भेक्ती: (भेकटी). पर्सिफॉर्मीस गणातील लॅटिडी या कुलात या माशाचा समावेश होतो. या माशाचे भेक्ती हे
नाव बंगाली भाषेतील आहे. मराठीत याला ‘खजुरा’ किंवा ‘जिताडा’ या नावाने ओळखतात. याचे शास्त्रीय नाव लॅटेस कॅल्कॅरिफेर असे आहे. हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, गंगा, गोदावरी, महानदी, कृष्णा वगैरे नद्यांच्या मुखांत, सिंधपासून चीनपर्यंतच्या किनाऱ्यावर व थायलंडमध्येही आढळतो.
भेक्तीचा रंग करडा ते हिरवा असून पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील चंदेरी रंगाचा असतो. प्रजोत्पादनाच्या काळात याच्या अंगावर जांभळट छटा दिसतात. शरीर लांब असून दोन्ही बाजूंनी संकुचित व चपटे असते. प्रजोत्पादनक्षम झालेल्या माशांची लांबी ४५ ते ६१ सेंमी. असून वजन २२७ ग्रॅ.पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेले मासे १५० ते १५२ सेंमी. लांब असून त्यांचे वजन ४.५ ते ५ किग्रॅ.पर्यंत असते. त्याच्या अंगावरील खवले पातळ, परस्परव्यापी व काहीसे वक्र असतात. खवल्यांची उघडी टोके दातेरी असून त्यांच्या कडांवर बारीक दातासारखे काटे असतात. वरच्या जबड्यातील मोठे दात घशाकडे वळलेले असून खालच्या जबड्यातील दात लहान असतात. परामध्ये (हालचालीसाठी वा तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घडीमध्ये) सुईसारखे काटे असतात. दोन्ही पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) तळाशी एकत्र झालेले असतात व त्यांत सात काटे असतात. श्रेणिपक्ष (कमरेच्या भागावरील पर) वक्षीय भागात असतो. गुदपक्षात (गुदाजवळील परात) तीन काटे असतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) गोल असतो. या माशामध्ये आंत्रापासून (आतड्यापासून) अंधनालाच्या (बाहेरच्या टोकाशी बंद असणाऱ्या) स्वरूपात उत्पन्न झालेली वायूने भरलेली पिशवी असते, तिला सवृंत वाताशय (अन्नमार्गाला वायुनलिकेने न जोडलेले वाताशय) असे म्हणतात. हा मासा मांसाहारी असून लहान कवचधारी प्राणी, गोगलगाई इ. प्राणी हे याचे खाद्य होय.
समुद्राच्या भरतीच्या वेळी भेक्तीची लहान पिले भातखाचरे व मिठागरात येतात. तेथेच त्यांची वाढ होते. खाऱ्या व गोड्या पाण्यात हा मासा राहू शकतो. मद्रासजवळ गोड्या पाण्यात या माशाचे संवर्धन केले जाते.
भेक्ती उत्कृष्ट क्रीडामत्स्य आहे. याचे उत्पादन जून ते ऑक्टोबर या काळात होते. पश्चिम बंगाल व इतरत्रही याचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. यामध्ये पुढील अन्नघटक आढळतात : प्रती १०० ग्रॅममध्ये प्रथिन १३.७ ग्रॅ. वसा १.१ ग्रॅ. खनिजे १.२ ग्रॅ. (कॅल्शियम ५३० मिग्रॅ., फॉस्परस ४०० मिग्रॅ., लोह १ मिग्रॅ., सोडियम १६ मिग्रॅ., पोटॅशियम १७३ मिग्रॅ., तांबे ०.११ मिग्रॅ.) जीवनसत्त्वे (निकोटिनिक अम्ल ०.७ मिग्रॅ., क जीवनसत्त्व १० मिग्रॅ. कोलीन ३४९ मिग्रॅ.). या १०० ग्रॅमपासून ७३ कॅलरी उष्णता मिळते. त्याच्या वाताशयापासून ‘आयझिंग्लास’ हा जिलेटिनयुक्त पदार्थ तयार करण्यात येतो. याचा उपयोग मद्य विशुद्ध (स्वच्छ) करण्यासाठी होतो.
पश्चिम बंगालमध्ये हे मासे पकडून ताजे खातात, तर इतर ठिकाणी ते सुकवून व खारवून साठविले जातात व यथाकाल त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो.
भोईटे, प्र. बा.
“