बहाई धर्म : बहाउल्ला (१८१७-९२) यांनी स्थापना केलेला एक विश्र्वधर्म. इस्लामच्या शिया पंथातून उदयास आलेल्या बाबी पंथाचेच बहाई धर्मात पर्यवसान झालेले आहे.

इराणच्या मिर्झा अली मुहंमद यांनी १८४४ साली आपण ⇨बाब (अदृश्य असलेल्या बाराव्या इमामाचा संदेश लोकांपर्यत पोहोचविण्याचे प्रवेशद्वार) असल्याचे घोषित केले. त्यांच्या पंथाला बाबी पंथ असे नाव प्राप्त झाले. बाब यांनी सुबह-इ-अझळ यांची आपला आध्यात्मिक वारस म्हणून नियुक्ती केली. १८६३ पर्यंत अझल हेच बाबी पंथाचे प्रमुख होते. परंतु अझल यांचे सावत्र बंधू ⇨ वहाउल्ला यांनी आपणच प्रेषित आहोत, असे घोषित केल्यानंतर (१८६३) बाबी पंथात दोन गट पडले. यावेळी अझलना मानणारे मोजके लोक अझली झाले. ते मूळ बाबी पंथाची तत्त्वेच मानत होते परंतु बाबी पंथाच्या बहुसंख्या अनुयायांनी बहाउल्लांचे नेतृत्व मान्य केले. बहाउल्ला यांनी अनेक बाबतींत बाबच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे तत्त्वज्ञान सांगितले असल्यामुळे बहाई हा स्वतंत्र धर्म मानला जाऊ लागला आणि बहाउल्ला हे त्याचे संस्थापक ठरले.

बहाउल्ला यांना पॅलेस्टाइनमधील अक्का येथे हद्दपार करण्यात आले होते. त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यत तेथूनच धर्मप्रचार केला. त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र अब्बास एफेंडी ऊर्फ अब्दुल-बहा (तेजाचा सेवक २३ मे १८४४ — २८ नोव्हेंबर १९२१) याला आपला आध्यात्मिक वारस म्हणून नियुक्त केले. आपल्या उपदेशवचनांचा अर्थ लावण्याचा अधिकारही त्यांना त्याला दिला. अब्दुल-बहांचा भाऊ मिर्झा मुहमंद अली याने भावाला विरोध केला परंतु त्याला फार थोडे अनुयायी मिळाले. अब्दुल-बहा यांनी विविध देशांतून प्रवास करून बहाई धर्माचा प्रचार केला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुलीचा ज्येष्ठ मुलगा शोधी एफोंडी रब्बानी (१८९६ — १९५७) याला आपला वारस बनविले. त्याने स्वतःला ‘ईश्र्वरी कार्याचा संरक्षक’ अशी उपाधी घेतली. शोधी एफेंडीचा मृत्यू झाल्यानंतर (१९५७) वहाई धर्माचे नेतृत्व ‘विश्र्वन्याय-मंदिर’ (यूनिव्हर्सल हाउस ऑफ जस्टिस) या संसदेकडे गेले. विधिविधान, प्रशासन व न्याय या बाबतींतील सर्वोच्च अधिकार असलेली ही संसद विविध राष्ट्रांतील राष्ट्रीय आध्यात्मिक संसदांनी निवडलेली असते. तिचे मुख्य केंद्र इझाएलमधील हायफा येथे असून बाव, बहाउल्ला व अब्दुल-बहा यांची स्मारके त्याच्या जवळपासच आहेत.

