भूसेना : भूमीवर लढणारी सेना म्हणजे भूसेना, असे सामान्यपणे म्हणता येईल. भूसेना शत्रूच्या भूसेनेशी युद्ध करते तसेच तिच्याकडून शत्रूची नौसेना व वायूसेना यांच्या आक्रमणाचा प्रतिकारही करण्यात येतो. उघड लढणारी फौज व गनिमी काव्याने [⟶ गनिमी युद्धतंत्र] लढणारी फौज असे भूसेनेचे स्थूल विभाग पाडता येतील. प्रत्यक्ष सेनेत लढणारे व त्यांना लागणारी रसद [⟶ सांग्रामिकी], ⇨ दारूगोळा, वाहनसुविधा व वैद्यकीय मदत [⟶ वैद्यकीययंत्रणा, सौनिकी] इत्यादींचा पुरवठा करणारे असेही उपविभाग यात असतात. भूसेनेत पदाती किंवा पायदळ, रणगाडे [⟶ रणगाडा], तोफखाना [⟶ तोफ व तोफखाना], अभियांत्रिकी [⟶ सैनिकी अभियांत्रिकी], संदेशवहन [⟶ संदेशवहन, सैनिकी] इ. विभाग किंवा दले यांना प्रथम स्थान देण्यात येते. राष्ट्राच्या शक्तीचे जे काही घटक असतात त्यात भूसेनेला महत्त्वाचे स्थान असते. बडी राष्ट्रे सोडल्यास इतर लहानसहान देशांची भिस्त भूसेनेवरच अवलंबून असते. बहुतेक सर्व देशांच्या भूसेना सर्वसाधारपणे एकाच धर्तीवर उभ्या केलेल्या असतात. एक लहान लढणारा घटक ठरवून त्यांच्या मोठ्या तुकड्या बनविल्या जातात व पिरॅमिडप्रमाणे असलेल्या संरचनेत सगळ्यात उच्च पदावर जनरल अथवा फील्ड मार्शल आणि सर्वांत खालच्या पायरीवर शिपाई अशी भूसेनेची रचना केलेली आढळते. लष्करी जीवनात शिस्तबद्ध चाकोरीचा भाग जास्त असतो. प्रत्येक प्रसंगी कसे वागावे व प्रतिक्रिया काय असावी हे सेनेमध्ये लिखित स्वरूपात ठरवून दिलेले असते. अशा प्रकारच्या शिकवणीतून शिपाई तयार होतो, म्हणून तो युद्धकाळात जीव वाचविण्याऐवजी प्राणत्याग करायला पुढे सरसावतो परंतु या चाकोरीबद्ध जीवनात सगळे पैलू लष्करी जीवनात आढळतात. त्यामुळे लष्करी छावणीत लष्कराच्या सगळ्या गरजा पुरविण्याची व्यवस्था असते. परिणामी सेना आपले एक निराळेच विश्व निर्माण करते. समाजात सेनेला स्वतंत्र स्थान असते. काही देशांत लष्करी सेवा सक्त्तीची असल्यामुळे ही बंधने फक्त काही वर्षांपुरतीच असतात म्हणून समाजापासून सेना फारशी दूर जात नाही. सर्वसाधारणपणे भूसेना, वायूसेना व नौसेना ह्यांच्यामधील फरक जरी सहज लक्षात येण्यासारखा असला तरी भूसेनेचा मरीन कोअर हा अमेरिकन सैन्यविभाग नौदलाशी जास्त निगडीत आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून उतरणारे आणि ⇨ छत्रीधारी सैन्य यांचा वायुदलाशी निकटचा संबंध असतो. रसद पुरविणे, दारूगोळा पुरविणे, वाहने दुरूस्त करणे वगैरे कामे नौदलाची असोत, अथवा वायुसेनेची असोत ती भूसेनेच्या विभागाप्रमाणेच कार्य करीत असतात एवढेच नव्हे तर बांधणी विभाग, वैद्यकीय विभाग हे एकत्रही असू शकतात. [⟶ नौसेना वायुसेना]. ऐतिहासिक आढावा : लढाईची सुरूवात ही प्राचीन काळात टोळ्याटोळ्यांतील संघर्षापासून झाली. ह्या संघर्षाची कारणे शेतीची नासधूस, धनधान्याची लुटालुट, जनावरांचे व स्त्रियांचे अपहरण, मानापमानाचे प्रसंग व त्यांतूनच उद्‍वलेले तंटे वगैरे असत. या संघर्षात प्रत्येकजण भाग घेई. त्यातूनच पुढे लढणारा वर्ग-ज्यात साधारण तरूणांचा भरणा असे- निर्माण झाला व पुढे काही गटांची लढाई करणे ही मत्केदारीच होऊन बसली. हूण, शक, मग्यार, मंगोल अशा काही जमाती लढवय्याचाच पेशा करू लागल्या आणि दुसऱ्या देशांवर स्वाऱ्या करून त्यांची लूटमार करणे हा त्यांचा व्यवसाय बनून गेला अशा स्वाऱ्यांत पुढारीपण करणारे लढवय्ये वीर आपोआपच मानसन्मानास प्राप्त झाले आणि त्यातूनच सरदार-दरकदार असे वर्ग निर्माण झाले. प्राचीन ग्रीक व रोमन नगरराज्ये स्थापन