पंजे मंगेशराव

मंगेशराव, पंजे : (२२ फेब्रुवारी १८७४-२५ ऑक्टोबर १९३७). आधुनिक कन्नड कवी, कथाकार व विचारवंत लेखक. पंजे मंगेशरावांचे मूळ सारस्वत घराणे दक्षिण कानडा जिल्ह्यातील सुब्रह्मण्य गावाजवळील पंजे ह्या खेड्यातील. नंतर हे पंजे घराणे नेत्रावती नदीकाठी वसलेल्या बंटवाल येथे येऊन स्थायिक झाले. बंटवाल येथेच मंगेशरावांचा एका गरीब कुटुंबात जन्म झाला. मंगेशराव १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची मातृभाषा कोंकणी होती, प्रादेशिक भाषा तुळू होती आणि शिक्षण मात्र कन्नडमधून झाले. ह्या तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पुरंदरदास, कनकदास यांच्या कन्नड भक्तिरचनांचा तसेच मराठी भजनांचा त्यांच्या बालमनावर खोल ठसा उमटला. यमक-प्रासप्रियता व कवितेची लय त्यांच्या ठिकाणी बालपणापासूनच विकसित होत गेली आणि तेव्हापासून त्यांना कविता करण्याचा छंद जडला.

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक बेनगल रामराव यांच्या बहिणीशी (गिरिजाबाईशी) त्यांचा विवाह १८९४ मध्ये झाला. १८९५ मध्ये ते बी.ए. झाले. १९०० च्या सुमारास मंगलोर येथील शासकीय महाविद्यालयात कन्नडचे पंडित म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच वेळी बेनगल रामराव यांच्या मदतीने त्यांनी सुवासिनी हे कन्नड मासिक सुरू केले. या मासिकातून १९०० ते १९०३ या काळात त्यांच्या बहुतांश कविता व कथा प्रसिद्ध झाल्या. ‘रा.मं.पं.’, ‘हरटेमल्ल’ व ‘कविशिष्य’ ह्या टोपण नावांनी त्यांनी आपले गद्य-पद्यलेखन केले. मंगलोर येथील शिक्षण खात्यांत व पुढे कूर्ग जिल्ह्यात (१९२१-२८) त्यांनी शाळा निरीक्षक म्हणूनही काम केले. त्यांनी तयार केलेली कन्नड पहिली (१९११) व कन्नड दुसरी (१९१९) ही पाठ्यपुस्तके होत. मडिकेरे सेंट्रल स्कूलचे मुख्याध्यापक म्हणूनही काही काळ त्यांनी काम केले. हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

कला, संगीत, साहित्य तसेच तुळू भाषेतील लोकवाङ्मय यांची त्यांना मनापासून आवड होती. एक सुसंस्कृत, कलासक्त व सदभिरूचिसंपन्न व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यातून प्रत्ययास येते. कन्नडमध्ये पारंपरिक व चाकोरीबाहेरील वळणाची स्वतंत्र भावगीतपर कविता रचण्याचा आरंभ त्यांनीच केला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीची ही त्यांची काव्यरचना अल्प असली, तरी तीत आधुनिक वळणाच्या कन्नड काव्याचे नवे भावगीतपर वळण स्पष्ट दिसते. त्यांनी लिहिलेली स्फुट बालगीते शालेय पाठ्यपुस्तकांतून आवर्जून घेतली जातात. त्यांच्या ‘लोरी-गीत’, ‘सर्प-गीत’, ‘उदयराग’, ‘तेंकण-गाळियाट’ इ. कविता उत्कृष्ट मानल्या जातात. विशेषतः ‘तेंकण-गाळियाट’ (म.शी.दक्षिण वाऱ्याचा खेळ) ह्या कवितेची शैली, गतिमान लय, छंद, शब्दकळा, कल्पकता व नाद लक्षणीय आहे.

आधुनिक कन्नड कथेचे प्रवर्तक म्हणून एम्. एन्. कामत, वासुदेवाचार्य केरूर व पंजे मंगेशराव या त्रयीचे स्थान महत्त्वाचे आहे. पंजे यांनी मोजक्याच लघुकथा आणि बालकथा लिहिल्या. बालकथावलि (१९१६), कोटि चेन्नय (लोककथासंग्रह-१९२७) व ऐतिहासिक कथावलि (१९३४) हे त्यांचे महत्त्वाचे कथासंग्रह होत. १९२७ मध्ये प्रकाशित झालेल्या पंचकज्जाय या ग्रंथात पंजे यांचे वैचारिक साहित्य संकलित झाले.

बासेल मिशनने चालविलेल्या सत्यदीपिके या मासिकांत पंजे यांनी ‘हरटेमल्ल’ ह्या टोपण नावाने सामाजिक, राजकीय व वैचारिक स्वरूपाचे प्रभावी गद्यलेखन केले. जर्मन अधिकाऱ्यांना पंजे कन्नड शिकवीत असत. या संबंधातूनच बासेल मिशनने १९०५ मध्ये पंजे यांनी तयार केलेला कन्नडचा व्याकरणाग्रंथ प्रसिद्ध केला. बालकथावलि हा त्यांचा कथासंग्रहही बासेल मिशननेच प्रसिद्ध केला.

‘बालसाहित्य मंडळा’ ची (१९२१) स्थापना केलेल्या पंजे यांना ‘कन्नड बालवाङ्मय पितामह’ म्हणून गौरविले जाते. नादयुक्त, प्रासयुक्त व चमत्कारयुक्त कविता रचणारे, यशस्वी लघुकथा लिहिणारे व श्रेष्ठ संशोधक म्हणून कन्नड साहित्यात त्यांचा नामोल्लेख केला जातो.

मंगलोर येथे १९२७ मध्ये कन्नड साहित्य संमेलन भरविण्यात पंजे यांचाच सर्वतोपरी पुढाकार होता. १९३४ मध्ये रायचूर येथे भरलेल्या विसाव्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पंजे यांना देण्यात आले. पंजे यांच्या निधनानंतर १५ वर्षांनी पंजे स्मारक ग्रंथ समितीतर्फे त्यांच्यावर पंजेयवर नेनपिगागि (१९५२) हा गौरवग्रंथ गोविंद पै व इतरांनी संपादून प्रकाशित केला. १९७१ तसेच १९७२ मध्येही पंजे मंगेशराव या शीर्षकाचे कन्नड गौरवग्रंथ त्यांच्या स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आले. १९७४ मध्ये त्यांची जन्मशताब्दी मंगलार ह्या त्यांच्या कर्मभूमीत तसेच कर्नाटकातील प्रमुख शहरांतून मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली.

बेंद्रे, वा. द.