मतदान : सामाजिक जीवनाचे नियमन करण्यामध्ये जास्तीतजास्त लोकांचा सहभाग असावा, हे लोकशाही पद्धतीला अभिप्रेत असते. मतदानाच्या अधिकाराचा वापर करून हा सहभाग साधण्यात येतो. सामाजिक जीवनाचे नियमन करण्याचे विविध मार्ग उपलब्ध असतात. पर्यायी धोरणामधून किंवा पर्यायी उमेदवारांमधून निवड करणे, हे या मार्गाचे ठळक स्वरूप असते. अशी निवड करण्यासाठी नागरिकाने आपले मत देऊन विशिष्ट धोरणाबद्दल अगर उमेदवाराबद्दल आपली पसंती व्यक्त करावयाची असते. ज्याला बहुसंख्य मते पडतील, ते धोरण अथवा तो उमेदवार निवडून आला, म्हणजे बहुमताची पसंती त्यालाच आहे, असे मानण्यात येते.

सर्वसंमतीने मान्य झालेले धोरण अथवा उमेदवार निवडणे हाच खऱ्या प्रत्यक्ष लोकशाहीचा मार्ग आहे परंतु हे साधणे अशक्यप्राय असल्यामुळे व्यवहारात प्रातिनिधिक लोकशाही बहुमताच्या आधारे कार्यवाहीत आणली जाते. त्यासाठी मतदानाचा आधार आवश्यक ठरतो. एखाद्या सामाजिक गटातील बहुमताचे जे मत असेल, ते त्या गटाचे मत असे मानण्यात येते. ही पद्धती फार पूर्वीपासून रूढ झाली आहे.

लोकशाही पद्धती ही मानवी समाज प्रगत झाल्याचे लक्षण आहे.संघर्ष न करता, बळजबरी न करता, लोकांच्या सहभागाने आणि विचारविनिमयाने एखाद्या गोष्टीचा निर्णय लावण्याची पद्धती, ज्यावेळी मानवाने स्वीकारली, त्यावेळी मानवी समाज प्रगत अवस्थेप्रत पोहोचला होता. रानटी जीवन मागे टाकून सांस्कृतिक जीवन शांततामय मार्गाने व संघर्षाऐवजी सहकार्याने व्यतीत करण्याइतपत मानवी जीवन प्रगत झाले होते. समाजाच्या सर्व घटकांनी सामाजिक निर्णय घेण्यात सहभागी व्हावे, हा या प्रगतीचा अगदी अलीकडचा टप्पा होय. हे सामाजिक घटकांचे सहकार्य प्रत्यक्ष व्यवहारात मिळविण्याचा मार्ग, म्हणजे मतदान घेऊन बहुमताच्या निर्णयास अंतिम स्वरूप देणे, हा होय.

समाजाच्या विविध अवस्थांमध्ये मतदान करण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा रूढ झाल्या. कातड्याचे तुकडे, रंगीबेरंगी गोट्या, नाणी यांचा वापर करून, हात वर करून अगर उभे राहून, आवाजी मतदानाने अगर मतपत्रिकेद्वारे मते व्यक्त केली जातात. कागदी मतपत्रिकांद्वारे गुप्त रीतीने मतदान करण्याची रीत ही सर्वात अलीकडची असून ती बहुतेक देशांत रूढ आहे. काही प्रगत देशांत यंत्राद्वारे मतदान करण्याची सोयही आहे.

हुकूमशाही राजवटीतसुद्धा मतदानाचा वापर करतात. सर्वसामान्यपणे निम्म्यापेक्षा जास्त लोक मतदान करतात, असा लोकशाही देशांतील अनुभव आहे परंतु हुकूमशाही राजवटीमध्ये (नाझी अगर साम्यवादी) मतदानाचे प्रमाण ९९% पेक्षाही जास्त असते. तीच स्थिती निमलष्करी राजवटीमध्येही आढळते. या राजवटीत मतदान मुख्यतः लोकांचा पाठिंबा आपल्या राजवटीला आहे, हे दाखविण्यासाठी म्हणजेच राजवटीची अधिमान्यता प्रस्थापित करण्यासाठी वापरतात. यावरून मतदानाचे प्रमाण हे काही लोकशाहीचे गमक ठरू शकत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते.

राजवटीची अधिमान्यता प्रस्थापित करणे, हे मतदानाचे एक कार्य काही राजवटींमध्ये असते. तशीच इतरही कार्ये मतदानामार्फत साधली जातात. लोकक्षोभाच्या वातावरणात लोकांच्या तप्त भावनांच्या अभिव्यक्तीस अवसर देण्याचे एक माध्यम म्हणूनही मतदानाचा उपयोग होऊन वातावरण शांत होण्यास मदत होते. अधिकाऱ्यांच्या आज्ञा जनतेने स्वखुषीने पालन कराव्यात, यासाठी जनतेला विश्वासात घेण्याचा एक मार्ग म्हणूनही मतदानाचा उपयोग केला जातो. राज्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपासून अल्पसंख्य वंचित राहू नयेत, म्हणूनही मतदानाचा उपयोग होऊ शकतो. अशी निरनिराळ्या प्रकारची कार्ये मतदानामार्फत साधली जातात.