झाल्यानंतर त्यांतूनच पुढे सैन्ये उभी राहिली. सेनेत सेवा करणे हा एक पेशा निर्माण झाला. पोटभरू सैन्य जो पैसा देईल त्याच्या बाजूने लढे. लढणे हा पेशा बनल्यामुळे त्यात शिस्त, वळण व चाकोरीबद्ध जीवन यांचा अंतर्भाव झाला. त्यामागे एक तत्त्वज्ञान उभे राहिले. देशाकरिता प्राणार्पण करणे, हे उदात्त समजले जाऊ लागले आणि लढण्याची एक परंपरा निर्माण झाली. लढणाऱ्या जाती वेगळ्या राहू लागल्या. उत्तरोत्तर जसजसे लढाईचे क्षेत्र वाढू लागले तसतशी लढाईची तयारी व त्यावरील प्रतिबंधक उपायही वाढले आणि भूसेना किल्यात राहू लागली. ⇨ तटबंदी निर्माण झाली व त्यातूनच पुढे तटबंदी फोडण्याकरिता गोळे फेकणारी अवजारे व तोफा यांचा जन्म झाला. रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर मध्ययुगीन काळात धंदेवाईक सैन्याची जागा लहानलहान जर्मन राज्यांच्या फौजांनी घेतली परंतु जेव्हा मग्यार, किंवा हूण हजारोंच्या संखेने धाड घालीत तेव्हा ह्या लहान राज्यांच्या सेनेचा नायनाट होई. जसजसी लहान राष्ट्रे नष्ट पावली तसतशी मोठ्या राष्ट्रांतून जमीनदारी व मनसबदारी पद्धत उदयास आली. हे जमीनदार आपल्या पदरी सैन्य बाळगू लागले. लढाईच्या वेळी हे उमराव आपापली सैने घेऊन राज्याच्या दिमतीला हजर राहत परंतु आयत्या वेळेला उभे केलेले हे सैन्य शिस्त, सराव ध्येयधोरण इत्यादींचा अभाव व परस्परांचे हेवेदेवे यांच्या प्रभावामुळे निष्प्रभ होई. युद्धशास्त्राची त्या काळी विशेष प्रगती झाली नव्हती. केवळ किल्यांना वेढा देणे व महिनेच्या महिने शत्रूची नाकेबंदी करणे, हेच लढाईचे मुख्य अंग होऊन बसले होते. मध्ययुगीन काळात ⇨ घोडदळालाच प्राधान्य आले. चिलखत घातलेले आणि भाले घेतलेले उमराव आपापल्या सैन्यासह रणांगणात उतरू लागले. हा काळ संपल्यानंतर यूरोपमध्ये काही राजघराणी नावारूपास आली व त्यानी स्वतःची पगारी फौज उभी केली. परिणामतः उमरावशाहीचा प्रभाव आणि तोफखानेही सज्ज झाले. राजांच्या फौजा : इ. स. १५५० ते १६५० या काळात स्वीडनमध्ये ⇨ गस्टाव्हस आडॉल्फस व इंग्लंडमध्ये ⇨ ऑलिव्हर क्रॉमवेल यांनी घोडदळ व पायदळ यांची पुनर्रचना केली. गणवेश, शिस्त व शस्त्रास्त्रांची समान पद्धती या नव्याने सुरू केलेल्या सोयींमुळे सैन्य ही एक ताकद ठरली. कवाईत व शिस्त कडक केल्यामुळे जनतेची लुटमार थांबली. त्यातूनच एक अधिकारी-वर्ग निर्माण झाला आणि पूर्वीच्या उमरावांची तसेच राजेरजवाड्यांची जागा या पगारी अधिकाऱ्यांनी घेतली. लष्करी पेशा हा मानाचा असल्यामुळे श्रीमंत घराण्यातील मुले अधिकारी-वर्गात स्वखुशीने जाऊ लागली. ह्यांचा कल घोडदळाकडे जास्त असे. इतरेजन मात्र पायदळात व तोफखान्यात जात.


हळूहळू सैन्यात अधिकाऱ्यांचे प्रमाण शिपायांच्या संखेच्या मानाने जास्त होऊ लागले. फ्रान्समध्ये तर शेकडो अधिकारी नुसते पगार खात. चौदाव्या लुईच्या काळात (१७५०-७४) फ्रान्सची सैन्यसंख्या जवळजवळ ४ लाख होती. त्या उलट क्रॉमवेलने सैन्याच्या आधारे राज्यसत्ता उलथवली, हे धान्यात घेऊन इंग्लंडमध्ये खडी फौज खूपच कमी करण्यात आली. एवढेच नव्हे तर पार्लमेंटने सैन्यावरील आपली पकड अधिकच मजबूत केली. इंग्लंडमध्ये त्या काळी अधिकारी लोक पैसे भरून कमिशन विकत घेत. अठराव्या शतकात जर्मन सेना राज्याची मुख्य शक्ती होती. त्यांचा अधिकारी-वर्ग उमराव घराण्यातला असे. काही सैनिकी पद्धती : सैनिकी दर्जाच्या निदर्शक अशा काही पद्धती इतिहासकालात रूढ होत्या. उदा., फॅलँक्स (दाट रांगांतील युद्धसज्ज पदाती ), हॉपलाईट (अतिशस्त्रसज्ज पदाती), लीजन व काँडोटिअरी (भाडोत्री सैन्यदल) इत्यादी. फॅलँक्स-प्राचीन ईजिप्तमधील ‘फॅलँक्स’ सैन्य हातगाईच्या लढाईत तलवारीचा उपयोग करीत असे. या तलवारी काही लांब वा काही आखूड पल्ल्याच्या असत. याशिवाय भाल्यांचाही वापर फॅलँक्स-प्राचीन ईज्प्तमधील ‘फॅलँक्स’ सैन्य हातघाईच्या लढाईत तलवारीचा उपयोग करीत असे. या तलवारी काही लांब वा काही आखूड पल्ल्याच्या असत. याशिवाय भाल्यांचाही वापर फॅलँक्सकडून केला जाई. भालेदार, तलवारधारी व परशुधारी असे फॅलँक्सचे तीन विभाग असत. यांशिवाय रथातून लढणारे रथी धनुष्यबाण व चिलखत यांचाही उपयोग करित असत. हॉपलाईट-प्राचीन ग्रीसमधील शस्त्रसंभाराने सज्ज असलेले पायदळ सैन्य. या सैनिकाकडून रथांचा वापरही प्राचीन ग्रीसमध्ये केला जाई. द्वंद्वयुद्धात ढास, तलवार व भाले यांचा हे वापर करीत. स्पार्टाच्या नगरराज्यात सर्वच पुरूष शस्त्रधारी होते त्यामुळे ते नगरराज्य म्हणजे एक सेनाच वाटे. त्या काळी फॅलँक्सच्या आघाडीत एक रांग भालईतांची, दुसरी रांग तलवारधारकांची व तिसरी गदाधाऱ्यांची असे. काँडोटिअरी- इ. स. पंधराव्या शतकाच्या शेवटी इटालियन सैन्यामध्ये काँडोटिअरी हा घोडदळाचा एक प्रकार होता. काँडोटिअरीचे पहिले पथक माँत्रिल द आलबर्न याने उभारले. त्यात ७,००० घोडदळ व १,५०० पायदळ होते. एका पथकातून दुसऱ्या पथकात जाण्याचे स्वातंत्र्य त्यातील सैनिकाला असे. खड्या सैन्याच्या जागी काँडोटिअरीचा वापर करणे त्याकाळी क्रमप्राप्त ठरले. खाजगी अधिकारी आपल्या पदरी घोडदळाच्या टोळ्या बाळगीत. हे सैनिक शिरस्त्राण व चिलखत वापरीत. पुढे पुढे ही पदके बेछूट, स्वैराचारी बनली व लूटमार करून आपली पाशवी वृत्ती प्रकट करू लागली त्यामुळे लोकांत त्यांच्याविषयीची अप्रियता निर्माण झाली व हळूहळू त्या सैनिकी पद्धतीचा अस्त झाला. लीजन-प्राचीन रोमन सैन्यास फॅलँक्सच्या ऐवजी ‘लीजन’ ची पद्धती रूढ झाली. यात पायदळ व त्याच्या साहाय्याला घोडदळ असे. सैनिक शिरस्त्राण व चिलखत घालीत. तथापि ‘लीजन’ हा शब्दप्रयोग निरनिराळ्या अर्थाने वापरण्यात येऊ लागला. रोमन साम्राजाच्या सुरूवातीला जागतिक भरती (लेव्ही ऑफ सिटिझन) याचा द्योतक होता, पण पुढे लीजन म्हणजे चार ते सहा हजार संख्येचे, अत्युच्च शिक्षण घेतलेले कुशल व चिलखती घोडेस्वार, पायदळ व आयुधधारी अशा तुकड्यांचे संयुक्त पथक असे समजले जाई. एकेकाळी अशी ६० लीजन अस्तित्वात होती. नेपोलियनने शाहीदल (ग्रँड आर्मी) व लीजन म्हणजे दुय्यम दर्जाचे प्रादेशिक सैन्य असे दोन प्रकार सुरू केले. लीजनचे काम मातृभूमीचा बचाव करणे इतकेच मर्यादित असे. अमेरिकन यादवी युद्धामध्ये स्वयंपूर्ण युद्धपथकांना लीजन असे म्हणत.आपल्या साम्राज्यातील वसाहतींची वाढ करण्यासाठी फ्रान्सने ‘फ्रेच लीजन ’ या पथकाचा प्रामुख्याने वापर केला. दुसऱ्या महायुद्धामध्येही या पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. युद्धतंत्रामध्ये तज्ञ अशा निधड्या छातीच्या लढवय्यांची ही पथके असत. त्यात कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकाला प्रवेश मिळू शके. मात्र तो युयुत्युवृतीचा असावा लागे. समाजातून बहिष्कृत केलेले, पण बेडर वृत्तीचे लोकही या पथकात प्रवेश करित. राष्ट्रीय सेना व लष्करी पेशा : पुढे एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये सेनांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. १८७०-७१ मधिल ⇨ फ्रँकोप्रशियन (जर्मन) युद्धात दोन्ही सैन्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होती .

पित्रे, का. ग.

