स्रोतसे : ( आयुर्वेद ). शरीरात मांस, मेद, अस्थी इ. धातू त्वचा, स्नायू इ. उपधातू हृदय, ग्रहणी, बस्ती इ. अवयव चक्षू , रसना इ. इंद्रिये केश, नख इ. मल आणि इतर शारीर घटक त्या त्या स्थानात स्थिर असतात. शरीरातील हे सर्व घटक पोष्य होत. त्यांना परिणत घटक म्हणतात. चलनादी व्यापारांनी क्षणोक्षणी शरीर झिजते. ती झीज भरून काढण्यासाठी बाह्य द्रव्ये सेवन करावी लागतात. त्या द्रव्यांचे पचन होऊन त्यांतील त्या त्या शारीर घटकांचे पोषक अंश इष्ट स्थानात जाऊन पोषण होणे आवश्यक असते. आहारसेवनानंतर सतत पचन होत असणार्‍या म्हणजे परिणाम आपद्यमान अशा ह्या घटक अंशांना पोषक घटक म्हणतात. या पोषक घटकांना त्या स्थिर घटकापर्यंत ज्या मार्गाने नेले जाते त्या मार्गाला स्रोतसे असे म्हणतात. ह्या स्रोतसांवाचून शरीरामध्ये काहीही निर्माण होऊ शकत नाही. सूक्ष्मातला सूक्ष्म असा शारीर घटकही आपले पोषण स्रोतसांतूनच घेतो. स्रोतसांतून वाहणारे धातू , अवयव इत्यादिकांचे पोषक अंश द्रवरूप असतात. ही स्रोतसे सर्व शरीरभर पसरलेली आहेत.

महास्रोतस : अन्नग्रहण, त्याचे पचन, त्यातील सार भागाचे ग्रहण व निरुपयोगी असार मलाचे विसर्जन हे कार्य करणारा मुखापासून गुदापर्यंत जो लवचिक नळ आहे, तोही स्रोतसच आहे. त्यालाच महास्रोतस असे म्हटले आहे.

सूक्ष्म शारीर घटकाला ज्यातून पोषण मिळते, ते सूक्ष्म स्रोतस होय. महास्रोतसाहून लहान, परंतु सूक्ष्माहून मोठी अशी विविध आकारमानांची स्थूल स्रोतसे शरीरात आहेत. शिवाय कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व मन यांच्याही संचारासाठी उपयुक्त अशी अतिसूक्ष्म स्रोतसेही आहेत.

केवळ स्रोतसमूह म्हणजे पुरुष नव्हे. स्रोतसातून वाहून नेले जाणारे परिणाम आपद्यमान व परिणत रसादि धातू पुष्ट होणारे घटक आणि मांस, अस्थी इ. स्रोतसांशी संबद्ध असणारे स्थिर धातुमल ही सर्व स्रोतसांहून भिन्न आहेत आणि म्हणूनच स्रोतसांचा समुदाय म्हणजे पुरुष असे म्हणता येत नाही, तर स्रोतसे आणि वरील सर्व घटक मिळूनच पुरुष-शरीर होते असेच म्हटले पाहिजे.

स्रोतसांचे ज्ञान : स्रोतसे असंख्य आहेत. तथापि, त्यांचे मूलस्थान आणि त्यांच्या प्रकोपाने होणारी विकृती यांस अनुसरून ग्रंथकारांनी काही प्रकार सांगितले आहेत. तथापि, जेथे असे सांगितले नसेल त्या ठिकाणी मूलस्थान आणि विकृती यांवरून तज्ञाला स्रोतसांचे ज्ञान होण्यासारखे आहे.

स्रोतसांचे स्थूल प्रकार : (१) प्राणवह, (२) उदकवह, (३) अन्नवह, (४) रसवह, (५) रक्तवह, (६) मांसवह, (७) मेदोवह, (८) अस्थिवह, (९) मज्जावह, (१०) शुक्रवह, (११) मूत्रवह, (१२) पुरीषवह व (१३) स्वेदवह अशी स्थूलमानाने तेरा स्रोतसे चरकाचार्यांनी सांगितली आहेत.

स्वरूप व दुष्टी : शरीरात धातूंमध्ये असलेली व पोषक धातु-घटकांचे वहन करणारी ही सर्वही स्रोतसे त्या त्या धातूच्या वर्णाची व वाटोळी, स्थूल, सूक्ष्म, लांब, आखूड, वेलीच्या ताण्याच्या आकाराची ( स्प्रिंगसारखी ) असतात. ह्या सर्वही स्रोतसांना त्यांतून वाहणार्‍या धातूंशी भिन्न गुणाचा, परंतु दोषांशी समगुणी असलेला आहार-विहार दुष्ट करतो. उदा., दूध हा रसवर्धक पदार्थ आहे. तसेच कफवर्धकही आहे परंतु हत्तीणीचे दूध प्यायले असता ते मानवी रसधातूशी विगुण व कफाशी समगुणी असल्याने रसवहस्रोतसाची दुष्टी करील.

चरकाचार्यांनी स्रोतसांना शिरा, धमनी, रसायनी, रसवाहिनी, नाडी,पथ, मार्ग, शरीरछिद्र, संवृतासंवृत, स्थान, आशय निकेत अशा पर्यायी शब्दांनी उल्लेखिलेले आहे. शरीरातील धातूंच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म किंवा दृश्य पोकळीलाच हे सर्व पर्याय आहेत.

