मद्रसा : ‘मद्रसा’ ह्या मूळ अरबी शब्दाचा अर्थ विद्यादानाचे स्थान असा आहे. या ठिकाणी ⇨ कुराण, हदीस ⇨ (पैगंबराची वचने), ⇨मुसलमानी विधि आणि ⇨ अरबी भाषा प्रामुख्याने शिकविली जाते. मद्रसा साधारणतः मशिदीच्या परिसरात उभारल्या जात. सर्वप्रथम त्या मक्का, मदीना, बगदाद, बसरा आणि इतर काही ठिकाणी स्थापन केल्या गेल्या. दहाव्या व अकराव्या शतकांत नीशा- पूरसारख्या (इराण) शहरात पुष्कळ मद्रसा होत्या. त्यांपैकी अबुअली अल् हुसेनी (मृत्यू ११०३) यांनी हदीस शिकविण्यासाठी स्थापन केलेल्या एका मद्रसात एक हजार विद्यार्थी होते. बगदाद शहरात १०६७ मध्ये निजामुल्मुल्क तुसी यांनी स्थापन केलेली आणि त्यांच्याच नावाने ओळखली जाणारी ‘मद्रसा-ए-निझामिया’ ही समग्र इस्लामी जगतासाठी एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून प्रसिद्ध होती. बाल्ख (अफगाणिस्तान), मोसूल (इराक), इस्तंबूल (तुर्कस्तान), मर्व्ह (मरी) [तुर्कस्तान], बूखारा (रशिया) आणि अन्यत्रही मद्रसा होत्या. १२३४ मध्ये खलीपा अल्-मुस्तानसिर याने बगदाद येथे स्थापन केलेल्या अल्-मुस्तानसिरिया ह्या मद्रसात स्नानगृह, स्वयं-पाकघर, दवाखाना आदी व्यवस्था होती. स्पेनमधील ग्रानाडा आणि कॉर्दोव्हा येथील मद्रसा तर विश्वविद्यालयाच्या रूपात विकसित झाल्या आणि त्यांची ख्याती यूरोपभर पसरली. दहाव्या शतकात कैरोमध्ये स्थापन झालेले ⇨ अझार अल्-, विद्यापीठ (स्था. जून-जुलै ९७२) आजही इस्लामी जगतात सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था सम- जली जाते. या संस्थेत सकाळी तफसिर (कुराणावर भाष्य), हदीस, फिक्ह (इस्लामी कायदेशास्त्र) हे विषय शिकविले जातात. दुपारी इतिहास, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांसारख्या विषयांचे अध्यापन होते. संध्याकाळी चर्चासत्र घेतले जाते. शैक्षणिक सत्रांची सुट्टी रमजानमध्ये असते. अल् अझार विद्यापीठात १९६८ मध्ये ३३,०२० विद्यार्थी आणि ३१२ शिक्षक होते. येथील शिक्षण प्राथमिक – चार वर्षे, माध्यमिक – पाच वर्षे, उच्च – चार वर्षे आणि विशेषी- करण अशा चार टप्प्यांत पूर्ण केले जाते. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवर कुराण व हदीस यांखेरीज इतिहास, भूगोल, भौतिक- शास्त्र आणि गणित हे विषय शिकविले जातात. उच्च स्तरावर तीन शाखा आहेत : (१) अरबी भाषा आणि साहित्य, (२) धर्म- शास्त्र, (३) तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, तफसिर, हदीस, इस्लामी इतिहास आणि इतर विषय यांचे शिक्षण दिले जाते. या विषयांत पुढे विशेषी- करण करण्याचीही सोय आहे. जे उच्च शिक्षण पूर्ण करतात, ते खतीब (धर्मोपदेशक),
⇨ खुतबा, ⇨ इमाम (अनुकरणीय आचरण अस- लेला आदर्श नेता) आणि धार्मिक संस्थांत शिक्षक म्हणून काम कर-तात. जे विशेषीकरण संपादन करतात, ते प्राध्यापक – पदासाठी पात्र ठरतात.
भारतातदेखील मुसलमानांच्या आगमनानंतर मद्रसा उभारल्या गेल्या. सर्वप्रथम ⇨ मुहम्मद घोरीच्या कारकीर्दीत (११७३ – १२०६) अजमेरमध्ये मद्रसा स्थापन झाल्या. मोगलपूर्व काळात फक्त दिल्ली येथे एका वेळी एक हजारपेक्षा जास्त मद्रसा होत्या. दिल्लीतील फिरोझशाह मद्रसामध्ये शेख अब्दुल्ला नावाच्या विद्वान प्राचार्याने तर्क- शास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाचा विस्तार करून त्यात काजी अझुद्दीनच्या मताले नावाच्या ग्रंथाचा समावेश केला.
महमूद गावान याने १४७९ मध्ये ⇨ बीदर (कर्नाटक) येथे स्थापन केलेल्या मद्रसा नावारूपास आल्या होत्या. १५२० मध्ये जयपूरजवळील नरनौल (हरयाणा) या गावात शेरशहा यांनी एक मद्रसा सुरू केली. नरेंद्रनाथ यांच्या उल्लेखानुसार ⇨ अकबर बाद- शहाच्या कारकिर्दीत (१५४२-१६०५) हिंदू व मुसलमान एकाच मद्रसात फार्सी शिकत होते. अकबर बादशहाच्या आणि त्यानंतरच्या काळात मद्रसात धर्मशास्त्राशिवाय तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञानासारख्या बुद्धिप्रधान शास्त्रांनाही योग्य तो मान दिला जात असे. तसेच फार्सी साहित्यातील गुलिस्तान वोस्तान आणि दिवाने हाफीज यांसारखे ग्रंथ शिकविले जात.
