भित्तिपत्र : (वॉलपेपर). भिंतीची आतील बाजू सुशोभित करणारा एक वेधक कागद-प्रकार. भित्तिपत्र म्हणून कागदाप्रमाणेच लिनन कापड, कृत्रिम तंतूपट, नैसर्गिक तृणपट, प्लॅस्टिक वा लाकडी पातळ तक्ते, काचतंतूंपासून निर्मिलेले कागदीपट यांचाही उपयोग करण्यात येतो. ही भित्तिपत्रे लांबरुंद फलकाच्या व गुंडाळीच्या स्वरूपात उपलब्ध असतात.
भित्तिपत्राची कल्पना ही मूळची चिनी आहे, असे मानतात. ही भित्तिपत्रे भातापासून तयार केलेल्या कागदावर बनविण्यात येत असत व त्यांवर पक्षी, फुले, निसर्गदृश्ये किंवा भौमितिक आकृतिबंध चितारलेले असत. अशी भित्तिपत्रे चीनमध्ये १६०० च्या सुमारास होती. यूरोपात भित्तिपत्राचा प्रसार १६७५ च्या सुमारास झाला. येथे ती ‘वॉल हॅगिंग’ वा ‘पेपर टॅपेस्ट्री’ [⟶ चित्रजवनिका] या नावाने ओळखले जात. पुढे १७०० मध्ये फ्रान्सच्या कारागिरांनी चिनी शैली उचलली व ते आपली भित्तिपत्रे तयार करू लागले. त्यांची ही चायनोसेरी (Chinoiserie) शैलीची भित्तिपत्रे त्या काळी बरीच लोकप्रिय ठरली होती. चीनमध्ये आयात केलेली भित्तिपत्रे मात्र ‘इंडिया पेपर’ या नावाने ओळखली जात. यूरोपातील भित्तिपत्राच्या वापरासंबंधी आणखी एक वेगळा तर्क लढविण्यात येतो. यूरोपात जेव्हा कागद-निर्मितीला प्रारंभ झाला व मुद्रणाचे काम होऊ लागले तेव्हा त्यावेळचे मुद्रक पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने नक्षीचे मुद्रण करून कागदतुकडे सुशोभित करीत. खिळा मुद्रणाप्रमाणेच लाकडी ठशाच्या साह्यानेही हे कागदतुकडे अलंकृत होऊ लागले व त्यांचा वापर पुठ्ठ्याच्या डब्याच्या अस्तरासाठी तसेच खणकपाटांचे वा लाकडी पेट्यांचे सुशोभन वाढविण्याकडे आणि भिंतीवर लावण्याकडेही होऊ लागला त्यातूनच पुढे अद्ययावत स्वरूपाच्या भित्तिपत्राने आकार घेतला.
हे काहीही असेल, तरी प्रारंभ मात्र यूरोपातील लाकडी भिंतीवरील भेगा, चिरा, डाग वा तडा यांसारख्या उणिवा लपविण्यासाठीच भित्तिपत्राचा वापर होऊ लागला होता. त्यातूनच पुढे भित्तिशोभनाच्या दृष्टिकोनाने मूळ धरले. सध्या तर भित्तिपत्राचा मुख्य हेतू सौंदर्यवर्धन हाच दिसतो. त्याच दृष्टीने भित्तिपत्रांची निर्मितीही करण्यात येते. त्यांचे विविध आकारप्रकार, नाना रंग वा त्यांवरील वेगवेगळ्या आकृतिबंध यांचा योजनाविस्तार याच हेतूने केला जातो. विविध प्रकारचे परिणाम साधून घरातील अथवा दालनातील वास्तव्य सुखद व प्रसन्न करण्याचे कार्य भित्तिपत्रांनी साधले जाते. गृहशोभनाचे नाना परिणाम भित्तिपत्रे साधतात. समुद्रकाठचे विस्तृत दृश्य वेधकपणे साकार करणाऱ्या भित्तिपत्रावरील चित्रामुळे, एखादी छोटी खोली किंवा दालनही खुल्या सागरकाठावर बसल्याचा सुखद भास होऊ शकतो. तसेच आकर्षक फर्निचरवस्तू, खिडक्या, काचेची कपाटे इत्यादींची चित्रे रेखलेल्या भित्तिपत्रांमुळे ते ते