धातूतील अवकाशात दुष्टी निर्माण होणे म्हणजे त्या त्या अवकाशरूप स्रोतसातून वाहणार्‍या धातुघटक अंशात आणि स्थानस्थ धातूत दुष्टी निर्माण होणे होय. तसेच धातूची दुष्टी ही त्या त्या स्रोतसांचीही दुष्टी असतेच परंतु ह्या सर्वही स्रोतसांना व धातूंना दुष्ट करणारे वात-पित्त-कफ हे त्रिदोषच होत. [ आतुरचिकित्सा आतुर निदान ].

स्रोतसांचे वर्गीकरण : घनद्रव्यवह स्रोतसे : काही प्रकारचे अन्न आणि पुरीष हे स्थूल पदार्थ आहेत. यांचे वहन करणारी अन्नवह आणि पुरीषवह स्रोतसे ही महास्रोतसाचेच ऊर्ध्व व अधः असे दोन भाग आहेत. ते वरील प्रकारच्या घन द्रव्यांचे वहन करतात, म्हणून त्यांना घनद्रव्यवह स्रोतसे म्हणतात.

द्रवद्रव्यवह स्रोतसे : उदकवह, धातुवह, मलवह आणि दोषवह इ. स्रोतसे ही द्रवद्रव्यवह स्रोतसे होत. दोषांचे आणि परिणाम आपद्यमान अशा मांस, अस्थी सदृश घन धातूंचे घटक हे द्रव स्वरूपातच वाहत असतात. त्यांची वाहक अशी ही द्रवद्रव्यवह स्रोतसे मध्यम, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असतात.

वायुद्रव्यवह स्रोतसे : महास्रोतसाची घशापासून फुफ्फुसापर्यंत स्थूल, मध्यम, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशी क्रमाने परस्परांशी संलग्न चार प्रकारची वायुद्रव्यवह स्रोतसे असतात. फुप्फुसापासून हृदय आणि हृदयापासून सर्व शरीरभर वायू विशुद्ध रक्ताबरोबरच वाहत असतो. आहारातून येणारे रुक्ष, लघू इ. वातगुणाचे घटक हेही द्रव स्वरूपातच वाहत असतात.

मर्मसंज्ञक स्रोतसे : म्हणजे मर्माचे पोषण करणारी स्रोतसे. मांसमर्मे, शिरामर्मे इ. घटकांवरून मर्मांचे प्रकार आहेत. मर्मांमध्ये ह्याप्रमाणे असलेल्या मांसादिक घटकांची पोषक द्रव्ये वाहून नेणार्‍या स्रोतसांना मर्मसंज्ञक स्रोतसे म्हणतात.

अतिंद्रिय द्रव्यवह स्रोतसे : नेत्रादि इंद्रियांना गम्य नसणारी, मन, इंद्रिये, पंचेद्रिये-द्रव्य, इंद्रिय प्राण, संज्ञा इत्यादींचे वहन करणारी स्रोतसे संवेदना असणार्‍या प्रत्येक सूक्ष्म अशा शारीर घटकापर्यंत पसरलेली असतात.

सुश्रुतांची निराळी कल्पना : स्रोतसे : सुश्रुताचार्यांनी शिरा व धमनीपेक्षा स्रोतसे वेगळी मानली आहेत. शरीरातील कोणत्या तरी एका पोकळीपासून निघून त्या पोकळीतील द्रव्य घेऊन शरीरात अन्यत्र वाहून नेणारे जे, त्याला स्रोतस म्हणावे. शिरा, धमनी, स्रोतसे ही जरी परस्परांच्या सन्निध असून सारखी कामे करणारी असली, तरी परस्परांपेक्षा स्वरूपाने भिन्न आहेत कार्य एक असले तरी त्यातले वैशिष्ट्य भिन्न आहे. आणखीही काही वैशिष्ट्यांमुळे ते परस्पर भिन्न आहेत. म्हणूनच स्रोतसे ही शिरा व धमनींपासून वेगळी सांगितली आहेत.

शिरा : शरीराकडून हृदयाकडे व तेथून सर्व शरीरभर जे जलरूपी द्रव वहन होत असते ते वाहून नेणार्‍या मार्गांना शिरा असे म्हणतात. पाटाने शेताला पाणी दिले जावे किंवा झाडांच्या पानांत त्यांचे पोषण करणार्‍या शिरा असाव्यात तशा स्वरूपाचे कार्य करणार्‍या ह्या शिरा सर्व शरीरभर आहेत. त्यांचे चार प्रकार आहेत. त्यांतील कफवह शिरांना गौरी, पित्तवह शिरांना नीला, वातवह शिरांना अरुणा व रक्तवह शिरांना रोहिणी असे म्हणतात.

धमनी : सुश्रुतांनी शिरा जशा त्यांच्या वैशिष्ट्याने निराळ्या सांगितल्या त्याप्रमाणेच धमनीही निराळ्या सांगितल्या आहेत. त्या शिरांप्रमाणे द्रवद्रव्य वहन करीत नाहीत परंतु स्वतःच्याच पोषक द्रव्यांच्या संचयासाठी त्यांच्यात पोकळ्या असतात. शिवाय पुरीषवह धमन्या पुरीषासारख्या घन पदार्थाला पुरीषवह स्रोतकांतून वहन करण्याला, तसेच मूत्रवह धमन्या मूत्रवह स्रोतसातून मूत्रासारख्या द्रव पदार्थाच्या वहनास मदत करतात.काही धमन्या शब्दस्पर्शरूपादि अर्थाचे ग्रहण करतात. तसेच काही श्वासोच्छ्वास, अन्न, जल इत्यादींचे त्या त्या स्रोतसांतून वहन करण्यास मदत करतात. बोलणे, ओरडणे, झोपणे, जागे करणे इ. कार्ये करण्याचे वैशिष्ट्ये असणार्‍या वातवाहक धमन्या स्रोतसांपासून वेगळ्या आहेत.

जोशी, वेणीमाधवशास्त्री