अठराव्या शतकात शाह वलीउल्लाचे वडील शाह अब्दुर रहीम (मृत्यू १७१९) यांनी स्थापन केलेली ‘मद्रसा-ए-रहिमिया’ ही संस्था फार प्रसिद्ध होती. याच शतकात निझामुद्दीन सिहाल्वी (मृत्यू १७४८) याने तयार केलेला अभ्यासक्रम दर्से – निझामी म्हणून ओळखला जातो. त्यात अरबी भाषा व तिचे व्याकरण, तफसिर, हदीस, फिक्ह, तर्क- शास्त्र, तत्त्वज्ञान आणि गणित या विषयांचा समावेश होता. गणिता- मध्ये युक्लिड व ‘खुलासतुल हिसाब’ यांचा समावेश केला होता. प्रत्येक विषयातील सर्वांत कठीण पुस्तके शिकविणे हा त्या अभ्यास- क्रमाचा उद्देश होता. संपूर्ण अभ्यासक्रमाचा कालावधी पंधरा वर्षे होता.
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी काढलेल्या विद्यालय – महाविद्यालयां-सोबतच मद्रसादेखील सुरू होत्या. १७८० मध्ये कलकत्ता येथे वॉरन हेस्टिंग्ज याने ‘मद्रसा-ए-आलीया’ नावाची एक शाळा काढली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दशकात मद्रसामधून इस्लामी धर्मशास्त्राशिवाय पाच वर्षीय बुनियादी शिक्षणाचा अभ्यासक्रम राबविला गेला. येथील फाजिल (अभ्यासक्रम) ही पदवी बी.ए.च्या समकक्ष, तर कामिल (अभ्यासक्रम) ही पदवी एम्.ए.च्या समकक्ष आहे.
सहारनपूर जिल्ह्यातील १८६६ मध्ये स्थापन झालेली देवबंद येथील ‘दारूल उलूम’ ही संस्था मौलाना मोहम्मद कासीम यांच्या भरीव प्रयत्नांमुळे एवढी नावारूपास आली, की आज ती भारतातील मद्रसां- मध्ये सर्वांत मोठी समजली जाते. हुसेन अहमद मदनी यांसारख्या विद्वानाने वरील संस्थेत संस्थाप्रमुख म्हणून काम केले त्यांनी आणि त्या संस्थेतील इतर शिक्षकांनीसुद्धा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. या संस्थेतील अभ्यासक्रमात कुराण व हदीस यांवर विशेष भर देण्यात येतो. या मद्रसाशिवाय लखनौ येथे १८९८ मध्ये स्थापन झालेली ‘दारूल उलूमे नदवतूल उलमा’ नावाची संस्था फार प्रसिद्ध आहे. ⇨ मौलाना नोमानी शिब्ली आणि हबीबूर रहमान खान शेरवानी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचा सहभाग या संस्थेच्या प्रसिद्धीस कारणीभूत ठरला. आजही अबूल हसन अली नदवीसारखे मुस्लिम जगतातील प्रसिद्ध विद्वान या संस्थेशी संबंधित आहेत. या मद्रसात इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि हिंदी या आधुनिक विषयांचाही समा- वेश आहे. अरबी भाषा एक जिवंत भाषा म्हणून येथे शिकवली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांना अरबी भाषा लिहिणे व बोलणे यांचे प्रशिक्षण दिले जाते. इतर प्रसिद्ध मद्रसा भोपाळ, सहारनपूर व हदरा- बाद येथे आहेत. गुजरातमधील डाभेल येथील मद्रसा एके काळी फारच प्रसिद्ध होती. महाराष्ट्रामध्येदेखील अनेक ठिकाणी मद्रसा आढळतात. भारतात जेथे जेथे पुरेशी मुस्लिम वस्ती आहे, तेथे तेथे आजही लहानमोठ्या मद्रसा दिसून येतात. मध्ययुगात आजच्यासारखी परीक्षापद्धती नव्हती. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थाप्रमुख ‘ईजाझा’ नावाने ओळखले जाणारे प्रमाणपत्र देत असे. या प्रमाणपत्रावरून त्या विद्यार्थ्यांत शिकविण्याची पात्रता आहे, असे गृहीत धरले जात होते. सध्या मद्रसांमध्ये अभ्यासक्रमानंतर चाचणी घेतली जाते आणि नंतर प्रमाणपत्रे दिली जातात. जुन्या काळात बादशाह, वजीर आणि श्रीमंत लोक देणग्या देऊन व ⇨ वक्फ स्थापन करून मद्रसा चालवीत. आजसुद्धा वक्फद्वारा तसेच देणग्या गोळा करून मद्रसा चालविल्या जातात. कोणत्याही मद्रसात विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेण्यात येत नाही. बाहेरगावाहून येणार्या विद्यार्थ्यांना फक्त जेवणाचा खर्च करावा लागतो. गोळा झालेल्या निधीतून शिक्षकांना पगार दिला जातो. आजसुद्धा मुस्लिम मुले शाळेत तर जातातच परंतु त्यांतील काही आपापल्या भागातील मद्रसात जाऊन कुराणाचे पठण, अरबी भाषांचे अध्ययन आणि इस्लामी रीतिरिवाजांचे शिक्षण घेतात. आजही भारतात पंधराशेहून अधिक मद्रसा आहेत.
नईमुद्दीन, अन्वारूलऐन