बहिणाबाई, संत : (१६२९/३० – २  ऑक्टोबर  १७००).   मराठी संत कवयित्री. तिच्या आत्मकथेवरून तिच्या जीवनाचे काही महत्त्वाचे तपशील मिळतात. वेरूळजवळील देवगाव येथे तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव आऊजी आईचे जानकी. आडनाव कुळकर्णी. बहिणाबाई केवळ तीन वर्षांची असताना तिचा विवाह तीस वर्षे वयाच्या एका बिजवराशी करून देण्यात आला. पाठक हे त्याचे आडनाव. बहिणाबाईला आंरभी तिच्या नवऱ्याकडून जाच होत होता आणि प्रापंचिक सुख तिच्या वाट्याला फारसे आले नाही, असे तिच्या आत्मकथेवरून दिसते. तिच्या विवाहानंतर चार वर्षांनी तिच्या वडिलांवर काही संकट आले. घरदार सोडून परागंदा व्हावे, असा जावयाने सल्ला दिला. तो मानून बहिणाबाईचे आईवडील बहिणाबाई तिचा नवरा असे सर्वजण भ्रमंती करू लागले, पंढरपूर, शिंगणापूर, रहिमतपूर अशा स्थळी वास्तव्य करीत ते कोल्हापुरास आले. तेथे हिरंभट नावाच्या एका ब्राह्मणाने त्यांना आश्रय दिला. कोल्हापुरास असताना जयरामस्वामी (वडगावकर) ह्यांचा सत्संग तिला लाभला. तुकोबांची अभंगवाणी तिने त्यांच्याच तोंडून ऐकली. तुकोबांकडे तिचे मन ओढ घेऊ लागले. अखेरीस कार्तिक वद्य पंचमी, रविवार शके १५६९ (इ. स. १६४७ काहींच्या मते हा शक १५६२ असा असावा.) रोजी बहिणाबाईला स्वप्नात तुकारामांनी दर्शन देऊन गुरूपदेश केला. पतीचा जाचही यथावकाश संपला. पुढे बहिणाबाई पतीसह देहूस आली आणि तेथे तुकोबांचे प्रत्यक्ष दर्शनही तिला घडले. देहू येथे असताना तिला एक मुलगी झाली. तिचे नाव काशीबाई असे ठेविले. बहिणाबाईला विठोबा नावाचा एक मुलगाही होता. त्यानेही काही काव्यरचना केली आहे. बहिणाबाईचा मृत्युदिन त्याच्या एका आरतीत नोंदलेला आढळतो.

 

बहिणाबाई ही वारकरी संप्रदायातली नसून रामदास संप्रदायातली होती, असे एक मत व्यक्त केले जात होते. तथापि ते चुकीचे असल्याचे वा. सी. बेंद्रे, पांगारकर आदी अभ्यासकांनी दाखवून दिलेले आहे. 

 

बहिणाबाईची काव्यरचना सु. सात-साडेसातशे असून ती वि. ना. कोल्हारकर ह्यांनी संत बहिणाबाईचा गाथा ह्या नावाने संकलित केलेली आहे (१९२६). त्याचप्रमाणे जस्टिन इ. अँबटसंपादित महारष्ट्र कविसंतमालेत बहिणाबाईच्या मूळ मराठी गाथ्याबरोबरच त्याचा इंग्रजी अनुवादही दिलेला आहे (महाराष्ट्र कविसंतमाला इंग्रजी भाषांतर नं. ५ – संत बहिणाबाई, १९२९). 

 

बहिणाबाईची काव्यशैली साधी, सरळ परंतु हृदयस्पर्शी अशी आहे. ‘संतकृपा जाली │इमारत फळा आली’ हा तिचा अभंग सुविख्यात आहे. ह्याच अभंगातील ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ आणि ‘तुका जालासे क-ळस’ ह्या तिच्या ओळी चिरस्थायी झालेल्या आहेत. तिच्या आत्म-कथेतून प्रांजळपणा आणि आत्मपरीक्षण ह्यांचा विलोभनीय प्रत्यत येतो.

संदर्भ : १. इर्लेक, सुहासिनी, प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्-मयीनकार्ये, औरंगाबाद, १९८०.

            २. ढेरे, रा. चिं. संतांच्या आत्मकथापुणे, १९६७.

            ३. बेंद्रे, वा. सी. तुकाराममहाराज यांचे संत-सांगाती, मुबंई, १९५८.

सुर्वे. भा. ग.