बहुमूत्रमेह : अती तहान लागणे व पुष्कळ लघवी होणे (दिवसातून ५ लिटरपेक्षा जास्त) ही प्रमुख लक्षणे असलेल्या ⇨ पोष ग्रंथीच्या  पश्च भागातून स्त्रवणाऱ्या प्रतिमूत्रल (मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक म्हणजे लघवीच्या प्रमाणात घट घडवून आणणाऱ्या) हॉर्मोनाच्या [⟶ हॉर्मोने] न्यूनतेमुळे उत्पन्न होणाऱ्या विकृतीला ‘बहुमूत्रमेह’ म्हणतात. पोष ग्रंथी कवटीत मेंदूच्या तळाशी असल्यामुळे तसेच हीच लक्षणे असलेली वृक्कजन्य (मूत्रपिंडजन्य) विकृती निराळी ओळखण्याकरिता या विकृतीला ‘मस्तिष्क बहुमूत्रमेह’ असेही म्हणतात. या विकृतीतील मूत्राचे वि. गु. नेहमीच्या १.०१५ ते १.०२० ऐवजी १.००१ ते १.००५ असते.

संप्राप्ती : रोगकारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते. (अ) प्राथामिक अथवा अज्ञातहेतुक : जवळजवळ पन्नास प्रतिशत रोगी यात मोडतात, म्हणजेच बहुसंख्य रोग्यांमधील रोगकारण अज्ञात असते. (आ) दुय्यम अथवा इतर काही कारणामुळे उद्‌भवणारा : (१) आघातजन्य : प्रसूतीच्या वेळी मेंदूस झालेली इजा, इतर अपघातजन्य मस्तिष्काघात, कवटीच्या तळभागाचा अस्थिभंग आणि कवटीच्या अंतर्गत भागातील शस्त्रक्रिया करताना झालेली इजा. (२) पोष ग्रंथीची अर्बुदे (नवीन पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे उद्‌भवणाऱ्या गाठी), अघोथॅलॅमसातील [⟶ तंत्रिका तंत्र] अर्बुदे, प्रतिक्षेपजन्य पोष ग्रंथीची अर्बुदे, उदा., स्तनकर्क प्रतिक्षेप [⟶ प्रतिक्षेप]. (३) कणार्बुदीय विकार : क्षयरोग, ग्रांथिक रोग, उपदंश (गरमी). (४) शोथप्रधान विकार : दाहयुक्त सूज प्रामुख्याने असलेले व्हायरसजन्य विकार. (५) शीहन लक्षणसमूह (एच्. एल्. शीहन या इंग्लिश विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणारा लक्षणसमूह) अथवा प्रसूतिपश्च पोष ग्रंथी स्त्राव-न्यूनता : प्रसूतीच्या वेळी किंवा नंतर गंभीर रक्तस्त्राव आणि अवसादामुळे (तीव्र प्रकारच्या आघातानंतर आढळून येणाऱ्या सार्वदेहिक प्रतिक्षोभामुळे) पोष ग्रंथीत ऊतक मृत्यू (समान कार्य व रचना असणाऱ्या पेशींच्या समूहाचा मृत्यू) होतो. (६) आनुवंशिक बहुमूत्रमेह : क्वचित आढळणारी ही विकृती कोणत्याही लिंगाच्या मुख्यत्वे करून अर्भकात व लहान मुलात आढळते. एका कुटुंबात ती पिढ्यान् पिढ्या सात पिढ्यांपर्यत आढळून आलेली आहे.

