बँकॉक : थायलंडची राजधानी. लोकसंख्या ४८,७०,५०९ (१९७८). हे सयामच्या आखातापासून ४० किमी. चाऊ फ्राया नदीच्या पूर्व काठावर वसलेले आहे. नदीचा त्रिभूज प्रदेश व लगतचे सयामचे आखात. यांमुळे बँकॉक हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक उत्तम बंदर ठरले आहे. शहरातील कालव्यांचे जाळे, त्यांतून होणारी जलवाहतूक, तसेच तरती बाजारपेठ यांमुळे बँकॉकला ‘पूर्वेचे व्हेनिस’ म्हणून गौरविले जाते.
थायलंडच्या विद्यमान चक्री राजवंशातील पहिला राम (कार. १७८२-१८०९) याने १७८२ मध्ये हे शहर वसवून तेथे राजधानी केली. शहराची तटबंदी, शाही राजवाडा तसेच वाट पो व वाट फ्राकाएओ ही मंदिरे त्याच्या कारकीर्दीत बांधण्यात आली. वाट फ्राकाएओतील बुद्धाची निळी मूर्ती भारतात बनविली आहे, असे मानतात. या मंदिराच्या भिंतीवर रामायणातील प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. पुढे १८५१ पर्यंतच्या कालखंडात इतर बुद्धमंदिरांबरोबरच उंच मनोऱ्यानसाठी प्रसिद्ध असलेल्या वाट अरूण या मंदिराची उभारणी करण्यात आली. चौथ्या रामच्या कारकीर्दीत (१८५१-६८) बँकॉक परदेशी व्यापारास खुले करण्यात आले. राजा चुलालंगकर्ण किंवा पाचवा राम (कार. १८६८-१९१०) याच्या कारकीर्दीत शहराच्या सार्वत्रिक विकासासाठी योजना तयार करण्यात येऊन रस्ते, पूल, टपाल-तारायंत्र (१८८५), बँकॉक ते अयोध्या या पहिल्या राज्य लोहमार्गाची सुरूवात (१९००) यांसारख्या दळणवळणविषयक सुधारणा करण्यात आल्या. संगमरवरी बुद्धमंदिर, इटालियन वास्तुशैलीतील दरबार वास्तू इ.भव्य रचना याच्या कारकीर्दीतच झाल्या. दुसऱ्या महायुद्धात बाँबहल्ल्यामुळे शहराचे बरेच नुकसान झाले. काही काळ ते जपानच्या अंमलाखाली होते.
थायलंडचे प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र म्हणून बँकॉकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या मोठमोठ्या गिरण्या येथे असून त्यांमध्ये हजारो लोक गुंतलेले आहेत. यांशिवाय साखर, कागद, सिमेंट, साबण, सुती कापड, अन्नप्रक्रिया, तेलशुद्धीकरण, विद्युत्साहित्य, औषधे इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. येथील तेलशुद्धीकरण कारखाना मोठा असून त्याची वार्षिक क्षमता १७ लाख मे. टन आहे. येथून तांदूळ, रबर, सोने, चांदी, कातडी, मासे यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. बँकॉक हे जडजवाहिरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असून चांदीचे व ब्राँझचे दागदागिने तसेच रत्नां च्या व्यापारात हे अग्रेसर आहे. देशातील व परदेशांतील अनेक बँकांची कार्यालये येथे असून औद्योगिक वित्त महामंडळाचे प्रधान कार्यालयही येथेच आहे. संयुक्त राष्ट्रांची ‘इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक’ (एस्कॅप) व ‘साउथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेन’ (सीटो) या संघटनांची प्रधान कार्यालये, तर ‘युनिसेफ,’ ‘यूनेस्को,’ ‘हू’ (जागतिक आरोग्य संघटना) यांची विभागीय कार्यालये या शहरात आहेत.
लिमये, दि. ह. गाडे, ना. स.
“