बसु, मनोज : (२५ जुलै १९०१-     ).    लोकप्रिय बंगाली कथाकार व कादंबरीकार. जेसोर (यशोहर) जिल्ह्यातील डोंगाघाट येथे जन्म व प्राथमिक शिक्षण. कलकत्त्याच्या रिपन कॉलेजिएट स्कूल मधून १९१९ साली ते मॅट्रिक झाले व साऊथ सबर्बन कॉलेजमधून १९२४ साली बी. ए. झाले. पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यासक्रम सुरू केला पण आर्थिक परिस्थितीमुळे तो अपूर्ण राहिला. प्रथम काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली व पुढे ‘बेंगॉल पल्बिशर्स’ ही प्रकाशनसंस्था काढून लेखन व प्रकाशन व्यवसायात स्वतःस वाहून घेतले. सध्या त्यांचे वास्तव्य कलकत्त्यास असते.

मनोज बसू हे प्रथम कथाकार म्हणून वाचकांसमोर आले. वनमर्मर (१९३२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. याशिवाय दुःखनिशार शेष (१९४४), पृथिवी कादेर (१९४८), खद्योस (१९५०), कुंकूम (१९५३), किंशुक (१९५७), ओनारा (१९६९) इ. त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत. मूलि नाई (१९४३) ही मनोज बसूंची पहिली कादंबरी असून जलजंगल (१९५२), आमार फाशी होलो (१९५८), बन केटे बसत (१९६१), मानुष  गढार  कारीगर  (१९६३), निशिकुंटुब  (१९६३), स्वर्णसज्जा (१९६४), सेतुबंध (१९६७), प्रेमिक (१९७०) इ. त्यांच्या कादंबऱ्या  महत्त्वाच्या  आहेत.  यांशिवाय  प्लायन  (१९४१), नूतन  प्रभात (१९४३), विपर्यय (१९४८), राखीबंधन (१९४९), डाकबंगला (१९६९) इ.  नाटके चीन  देखे  एलाम  (१९५३), सोविएतेर  देशे  देशे (१९५७) हे   प्रवासवर्णनात्मक  ग्रंथ   व   बालवाचकांसाठी  लिहिलेला राजार वडि (१९६७) हा कथासंग्रह इ. उल्लेखनीय ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

 

मनोज बसू हे भारतीय कला व साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून १९५२ साली चीनला व १९५६साली रशियाला जाऊन आले. त्यांच्या चीन देखे एलाम या प्रवासवर्णनाला दिल्ली विद्यापीठाचा नरसिंह दास पुरस्कार १९५० मध्ये कलकत्ता विद्यापीठाचा शरदस्मृति पुरस्कार १९६४ साली मणिलाल पुरस्कार व १९६६ साली निशिकुंटुब कादंबरीसाठी साहित्य अकोदेमीचा पुरस्कार लाभला.

सोपी सहजसुंदर भाषाशैली व मर्मग्राही शब्दचित्रणे ही मनोज बसूंच्या लेखनाची बलस्थाने होत. ताराशंकर बंदोपाध्याय यांनी त्यांची आरोग्यनिकेतन (१९५३) ही कादंबरी मनोज बसूंना अर्पण केली आहे. त्यांच्या निशइकुंटुब कादंबरीचा इंग्रजीत सचिंद्रलाल घोष यांनी आय कम अँज अ थीफ या शीर्षकाने (१९७१) व हिंदीत हंसकुमार तिवारी यांनी रातका मोहमान (१९६७) या शीर्षकाने अनुवाद केलेला आहे. स्वर्णसज्जा या कादंबरीचा इंग्रजीत सचिंद्रलाल घोष यांनी ट्रॅपिंग्ज ऑफ गोल्ड (१९७०) या शीर्षकाने व मराठीत सरोजिनी कमतनूरकर यांनी सौभाग्य (१९७२) या शीर्षकाने अनुवाद केलेला आहे. यांशिवाय इंग्रजीत रूपवती व जलजंगलचेही अनुवाद झाले आहेत. मूलि नाई, आमि सम्राट, मानुष गडार कारीगर, नवीन यात्रा, सेतुबंध, प्रेमिक इ. त्यांच्या कृतींचेही हिंदीत अनुवाद झालेले आहेत.

आलासे, वीणा