मच्छकुंड : आंध्र प्रदेश व ओरिसा या राज्यांच्या परस्पर सहकार्याने उभारण्यात आलेला जलविद्युत् प्रकल्प. हा आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापटनम् जिल्ह्यात आंध्र प्रदेश व ओरिसा राज्यांच्या सरहद्दीवर असून आंध्र प्रदेश राज्यातील हा एक महत्त्वाचा वीज प्रकल्प समजला जातो. यासाठी विशाखापटनमच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर असलेल्या डुडुमा प्रपातांच्या जवळच्या उंच प्रदेशाचा उपयोग करून घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा आराखडा १९४१ साली करण्यात आला. तत्कालीन मद्रास इलाख्यातील मच्छकुंड या सिलेरू नदीच्या उपनदीचे पाणी जलपत येथे धरण (लांबी ४१० मी., उंची ५४ मी.) बांधून अडविण्याचे ठरविण्यात आले. तसेच त्या जलाशयाच्या खालच्या बाजूस सु. २७ किमी. वर (डुडुमा प्रपाताच्या वरच्या बाजूस सु. २.५ किमी. वर दुसरा बंधारा (३१६ मी. लांब) बांधून तेथून बोगद्यांतून विद्युत्गृहास सतत पाणी पुरविण्याची योजना आखण्यात आली. हे पाणी सु. १६५ मी. उंचीवरून टरबाइनांवर पडते. या योजनेच्या कामास ऑक्टोबर १९४६ मध्ये सुरूवात करण्यात येऊन ऑगस्ट १९५५ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झाला. सुरूवातीच्या काळात याची वीजनिर्मिती क्षमता १०२ मेवॉ. ठरविण्यात आली होती, परंतु १९८२ पर्यंत ती ११५ मेवॉ. पर्यंत वाढविण्यात आली.

मच्छकुंड विद्युत्प्रकल्प दोन राज्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आल्याने त्याची देखभाल व वीजवाटप यांविषयी १४ जानेवारी १९४६ साली ९९ वर्षांचा करार करण्यात आला. या करारान्वये एकूण वीज उत्पादनापैकी व खर्चापैकी २०% भाग ओरिसा राज्याचा ठरविण्यात आला आहे.

निसर्गसुंदर डुडुमा प्रपात, मच्छकुंड गाव व मच्छकुंड नदी यांचे धार्मिक महत्त्व यांमुळे पर्यटकांच्या दृष्टीने हे आकर्षण स्थळ ठरले आहे. नदी व गाव यांच्याशी निगडीत अशा अनेक पुराणकथाही प्रचलित आहेत.

चौंडे. मा. ल.