बस्ति : गुदद्वारातून गुदाशयात विशिष्ट उपकरणाच्या मदतीने औषधे किंवा पोषक पदार्थ द्रवरूपात जेव्हा उपचारार्थ किंवा निदानार्थ सोडले जातात, तेव्हा त्या उपचाराला ‘बस्ती’ म्हणतात. बस्ती या शब्दाचे ओटीपोट व मूत्राशय असेही अर्थ आहेत. प्राण्यांच्या मूत्राशयाला नळी जोडून त्याचा बस्तीच्या उपकरणासारखा उपयोग करीत व त्याला ‘बस्तियंत्र’ म्हणत. बद्धकोष्ठ [→ मलाविरोध] असलेल्या रूग्णाच्या गुदाशयात साचलेल्या कठीण मळाला मऊपणा येऊन त्याचे सहज उत्सर्जन होण्याकरिता सर्वसाधारणपणे बस्तीचा उपयोग करतात. गुदाशय व गुदद्वार यांवरील शस्त्रक्रियेपूर्वी बस्तीचा वापर केला जातो.  

 

प्रकार : बस्तीचे दोन प्रकार ओळखले जातात. (१) मलोत्सर्जक बस्ती व (२) धारणा बस्ती.

मलोत्सर्जक बस्ती : हा बस्ती घेताना रोग्याने डाव्या कुशीवर झोपून गुडघे शक्य तेवढे पोटाकडे मुडपून पडावे. झोपत्याजागी अंथरूणावरच बस्ती घेणे असल्यास कपडे खराब होऊ नयेत म्हणून रबरी किंवा प्लॅस्टिक कापडाचा उपयोग करावा. सर्वसाधारणपणे अर्धा ते एक लिटर कोमट पाण्यात (३८ºसे. तापमान) सु. तीन चहाचे चमचे मीठ घालून प्रौढास बस्तीकरिता वापरतात. द्रावणाचे प्रमाण वयावर अवलंबून असते व ते एक वर्षास ६० मिलि. असते. म्हणजे चार वर्षे वयाच्या मुलास २४० मिलि. बस्ति-द्रावण असलेले भांडे रोग्याच्या गुदद्वारापासून सर्वसाधारणपणे ४५ सेंमी. उंच धरतात. म्हणजे त्यामुळे मंद वेगाने व योग्य त्या दाबाने द्रावण गुदाशयात शिरते. बस्तीच्या  उपकरणाकरिता लागणारे भांडे, नळी वगैरे अगोदर तपासून पहाणे आवश्यक आहे. नळीला प्रवाह कमीजास्त किंवा बंद करता येणारा चाप बसविलेला असावा. गुदाशयात घालावयाचा तोटीचा भाग कठीण असल्यास त्यावर तेल किंवा पेट्रेलियम जेली (व्हॅसलीन) लावून नंतरच हळूहळू जोर न करता वर सरकवावा शक्य असल्यास ही क्रिया रूग्णास स्वतःच करू द्यावी. भांड्यातील द्रावण संपताच तोटी काढून घ्यावी.

बस्ती देण्याची उपकरणे : (अ) ग्लिसरीन पिचकारी (आ) हिगिन्सन पिचकारी.

बस्तीकरिता निरनिराळी द्रावणे वापरतात. १५० मिलि. सरकीचे तेल किंवा डाय-ऑक्टिल सोडियम सल्फो-सक्सिनेट (५ मिलि. १% द्रावण + ९० मिलि. पाणी) अगोदर काही वेळ धारणा बस्तीच्या स्वरूपात देऊन नंतर साध्या किंवा साबणाच्या पाण्याचा बस्ती देऊन कठिण मळ गुदाशयातून काढून घेता येतो.

