मघा : भारतीय २७ नक्षत्रांतील दहावे नक्षत्र. हे सिंह राशीतील पहिले नक्षत्र असून त्यात सिंहेतील ४,५ किंवा ६ तारे (आल्फा, गॅमा, ईटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस) असल्याचे मानतात. याची आकृती नांगर, विळा किंवा सिंहाच्या डोक्यासारखी दिसते. यांतील सहांपैकी चार तारे अधिक ठळक असून त्यांचा एक समांतरभुज चौकोन बनलेला दिसतो. नैऋत्येकडचा आल्फा लिओनीस (रीगलस = छोटा राजा) हा सर्वात तेजस्वी तारा नक्षत्रातील प्रमुख म्हणजे योगतारा आहे. आकाशात दिसणाऱ्या अत्यंत तेजस्वी अशा २५ ताऱ्यांपैकी हा एक असून त्याची प्रत १.३ [⟶ प्रत], होरा १० तास ५ मिनिटे व ३६.२ सेकंद आणि क्रांती + १२° १३’ १९.७” [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति], अंतर ८६ प्रकाशवर्षे, रंग निळसर पांढरा व वर्णपटीय प्रकार बी ८ [⟶ तारा] आहे. हा सूर्याच्या सु. १३० पट तेजस्वी आहे. हे ताऱ्यांचे त्रिकूट असून त्याचे सहचर ८ व १३ प्रतीचे आणि त्यापासून ११७” व ३” अंतरावर आहेत. हा तारा जवळजवळ क्रांतिवृत्तावर (सूर्याच्या भासमान मार्गावर) असून चंद्र कधीकधी याला झाकून जात असतो [⟶ पिधान]. गॅमा लिओनीस (अलजीबा) हे तारकायुग्म आहे. या नक्षत्राच्या पूर्वेस ३०० हून अधिक अभ्रिका आहेत. १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ च्या सुमारास हे नक्षत्र मध्यमंडावर दिसते. १८६६ मध्ये दिसलेल्या धूमकेतूनंतर दर ३३ ते ३४ वर्षाच्या कालावधीने १४–१८ नोव्हेंबरच्या सुमारास विस्तृत प्रमाणात उल्कावृष्टी होते तिचा उद्गम बिंदू या नक्षत्रानजिक आहे [⟶ उल्का व अशनि].
वैदिक काळी दक्षिणायन व पावसाळ्याची सुरूवात या नक्षत्रात होत असे तर परिक्षिताच्या वेळी सप्तर्षी मघामध्ये होते असा उल्लेख आहे. तसेच पूर्वी मघारंभ हा वर्षारंभ मानीत, असे एक मत आहे.
फलज्योतिषात हे अधोमुख, मध्याक्ष, उग्र व स्त्री नक्षत्र मानलेले असून याची देवता पितर व आकृती शाला सांगितलेली आहे. मघा नक्षत्रावर झालेला जन्म अशुभ समजतात.
पहा : नक्षत्र
ठाकूर, अ. ना.