भीम : पांडवांतील दुसरा व कुंतीचा द्वितीय पुत्र. पुराणकथेनुसार पांडूची पत्नी कुंती हिला हा वायुदेवतेपासून झाला होता. म्हणजेच हा पांडूचा क्षेत्रज पुत्र होय. ‘भीम’ या संस्कृत शब्दाचा भीषण असा अर्थ असून भीमाच्या जीवनातील भीषण घटना पाहता त्याचे हे नाव सार्थच ठरते. कुंतीच्या पुत्रांमध्ये तो मधला असल्यामुळे त्याला लक्षणेने ‘मध्यम पांडव’ असेही म्हटले जाई. त्याच्या खादाडपणामुळे त्याला ‘वृकोदर’ (लांडग्यासारखे पोट म्हणजेच लक्ष्यार्थाने भूक असलेला) असे नाव मिळाले होते. त्याला ‘भीमसेन’ ही म्हणत.
त्याचे शारीरिक सामर्थ्य प्रचंड होते तसेच त्याच्या ठिकाणी दुर्दम्य उत्साहशक्ती व युयुत्सू वृत्ती होती. कौरवांना त्याची भीती वाटत असल्यामुळे दुर्योधनाने त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. लहानपणी दुर्योधनाने त्याला विष पाजून पाण्यात टाकल्यानंतर तो नागलोकात पोहचला आणि तेथे वासुकीने दिलेले अमृताचे आठ कुंभ प्याल्यामुळे त्याला हजार हत्तींचे बळ प्राप्त झाले, अशी एक कथा आहे. त्याने बकासुर, हिडिंब, जरासंध, कीचक, जीमूतमल्ल इत्यादींचा वध केला. गीतेतील निर्देशानुसार (१.१०) महाभारतयुद्धात तो पांडवांच्या सैन्याचे रक्षण करीत असल्याचे दुर्योधनाने म्हटले आहे. धृतराष्ट्राचे शंभर पुत्र व इतर अनेक योद्धे त्याने मारले. दुःशासनाची छाती फोडून रक्त पिणे व त्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालणे, दुर्योधनाची मांडी फोडणे इ. कृत्यांवरून जशी त्याची क्रूरता व्यक्त होते, तशीच त्याची प्रतिज्ञापूर्तीची कुवत, इच्छा आणि सूडवृत्तीही स्पष्ट होते. तो अत्यंत तापट होता परंतु प्रसंगी मनाला न पटणाऱ्या धर्माच्या आज्ञांचे त्याने पालन केले. तसेच आपला प्राण धोक्यात घालून त्याने इतर अनेकांचे प्राण वाचविले. तो काहीसा भाबडा, स्पष्टवक्ता व निर्भीड होता.
द्रोण व कृप यांच्याकडून तो शस्त्रास्त्रविद्या शिकला होता. शर्यातीचा वंशज शुक तसेच बलराम यांच्याकडून तो गदायुद्ध शिकला होता. लाक्षागृहातून सुटण्यासाठी ते पेटविणे, सौगंधिक वनातून हजार पाकळ्यांची कमळे द्रौपदीसाठी आणणे, अजगराच्या रूपातील नहुषाकडून गिळले जाणे, अज्ञातवासात बल्लव या उघड व जयेश या गुप्त नावाने विराटाच्या पाकशालेचा प्रमुख बनणे, धर्माच्या राजसूय प्रसंगी पूर्वेकडची राज्ये जिंकणे, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून अश्वत्थामा मेल्याची घोषणा करणे, चित्रसेन गंधर्वाच्या तावडीतून दुर्योधनाला सोडविणे, अश्वत्थाम्याच्या मस्तकातील मणी आणून द्रौपदीला देणे इ. त्याची कृत्ये प्रसिद्ध आहेत. धर्माने त्याला युवराज म्हणून अभिषेक केला होता. एकदा हनुमंताने व एकदा कृष्णाने त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घेऊन त्याच्या गर्वाचे हरण केले होते.
त्याच्या धनुष्याचे नाव वायव्य आणि शंखाचे नाव पौंड्र असे होते. गदा हे त्याचे मुख्य शस्त्र होते. त्याच्या ध्वजावर सिंहाचे चित्र होते. आणि त्याच्या रथाचे घोडे अस्वलांप्रमाणे काळ्या रंगाचे होते.
त्याला एकूण तीन पत्नी होत्या. हिडिंब राक्षसाची बहीण हिडिंबा ही त्याची पहिली पत्नी असून घटोत्कच हा त्या दोघांचा मुलगा होय. भीम व द्रौपदी यांच्या मुलाचे नाव महाभारतानुसार सुतसोम, तर भागवत व मत्स्यपुराण यांच्यानुसार श्रुतसेन असे होते. भीमाने स्वयंवरात जिंकलेली काशिराजाची कन्या जलंधरा वा बलंधरा हिच्यापासून त्याला शर्वत्रात नावाचा पुत्र झाला. भागवतानुसार त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव काली असे असून त्या दोघांच्या पुत्राचे नाव सर्वग वा सर्वगत असे होते.
मृत्युसमयी त्याचे वय १०७ वर्षांचे असावे, असे विद्वानांचे अनुमान आहे. आयुष्याच्या अखेरीस द्रौपदी व आपले भाऊ यांच्यासह मेरू पर्वत चढत असताना इतर सर्वांनंतर परंतु धर्माच्या आधी तो पडला. इतरांना तुच्छ लेखल्यामुळे व खादाडपणामुळे त्याचे पतन झाले, असे धर्माने त्या वेळी त्याला सांगितले. शंकराच्या शापामुळे त्याला वनरसानगरीचा वीरणनामक म्लेंच्छ राजा म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागला, अशी कथा भविष्यपुराणात आढळते. एकदा व्यासांच्या सांगण्यावरून सर्व एकादशींचे पुण्य देणारी निर्जला एकादशी त्याने केली होती, म्हणून ज्येष्ठ शुद्ध एकादशीला ‘भीमजलाकी एकादशी’ व दुसऱ्या दिवसाला ‘पांडवद्वादशी’ असे म्हणतात. तो रात्रीच्या वा हिवाळ्याच्या अंधाराने वेढलेल्या सौर वीराचे प्रतीक आहे, असे दे गूबेरनातीस यांनी आपल्या झूऑलॉजिकल माइथॉलॉजी या ग्रंथात म्हटले आहे.
पहा : कुरुयुद्ध पांडव महाभारत.
साळुंखे, आ. ह.