विकृतिविज्ञान : प्रतिमूत्रल हॉर्मोन (याला वाहिनी संकोचक किंवा व्हॅसोप्रेसीन या दुसऱ्या नावानेही ओळखतात) पोष ग्रंथीच्या पश्चखंडातील तंत्रिका कोशिकायुक्त (मज्जा पेशींनी युक्त) भागात साचवले जाते. वृक्कातील मूत्रनलिकांच्या [⟶ मूत्रोत्सर्जक तंत्र] शेवटच्या भागावर परिणाम करून हे हॉर्मोन त्यामधून जाणाऱ्या पाण्याचे पुन्हा अभिशोषण होण्याचे प्रमाण वाढवते. मूत्रनलिकांच्या दूरस्थ संवलित (गुंडाळल्यासारख्या) भागाच्या पारगम्यतेवर हॉर्मोनाच्या न्यूनतेमुळे परिणाम होऊन नेहमीपेक्षा जास्त पाणी मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते. वृक्कजन्य बहुमूत्रमेहात या हॉर्मोनामध्ये दोष नसून मूत्रनलिकांच्या भागांची त्याला प्रतिसाद देण्याची क्षमताच उपजत किंवा उपार्जित कारणामुळे नाहीशी झालेली असते. प्रस्तुत नोंदीत मस्तिष्क बहुमूत्रमेह या विकृतीचीच माहिती दिली आहे.

लक्षणे : कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरूषात उद्‌भवणारी ही विकृती क्वचित आढळणारी आहे. अती तहान व पुष्कळ लघवी ही लक्षणे बहुधा एकाएकी सुरू होतात. तहान हे प्रथम सुरू होणारे लक्षण असून त्यावरील नियंत्रणाचा रोग्याचा प्रयत्न अगदी असह्य असतो. दिवसाकाठी ५ ते १० लि. लघवी होऊ शकते. बहुमूत्रता रात्रंदिवस असल्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. शरीरातील द्रव निघून गेल्यामुळे निर्जलीभवनाचे [⟶ निर्जलीकरण] दुष्परिणाम होतात, वजन घटते व बद्धकोष्ठ होतो.

बहुमूत्रतेस कारण असणाऱ्या इजा किंवा भूल यांमुळे बहुमूत्रतेबरोबरच बेशुद्धी आली असेल, तर रूग्णास पाणी मागणेही शक्य होत नाही व घातक परिस्थिती उद्‌भवते. अशी परिस्थिती बहुतकरून कवटीस मार लागला असता किंवा कवटीच्या अंतर्गत भागातील शस्त्रक्रिया करताना झालेल्या इजेमुळे उद्‌भवते. अशा वेळी मूत्राचे एकूण आकारमान, मूत्र व रक्त यांतील लवणांचे प्रमाण यांच्या मापनाचा काळजीपूर्वक तपशील ठेवून त्यावर मनन केले, तरच घातक निर्जलीभवन टाळता येते.

निदान : रोगनिदानाकरिता काही प्रयोगशालेय परीक्षा व काही सोप्या परीक्षा उपलब्ध आहेत. ⇨मधुमेह, वृक्कजन्य बहुमूत्रमेह, काही चिरकारी (दीर्घकालीन) वृक्कविकृती आणि आग्रही अथितृष्णा या विकृतींत बहुमूत्रता हे लक्षण असते. मधुमेहात मूत्राचे वि. गु. वाढते व त्यात साखर असते. वृक्कजन्य बहुमूत्रमेहात मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोनाचा परिणाम मिळत नाही. मस्तिष्क बहुमूत्रमेहाच्या निदानाकरिता पुढील तीन सोप्या परीक्षा आहेत.

(१) मिठाचे द्रावण पिण्यास देणे : आठ तास अगोदर सर्व पेये वर्ज्य करणे व रोग्यास लघवी करण्यास सांगणे. त्यानंतर रोग्यास १% मिठाचे द्रावण १००० मिलि. प्यावयास देणे व पुढील दोन तास होणारी सर्व लघवी गोळा करणे. प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेत प्यालेल्या द्रावणापैकी फक्त २५% द्रावण मूत्ररूपाने उत्सर्जित होते व रोग असल्यास हे प्रमाण वाढल्याचे आढळते.

(२) मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन परीक्षा (व्हॅसोप्रेसीन परीक्षा) : रोग्यास सायंकाळी सात वाजता तेलमिश्रित पिट्रेसीन टॅनेट ५ एकक मात्रा अंतःस्नायू अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत होणाऱ्या सर्व मूत्राची परीक्षा करतात. प्राकृतिक अवस्थेत वि. गु. १.०२० पेक्षा जास्त वाढते. रोग असल्यास ते १.००१ ते १.००५ पेक्षा अधिक वाढत नाही. तर्षणमापकाने तर्षणता मोजतात [⟶ तर्षण]. निरोगी व्यक्तीत तर्षणता ८०० मिलिऑस्मोल असते, तर रोग्यात हे प्रमाण २०० मिलिऑस्मोलपेक्षा वर जात नाही.


