामानतात. पेरणी व सुगीच्या हंगामापुर्वी ते स्वामीकू-कुंबीदल नावाचा समारंभ करतात. चथमुथू हा त्यांच्यातील महत्वाचा वार्षिक सण आहे. कर्मठ मन्नन अजूनही धूप, हिंगूळ आदींचा पूजेसाठी वापर करतात.
मन्नन तमिळ आणि मल्याळम् यांची मिश्र बोली बोलतात. त्यांच्यात पंचायत प्रमुखाला कनी किंवा कन्नीकारन म्हणतात. त्याच्या पत्नीस (कन्नीकारथी) जमातीत मान व आदर असतो. कनीस मंत्री नावाचा अधिकारी मदत करतो. मांत्रिकास (बथी किंवा मंत्रवथी) विशेष स्थान असते. जमातीतील सर्व धार्मिक विधी आणि औषधोपचार तोच करतो.
मन्नन मृतांना पुरतात. मृताची हजामत करून त्यास स्नान घालतात. आणि नविन कापडांत गुंडाळून प्रेत फुलांनी सजवितात. नंतर ते वेताच्या चटईवर ठेवून मीटर-दीडमीटर खड्डा खणून त्यात पुरतात. पुरलेल्या जागी तात्पुरता मांडव उभारतात. भाचा मृताचा उत्तराधिकारी असतो. मृताशौच सात दिवस पाळतात.
संदर्भ: 1. Luiz, A.A. D. Tribes of Kerala New Delhi. 1962.
2. Thurston, Edgar. Castes and Tribes of Southern India, Vol. IV. Madras, 1975.
शेख, रूक्साना