पाश्चात्य देशांमध्ये असे आढळून आले आहे की, स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये, सामान्यांपेक्षा उच्चशिक्षितांमध्ये आणि उच्च वर्गीयांमध्ये तसेच श्रमिक संघटनांच्या सभासदांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त आढळते. ज्यांना राजकीय वार्ता सहज उपलब्ध आहेत किंवा शासनाच्या महत्त्वाविषयी ज्यांना जास्त जाण आहे, अशांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त असते. मतदानात सहभागी न होणारे लोक काही विशिष्ट परिस्थितीमुळे किंवा कारणांमुळे मतदान करू शकत नाहीत परंतु जाणीवपूर्वक मतदानापासून दूर राहणारे लोक लोकशाही राजवटीमध्ये थोडेच असतात.

लोकशाहीच्या सिद्धांताप्रमाणे मतदान करणारा इसम म्हणजे मतदार. त्याला ज्यांमधून निवड करावयाची अशा पर्यायांबद्दल चांगली जाण व ज्ञान असावे लागते त्या निवडीमध्ये मतदाराला रस असावा लागतो व त्याने विवेकपूर्वक आणि विशिष्ट तत्त्वांबरहुकूम निवड करणे इष्ट असते तथापि अनुभवजन्य सर्वेक्षणावरून असे दिसते, की प्रत्यक्षामध्ये ही गृहीत कृत्ये खरी नसतात. ज्या सार्वत्रिक मतदानामधून उमेदवार किंवा धोरणे ठरविली जातात, अशा मतदानामध्ये नियमितपणे भाग घेणारे मतदार थोडेच असतात. एवढेच नव्हे, तर त्यांना निवडणुकीमध्ये गुंतलेल्या प्रश्नांबद्दल फारशी माहितीही नसते. १९ व्या शतकातील उदारमतवादाने जो विश्वास बाळगला होता, की सार्वत्रिक प्रौढ मताधिकारामुळे शासनाच्या धोरणाबाबत आणि कार्यक्रमाबाबत जाणीवपूर्वक मतदान होऊन योग्य निवड होईल, तो विश्वास खरा ठरला नाही. निवडणुकीत गुंतलेल्या बऱ्याचशा प्रश्नांबद्दल मतदाराला माहिती नसते. व्यक्तीच्या मतावरून धोरणासंबंधीच्या पसंतीबद्दल अनुमान काढणे फार धोकादायक ठरते. पुष्कळदा ज्या पक्षाला मतदार मते देतो, त्या पक्षाच्या धोरणाबाबत त्यास फारशी माहितीही नसते.

पक्षाच्या धोरणाबद्दल मतदाराला मर्यादित माहिती असल्यामुळे इतर राजकीय आणि सामाजिक निष्ठांना जास्त महत्त्व प्राप्त होते आणि त्या दीर्घकाल टिकून राहतात. अमेरिकेमध्ये जवळजवळ एक – तृतीयांश मतदार परंपरागत विशिष्ट पक्षाचे समर्थक असतात. विशिष्ट राज्ये विशिष्ट पक्षाची अशी तेथे परिस्थिती आहे. एकदा एखाद्या पक्षाबद्दल निष्ठा निर्माण झाली की, धोरणे ठरविणे, त्यासंबंधी बऱ्यावाईटाचा निर्णय घेणे, राजकीय परिस्थितीबद्दल माहिती करून घेणे वगैरे सर्व कर्तव्ये पक्षाच्या अधिकाऱ्यांवर सोपविता येतात. फक्त निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावयाचा किंवा तो काढून घ्यावयाचा एवढेच काम मतदाराला करावे लागते. राजकारणाबद्दल मतदाराला जेवढे ज्ञान कमी त्या प्रमाणात वैयक्तिक आणि सामाजिक निष्ठांना प्राधान्य मिळते आणि निवडणुकीमध्ये त्याबरहुकूम वर्तन होते.

मतदानाचे महत्त्व ते किती प्रमाणात होते, यापेक्षासुद्धा ते किती मोकळेपणाने,निःपक्षपातीपणे आणि जाणतेपणाने होते,या गोष्टींवर अवलंबून आहे. मतदारावर कोणत्याही तऱ्हेचे दडपण आले, तर खुलेपणाने मतदान करणे त्याला शक्य होत नाही. भारतामध्ये नात्याचे संबंध, धर्म, जात, भाषा, प्रदेश वगैरे अनेक शक्ती काम करीत असतात. त्यांच्या प्रभावामुळे मतदार आपले मत मोकळेपणाने वा स्वतंत्र विचाराने देऊ शकत नाही. भारतातील मतदानामध्ये पैशांचा अवाजवी उपयोग होतो व त्याचा प्रभाव पडतो, ही मोठी तक्रार आहे. शासकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, कृत्यांचा व धोरणांचाही मतदारावर प्रभाव पडू शकतो. या विविध शक्तींच्या परिणामामुळे मतदान दूषित होऊ शकते.

भारतामध्ये संविधानाने मतदानाचा अधिकार एकवीस वर्षावरील सर्व प्रौढ स्त्री – पुरूषांना दिला आहे. आतापर्यंत भारतात सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यांमध्ये मतदानाचे प्रमाण बरेच समाधानकारक होते. बहुसंख्य मतदार निरक्षर, अज्ञानी व दरिद्री असल्यामुळे सुजाणपणे मतदान करण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी या पद्धतीमुळे राजकीय जागृती होण्यास मदत होते. राजकीय जाणीव वाढते काय, हा मात्र विवाद्य प्रश्न आहे.

पहा : निवडणूक मतदानपद्धति मताधिकार.

संदर्भ : Lakeman, Enid Lambert, J.D. Voting in Democracies, London, 1966.

देशपांडे, ना. र.