भूसेनेचे प्रमुख घटक : भूसेनेचे प्रमुख घटक सामान्यतः पुढीलप्रमाणे असतात. (१) पायदळ विभाग : सैन्यातील सर्वांत मोठा व महत्त्वाचा विभाग. इतर विभागांच्या साहाय्याने शत्रूचा संहार करणे व शत्रूच्या ताब्यातील जमिनीवर कबजा करणे तसेच आपल्या ताब्यातील भूमीचे शत्रूपासून संरक्षण करणे, हे याचे मुख्य कर्तव्य आहे. यंत्रचलित (मेकॅनाइझ्ड) पायदळ हा विभाग आधुनिक काळातील युद्धात पायदळाला गतिमान करण्यासाठी पायदळ लढाऊ वाहने (इन्फन्ट्री काँबॅट व्हेकल्स) वापरून चिलखती विभागाबरोबर सहकार्य करतो. (२) रणगाडे किंवा चिलखतीविभाग : पायदळाच्या साहाय्याने किंवा स्वतंत्रपणे शत्रूवर हल्ला करून त्याचा धुव्वा उडवणे व स्वभूमीचे संरक्षण करणे, हे या विभागाचे प्रमुख कार्य असते. गतिमानता, चिलखती संरक्षण आणि शस्त्रास्त्रप्रभाव ही या दलाची वैशिष्ट्ये आहेत. (३) तोफखाना : पायदळ व चिलखती दल यांना साहय्य करणे, हे या दलाचे काम आहे. यात क्षेत्र विभाग (फील्ड ब्रँच), पर्वतीय विभाग व विमानविध्वंसक विभाग यांचा समावेश असतो. (४) अभियांत्रिकी विभाग : युद्धात भूसेनाला राहण्यास, लढण्यास व परिक्रमण करण्यास सहाय्य करणे, हे या विभागाचे मुख्य काम आहे. त्यासाठी घरे बांधणे, रस्ते बांधणे, पूल निर्माण करणे, विमानतळ बांधणे, तटबंदी उभारणे व सुरूंग पेरणे आणि काढणे इ. कामे याच्यावर सोपविली जातात. (५) संदेशवहन विभाग : भूसेनेच्या संपर्काच्या सर्व गरजा उदा., दूरवाणी, बिनतारी संदेश तसेच दूरदर्शन इ. साधनांचा उपयोग करून युद्धसंकलनास सहाय्य करणारा विभाग. (६) रसदविभाग (आर्मी सर्व्हिस कोअर) : सैन्याच्या तिन्ही विभागांना लागणारी अन्नसामग्री पुरवणे व वाहनसेवा देणे, ही ह्या विभागाची कार्ये आहेत. (७) आयुध विभाग (आर्मी ऑर्डनन्स कोअर) : भूसेनेला लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इतर सर्व प्रकारचे साहित्य पुरविणारा विभाग. (८) विद्युत् व यांत्रिकी अभियंता विभाग : भूसेनेची सर्व प्रकारची वाहने व इतर यांत्रिक साहित्याची दुरूस्ती तसेच निरीक्षण करणारा विभाग. (९) वैद्यकीय विभाग (आर्मी मेडिकल कोअर) : भूसैनेला वैद्यकीय सहाय्य देणे व त्यासाठी रूग्णालये चालविणे, हे या विभागाकडे सोपविलेले असते. (१०) या मुख्य विभागांशिवाय दंतसेवा विभाग, पशुचिकित्सा विभाग, दुग्धवितरण विभाग तसेच सैनिकी पोलीस विभाग इत्यादींचा भूसेनेत समावेश होतो.

कुलकर्णी, ह. वा. 


भूसेनेचे युद्धतंत्र : कोणत्याही युद्धाचे साधारणपणे चार प्रमुख विभाग पडतात. ते म्हणजे शत्रूची चाहूल घेऊन त्याच्याशी संपर्क साधणे, त्याच्यावर आक्रमण करणे, स्वतःचे संरक्षण करणे व माघार घेणे हे होत. हे युद्ध उघड असो वा गनिमी काव्याने लढलेले असो, युद्धाबाबत मुख्य सिद्धांत पुढीलप्रमाणे असतात. : (१) लढाईचे ध्येय निवडणे व ते कायम ठेवणे, (२) आक्रमक धोरण बाळगणे, (३) सैन्यांचे केंद्रीकरण करणे, (४) आवश्यक तेवढेच सैन्य वापरणे, (५) सैनिकांचे मनोबळ टिकवून धरणे, (६) शत्रूला स्तंभित करणे व फसविणे आणि (७) रसद व पुरवठा सातत्याने चालू ठेवणे. तडीत् युद्धतंत्र : हेलिकॉप्टर व विमान यांच्याद्वारा आकाशमार्गे सैन्यतुकड्या रणभूमीवर उतरविण्यात येतात. हे सैन्य जमिनीवरून रणगाडे, चिलखती गाड्या व वाहने यांच्या साह्याने शत्रूवर आक्रमण करते, तर त्यापुढील प्रदेश विमाने तोफगोळे टाकून शत्रुविरहीत करतात. पहिल्या महायुद्धानंतर खंदक युद्ध [⟶ खंदक युद्धतंत्र] मागे पडले तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनांनी ⇨ तडीत् युद्धतंत्राचा आक्रमक प्रकार उपयोगात आणला. भावी काळातील अण्वस्त्र युद्धतंत्र [⟶ अणुयुद्ध] कसे असेल, याची सर्वत्र जिज्ञासा दिसून येते. संयुक्त कारवाई : दुसऱ्या महायुद्धात भूसेना, नौसेना व वायुसेनेच्या ⇨ संयुक्त सेनाकारवाईची गरज भासू लागली व त्यातून एक संयुक्त युद्धतंत्र निर्माण झाले. मलाया, सिंगापूर, जावा, सुमात्रा व पॅसिफिक महासागरातील बेटांवरच्या लढाया संयुत्क युद्धतंत्राने करण्यात आल्या. तिन्ही दलांची शक्ती एकत्रित करून त्यावर एक सर्वाधिकारी (सुप्रीम