भूगोल, सैनिकी : भौगोलिक परिस्थिती व सैनिक, सैनिकी उद्दिष्टे आणि कार्य यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करणारी भूगोल शास्त्राची उपशाखा .वेगवेगळ्या सेनाधिकाऱ्यांची, उपस्थिती भौगोलिक परिस्थितीकडे बघण्याची व तिचे वैशिष्ट्ये जाणून घेण्याची दृष्टी समान असत नाही. उदा. भारत–चीन युद्धात (१९६२). कामेंग येथील से ही हिमालयीन खिंड भारताची संरक्षणफळी उभारण्यास अयोग्य होती, असे काहींचे मत होते. नेपोलियन (१८१२–१३) व हिटलर (१९४१–४३) यांच्या रशियाच्या भौगोलिक परिस्थितीबद्दलच्या कल्पना व त्यानुसार ठरविलेले युद्धतंत्र वेगवेगळे होते.
शत्रूचे सैनिकी बळ व त्याची युद्धक्षमता यांचा नाश करणे , हे मूळ कार्य असते. त्यासाठी सैन्याला हालचाल व प्रवास करून शत्रूला भिडणे ,त्याच्यावर शस्त्रास्त्र- मारा करणे व विजय मिळविणे इ.गोष्टी पार पाडाव्या लागतात. अशा सैनिकी कार्यावर भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव कसा आणि का पडतो, याचे स्पष्टीकरण पुढे दिले आहे:(१) दृश्यता : भूभागाची दृश्यता सैनिकी दृष्टीने महत्त्वाची असते. सैन्याची हालचाल, गतिमानता, अस्त्रमारा व दळणवळण यांवर दृश्यमानतेचा प्रभाव असतो. भूपृष्ठ-वैशिष्ट्ये, हवामान (धुके, पाऊस इ.) व मानवनिर्मित वस्तूंमुळे भूभागाच्या दृश्यतेत अडथळे येतात. (२) सुगमता : सैन्याला एका प्रदेशातून दुसऱ्या भूभागाकडे जाण्यासाठी मार्गाची व दिशांची निवड करावी लागते. अंतर, प्रवास वेळ, अडथळे, तळ, वाहनांची उपलब्धता व प्रकार इत्यादींवर सैन्याचे गमनागमन अवलंबून असते. अणुबाँब-चांचणी व प्रक्षेपण यांच्या जागा ओळखणे हेही अत्यावश्यक झाले आहे. (३) गतिशीलता : ऋतूमान, हवामान, आगेकूचीचा वेग व प्रमाण, वाहतूक- साधने व ती निवडण्याचे स्वातंत्र्य,वाहतूक-प्रवाह, वाहतूक-संघटना व बाह्यवस्तूंची विविधता यांवरून गतिशीलता मापता येते. पंजाब व अरूणाचल प्रदेश यांतील गतिशीलता वेगवेगळ्या आहेत. (४) दळणवळण : रेडिओ, रडार इ. इलेक्ट्रॉनिकी साधनांद्वारे सैनिकी आदेश तसेच सांग्रामिक वृत्त व माहिती देणे-घेणे या कार्यावर हवामान, चुंबकीय वादळे व विक्षोभ आयनांवरीय बदल, प्रदेशपृष्ठ, जमिनीचे गुणधर्म इत्यादींचे परिणाम होतात. बिनभरवशाच्या व अनियमित दळणवळाचे दुष्परिणाम राजकीय, तसेच सैनिकी आधिपत्य व नियंत्रणावर होतात. आसाम सारख्या डोंगरी व जंगलमय भागात रेडिओ दळणवळण कार्यक्षम ठेवणे अतिकठीण जाते. (५) प्राप्यता आणि उपलब्धता : इच्छित ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य राशीत सैनिकी, सांग्रामिक साधने, रसद इ. उपलब्ध करून देणे म्हणजे प्राप्यता व उपलब्धता