मध्यममार्ग : गौतम, बुध्दाच्या धर्मोपदेशात दाखविलेल्या नैतिक मार्गाला मध्यममार्ग असे म्हटले आहे. ह्याचे कारण बुध्द दोन टोके किंवा अंत टाळून मधल्या मार्गाने जातो. कामसुखाचा परित्याग तसाच देहदंडनाचाही परित्याग करून मधल्या मार्गाने कालक्रमणा करण्यासंबंधी बुध्दाचा उपदेश आहे. हा मध्यममार्ग म्हणजे बुध्दाचा आर्य अष्टांगिक मार्ग होय. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्म, सम्यक आजीव (चरितार्थ, आत्मपोषण) सम्यक व्यायाम (प्रयत्नशीलता) सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ही ती अष्टांगे होत. [⇨बौध्द धर्म].

बौध्द तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मध्यममार्ग किंवा मध्यमा प्रतिपद म्हणजे अस्तित्व किंवा नास्तित्व, शाश्वतवाद किंवा उच्छेदवाद, एकत्व किंवा नानात्व , उत्पत्ती किंवा विनाशी ह्यांसारखी कोणतीही एकांतिक दृष्टी न ठेवता प्रतीत्य समुत्पादात अंतर्भूत झालेला ⇨शून्यवाद किंवा सापेक्षवाद हेच खरे पारमार्थिक सत्य आहे, अशी जी माध्यमिकांची विचारसरणी आहे तिलाही हे नाव दिलेले आहे.[ ⇨बौध्द दर्शन] .

बापट, पु. वि.