कमांडर) नेमला जाई व तो तिन्ही दलांच्या कामकाजाचे संयोजन करीत असे. आधुनिक अणुयुद्धात भूसेनेचे स्थान : अण्वस्त्रामुळे युद्धाचे तंत्र बदलेले, हे जरी खरे असले, तरी शत्रूचा पराभव किंवा नाश झाल्यावर त्याचा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवायचा असेल, तर भूसेना ठेवावीच लागेल. तसेच क्षेपणास्त्रे विमानातून किंवा सागरी मार्गाने नेता येत नसल्यामुळे जमिनीवरून त्यांचे प्रक्षेपण भूसेनेलाच करावे लागणार हे उघड आहे. भारतीय भूसेना : भारताची सैन्यपरंपरा अत्यंत प्राचीन आहे. अश्मयुगात गारगोटी व दगड यांपासून बनलेली अस्त्रे आणि त्यानंतर धनुष्यबाण [⟶ धनुर्विद्या] यांचा वापर योद्धे करीत. तदुत्तर काळात लोखंडाचा शोध लागला व लोहयुगात शस्त्रास्त्राबाबत क्रांती घडली. भाले, खंजीर, तलवारी, ढाली, गदा व त्यांना तोड म्हणून शिरस्त्राणे, चिलखते इ. संगक्षक साधनांचा जन्म झाला [⟶ शस्त्रसंभार]. वैदिक काळात चतुरंगबल, षट्‌बल आणि अष्टबल अशा तीन प्रकारच्या सेना असत. चतुरंगबल रथ, हत्ती, घोडदळ व पायदळ. षट्बल म्हणजे रथ, हत्ती, घोडदळ, पायदळ, रस्ते बनविणारे व नौदल (नद्यांतून वावरणारे) आणि अष्टबल म्हणजे वरील सहा प्रकारांशिवाय रसदविभाग आणि तांत्रिकी विभाग समाविष्ट केलेला सेनाप्रकार होय. त्याकाळी शस्त्रास्त्रे हाताळण्याचे शिक्षण गुरूकुलात दिले जाई. शुक्रनीतिसार या ग्रंथात युद्धाचे उत्तम, मध्यम, कनिष्ठ व अधम असे चार प्रकार सांगितले आहेत. पांडवांच्या काळात सैन्य चतुरंगबल होते पुढे मौर्य साम्राजात ते षट्‌बल झाले. भारताच्या चतुरंगबलांपैकी ⇨ रथ इसवी सनापूर्वी ३२७ साली अलेक्झांडर-पोरस यांच्यामध्ये झालेल्या युद्धात नाकामी ठरल्यामुळे पुढे त्याचा वापर कमी झाला. हत्ती मात्र बरीच वर्षे प्रभावी ठरले. मगध देशाच्या फौजेत ३,००० हत्ती होते परंतु पुढे पुढे घोडदळाचा प्रभाव वाढल्यामुळे हत्तींचा वापर कमी झाला. मध्ययुगीन काळात दिल्लीचे सुलतान व नंतरचे मोगल राज्यकर्ते यांनी घोडदळ व पायदळ यांचाच जास्त वापर केला होता. हत्ती हे राजचिन्ह तेवढे कायम राहिले. सेनेत यंत्री, ⇨ सॅपर्स व मायनर्स (रस्ते बांधणे, जंगल तोडणे, तटबंदी बांधणे, सुरूंग लावणे इ. कामे करणारी मजूरसेना), यांचा समावेश मोगलांच्या वेळेपासूनच होता. मोगल व गुलाम वंशाच्या कारकीर्दीतही गुलामांना तसेच युद्धकैद्यांना सैन्याला रसद पुरविणे, रस्ते बांधणे, मार्गातील अडथळे दूर करणे अशी कामे करावी लागत. मनसबदारी पद्धतीमुळे प्रत्येक मनसबदाराला बादशाहाच्या सेनेची रसद व युद्धसामग्री वाहून नेण्यासाठी बैल, उंट [⟶ उंटदल] व घोडे इ. पुरवावे लागत त्यामुळे वेगळे रसदखाते नव्हते मात्र गुलाम घराण्याच्या काळात (१२०६-९०) रसदखाते वेगळे होते. मुस्लिम राजवटीत अफगाण, तुर्क व मोगल सरदार आपापल्या देशातील लोकांना सैन्यात सामावून घेत. त्यांनी बंड करू नये म्हणून मोगल सम्राटांनी प्रत्येक टोळीत तीन-चारही देशांतले लोक घातले. हिंदूंनाही गुलामराजांनी व मोगल सम्राटांनीही सैन्यात प्रवेश ठेवला होता, तसेच ते अधिकारपदावरही जात. विशेषतः मोगल राजवटीत रजपूतांना अधिकारपदे दिली जात. स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतीय सेना : इ. स. १६०० नंतर ईस्ट इंडीया कंपनीच्या कारकीर्दीत देशी राज्यात भूसेनेचा भर पायदळ व घोडदळ यांवर असे. दक्षिणेस मनसबदारी नव्हती परंतु नायकवाडी होती. हे नायक पायदळ व घोडदळ बाळगीत. बाबरच्या आक्रमणापासून भारतात तोफखान्याचा समावेश भूसेनेत झाला. पानिपतच्या लढाईत [⟶ पानिपतच्या लढाया] इब्राहिम लोदीचा पराभव बाबरच्या तोफखान्यामुळे घडला (१५२६). मोगलाच्या काळात पायदळ, घोडदळ, उंट, हत्ती, तोफखाना, यंत्री व रसदखाते असे विभाग होते. अठराव्या शतकात दक्षिणेत बंजारा जातीचे लोक बैलांचे हजारो तांडे घेऊन येत व देशी राज्याच्या भूसेनेला तसेच ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेला रसद पुरवीत. त्याकाळी किल्ल्यांचा उपयोग धान्य, दारूगोळा, तोफा, हत्यारे, व त्यांचे सुटे भाग वगैरे साठविण्याकरिता केला जाई. त्यामुळे स्वतंत्र असे सरदखाते नव्हते.