होय. हे गमनागमन व गतिशीलता यांवर अवलंबून असते. प्राप्यता व उपलब्धता असमाधानकारक असल्यास लढाईत पराजय पतकरावा लागतो . १७६१ च्या पानिपतच्या युद्धात अन्न व घास-दाण्याचा तुटवडा पडला. १९६२ च्या भारत-चीन युद्धांतील भारताच्या पराभवाचे एक कारण रसदपुरवठा असमाधानकारक होता, हेच होय. (६) भेद्यता : सैनिकी कामात विघ्ने आणण्याची शत्रूची क्षमता म्हणजे भेद्यता होय. संग्रामक्षमतेच्या दृष्टीने सैन्य व नागरिकांचा योगक्षेम, उत्पादन, सैनिकी व राजकीय संख्या, वाहतूक, दळणवळण इ. गोष्टी अभेद्य राहतील, अशी काळजी घ्यावी लागते. मराठ्यांनी (१६८९–१७०७) व शीखांनी (१६९९–१७६८) मोगली सैन्याचा रसदपुरवठा विस्कळीत करून मोगल आक्रमणाला पायबंद घातला होता. दुसऱ्या महायुद्धात दोस्त सैन्याने जर्मनीचे रूर खोरे जिंकून उत्पादनात व्यत्यय आणला. आधुनिक कालात प्रचार, फितुरी ,घातपात यांचाही या संदर्भात विचार करावा लागतो. (७) आत्मरक्षण : सैनिकांच्या रक्षणाबरोबरच आपल्या स्वनागरिकांचे संरक्षण करणे, त्यांचे मनोधैर्य टिकविणे व वाढविणे तसेच शत्रुजनांचे मनोधैर्य खच्ची करणे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सर्व बाबी परस्परावलंबी असून त्यांच्यावरभौगोलिक परिस्थितीचे बरेवाईट परिणाम घडत असतात.सैनिकी कार्य पार पाडल्यानंतर पुष्कळदा भौगोलिक परिस्थितीत बदल घडू शकतात. नैसर्गिक-भौगोलिक परिस्थितीत विज्ञान व तंत्रविद्येच्या साहाय्याने काही मर्यादेपर्यंत बदल करता येतात. दुर्लध्य प्रदेश पार करण्यास विमाने वापरता येतात तर सुरुंग पेरून सुगम प्रदेशातील सैनिकी हालचालिंत व्यत्यय आणणे शक्य असते.
सैनिकी कार्य ज्या प्रदेशात करावयाचे असते, त्याला अनुरूप ठरेल अशा दृष्टीने शस्त्रास्त्रे ,संघटना, शिक्षण, वाहने, दळणवळणव्यवस्था, वैद्यकीय उपचारपद्धती, रसदपुरवठा, वस्त्रप्रावरणे, खाद्यपेये वगैरेंची निवड करावी लागते. उदा. डोंगराळ प्रदेशात शस्त्रास्त्रे हलकी असावी लागतात व खेचर किंवा विमानाने रसदपुरवठा करणे सोयीचे ठऱते. मरुभूमीत तुटवडा असतो म्हणून नळ टाकून पाणीपुरवठा करावा लागतो. मैदानी प्रदेशात वाहनगामी सैन्य (रणगाडे, स्वयंचलित तोफखाना ) वापरता येतो.
युद्ध (वॉर) व लढाया (बॅट्ल) यांच्या दृष्टीकोनांतून भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. शत्रुराष्ट्र कोणते आहे, युद्ध केव्हा सुरू करावयाचे सैनिक बळ (स्थल, वायु व नौसेना) कोणत्या भूप्रदेशात व कशा प्रकारचे वापरावयाचे, संग्राम कोणत्या क्षणी थांबवावयाचा हे भौगोलिक परिस्थिती व राष्ट्रीय शक्ती आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन ठरवावे लागते.
