बलाक : बलकांचा सिकोनिइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. यांचे ११ वंश असून त्यांत एकदंर १७ जाती आहेत. भारतात यांच्या ६ जाती आढळतात. यांपैकी श्र्वेतबलाक हिवाळी पाहुणा म्हणून भारतात येतो बाकीच्या जाती येथील रहिवासी आहेत.
श्र्वेतबलाक : याचे शास्त्रीय नाव सिकोनिया सिकोनिया असे आहे. हा जवळजवळ गिधाडाएवढा असून त्याची उंची १०७ – १२२ सेंमी. असते. चोच, पंख आणि पाय वगळून बाकीचे शरीर पांढरे पंख काळे चोच मोठी, लांब, अणकुचीदार आणि तांबडी पाय लांब व लाल, नर व मादी दिसायला सारखी असतात.
पाणथळीत वा तिच्या आसपास यांची जोडपी अथवा टोळकी भक्ष्य शोधीत हिंडत असतात. बेडूक, सरडे व मोठे किडे हे यांचे भक्ष्य होय. टोळ व त्यांची अंडी यांचा ते मोठ्या प्रमाणावर फडशा पाडतात. सप्टेंबर महिन्यात ते भारतात येतात आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला परत जातात.
बलाकांची वीण मेपासून जुलैपर्यंत पश्र्चिम आशियात आणि मध्य यूरोपात होते. तो आपले घरटे उंच झाडावर, घराच्या छपरावर, धुराड्यावर किंवा अशाच इतर उंच ठिकाणी बांधतो घरटे काटक्यांचे केलेले असून माचासरखे असते. मादी दर खेपेस ३-५ पांढरी अंडी घालते. घरावर किंवा घराच्या आस-पास श्र्वेतबलाकाने घरटे बांधणे हे कुटुंबात एखादे बालक जन्मणार याचे सूचक होय, असे यूरोपातील लोक समजतात.
पांढऱ्या मानेचा बलाक :याचे शास्त्रीय नाव सि. एपिस्कोपस असे आहे. हा श्र्वेतबलाकापेक्षा लहान असून भारतात सगळीकडे व हिमालयात १,२२० मी. उंचीपर्यत आढळतो. हा भारतात कायम राहणारा आहे. उंची ९०-१०७ सेंमी. मान पांढरी डोके, पाठ, छाती आणि पंख तकतकीत काळे पोट पांढरे चोच लांब, मजबूत व काळी पाय लांब व तांबडे. मासे, बेडूक, सरडे, खेकडे, गोगलगाई आणि मोठे किडे हे यांचे भक्ष्य होय. याच्या सवयी आणि वर्तन श्र्वेतबलाकासारखेच असते. प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो. घरटे पाण्याच्या जवळपास किंवा एखाद्या खेड्याला लागून असलेल्या उंच झाडावर असते. मादी ३-४ पांढरी अंडी घालते.
वरील दोन बलाकांखेरीज काळ्या मानेचा बलाक, क्षत्रबलाक, चित्रबलाक वगैरे बलाकांच्या जाती भारतात आढळतात.
कर्वे, ज. नी.
“