स्वातंत्र्योत्तरकालीन भारतीय भूसेना : विद्यमान भारतीय भूसेनेचा उगम ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत आहे. त्याकाळी वखारी व किल्ले यांच्या रक्षणाकरिता मुंबई, मद्रास, व कलकत्ता येथे तीन वेगळ्या सेना उभ्या केल्या गेल्या. अठराव्या शतकाच्या अखेरीस ह्या तिन्ही सेना एका कमांडर इन चीफच्या हाताखाली एकत्रित झाल्या. ह्या सेनेत देशी काळे सैन्य, हिदुस्थानात उभ्या केलेल्या गोऱ्या पलटणी, इंग्लंडहून आणविलेल्या पलटणी व घोडदळ आणि तोफखाना असे विभाग असत. १८५७ सालच्या उठावानंतर तोफखान्यातून काळे लोक काढून टाकण्यात आले व राणीच्या जाहीरनाम्यानंतर काळी फौज ब्रिटिश अंमलाखाली आली. भारतीय रेजिमेंटचे स्वरूप प्रांतीय होते. निरनिराळी नावे व क्रमांक आणि त्यांत वेळोवेळी होत गेलेले फरक यांचे फलस्वरूप सध्याच्या रेजिमेंटमध्ये आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदी लोकांना तोफखान्यात प्रवेश मिळाला. सर्वसाधारण उच्च जातीचे लोक व श्रीमंत लोक घोडदळात जात, तर इतर लोक पायदळात जात. तोफखान्यात परदेशी, अँग्लो इंडियन व मुसलमान यांचा जास्त भरणा असे. कर्मठ हिंदू तोफखान्यात जायला तयार नसत. मराठेशाही व पेशवाई या काळात मराठे पायदळ व घोडदळांतच जात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय भूसेनेत चिलखती रणगाड्यांच्या रेजिमेंट उभ्या करण्यात आल्या. घोडदळात घोडे जाऊन रणगाडे आले, पण नावे तीच राहिली. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच सॅपर्स आणि मायपर्स, सिग्नल रेजिमेंट, आर्मी सप्लाय कोअर, आर्मी मेडीकल कोअर, आर्मी ऑर्डनन्स कोअर, इ. एम, ई. मिलिटरी पोलीस, इंटेलिजन्स [⟶ गुप्तवार्ता], मेकॅनिकल इन्फंट्री, पॅराशूट सैन्य असे वेगवेगळे विभाग भूसेनेला जोडण्यात आले. इन्फंट्री, आर्टीलरी, आर्म्‌ड कोअर, इंजिनियर्स सिग्नल ही लढाऊ अंगे व बाकी मदतनीस फौज समजली जाते. जुन्या परंपरा टिकविण्याकरिता रेजिमेंटची नावे शक्य तो तीच ठेवून नविन राष्ट्रीय एकीकरणाच्या धोरणाप्रमाणे गार्ड, पॅराशूट रेजिमेंट वगैरे रेजिमेंटमध्ये सर्व जातींचे व धर्माचे लोक घेण्याचा प्रयोग चालू आहे तर काही रेजिमेंटमध्ये उत्तरेकडचे वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, डोंगरी लोक वेगळे व नागासारख्या वन्य जाती वेगळ्या ठेवण्याचे प्रयोगही सुरू आहेत. कंपनी सरकारच्या फौजेत हिंदी लोक सुभेदार, मेजर ह्या हुद्यांपर्यत जात. विसाव्या शतकात प्रथम हिंदी लोकांना सँडहर्स्ट येथे शिक्षण देऊन अधिकारी म्हणून घेण्यात येऊ लागले. ह्याला गुरखा रेजिमेंट अपवाद होत्या. दुसऱ्या महायुद्धात अधिकाऱ्यांची गरज फार मोठी असल्यामुळे हिंदी लोकांना मोठ्या प्रमाणात अधिकारी म्हणून प्रवेश मिळाला. नेपाळशी झालेल्या करारानुसार स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय सेनेत १० गुरखा रेजिमेंट होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांतील चार रेजिमेंट ब्रिटिश फौजेत गेल्या. सध्या हळूहळू नेपाळी नागरिकांच्या जागी भारतीय गुरखे घेणे चालू आहे. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत १९६२ पर्यंत भारतीय सेना मागासलेलीच राहिली. चिनी आक्रमणानंतर मात्र तिचे आधुनिकीकरण केले गेले व ते चालूच आहे. युद्धसामग्री –उत्पादनात भारत तांत्रिक दृष्ट्या मागे आहे त्यामुळे त्याला परराष्ट्रावर अवलंबून रहावे लागते. दुसऱ्या महायुद्धकाळात जवळजवळ ६ लाख हिंदी फौज होती, ती कमी करून अडीच लाख करण्यात आली, परंतु १९४७ च्या पाकिस्तानच्या आक्रमणानंतर ही संख्या वाढत गेली. त्यात १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६५ चे व १९७१ चे पाकिस्तानशी युद्ध यांची भर पडून आता भूसेनेची संख्या साडेआठ लक्ष झाली आहे. [⟶ भारत-पाकिस्तान संघर्ष भारत-चीन संघर्ष]. देशाच्या अंदाजपत्रकात चार टक्के खर्च संरक्षणावर होत असून त्यापैकी मोठा भाग भूसेनेवर खर्च