बहाई समाजाचे नेतृत्व करणाऱ्या दोन समित्यांपैकी प्रशासकीय समिती ही निवडून आलेली असते आणि सल्लागार समिती ही नियुक्त केलेली असते. प्रशासकीय समिती ही स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील परिषदांनी (‘असेंब्लीज’) बनलेली असते. या परिषदांची निर्मिती निवडणुकांनी होते. तथापि बहाई धर्मात निवडणूक हा केवळ एक उपचार नव्हे, तर ते एक आध्यात्मिक कर्तव्य मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष, उमेदवारी, प्रचार इत्यादींना स्थान नसते. एखाद्या ठिकाणी किमान नऊ बहाई एकत्र आले, की त्यांची स्थानिक परिषद तयार होते. अशा स्थानिक परिषदांमधून विशिष्ट पद्धतीने राष्ट्रीय संसद निवडली जाते आणि राष्ट्रीय परिषदांमधून जागतिक पातळीवरची सर्वोच्च परिषद निवडली जाते. या विविध परिषदांच्या हाती धार्मिक बाबतीतील त्या त्या विभागांचे अधिकार असतात. त्यांच्यातर्फे शिक्षण, भाषांतर इ. प्रकारची कार्येही केली जातात. १९७९ पर्यंत सु. ६८५ भाषांतून बहाई साहित्याचे भाषांतर करण्यात आले होते. ‘ईश्र्वरी कार्याचे हस्त’ ही सल्लागार समिती असून तिचे सभासद नियुक्त असतात. शोधी एफेंडी यांनी त्यांच्या हयातीत नियुक्त केलेले हे हस्त हल्ली ‘विश्र्व-न्याय-मंदिर’ या परिषदेच्या निर्देशानुसार काम करतात. या परिषदेने नियुक्त केलेली ‘काँटिनेंटल कौन्सिलर्स’ ही एक संघटना आहे. तसेच या संघटनेला साहाय्य करणारी नियुक्त अशी साहाय्यक मंडळेही आहेत. वहाईच्या मते समित्यांची ही व्यवस्था ईश्र्वरनिर्मित आहे. ही व्यवस्था फक्त बहाई समाजाच्या आध्यात्मिक नियमनासाठी नाही, तर भविष्यकाळात संभवणाऱ्या आदर्श वैश्र्विक शासनाचा आद्य नमुना आहे.

बहाई धर्मानुसार ईश्र्वराने विश्र्वाची आणि मानवाची निर्मिती केली आहे परंतु या धर्मात असेही मानले आहे, की ‘निर्माता’ हे ईश्र्वराचे वैशिष्टय ईश्र्वराप्रमाणेच शाश्र्वत असल्यामुळे जगदेखील शाश्र्वतच आहे. मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी असून त्याचा आत्मा अमर असतो. ईश्र्वराची पूजा करणे व सतत विकसनशील अशा संस्कृतीला प्रगत करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे. ईश्र्वर हा मानवी ज्ञानकक्षेच्या पलीकडे आहे परंतु लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी प्रेषितांच्या रूपाने त्याचा आविष्कार होतो. बहाई धर्मातील प्रेषितांविषयीचे विचार हे मूळचे बाबनेच मांडलेले आहेत. सर्व प्रेषित वस्तुतः एकच आहेत परंतु एका प्रेषिताचा संदेश कालबाह्य झाला, की नवा काळ, परिस्थिती व संस्कृती यांना योग्य असा संदेश देण्यासाठी नवा प्रेषित अवतरतो. प्रत्येक प्रेषित आपल्यानंतर येणाऱ्या प्रेषिताच्या आगमनाची पूर्वसूचना देत असतो. प्रेषितांची ही परंपरा कधीही खंडित होत नाही. ती सदैव विसनशील असून अनंत काळपर्यंत चालणार आहे.

बहाई धर्मानुसार सर्व धर्म तत्त्वतः एकच आहेत परंतु बहाई धर्म हा वर्तमान काळाच्या दृष्टीने सर्वांत अधिक योग्य आहे. विश्र्वशांती, मानवजातीचे ऐक्य, विज्ञान व धर्म यांच्यातील सुसंवाद, अंधश्रद्धेचा त्याग आणि सत्याचा शोध ही बहाई धर्माची महत्त्वाची उद्दिष्टे होत. राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय, धार्मिक, वांशिक इ. सर्व पूर्वग्रहांना या धर्माचा विरोध आहे. स्त्री-पुरूषांचे समान हक्क, एकपत्नीकत्व, सक्तीचे शिक्षण, पुरोहितसंस्थेचे उच्चाटन, आर्थिक विषमतेचे व गुलामगिरीचे निर्मूलन इत्यादींचा या धर्माने पुरस्कार केला आहे. या धर्मात संन्यासीस भिक्षुक, मठस्वामी इत्यादींना स्थान नाही. या धर्मात घटस्फोटाला मान्यता आहे परंतु लोकांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे. विवाहासाठी आईवडिलांची संमती आवश्यक आहे. या धर्मात सेवाभावाने केलेले कार्य पूजेइतके श्रेष्ठ मानले जाते. एकच भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून निवडावी वा निर्माण करावी, याकायदेशीर शासनाचे आदेश पाळावेत इ. तत्त्वे या धर्मात सांगितली आहेत.