युद्धसंबंधित भूगोल : प्रत्यक्ष लढाईला तोंड लागण्यापूर्वी युद्धक्षेत्राकडे सैनिक बळ नेऊन त्यांचे वितरण करावे लागते. या कार्यात सामान्यतः युद्धपट (वॉर स्ट्रॅटेजी) असे म्हटले जाते. प्रतिस्पर्धी सेनांची व स्थानांची सापेक्ष भूमिती, सापेक्ष हालचाल, गतिमानता, भेद्यता, गमनागमन, हवामान, अडथळे इ. घटकांचा युद्ध आखताना विचार करावा लागतो. उदा., १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगला देशातील संग्राम पावसाळ्यानंतरच युद्ध करणे क्रमप्राप्त होते. मराठ्यांच्या मोहिमा पावसाळ्यानंतरच सुरू होत. रशियामध्ये भयंकर थंडीमुळे हिवाळ्यात संग्रामात अडथळे निर्माण होतात.
प्रत्यक्ष लढाईच्या दृष्टीने जमिनीवरील, सागरी तसेच हवाई या युद्धप्रकारांच्या दृष्टीने भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. युद्धप्रदेशाच्या तुलनेने लढाईचे रणक्षेत्र संकुचित असते म्हणून भौगोलिक परिस्थितीच्या विश्लेषणाला मर्यादा पडतात तथापि वर वर्णन केलेले गमनागमन दृश्यता, भेद्यता इ. घटक येथेही लागू पडतात.
शत्रुराष्ट्राच्या सेवेचा व संपत्तीचा नाश करणे, शत्रूच्या प्रतिकारशक्तीवर नियंत्रण घालणे, शत्रुभूमी पादाक्रांत करणे व अखेरीस त्याची सत्ता उलथवून टाकून आपला अंमल प्रस्थापित करणे, हे जमिनीवरील युद्धाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने जमिनीचे पृष्ठरूप, हालचालीचे मार्ग व साधने, मोक्याच्या व महत्वाच्या जागा, राखीव फौजांची स्थाने, आघाडीचे विमानतळ, बगला, अडथळे इत्यादींचा विचार करावा लागतो.
रणांगणीय भौगोलिक घटकांचा विचार महत्त्वाचा असतो. जमिनीवरील उंचसखल जागा उदा., टेकड्या, ओढेनाले इ. ताब्यात असल्यास त्या परिसराची दृश्यता वाढते, शस्त्रास्त्रांच्या माऱ्याचा पल्ला वाढतो व सभोवतालच्या क्षेत्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवता येते. टेकड्यांची रांग किंवा नदीनाले यांमुळे आघाडीत तसेच हल्ल्याच्या मार्गात त्रृटी येते. जंगलात व दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात घोडदळ व रणगाड्यांच्या हालचालीवर निर्बंध पडतात. सपाट, सलग क्षेत्रावरील लढायात वाहनगामी सैन्याचा उपयोग लाभदायक ठरतो. अडथळे असल्यास माघार घेणे सुलभ होते. महाराष्ट्राच्या भूगोलाचा परिणाम शिवाजीच्या सेनासंघटनांवर तसेच संग्रामनीतीवर झाल्याचे दिसून येते. मोगलाच्या अवजड व अगतिमान अशा प्रचंड सैन्यबळाला ही भौगोलिक परिस्थिती अनुकूल नव्हती. भूपृष्ठाचे परिणाम ,हल्ला ,प्रतिहल्ला वगैरेवर कसा होतो, हे दुसऱ्या महायुद्धातील उत्तर आफ्रिका, इंफाळ व कोहीमा येथील लढायांवरून लक्षात येते. मानवनिर्मित वस्तूंमुळे नैसर्गिक परिस्थितीत कायमचे किंवा तात्पुरते बदल होतात. इमारती, शहरे, धरणे, कालवे, खंदक, तटबंदी रस्ते व रेल्वे इत्यादीचे परिणाम लढाईवर होतात. विमाने व हेलिकॉप्टर यांच्यामुळे पूर्वी दर्लघ्य असलेले प्रदेश सहज ओलांडता येतात तसेच रसदपुरवठा चालू ठेवता येतो विज्ञानातील शोधांमुळे वातावरणात बदल करून कृत्रिम पाऊस पाडून अगर धरण फोडून प्रदेश जलमय करता येतो.
