बँक्स, सर जोसेफ : (२? फेब्रुवारी १७४३–१९ जून १८२०). ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ व समन्वेषक. स्वतःच्या संशोधनापेक्षा विज्ञानप्रगतीला फार मोठी चालना देणारे अशी त्यांची ख्याती आहे. त्यांचा जन्म लंडन येथे आणि शिक्षण लंडन, हॅरो, ईटन व ऑक्सफर्ड (१७६०–६३) येथे झाले. १७६६ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो व पुढे १७७८ मध्ये तिचे अध्यक्ष झाले. मृत्यूपावेतो म्हणजे ४२ वर्षे ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. एंडेव्हर या जहाजातून त्यांनी कॅप्टन जेम्स कुक यांच्याबरोबर द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, न्यू गिनी व केप ऑफ गुड होप इ. प्रदेशांना भेटी देऊन विपुल वनस्पतिसंग्रह व माहिती जमा केली (१७६८–७१). तत्पूर्वी न्यू फाउंडलंड व लॅब्रॅडॉर (१७६६) व त्यानंतर आइसलँड (१७७२) या प्रदेशांतूनही त्यांनी सफर केली आणि वनस्पती तसेच कीटक जमा केले. त्यांचा महत्त्वाचा वनस्पतिसंग्रह व बहुमोल ग्रंथसंग्रह हल्ली ब्रिटिश म्यूझियमच्या ताब्यात असून त्यावरून त्यांचा कष्टाळूपणा, विद्वत्ता व औदार्य दिसून येते. उपयुक्त वनस्पतींचा शोध व गरजू देशांत त्यांचा प्रसार ते विशेषत्वाने करीत. उदा., ताहितीतून त्यांनी ‘ब्रेडफ्रुट वृक्ष’ (फणसाचा एक प्रकार) आणला. १८०५ मध्ये गव्हावरील तांबेरा व बार्बेरीच्या झुडपावरचा तांबेरा यांची जाती एकच आहे, हे त्यांनी प्रथम दर्शविले [⟶ कवक तांबेरा]. क्यूशाही येथील शास्त्रीय उद्यानाचे संचालक असताना त्यांनी अनेकांना (उद., रॉबर्ट ब्राऊन, डी. सी. सूलांडर व कॅप्टन विल्यम ब्लाय) इतर देशांत वनस्पतिसंकलनार्थ पाठवून नंतर त्यासंबंधीची चर्चा व इतर कित्येक वैज्ञानिक परिसंवाद, सभा इ. कार्यक्रम आपल्या घरी अनेकदा घडवून आणले होते. त्यामुळे ब्रिटनमधील विज्ञानाचा दर्जा तर उंचावलाच शिवाय अनेक विदेशी शास्त्रज्ञांशी स्नेहसंबंध जोडले गेले. ऑस्ट्रेलियातील स्तनी प्राण्यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. ऑर्डर ऑफ द बाथ (१७९५), प्रिव्ही कौन्सिलचे सदस्यत्व (१७९७) इ. बहुमान त्यांना मिळाले होते. त्यांच्या बहुमानार्थ एका वनस्पति-वंशाला बँक्सिया हे नाव देण्यात आले आहे. ते लंडनजवळील आयझलवर्थ येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.
“