सिऱ्होपेटॅलम : ऑर्किडेसी या फुलझाडांच्या [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] कुलातील एका प्रजातीचे नाव. यामध्ये ७०–९० जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार आफ्रिका, मॅस्करीन बेटे, इंडोमलाया, ऑस्ट्रेलिया, आशियाचा उष्णकटिबंधीय भाग इ. प्रदेशांत आहे. या अपिवनस्पतींपैकी काही बागेत शोभेकरिता लोंबत्या कुंड्यांतून लावतात. यांच्या रांगत्या खोडापासून आभासी कंद येतात. काही वेळेस यांचे झुबके आढळतात कंदावर पाने एकाकी, चिवट व दीर्घस्थायी किंवा जोडीने आल्यास बहुधा पातळ व गळून पडणारी असतात. फुले चवरीसारख्या फुलोऱ्यांच्या मंडलात येतात. फुलातील संरचना सामान्यतः ⇨ ऑर्किडेसी (आमर) कुलात वर्णिल्याप्रमाणे असते. पृष्ठीन संदल सुटे, बाजूची संदले अधिक लांब व फक्त तळाशी सुटी, परंतु पुढे जुळलेली प्रदले बरीच आखूड व सकेसल ओष्ठ (प्रदल) अखंड व बहुधा बाहेर वळलेला असून स्तंभ आखूड व टोकाशी द्विपक्ष असतो परागपुंज चार असतात.
सिऱ्होपेटॅलम फिंब्रिएटम : (इं. अंब्रेला ऑर्किड). ही जाती भारतात प्रदेशनिष्ठ असून कोकण, प. महाराष्ट्र, सह्याद्री घाट, कारवार इ. प्रदेशांतील जंगलांत आढळते. आभासी कंदांचा झुबका असून फुलोरा असते वेळी ते पिवळे व पर्णहीन असतात. पाने लांब व अरुंद (८–१० X १·२–२ सेंमी.) फुले अनेक, अवृंत व सच्छद असून ती एप्रिल-मेमध्ये येतात. संदले हिरवी प्रदलांच्या कडेने जांभळट केसलाची रांग असते ओष्ठ लालसर तपकिरी, मांसल व जिव्हिकाकृती स्तंभावर दोन टोकदार शिंगे असतात. कंद किंवा मुळे यांना सुटे करुन अभिवृद्घी करतात.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, स. वि.