होतो. भूसेनेची रचना भौगोलिक विभागावर असून आता पाच कमांड आहेत. त्याच्या खालोखाल कोअर, डिव्हीजन, ब्रिगेड व रेजिमेंट/बटालियन ह्या लढणाऱ्या तुकड्या आणि एरिया, सब एरिया, कम्युनिकेशन झोन वगैरे प्रबंध विभाग असतात. शिपायांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या रेजिमेंटच्या केंद्रात होते व अधिकारी ⇨ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला (पुणे) आणि भारतीय सैन्य अकादमी, डेहराडून येथे शिकतात. अधिकारी वर्गाच्या उच्च शिक्षणाकरिता वेगवेगळी महाविद्यालये आहेत. सैन्यात डॉक्टर हे आर्म्‌ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून शिकून बाहेर पडतात. स्त्री डॉक्टर व परिचारिका यांखेरीज स्त्रियांना भूसेनेत स्थान नाही. भारतीय भूसेनेच्या श्रेणीरचनेत सामान्य व राजादिष्ट असे दोन प्रमुख भाग असून त्यांच्या श्रेणी खालीलप्रमाणे असतात. सामान्य श्रेणी : सैनिक, सॅपर, पॅराट्रप, ग्रेनेडिअर, रायफलमन, गनर, नर्सिंग, ऑर्डर्ली इ. सेवकवर्ग यात मोडतो. त्यातील पदनामे (चढत्या श्रेणीने) अशी : शिपाई &gt लान्सनाईक &gt नाईक &gt लान्स हवालदार व हवालदार/दफादार &gt हवालदार मेजर/क्वॉर्टर मास्टर हवालदार. राजादिष्ट श्रेणीमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ असे दोन प्रकार असून त्यांची पदनामे पुढील प्रमाणे असतात.

कनिष्ठ श्रेणी : नायब सुभेदार /रिसालदार &gt सुभेदार / रिसालदार &gt सभेदार मेजर / रिसालदार मेजर. वरिष्ठ श्रेणी : सेंकंड लेफ्टनन्ट &gt लेफ्टनन्ट &gt कॅप्टन &gt मेजर &gt लेफ्टनन्ट कर्नल &gt कर्नल &gt ब्रिगेडियर &gt मेजर जनरल &gt लेफ्टनन्ट जनरल &gt जनरल &gt फील्ड मार्शल.


भारतीय भूसेनेची संरचना पुढीलप्रमाणे आहे : तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि दक्षिण असे पाच कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो. त्यानंतर प्रत्येक कक्षेत सोईनुसार प्रादेशिक मुख्यालय (एरिया हेडक्वॉर्टर), उपप्रादेशिक मुख्यालय आणि स्थानिय मुख्यालय (स्टेशन हेडक्वॉर्टर) असे विभाग पाडलेले असतात. शांततेच्या काळात रसदपुरवठा, शस्त्रभांडारांवरील देखरेख, यंत्रशाळा –व्यवस्थापन, सैनिकी इस्पितळे, प्रशिक्षण केंद्रे व कक्षांतर्गत तळ ठोकून असलेल्या लढाऊ सैनिकी तुकड्यांची व्यवस्था वगैरे कामे ते ते कक्षाविभाग (कमांड) करीत असतात. युद्धकाळात आपापल्या क्षेत्रातील युद्धाची सर्व जबाबदारी त्या त्या कक्षप्रमुखावरच असते. भूसेनेच्या लढाऊ दलाची उभारणी पुढीलप्रमाणे असते : सेक्शन &gt प्लॅटून/ट्रूप &gt कंपनी /स्क्वॉड्रन/बॅटरी/रेजिमेंट, बटालियन, ब्रिगेड, डिव्हिजन व कोअर. त्यानंतर कमांडचे कोअर व एरिया असे दोन विभाग येतात. त्यांपैकी कोअरमध्ये डिव्हीजन व त्याखाली ब्रिगेड असून एरियाचे सबएरिया &gt स्टेशन असे उपविभाग पुढे असतात. बटालियन किंवा रेजिमेंट विभाग असतो. भूसेनेत निरनिराळ्या कामांसाठी पुढील खाती असतात : रणगाडे, तोफखाना, पदाती (पायदळ), अभियांत्रिकी, संदेशवहन, वाहन, व अन्नपुरवठा, वैद्यकीय, दारूगोळा, व युद्धसामग्री-पुरवठा, लष्करी पोलीस, जनावरांचे विभाग, शेती, दुध वगैरे. भूसेनेची जबाबदारी : स्वतंत्र भारतात भूसेनेवर खालील जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या : (१) भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, (२) देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व (३) आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे. राष्ट्रसंघाचे सदस्य या नात्याने भारताने आपले सैन्य कोरीया, इंडोचायना, काँगो, गाझा व सायप्रस येथे पाठविले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सेनेने पाकिस्तानी टोळीवाल्यांचे आक्रमण थोपवून काश्मीरचे खोरे वाचविले. तसेच जुनागढ, हैदराबाद व गोवा विभुक्त केले. १९६२ साली मात्र चिनी आक्रमणामुळे अरूणाचल प्रदेशामध्ये काही भागांत आपल्या सैन्याची पीछेहाट