(३) क्लोरोथायाझाइड परीक्षा : रोग्यास २ मिग्रॅ. क्लोरोथायाझाइड (नेफ्रिल) नावाचे औषध तोडांने दिल्यानंतर पुढील चोवीस तास लघवीचे नमुने तपासतात. प्राकृतिक अवस्थेत मूत्राचे आकारमान वाढते. रोग असल्यास मूत्राचे आकारमान घटल्याचे आढळते परंतु वि. गु. आणि तर्षणता यांत कोणताही बदल आढळत नाही. वृक्कजन्य बहुमूत्रमेहात मूत्राचे आकारमान कमी होतेच पण शिवाय वि. गु. वाढल्याचे आढळते.

फलानुमान : (रोगाच्या संभाव्य परिणामासंबंधीचा अंदाज). अज्ञातहेतुक प्रकारात फलानुमान उत्तम असते कारण हॉर्मोनाचा पूरक इलाज गुणकारी अशून दोन ते पाच वर्षांनंतर बंद करता येतो. इतर प्रकारांत फलानुमान मूळ रोगकारणावर अवलंबून असते.

उपचार : विशेष उपचारात तेलमिश्रित व्हॅसोप्रेसीन टॅनेटाची अंतःस्नायू अंतःक्षेपणे, व्हॅसोप्रेसिनाची जलीय द्रावणे अंतःक्षेपणाने देणे, शुष्क पश्च पोष ग्रंथीचे चूर्ण तपकिरीसारखे हुंगावयास देणे इत्यादींचा समावेश होतो. गंभीर रोगात डेस-ॲमिनो डी-आर्जिनीन व्हॅसोप्रेसीन १० ते २० मायक्रोग्रॅम मात्रा नाकातील थेंबांच्या स्वरूपात देतात व त्याचा परिणाम १२ ते २४ तास टिकतो. अलीकडे क्लोरोथायाझाइड, क्लोरप्रोपामाइड, कार्बोमॉइलडायबेंझो-ॲझेपाइन (टेग्रेटॉल) व क्लोफायब्रेट यांसारखी औषधे गुणकारी ठरली आहेत.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : ह्यात लघवीमधून साखर जात नाही. हा विकार उदकमेह समजायला हरकत नाही. ह्यात प्रमेहाची शोधन चिकित्सा करावी. परिजातकाचा काढा द्यावा. सुश्रुतांनी सांगितलेला खदीरकल्प, कडूकवठीचा कल्प द्यावा.

                                                                                                                                                                 पटवर्धन, शुभदा अ.

पशूंतील बहुमूत्रमेह : पाळीव पशूंमध्ये ही विकृती सहसा आढळून येत नाही. तथापि घोड्यामध्ये काही वेळा मूत्राचे प्रमाणाबाहेर उत्सर्जन होते. बुरशी आलेले गवत किंवा धान्य खाण्यात आल्याने अथवा पोष ग्रंथीवर गाठ आल्याने हा विकार होतो. वृक्कीय नलिकांमध्ये बिघाड झाल्यामुळे पाण्याचे पुन्हा अभिशोषण होण्याच्या क्रियेत व्यत्यय आल्याने हे घडते. तसेच पोष ग्रंथीच्या पश्चखंडामध्ये तयार होणाऱ्या व्हॅसोप्रेसीन या हॉर्मोनाच्या अभावामुळेही बहुमूत्रमेह होतो. अशा वेळी घोड्याच्या मूत्राचे वि. गु. १.००२ ते १.००६ इतके कमी होते. दूषित खाद्य देणे बंद केल्यावर हा विकार नाहीसा होतो.

                                                                                                                                                                        दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Datey, K. K. Shah, S. J. Ed., A. P. I. Textbook of Medicine, 1979.             2. Scott, R. B. Ed., Price’s Textbook of the practice of Medicine, oxford. 1978.