भोमा: (क. निरचेल्ली लॅ. ग्लोकीडिऑन होहेनकेरी, ग्लो. लॅन्सिओलॅरियम कुल-यूफोर्बिएसी). हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष मूळचा आशिया खंडातील विषववृत्तीय प्रदेशातील असून भारतात ओरिसा, छोटा नागपूर, सह्याद्री घाट, कोकण व कारवार येथील दाट जंगलांत तो विपुल प्रमाणात आढळतो. त्याला साधारणतः तळापासून फांद्या फुटतात. पाने साधी, एकाआड एक, फार लहान देठाची, लांबट टोकाची, मध्यम आकाराची (६.३-१५ X २.५-४.५ सेंमी.), दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी व सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) असतात. फुले एकलिंगी व अपूर्ण त्यांना पाकळ्या नसतात. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे फार लहान असून पानांच्या बगलेत डिसेंबर ते एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पे सवृंत (देठ असलेली) पिवळट हिरवी संदले मांसल, बहुदा ३+३ व केसरदले ३ व जुळलेली स्त्री-पुष्पांचे लहान गुच्छ व प्रत्येक फूल अवृंत (विनदेठाचे), अधिक पिवळट किंजपुट खंडित व तीन कप्प्यांचा प्रत्येक कप्प्यात २ बीजके असतात [⟶ फूल]. फळावर (बोंडावर) लहान खोलगट रेषा असून ते सु. १ सेंमी. व्यासाचे, लंबगोल व ६-८ खंडयुक्त असते. शेंड्याकडे मध्ये खाच असून फळ तडकल्यावर त्याचे प्रत्येकी दोन शकलांचे दोन अर्धगोल बीजे असलेले तीन फलांश (फळाचे सुटे भाग) परस्परांपासून अलग होतात. बीजे सपुष्क (गर्भावाहेर अन्नांश असलेली), बीजावर लाल रंगाचे आवरण [अध्यावरण ⟶ बीज] असते. ह्या वृक्षाची इतर सामान्य लक्षणे व फुलांची संरचना ⇨यूफोर्बिएसीत (एरंड कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड तांबूस उदी, कठीण व टिकाऊ असते. तथापि झाडाच्या लहान आकारमानामुळे त्याला व्यापारी महत्त्व नाही. ते घरबांधणीत वापरतात. साल औषधी असून पोटाच्या विकारांवर उपयुक्त असते. बियांचे तेल दिव्यांकरिता वापरतात.
महाजन, श्री. द.