भोरडा: याला भोरडीही म्हणतात. निरनिराळ्या प्रकारच्या मैनांच्या बरोबरच भोरड्याचाही स्टर्निडी या

भोरडापक्षिकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस हे आहे. यूरोपचा आग्नेय भाग (इटलीपर्यंत) आणि आशिया मायनरपासून तुर्कस्तानपर्यंतचा आशियाचा भाग यांत रहाणारा हा पक्षी आहे.हिवाळी पाहुणा म्हणून हा भारतात येतो. जुलै-ऑगस्टमध्ये भोरडे भारतात येतात व एप्रिलमध्ये परत आपल्या देशात जातात. भारतात आल्यावर हे सगळीकडे पसरतात पण वायव्य विभाग आणि दख्खनमध्ये (महाराष्ट्र) यांची गर्दी असते आणि बंगाल व दक्षिण भारतात यांची संख्या थोडी असते.

भोरडा साळुंकीएवढा असतो. सबंध डोके, गळा, छातीचा वरचा भाग, पंख आणि शेपटी तकतकीत काळ्या रंगाची असतात डोक्यावर चकचकीत काळ्या रंगाचा तुरा असून तो पडलेला व मागे मानेवर वळलेला असतो बाकीचे सगळे शरीर गुलाबी रंगाचे असते म्हणून याला गुलाबी साळुंकी असेही म्हटले जाते. मादीच्या गुलाबी रंगात किंचित करडी झाक असते.

रब्बी ज्वारीचे पीक तयार झाल्यावर भोरड्यांच्या झुंडीच्या झुंडी सकाळ-संध्याकाळ कणसांवर हल्ला चढवून दाणे खातात व बरीच नासधूसही करतात. दुपारच्या वेळी हे झाडांवर विश्रांती घेतात. भोरडे धान्यच नव्हे, तर किडेही खातात नाकतोडे आणि टोळ यांचा हे फार मोठ्या प्रमाणावर फन्ना उडवितात. ज्वारीची कापणी झाल्यावर हे शेतातले किडे टिपून खातात वड, पिंपळ, टणटणी, तुती इ. झाडांची फळेही हे खातात. शेवरीची फुले फुलली म्हणजे त्या फुलातला मध पिण्याकरिता यांचे थवे शेवरीवर जमा होतात. शेतातले धान्य खाऊन केलेले नुकसान नाकतोडे, टोळ आणि इतर किडे खाऊन थोड्या प्रमाणात तरी हे भरून काढतात. शेवरीच्या फुलांच्या परागसिंचनाचे कार्यही हे करतात.

यांचा विणीचा हंगाम में आणि जूनमध्ये असतो. यूरोपचा पूर्व भाग आणि पश्चिम व मध्य आशियात यांची वीण होते.

कर्वे, ज. नी.