दालन किंवा खोली खऱ्याखुऱ्या फर्निचरवस्तूंनीच नटल्याचा परिणाम साधला जातो. उभ्या रेषांचे, पट्ट्यांचे किंवा फळ्यांचे चित्रांकन केलेली भित्तिपत्रे एखाद्या बसक्या वा बैठ्या दालनाला भ्रामक पण सुखद उंची प्राप्त करून देतात अथवा आडव्या रेषा, फळ्या वा पट्ट्यांचे भित्तिपत्र अरुंद दालनाला ऐसपैस रुंदी प्राप्त करून देतात. सांप्रत भित्तिपत्रे बनविण्याच्या तऱ्हा व त्यांचे प्रकार अनेक असेल, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(१) दुहेरी थराचे भित्तिपत्र (ड्युप्लेक्स वॉलपेपर) : यामध्ये कागदाचे एकावर एक असे दोन थर असतात. त्यामुळे कागदाची जाडी वाढते. याचा वापर उत्थित शिल्पांकनाकडे विशेषत्वाने होतो. (२) उत्थित शिल्पांकित भित्तिपत्र (एम्बॉस्ड वॉलपेपर) : एकरंगी तसेच रंगीत कागदाचा वापर करून त्यावर उत्थितशिल्पांकित आकृतिबंध उठविलेले असतात. (३) लवयुक्त भित्तिपत्र (फ्लॉक वॉलपेपर) : या प्रकारात कागदाच्या पृष्ठभागावर डिंकसदृश चिकट पदार्थाचे लेपन करून त्यावर मखमल, लोकर, रेशीम, सूत वा रेयॉनसारख्या कृत्रिम धाग्यांच्या बारीक कातरतंतूंची पखरण करण्यात येते. त्यामुळे भित्तिपत्रावर मखमली कापडाचा आभास निर्माण होतो. त्यासाठी विविध रंगांच्या धाग्यांचा वापर करण्यात येतो. (४) तृणपट (ग्रास वॉलपेपर) : हा एक वैशिष्ट्यपूर्ण जपानी प्रकार असून त्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पीतरंगी वनस्पतींच्या सालीची विणलेली जाळीदार चौकट कागदावर बसविलेली असते. अलीकडे उपरोक्त वनस्पतींशिवाय इतरही अनेक वनस्पती वा तृणांचा वापर करण्यात येतो. (५) जपानी काष्ठ भित्तिपत्रे (जपानी वूड वॉलपेपर): ही मूळ जपानी कल्पना असून यात कागदाच्या पृष्ठभागावर अलंकृत व झिलईयुक्त कडक लाकडी चौकट बसविण्यात येते. याला पाश्चात्त्य देशांत विशेष मागणी असते. (६) चर्मसदृश भित्तिपत्र (लेदर इफेक्ट वॉलपेपर): यामध्ये विविध प्रकारच्या कातड्यांचा आभास निर्माण केलेला असतो. (७) संगमरवरी भित्तिपत्र (मार्बल वॉलपेपर): या प्रकारात कागदावर तैलरंगाने मुद्रण करून व नाना प्रकारचे नक्षीकाम उठवून संगमरवराचा परिणाम साधण्यात येतो. (९) धातुसदृश भित्तिपत्र (मेटॅ्लिक इफेक्ट वॉलपेपर) : या प्रकारामध्ये सोने, जस्त वा तत्सम अन्य धातूंच्या भुकटीने मुद्रण करून धातूचा परिणाम साधण्यात येतो. कधीकधी सोनेरी वर्ख वा ॲल्युमिनियम पत्र्यांचाही वापर केला जातो.
वरील प्रकारांखेरीज इतर आणखी काही प्रकार आहेत. त्यांपैकी काहींमध्ये अभ्रकाचे तुकडे, लाकडी भुसा, फळांचा गर, कागदी लगदा, वाखतंतू मिळवून तर काहींवर मेणाचा वा लाखेचा थर देऊन आणि काहींवर जवसतेल (अळशीचे तेल) वा स्पिरिट यांचे विलेपन करून नाना पोतांची, नाना रंगांची, कमीअधिक जाडीची व वेधक परिणाम साधणारी भित्तिपत्रे तयार करण्यात येतात.