बहाउल्लांच्या तत्त्वांवर श्रद्धा असणाऱ्या कोणालाही बहाई धर्मात  प्रवेश  दिला  जातो.  त्यासाठी  कोणतेही  धार्मिक  विधी  नाहीत. दररोज  सकाळी, दुपारी  व  रात्री  अशी  तीन  वेळा  प्रार्थना  करावी, असा  नियम  आहे.  बहाउल्लांनी  अरबीत  लिहिलेली  प्रार्थना  कोणत्याही भाषेतून म्हटली तरी चालते. प्रार्थनेत कर्मकांडाला महत्त्व नसून श्रद्धेला महत्त्व आहे. प्रार्थना वैयक्तिक व सामुदायिक अशी दोन्ही प्रकारची असते. काही वेळा प्रार्थनेच्या आधी तोंड व हात धुतात. वर्षातील शेवटचा बाबी महिना ( = १९ दिवस) हा उपवासाचा महिना होय. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करावयाचा असतो. प्रत्येक बाबी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दर १९ दिवसांनी बहाई लोक एकत्र जमतात आणि ‘एकोणीस दिवसांचा उत्सव’ साजरा करतात. यावेळी धर्मग्रंथांचे वाचन होते. त्यानंतर प्रशासन, आर्थिक स्थिती इत्यादीसंबंधी अहवाल सादर केला जातो. त्यानंतर एकत्रितपणे  उपाहार  घेतला  जातो.  वर्षाचे  १९  महिने  व  महिन्याचे १९ दिवस ही बाब यांनी प्रचलित केलेली कालगणना बहाई धर्माने स्वीकारलेली आहे. नवे वर्ष २१ मार्चला सुरू होते. बाब व बहाउल्ला  यांचा जन्म, त्यांनी केलेली घोषणा व त्यांचे देहावसान या घटनांचे दिवस साजरे केले जातात. या धर्माने अमली पदार्थांच्या सेवनास मानई केलेली आहे. अब्दुल-बहांच्या एका व्याख्यानातून त्यांनी शाकाहाराचा पुरस्कार केल्याचे दिसते.

बहाई आध्यात्मिक केंद्राच्या दिल्ली येथील संकल्पित वास्तूची प्रतिकृती बहाई धर्माचे प्रतीक
हैफा (इझाएल) येथील भौंट कार्मेलवरील बहाई धर्माचे पवित्र मंदिर

बहाई प्रार्थनामंदिरांना मशरिक-अल्-अधकार असे म्हणतात. ही इमारत गोलाकार असते. या इमारतीचे नऊ दरवाजे हे मानवजातीच्या व जगातील प्रमुख अशा नऊ धर्मांच्या ऐक्याचे प्रतीक होय. सर्व धर्मांचे ऐक्य दर्शविण्यासाठी मंदिराला एकच घुमट असतो. मंदिरात वेदी वा उपासकासाठी स्वतंत्र स्थान नसते.


