मद्रास विद्यापीठ : ब्रिटिशकालीन भारतातील पहिल्या तीन विद्यापीठांपैकी (कलकत्ता, मुंबई, मद्रास) एक. मद्रास येथे स्थापना (१८५७). १९२३ च्या अधिनियमान्वये विद्यापीठास अध्यापनात्मक व निवासी स्वरूप देण्यात आले. त्यानंतरच्या काळात वेळोवेळी (१९३७, १९४०, १९४२, १९४३, १९६६ व १९७८) केलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार विद्यापीठीय विद्यमान स्वरूप तयार झाले.

तमिळनाडू राज्यातील अन्नमलई व मदुराई-कामराज विद्यापीठ कार्यक्षेत्रे वगळता उर्वरित भाग व पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचा भाग विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येतात. त्यात १५५ संलग्‍न महाविद्यालये व ११ प्राच्यविद्या संस्था यांचा समावेश होतो. संलग्‍न महाविद्यालये व विद्यापीठीय अध्यापन केंद्रे यांतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या १,२८,४५४ आहे (१९८१-८२). विद्यापीठाने त्रिची (स्था. १९६६) व कोईमतूर (ऑक्टबर १९७३) येथे पदव्युत्तर अध्यापन केंद्रे सुरू केली आहेत. विद्यापीठाची आठ स्वायत्त महाविद्यालये देखील आहेत.

विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्‍न आहे. विद्यापीठीय शैक्षणिक वर्ष २५ जून-३० एप्रिल असे असून साधारणपणे त्यात तीन सत्रे असतात. कला, विज्ञान, वाणिज्य व व्यवसाय व्यवस्थापन, विधी, वैद्यक, अभियांत्रिकी, तंत्रविद्या, ललित कला, भारतीय व अन्य भाषा इ. प्रमुख विद्याशाखा आहेत.

विद्यापीठ अनुदान मंडळाच्या योजनेनुसार वनस्पतिविज्ञान, तत्त्वज्ञान व गणित यांच्या अध्ययनाची विस्तार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विद्यापीठातील काही महाविद्यालयांनी सायंकालीन अध्यापनाची सोय केली आहे. विद्यापीठाच्या क्षेत्रातील विद्यालये, महाविद्यालये वा संस्था यांतील सेवकांना किंवा त्यांच्या मुलांना खाजगी रीत्या विद्यापीठीय परीक्षा देण्याची विद्यापीठाने तरतूद केली आहे. विद्यापीठ-कक्षेत वेगवेगळ्या देणगीनिधीतून विविध विषयांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. तीत देशातील तसेच परदेशांतील प्रख्यात विद्वानांना निमंत्रित करण्यात येते.

विद्यापीठीय परिसरात रोजगार विनियोग व मार्गदर्शन केंद्र (स्था. १९६५) असून ते रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. ‘कमवा व शिका’ या योजनेखाली विद्यार्थ्यांना अंशकालिक रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या केंद्रातर्फे कामगार जगत (वर्ल्ड ऑफ वर्क) नावाचे वार्तापत्रही प्रकाशित करण्यात येते. विद्यापीठाची ‘मद्रास विद्यापीठ वसतिगृह निर्माण सहकारी संस्था’ असून ती वसतिगृह बांधण्यास कर्जेरूपाने पैसे उपलब्ध करते.

विद्यापीठाचे ग्रंथालय समृध्द असून त्यात सूक्ष्मपट, छायाचित्रण इत्यादींच्या सुविधा आहेत. ग्रंथालयात ४,११,२५२ ग्रंथ, १,२७२ नियतकालिके व २,२६१ नकाशे होते (१९८१-८२). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे ८.०३ कोटी रू. व ६.७० कोटी रू. होता.

मिसार, म. व्यं.