सागरी पृष्ठ व सागरांतर्गत आणि सागरी क्षेत्राचे हवामान या घटकांचा परिमाण नाविक युद्धावर होतो. खवळलेल्या समुद्रात नौकानयन,रसदपुरवठा, पाणतीर आणि इतर अस्त्रांचा मारा इ. गोष्टी पार पाडणे कष्टप्रद असते. लाटांमुळे जहाजांचा वेग कमी होतो. सुकाणू नियंत्रण अकार्यक्षम बनून आरमारांची पांगापांग होते. काही प्रसंगी प्रचंड लाटांमुळे नौकांचे नुकसाना होते. नाविकांच्या आरोग्यात बिघाड उत्पन्न होतो. विमानवाहक जहाजावरून विमान उडविणे/उतरविणे अशक्य होते. शत्रूच्या किनाऱ्यावर सैन्य-रसद इ. उतरविताना सागरी हवामान तसेच किनाऱ्यावरील भौगोलिक परिस्थिती अनुकूल असावी लागते.
जमीन, सागर व आकाशातील वातावरणीय परिस्थितीचा वायुयुद्धाशी म्हणजे लढाऊ विमानांशी संबंध येतो. वातप्रवाह व दिशा आपल्या विमानतळापासून शत्रुप्रदेश व लक्ष्यांचे अंतर, मार्ग व दिशा, उपलब्ध विमानतळ, लक्ष्याची अचूक ओळख जमिनीवरील वस्तूंच्या स्थानावरून मार्ग, दिशा व लक्ष्य ओळखणे हवामान, रेडिओ-संदेश दळणवळणाच्या दृष्टीने अयनांबरीय व वातावरणीय परिस्थिती असत्रांच्या प्रक्षेपणासाठी पृथ्वीचे परिभ्रमण पृष्ठवक्रता, वातावरणातील घनता, आर्द्रता व तपमान, गुरूत्वाकर्षण, सागरी पाण्याचे प्राचल इत्यादींचे पूर्वज्ञान तसेच विमानांच्या प्रवासकालात घडणारे बदल यांची त्याला पूर्वसूचना मिळणे आवश्यक असते. आतंरखंडीय अणुबाँबयुक्त अस्त्रांच्या प्रक्षेपणासाठी वरील घटकांचे फार महत्त्व आहे.
सैनिकी भूगोल व ग्रंथसंपत्ती : भारतात भूगोल व संग्राम यांच्या अन्योन्य संबंधावर कौटिल्याशिवाय इतर राज्यशास्त्र-प्रणेत्यांनी विचार केलेला आढळत नाही. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात (२.४ ते २२, २.१८.३६, ४७ ते ४९, ७.१ ते १८, ८.१४.७, १४.१५, १७, ९.१०) सैनिकी कार्ये व भूगोल यांच्या संबंधाविषयी विवेचन केलेले आहे. मुस्लीम बखर व तवारिख यांच्या लेखकांनी तत्कालीन भारतीय भौगोलिक परिस्थितीचे वर्णन केलेले आढळते. भारतावरील आक्रमणे व येथे झालेल्या लढायांच्या ऐतिहासिक वर्णनावरून सैनिकी कार्यावर भौगोलिक परिस्थिती कसा परिणाम करते, हे लक्षात येते.
पहा : भूगोल, भूराजनिती.
संदर्भ : 1. Colo David H. Imperial Military Geography : General Characteristics of the Empire in Relation to Defence, London, 1953.
2. Jeffries W. W. Ed. Geography and National Power Annapolis, 1958.
3. Peltier, L. C. Pearey, G. E. Military Geography, New York, 1966.
४. शेजवलकर, त्र्यं. शं. श्रीशिवछत्रपति, मुंबई, १९६४.
दीक्षित, हे. वि.
“