मंगळवार : आठवड्यातील तिसरा वार. या दिवशी पहिल्या होऱ्याचा (तासाचा) अधिपती मंगळ हा ग्रह असतो म्हणून याला मंगळवार हे नाव पडले आहे. यालाच भौमवार असेही म्हणतात. याची इंग्रजी (ट्यूसडे) व फ्रेंच (मार्दी) नाव युद्धदेवतेवरून आली असून मंगळ ही आपल्याकडेही युद्धदेवता मानण्यात येते. हिंदू हा वार अशुभ मानतात. या दिवशी मोठा प्रवास करीत नाहीत नवे वस्त्र परिधान करीत नाहीत अथवा स्त्रिया चोळी शिवीत नाहीत. या दिवशी देवीची, विशेषतः पार्वतीची व गणपतीची उपासना करतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थाला विशेष महत्त्व असून या दिवशी केलेली गणपतीची उपासना विशेष फलदायी होते, असे मानतात या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.
ठाकूर, अ. ना.