भित्तिपत्रांच्या प्रारंभ काळात त्यावर हातानेच छपाई करण्यात येई. कलेच्या दृष्टीने आजही लाकडी ठशाच्या साहाय्याने केलेली हातछपाईची भित्तिपत्रे उत्कृष्टच मानली जातात. यात प्रत्येक रंगच्छटेचे लेपन स्वतंत्ररीत्या व पाठोपाठ केले जाते. त्यामुळे या रंगच्छटा स्वतःचे अस्तित्व पुरेपूर प्रकट करू शकतात याउलट यांत्रिक मुद्रणात एकाच वेळी अनेक रंगच्छटांचे मुद्रण करण्यात येत असल्याने त्या एकमेकांत मिसळून जातात. फ्रान्स व चीनमध्ये रेशमी जाळी मुद्रण (सिल्क स्क्रीन प्रिंटिंग) केलेल्या कलात्मक व ढंगदार भित्तिपत्रांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होई व त्यांचा तोंडवळा भित्तिचित्रांना अधिक जवळचा असे.
अठराव्या शतकातच भित्तिपत्राची मागणी जगातील सर्व देशांमधून होऊ लागली व ती पुरविण्यासाठी भित्तिपत्रांची निर्मितीही झपाट्याने होत गेली. ग्रेट ब्रिटनमध्ये १८४० पासून यंत्राच्या साह्याने भित्तिपत्रे निर्माण होऊन त्यासाठी नवनवीन मुद्रणपद्धतीचा अवलंब होऊ लागला. लांबच लांब कागदावर कापडाप्रमाणे मुद्रण करून ती गुंडाळीच्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागली मात्र तत्पूर्वीच जे. बी. मायकेल पॅपलॉन या कारागिराने एक पुस्तक लिहून भित्तिपत्रांना मानाचे स्थान मिळवून दिले होते. भित्तिपत्रांची निर्मिती अनेक यूरोपीय देशांमधून होत असली, तरी सर्वोत्कृष्ट दर्जा फ्रान्सने गाठला होता.
यंत्रमुद्रित भित्तिपत्रांत दिवसेंदिवस सुधारणा घडून त्यांचे स्वरूप विकसित होत गेले. अमेरिकेत १९४७ मध्ये विनिल (Vinyl) नामक द्रव्याचा वापर करून धुण्यायोग्य भित्तिपत्र बनविले गेले तर १९५० मध्ये भित्तिपत्राच्या मागे चिकट द्रव्याचे विलेपन करून ते भिंतीवर डिंकाशिवायच चिकटविण्याचे तंत्र उपयोगात आले. १९७५ मध्ये पॉलिथिलीनची भित्तिपत्रे बाजारात विक्रिला आली. ही चिकटविण्याआधी भिंतीवर न टपकणाऱ्या चिकट द्रव्याचा लेप देऊन मग त्यावर ती चिकटवावी लागतात.
सध्या भित्तिपत्रांचा वापर जगातील सर्व देशांत होतो. सभागृहे, शैक्षणिक इमारती, उपाहारगृहे, मनोरंजन केंद्रे व खासगी निवासस्थानांत तसेच दिवाणखाना, शयनगृह, अभ्यासिका अशा विभिन्न स्थानांचे महत्त्व व स्वरूप लक्षात घेऊन त्या त्या स्थळांना अनुरूप ठरतील अशा स्वरूपाची वेधक भित्तिपत्रे उपलब्ध असतात. अर्थात भित्तिपत्रांच्या निवडीमागे वैयक्तिक अभिरुचीचा भाग फार मोठा असतो, यात शंकाच नाही. भारतात भित्तिपत्रांचे उत्पादन १९७८ मध्ये सुरू झाले. गृहशोभनात वापरण्यात येणाऱ्या इतर साधनांपेक्षा भित्तिपत्रे स्वस्त पडतात. यातच भित्तिपत्रांची लोकप्रियता सामावलेली आहे.
पहा : गृहशोभन फर्निचर भित्तिचित्रण भित्तिलेपचित्रण भित्तिशोभन रंग.
संदर्भ : 1. Entwisle, E. A., The Book of wallpaper, London, 1954.
2. Ewing, Claude H. Harris, H. A., Practical Instruction for Paper Hanging, Chicago, 1956.
3. HellMan, B. H., Story of Wallpapers, New York, 1957.
4. Stephenson, Lillian and Henry, Interior Design, London, 1964.
5. Wilson, John, Decoration and Furnishing, London, 1960.
जोशी, चंद्रहास
“