झाली परंतु लेह व सियांग भागात चिनी आक्रमण थोपविले गेले. १९६५ मध्ये कच्छ, काश्मीर व पंजाबात पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत भारतीय सेनेने पराक्रम गाजविला, तर १९७१ च्या ⇨ बांगला देशाच्या मुक्तियुद्धात तेथे (पूर्व पाकिस्तानमध्ये) पाकिस्तानी सैन्य भारतीय सेनेला शरण आले. भारताच्या फाळणीनंतर शरणार्थींना मदत करण्याच्या कामात भूसेनेचा फार मोठा वाटा आहे. भूसेनेखेरीज ⇨ प्रादेशिक सेना वराष्ट्रीय छात्रसेना हे दोन द्वितीय फळीच्या सैन्याचे विभाग आहेत. पैकी प्रादेशिक सेनेचा कारभार भारतीय भूसेनेद्वारा चालतो. ती पुढील कामे करते : लढाईच्या काळात बाराही महिने कामावर रूजू होऊन हवाई पट्टीचे संरक्षण करणे, युद्धकैद्यांच्या तळावर देखरेख ठेवणे, विमानविरोधी तोफा चालविणे. राष्ट्रीय छात्रसेनेला अधिकारी व निमअधिकारी भूसेनेकडून पुरविण्यात येतात. तसेच प्रशिक्षण देणारे शिक्षक अधिकारी, शस्त्रे-अवजारे वगैरे भूसेनेकडूनच मिळतात. त्याचप्रमाणे आसाम, नागालँड, मणिपूर मिझोराम, सिक्कीम, मेघालय व त्रिपुरा या सात राज्यांत आसाम रायफल्स ही निमलष्करी सेवा असून तिलाही भूसेनेकडूनच अधिकारी, दारूगोळा, हत्यारे व इतर युद्धोपयोगी सामग्री आणि प्रसंगी विमानाद्वारे अन्नपुरवठाही करण्यात येतो. यांखेरीज ⇨ सीमासुरक्षा दल वनागरी संरक्षण दल अशीही दले आहेत. त्यांपैकी सीमासुरक्षा दल हे गृहमंत्र्याच्या नियंत्रणाखाली असते परंतु सरहद्दीवरील पलटणी सैन्याच्या अधिकारात असतात व शत्रूची चाहूल लागताच सैन्याला बातमी देणे, ⇨ गस्त घालणे आणि शत्रूकडून हल्ला झाल्यास त्याचा जुजबी प्रतिकार करणे, असे त्यांचे कार्य असते. या दलास लागणारी सामग्री शस्त्रसंभारभांडाराकडून (ऑर्डनन्स डेपो) पुरविणे यात येते. भारत-तिबेट सामेवरील दलास (स्कॉउट) भूसेनेकडूनच अधिकाऱ्यांचा पुरवठा होतो. नागरी संरक्षण दलाचे युद्धकालीन कार्य मात्र उपविभागीय (सब एरिया) व विभागीय मुख्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रित करण्यात येते. राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठीही असेच एक सुरक्षा दल असते त्याला अंगरक्षक दल म्हणतात. हे घोडदळाचे पथक असून समारंभप्रसंगी त्याचा वापर करण्यात येतो. ह्यालाही आयुधे व सामग्री भूसेनेकडूनच पुरविण्यात येते. भूसेनेतील उच्च पुरस्कार : लढाईत दाखविलेल्या अपूर्व पराक्रमाबद्दल सैन्यात परमवीर चक्र, महावीर चक्र व वीर चक्र हे सन्मान देण्यात येतात. ते नौदल व वायुसेनेतील वीरांनाही मिळू शकतात. देशातील अंतर्गत शांतता प्रस्थापनाच्या कार्यात जे शौर्य दिसून येते त्याप्रीत्यर्थ कीर्तिचक्र व शौर्यचक्र तसेच अशोकचक्र व सेना पदक प्रदान केले जाते. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात परमोच्च शौर्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस १७ भारतीयांना मिळाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परमवीरचक्र प्राप्त केलेल्या वीरांत लेफ्टनन्ट कर्नल सोमनाथ शर्मा, मेजर डी. बी. राणे, नाईक आल्बर्ट इक्का यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष रणांगणाखेरीज इतर क्षेत्रांत सेवा केलेल्या अधिकाऱ्यांना परमविशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा व विशिष्ट सेवा ही पदके देण्यात येतात. [⟶ पदक मानचिन्हे, सैनिकी]. भूसेनेतील सर्वोच दर्जा फील्ड मार्शल माणेकशा यांनी मिळविला. भारतीय सेनेचे पहिले हिंदी कमांडर इन चीफ ⇨ जनरल करिअप्पा हे होते. नंतर ⇨ जनरल राजेंद्रसिंह, ⇨ श्रीनागेश, ⇨ थिमय्या, ⇨ थापर, ⇨ चौधरी , ⇨ कुमारमंगलम्‌ ⇨ माणेकशा, ⇨ बेवूर, ⇨ रैना,मलहोत्रा, कृष्णराव [⟶ राव जन. के. व्ही.] या अधिकाऱ्यांनी चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ हे स्थान भूषविले. ⇨ जनरल अरूण वैद्य (१९८३) सरसेनापती आहेत.

पहा : भारत (संरक्षणव्यवस्था) युद्ध व युद्धप्रक्रिया

  

पित्रे. का. ग.