अर्भकांना बस्ती देण्याकरिता ‘ग्लिसरीन पिचकारी’ नावाचे काचेचे किंवा प्लॅस्टिकचे उपकरण वापरतात व त्यासाठी १५ ते ३० मिलि. ग्लिसरीन पुरते. बस्तीकरिता साध्या नरसाळ्याला रबरी अगर प्लॅस्टिक नळी जोडून उपकरण बनविता येते. याशिवाय ‘हिगिन्सन पिचकारी’ नावाचे (अल्फ्रेड हिगिन्सन या शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे) रबरी उपकरण वापरतात. या उपकरणातील रबरी फुगा हाताने दाबून द्रावण गुदाशयात घालता. येते. एका टोकास झडप असल्यामुळे द्रावण भांड्यात परत येत नाही.

धारणा बस्ती : ज्या बस्तीतील द्रावण काही काळपर्यंत गुदाशयात किंवा त्यावरील मोठ्या आतड्यात राहण्याकरिता आणि तेथून अंशतः किंवा पूर्णपणे अभिशोषण होण्याकरिता देतात, त्या बस्तीला धारणा बस्ती म्हणतात. कधीकधी याला औषधी बस्ती अशीही संज्ञा वापरतात. धारणा बस्तीत अतिमंद प्रवाहाने द्रावण हळूहळू मोठ्या आतड्यात पोहोचवावयाचे असते म्हणून पुष्कळ वेळा तोटीस जोडलेली रबरी सुषिरी (नळी) गुदद्वारातून वर सरकवितात. सर्वसाधारणपणे १५० मिलि. द्रावण घालण्याकरिता दहा मिनिटे लागतात. याकरिता द्रावण असलेले भांडे फार उंच धरता कामा नये. एका वेळी ३०० मिलि. द्रावण वापरतात.


या बस्तीकरिताही निरनिराळ्या प्रकारची द्रावणे वापरतात. पोषक बस्तीमध्ये ६% ग्लुकोजाचे द्रावण १२० मिलि. ते २४० मिलि. दर चार तासांनी देतात. अलीकडे पोषक बस्तीचा वापर कमा झाला आहे, कारण पोषक द्रव्ये अंतर्नीला अंतःक्षेपणाने (शिरेतील इंजेक्शनाने) सुलभपणे व हव्या त्या वेगाने सहज देता येतात. गंभीर अतिसार, आमांश यांसारख्या विकृतीत श्र्लेष्मल (बुळबुळीत) स्टार्चापासून बनविलेले पातळ मऊ द्रावण धारणा बस्तीकरिता वापरतात. या द्रावणात अफूचे टिंक्चर काही ठराविक प्रमाणात घातल्यास वेदना थांबून रोग्यास आराम पडतो. कर्परांतर्गत दाब (कवटी व मेंदू यांच्या मधल्या भागात असलेल्या द्रवामुळे निर्माण होणारा दाब) कमी करावयाचा असल्यास मॅग्नेशियम सल्फेटाचे संपृक्त (विरघळलेल्या पदार्थांचे जास्तीत जास्त प्रमाण असलेले) द्रावण १५० मिली. धारणा बस्तीच्या स्वरूपात वापरतात. मूत्रपिंडाची विकृती असल्यास या द्रावणामुळे मॅग्नेशियमाची विषबाधा होण्याचा धोका असतो.

 

बेरियम सल्फेटाचे द्रावण बस्तीमध्ये मोठ्या आतड्याच्या काही विकृतींच्या निदानाकरिता क्ष-किरण चित्रणात वापरतात.

बस्ती या उपचारामध्ये काही धोके असतात. रूग्णास स्वतः हा उपचार करण्याचे शिकविल्यास सवय लागण्याची शक्यता असते. तो-टी किंवा सुषिरी आत सरकविताना आतड्याच्या अंतःस्तराला इजा हो-ण्याचा धोका असतो. द्रावण आत जात असताना हवा आत शिरू न दे-ण्याची काळजी घ्यावी लागते. परिचारिकेने अगर रूग्णाने वैद्यकीय स-ल्ल्याशिवाय हा उपचार केव्हाही करू नये.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : मानव व चतुष्पाद प्राण्यांच्या शरीरात उत्पन्न होणारे मूत्र ज्या अवयवात संचित होते तो अवयव म्हणजे बस्ती अथवा मूत्राशय. बस्ती या अवयवाचे उपकरण करून त्याच्या साह्याने जो उपचार केला जातो त्याला बस्ती म्हणतात. शेळी, गाय, म्हैस या प्राण्यांचा मूत्राशय घेऊन त्यावर योग्य ते संस्कार करून त्याच्या भोकात योग्य अशी नळी बसवून त्यात औषध घालून ते औषध गुदद्वार, मूत्रद्वार व योनिद्वार यांत बस्तीला जोडलेली नळी घालून, तो दाबून, आतील औषध त्या त्या अवयवात घालतात. ही क्रिया हिच्या अगोदरच्या व नंतरच्या शास्त्रोक्त क्रिया या सर्व क्रियांना मिळून बस्तिविधी म्हणतात.

