भोर संस्थान: ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यमान महाराष्ट्र राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ २,३३० चौ.किमी. लोकसंख्या १,६५,९६१ (१९४१). उत्पन्न सु. नऊ लाख रुपये होते. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा जिल्हा यांनी ते सीमांकित होते. संस्थानची राजधानी सुरुवातीस नेरे या गावी होती.
या संस्थानचे मूळ पुरुष शंकराजी नारायण गांडेकर. हे मूळचे कोंकणातील गांडापूर येथील रहिवासी असून शंकराजीचे वडील नारोपंत व आजोबा मुकुंदपंत छत्रपती शिवाजींच्या सैन्यात कारकून होते. ही कारकुनी शंकराजीनेही काही वर्षे केली. पुढे त्याच्या पराक्रमामुळे त्यास प्रथम ‘मदारुल महाम’ हा किताब मिळाला अणि छ. राजाराम जिंजीहून आल्यानंतर सचिवपद व जहागीर मिळाली (१६९८). राजारामने त्यास कराडच्या उत्तरेकडील मराठी राज्याचा व्यवस्थापक नेमले आणि त्याच्या मदतीस धनाजी जाधवास दिले. छ. शाहूच्या सुटकेनंतर १७०७ मध्ये शंकराजीपुढे शाहू की ताराबाई असा स्वामित्वाविषयी प्रश्न पडला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. त्याचा मुलगा नारोशंकर (कार. १७०७-३७) याला छ. शाहूने जहागीर व सचिवपदाची सनद करून दिली. नारोशंकराला संतती नव्हती. म्हणून त्याने दत्तक घेतला. त्याचे नाव चिमणाजी महादेव (कार. १७३७-५७) होते. यास सचिवपदाची वस्त्रे शाहूने दिली. नारोशंकराने भोरला रामाच्या मूर्तीची स्थापना करून रामोत्सवास सुरुवात केली. चिमणाजीने भोर ही संस्थानची राजधानी केली (१७४०). त्या वेळेपासून भोरच्या संस्थानिकांना पंतसचिव असे म्हणण्याचा प्रघात पडला असावा. चिमणाजीनंतर भोरच्या गादीवर सचिव म्हणून त्याचा थोरला मुलगा सदाशिवराव (कार. १७५७-८७) आला.
संस्थानने इ. स. १८१८ पासून सातारची व १८४८ पासून इंग्रजांची मांडलिकी पतकरली. चिमणाजी रघुनाथने (कार. १८५२-७१) खंडणी ४,६८४ रुपये कर्ज फेड करून सुधारणांचा पाया घातला. शंकर चिमणाजी (कार. १८७१-१९२२) व रघुनाथ शंकर (कार. १९२२-४८) यांच्या कारकीर्दीत मोफत प्राथमिक शिक्षण (५५ शाळा), आरोग्य (५ रुग्णालये), पक्क्या सडका (१६८ किमी.), कारखाने (५), डाक-तारखाते, स्थानिक स्वराज्य (२ नगरपालिका), वाचनालये, बालवीर चळवळ, शेतीसुधार योजना, ग्रामोद्धार, अस्पृश्यता निवारण अशा अनेक सुधारणा झाल्या. राजकीय हक्कांसाठी १९२२ मध्ये प्रजापरिषद स्थापन झाली. १९२८ मध्ये कायदेमंडळाचे २६ सदस्य होते. १९३५ मध्ये पंतसचिवांना राजा हा किताब मिळाला. राजेसाहेबांना पूर्ण मुलकी – फौजदारी अधिकार होते. रघुनाथ शंकरांनी नरेंद्र मंडळातही भाग घेतला होता. संस्थानचा तीन-चतुर्थांश भाग डोंगराळ असून नीरा, मुठा, येळवंडी व गुंजवणी या नद्या संस्थानाच्या प्रदेशातून वाहतात. भोरपासून उत्तरेस येळवंडी नदीवर ⇨भाटघर येथे घरण वांधले आहे. यामुळे दुष्काळी भागाला जलसिंचन होते. विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे संस्थानाचे तहसील होते. यापैकी शेवटचे दोन सहसील तुटक असून संस्थान पुणे-सातारा व सातारा-कुलाबा जिल्ह्यांनी वेढले होते. भोर व शिरवळ ही शहरे व ५०२ खेडी या संस्थानात होती. ८ मार्च १९४८ रोजी संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले.
संदर्भ : भागवत, अनंत नारायण, भोर संस्थानचा इतिहास, पुणे, १९०३.
कुलकर्णी, ना. ह.