मदनबाण : (इं. जॅस्मिन लॅ. जॅस्मिनम ओडोरॅटिसिमम कुल-ओलिएसी). या सरळ, उंच वाढणार्‍या, गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या झुडपाचे मूलस्थान कानेरी व मादीर बेटे असून भारतात त्याची लागवड सुवासिक फुलांसाठी व शोभेसाठी केलेली आढळते. याच्या फांद्या शूलाकृती किंवा काहीशा कोनयुक्त व अनम्य ( सहज न वाकणार्‍या ) असतात. पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त व पिसासारखी विभागलेली असतात. पर्णदले तीन किंवा पाच, चक-   चकीत, अंडाकृती किंवा रूंदट अंडाकृती व विशालकोनी असतात. फुले पिवळी व सुगंधी असून शेंड्याकडे उन्हाळ्यात येतात. फुले आल्यावर पालवी कमी दिसते. संवर्तदंत फार आखूड असतो. पाकळ्या पाच, लांबट, लांबट-विशालकोनी आणि बहुधा नलिकेपेक्षा आखूड  असतात [→फूल]. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ओलिएसीत (पारिजातक कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

तैवानमध्ये याची लागवड फुलांसाठी करतात. तेथे फुलांचा उपयोग चहाला सुवास देण्यासाठी करतात. सुकल्यावरही फुलांचा सुगंध टिकून राहातो. फुलांपासून ०.११६ टक्के लालसर तपकिरी अर्क   निघतो. त्यामध्ये लिनॅलूल, डी-लिनॅलिल अँसिटेट, बेंझिल अल्कोहॉल, बेंझिल अँसिटेट, मिथिल अँथ्रानिलेट, इंडॉल व सेस्क्किटर्पिन किंवा डायटर्पिन अल्कोहॉल ही रसायने असतात मात्र त्यात जॅस्मोन नसते.

पहा : जाई मोगरा.

 जमदाडे, ज. वि.