प्रकार : निरूह किंवा आस्थापन अनुवासन व उत्तर असे मुख्य तीन प्रकार होतात. यांपैकी ‘अनुवासन’ या प्रकारावक स्वतंत्र नोंद असून राहिलेल्या दोव प्रकारांची माहिती खाली दिली आहे.

आस्थापन किंवा निरूह बस्ती : वय, तसेच दोष यांचे स्थापन करणारा.  चटणीमिश्र  औषधी  काढे, तेल, तूप  इ.  स्नेह  घालून गुदावाटे  देणे.  तेड, वेल, गेळफळ  इ. द्रव्ये  यात  असतात.  हा ठराविक  कालपर्यंत  पोटात  ठेवायचा  असतो, अधिक काल ठेवता येत नाही. आपोआप बाहेर आला नाही, तर तो काढण्याकरिता →वर्ती इ. उपचार करावयाचे असतात. हा जेवण झाल्यावर देऊ नये. सर्वांगवात, प्लीहागुल्म, हृद्रोग, मलवातादिसंचय इत्यादींमध्ये उपयुक्त आहे. अतिशय कृश, उरःक्षती, आमातिसारी, श्र्वासी, कासी, कुष्टी, मधुमेही इ. तसेच गुदाला सूज, पोटफुगी, उचकी, बद्धच्छिद्रोदर असताना देऊ नये.

उत्तर बस्ती : उत्तर म्हणजे वरचा किंवा श्रेष्ठ. गुदद्वाराच्या वरच्या द्वारात किंवा निरूह बस्तीनंतर द्यावयाचा किंवा गुणाने श्रेष्ठ बस्ती तो, उत्तर बस्ती होय. हा मूत्रमार्गात व योनीत द्यावयाचा असतो. शेळी, मेंढी, रानडुक्कर इत्यादींचा बस्ती घेऊन त्याला योग्य आकाराची नळी जोडावी व तिला चकती जोडावी म्हणजे उत्तर बस्तियंत्र तयार होते. नळीचा लांबी पुरूषांकरिता १४ व स्त्रियांकरिता १२ अंगुळे असावी. अंगुळे रोग्याची समाजावीत. घेर व जाडी मूत्रमार्गाप्रमाणे असावी. छिद्र मुगाएवढे असावे. सोने, चांदी इ. धातूंची नळी असावी.

 

विधी : विकारनाशक स्नेह देऊन, स्वेद देऊन, तूप घातलेली पेज पाजून हा बस्ती द्यावा. पुरूषाला बसवून व स्त्रीला उताणी निजवून गुडघे उंच ठेवून द्यावा. ऊन तेलाने ओटीपोटाला अभ्यंग करून द्यावा. याच्या  अगोदर  २-३  निरूह  बस्ती  शास्त्रोक्त  विधीप्रमाणे  दिलेले असावेत. पुरूषावा इंद्रिय ताठ असताना प्रथम एक सळई आत घालून काढावी  व  नंतर  इंद्रियाच्या  मागच्या शेवटापर्यंत नळी हात न कापू देता, तुपाने माखून हळूच घालावी व बस्ती दाबून औषध आत सोडावे.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री

संदर्भ : 1. Gravollus, E. M. British Red Cress Society Nursing ManualNo. 2, London, 1951.

             2. St. John Ambulance Association (India). Nursing, New Delhi, 1960.