बर्थेलॉट (बेर्तलो), प्येअर यूझेअन मार्सलां : (२५ ऑक्टोबर १८२७-१८ मार्च १९०७). फ्रेंच रयनशास्त्रज्ञ व विज्ञान इतिहासकार. त्यांच्या विचाराचा व कार्याचा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील रसायनशास्त्राच्या विकासावर लक्षणीय प्रभाव पडलेला होता. त्यांनी कार्बनी रसायनशास्त्र व ⇨ऊष्मारसायनशास्त्र या विषयांत विशेष महत्तवाचे कार्य केले. त्यांनी राजकारणातही उच्च स्थाने भूषविली.

बर्थेलॉट यांचा जन्म पॅरिस येथे झाला व तेथेच शिक्षण घेऊन १८४९ मध्ये त्यांनी विज्ञानाची पदवी मिळविली. काही काळ एका खाजगी प्रयोगशाळेत व्यावहारिक रसायनशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर १८५१ मध्ये कॉलेज द फ्रान्समध्ये ए. जे. बालार यांचे साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक धाली. एम्.ई. शव्हरल यांच्या ग्लिसरिनावरील कार्याचा विस्तार करणारे संशोधन करून त्यावर त्यांनी डॉक्टरेटकरिता प्रबंध लिहिला व त्यामुळे त्यांना मोठी कीर्तीही मिळाली. एकोल सुपिरियर द फार्मसी या संस्थेत पुढे शिक्षण घेऊन त्यांनी १८५८ मध्ये औषध-निर्मितिशास्त्राची पदवी मिळविली व पुढील वर्षी त्याच संस्थेत कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८६५ मध्ये कॉलेज द फ्रान्समध्ये त्यांच्याकरिता कार्बनी रसायनशास्त्राचे खास अध्यासन निर्माण करण्यात आले. १८७६ मध्ये उच्च शिक्षणाचे महानिरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली व १८८१ साली संसदेचे आजन्म सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्यावरही त्यांनी शैक्षणिक प्रश्नांबाबत विशेष रस घेतला. १८८६-८७ मध्ये ते फ्रान्सचे शिक्षण मंत्री आणि १८९५-९६ मध्ये परराष्ट्र मंत्री होते.

बर्थेलॉट यांनी १८५०-६० या काळात अल्कोहॉलासंबंधी महत्वाचे संशोधन केले. अल्कोहॉलापासून बेंझीन व फिनॉल, तसेच ॲसिटिक अम्लापासून बेंझीन व नॅप्थॅलीन तयार करता येतात, असे त्यांनी दाखविले. या संदर्भात त्यांनी ‘कार्बनी संयुगे त्यांच्या मूलद्रव्यांपासून संश्लेषित करता येतात’ असा शब्दप्रयोग प्रथम वापरला. १८५३-५४ मध्ये त्यांनी ग्लिसरिनाच्या अनुजातांसंबंधी (एका संयुगापासून तयार केलेल्या अन्य संयुगांसंबंधी) महत्वाये संशोधन केले. या संशोधनावरून त्यांनी कार्बनी रसायनशास्त्रातील ग्लिसरीन हे अकार्बनी रसायनशास्त्रातील फॉस्फोरिक अम्लाशी संगत संयुग आहे, असा निष्कर्ष काढला. तसेच या संदर्भात त्यांनी पॉलिॲटॉमिक अल्कोहॉले [आता ‘पॉलिहायड्रिक’ या नावाने ओळखली जाणारी अल्कोहॉले ⟶ अल्कोहॉल] ही संकल्पना व शब्द प्रचारात आणला.

त्यानंतर त्यांनी शर्करांसंबंधी संशोधन करून कार्बोहायड्रेटांविषयीच्या त्या काळातील उपलब्ध माहितीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी अनेक नवीन शर्करा अलग केल्या. उसाच्या शर्करेच्या किणवनाने (आंबविण्याच्या क्रियेने) मिळणारी पर्यस्त शर्करा ही यीस्टमधील (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीतील) एका एंझाइमामुळे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनामुळे) मिळते असे त्यांनी दाखविले, त्यांनी La chimie organique fondee sur la synthese या १८६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथाच्या पहिल्या खंडात हायड्रोकार्बनांच्या व अल्कोहॉलांच्या संश्लेषणासंबंधी आणि दुसऱ्या खंडात ग्लिसरीन व शर्करा यांसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती दिलेली आहे. कार्बनी रसायनशास्त्रातील संश्लेषणामुळे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ हे प्रयोगशाळेत तयार केलेल्या पदार्थांहून वेगळे आहेत, हा पूर्वीच्या रसायनशास्त्रज्ञांचा दावा बरोबर नसल्याचे त्यांनी निग्रहपूर्वक प्रतिपादन केले. कार्बनी संयुगे व अकार्बनी संयुगे वेगळी असण्यास एक जैव (चैतन्ययुक्त) प्रेरणा कारणीभूत असल्याच्या दृष्टीकोनाचेही त्यांनी खंडन केले.