या मंदिरांतून बहाई व इतर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे वचन चालते. याखेरीज दुसरे कोणतेही  कर्मकांड असत नाही. तेथे पुरोहित नसतात व धर्मोपदेशही केला जात नाही. तेथे सर्व धर्माच्या लोकांना प्रवेश मिळतो आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार केव्हाही व कोणत्याही पद्धतीने प्रार्थना करण्याची परवानगी असते. जागोजागी अशी मंदिरे उभारून त्यांच्या परिसरात शाळा, अनाथालये, वृद्धाश्रम, रूग्णालये इत्यादींची निर्मिती करावी, अशी बहाई लोकांची आकांक्षा आहे. त्यांचे पहिले मंदिर इष्काबाद (रशिया) येथे बांधण्यात आले (१९७२) परंतु ते भूकंपाने उद्-ध्वस्त झाले. सध्या तेथे संग्रहालय आहे. त्यानंतर अलीकडे विलेमिट (इलिनॉइस, अमेरिका), कांपाला (युगांडा), सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि फ्रँकफुर्ट (प. जर्मनी) येथे मंदिरे बांधण्यात आली आहेत. यांखेरीज बाब, बहाउल्ला व अब्दुल०बहा यांच्या कबरी, बगदादजवळची रिजव्हान बाग, बाब यांचे शीराझमधील निवासस्थान इ. ठिकाणे ही बहाई लोकांची पवित्र स्थाने होत.

 

बहाउल्लांचे ग्रंथ बहाई धर्माचे मुख्य धर्मग्रंथ होत. ते अरबी-फार्सी भाषांत आहेत, ते ईश्र्वरी आविष्कार आहेत, असे मानले जाते. अब्दुल-बहा आणि शोधी एफेंडी यांनी बहाउल्लांच्या ग्रंथांवर केलेली भाष्ये व त्यांचे स्वतंत्र ग्रंथ हेही बहाई लोकांचे धर्मग्रंथ होत. बाब, सुबह-इ-अझल, मिर्झा मुहमंद अली इत्यादींचे ग्रंथही त्यांच्या त्यांच्या अनुयायांना धर्मग्रंथ वाटतात.

बहाई धर्मामध्ये एक  महान प्रतीक   मानलेले   असून   त्याला ‘सर्वश्रेष्ठ   नामाचे   प्रतीक’ असे म्हणतात. या प्रतीकामध्ये विशिष्ट आकाराच्या   तीन  आडव्या   रेषा आहेत. त्यांपैकी   वरची    रेषा परमेश्र्वराच्या विश्र्वाची, मधली रेषा अवतारांच्या विश्र्वाची व खालची रेषा मानवाच्या विश्र्वाची द्योतक आहे. मधल्या रेषेच्या आकाराची एक उभी रेषा या तीनही रेषांना विशिष्ट पद्धतीने जोडते. याचा प्रतीकात्मक अर्थ असा, की परमेश्र्वराचे विश्र्व व मानवाचे विश्र्व यांना जोडणे, हे अवतारांचे कार्य आहे. या प्रतीकाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ टोके असलेले दोन तारे आहेत. ते मानवी शरीराचे प्रतीक असून त्यांतील ५ टोके म्हणजे एक डोके, दोन हात व दोन पाय हे अवयव होत.

 

इराणहून आलेल्या जमाल एफेंडी यांनी १८७० साली भारतात बहाई धर्माची सुरूवात केली. सध्या भारतात या धर्माच्या सु. ११ हजार स्थानिक परिषदा आहेत. १९७९ साली या धर्माची जगात १ लाख केंद्रे असून सु. ३ कोटी ५०० अनुयायी आहेत. भारतात सु. १ कोटी आणि महाराष्ट्रात सु. ३० हजार अनुयायी आहेत. प्रत्येक देशातील राजधानीचे शहर हे राष्ट्रीय परिषदेचे ठिकाण असते. १९७९ साली अशा ११३ राष्ट्रीय परिषदा होत्या. महाराष्टात मुंबई, पाचगणी (जि. सातारा), पुणे, सोलापूर, नागपूर, देवळाली (नासिक), कोल्हापूर, सांगली व सातारा येथे प्रमुख केंद्रे आहेत.

संदर्भ :    1. A bdul-Baha Trans, Some Answered Question, London,1961.

             2. Bahaullah, Kitab-i-igan, London, 1950.

             3. Baha-ullah, The Hidden Words, 1970.

             4. Effondi, Shoghi God Passes by, Wilmette, 1944.

             5. Esslemont, J. E. Bahaullah and the New Era, Delhi, 1969.

             6. Muhammad-I-Zarandi Trans. &amp Ed. Effendi, Shoghi, The Dawn-Breakers, 1970.

 

बेही, एच्. साळुंखे, आ. ह.