बर्थेलॉट यांनी १८६० मध्ये कार्बन व हायड्रोजन यांच्या सरळ संयोगाने ॲसिटिलीन हा वायू मिळविला आणि तो त्यांच्या संश्लेषण प्रणालीतील सर्वात महत्वाचा प्रारंभ बिंदू असल्याचे त्यांनी प्रतिपादिले. हा वायू काचेच्या नळीत तापविल्यास (त्याचे बहुवारिकीकरण-दोन अगर साध्या रेणूंच्या संयोगाने जटील रेणूंचे संयुग तयार होण्याची क्रिया-होऊन) बेंझीन व थोडे टोल्यूइन तयार होते, असे त्यांनी दाखविले. ⇨ॲलिफॅटिक संयुगांचे ॲरोमॅटिक संयुगात साध्या रीतीने रूपांतर करता येते हे दर्शविणारे हे पहिले उदाहरण होते.

अल्कोहॉले व अम्ले यांच्यापासून एस्टरे तयार होण्याच्या विक्रियांया बर्थेलॉट व एल्. पी. द सेंट-गाईल्स यांनी केलेल्या अभ्यासाचा सी.एम्.गुलवॅर व पी. व्हाँग यांना वस्तुमान समतोलाचा नियम [⟶समतोल, रासायनिक] मांडण्यास मोठी मदत झाली. कार्बनी संयुगांच्या निर्मितीत व अपघटनात (घटक अलग होण्याच्या क्रियेत) होणाऱ्या उष्णता बदलांसंबंधी विवरण करताना त्यांनी ज्या विक्रियांत उष्णता शोषली जाते त्यांना ‘एंडोथर्मिक’ (ऊष्माग्राही) आणि ज्या विक्रियांत उष्णात बाहेर पडते त्यांना ‘एक्झोथर्मिक’ (ऊष्मादायी) अशा संज्ञा वापरल्या. त्यांनी रासायनिक बदलातील उष्णतेसंबंधी तीन तत्त्वे मांडली. त्यांतील ‘महत्तम कार्याचे तत्त्व’ या नावाने ओळखण्यात येणारे तत्त्व एच्. एल्. एफ्. हेल्महोल्ट्स, जे.डब्ल्यू. गिब्झ व जे .एच्. व्हांट-हॉफ यांच्या संशोधनामुळे नंतर मागे पडेल. त्यांनी ऊष्मारसायनशास्त्रातील प्रयोग तंत्र सुधारण्याचे प्रयत्न केले. पदार्थांचे कॅलरी मूल्य काढण्यासाठी वापरण्यात येणारा बाँब उष्णतामापक [⟶ इंधन] बर्थेलॉट यांनीच प्रचारात आणला.

फ्रँको-प्रशियन युद्धाच्या वेळी (१८७०-७१) पॅरिसच्या संरक्षणासाठी नेमलेल्या वैज्ञानिक समितीचे व पुढे फ्रान्सच्या स्फोटक द्रव्यांसंबंधीच्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी स्फोटक द्रव्यांच्या यंत्रणेचा अभ्यास करून स्फोटक तरंगाची संकल्पना मांडली. १८८३ मध्ये त्यांनी वनस्पती रसायनशास्त्राविषयी संशोधन करणारी एक संस्था मदाँ येथे स्थापन केली. तेथे त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची २५ वर्षे कृषी रसायनशास्त्राविषयी-विशेषतः नायट्रोजनाचे स्थिरीकरण व सूक्ष्मजंतूंचे त्यातील कार्य-यांविषयी संशोधन केले.

बर्थेलॉट यांनी सु. १,६०० ग्रंथ व निबंध प्रसिद्ध केले. त्यांतील कार्बनी रसायनशास्त्रातील संश्लेषण, हायड्रोकार्बने, उष्मारसायनशास्त्र, रासायनिक यामिकी (विक्रियांचे गतिविज्ञान), स्फोटक द्रव्ये इ. विषयांवरील त्यांचे ग्रंथ विख्यात आहेत. त्यांनी ग्रीक, सिरियाक व अरबी ग्रंथावरून भाषांतर करून लिहिलेले रसायनशास्त्र व किमया यांच्या इतिहासावरील ग्रंथ अभिजात समजले जातात. आयुष्याच्या शेवटी त्यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञान, शिक्षण व नीती यांतील संबंधांवर अभ्यासपूर्वक ग्रंथ लिहिले. La Grande Encyclopedie या विश्वकोशातही त्यांनी अनेक लेख लिहिले होते. १८६३ मध्ये ते ॲकॅडेमी ऑफ मेडिसिनचे सदस्य झाले. १८७३ साली ते ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे सदस्य व १८८९ मध्ये लूई पाश्चर यांच्यानंतर कायम सचिव झाले. अनेक परदेशी संस्थांचेही ते सदस्य होते. लिजन ऑफ ऑनरचे शेव्हालिअर (१८६१) व ग्रां-क्रूवा (ग्रँड क्रॉस १९००) हे सन्मान त्यांना मिळाले. ते पॅरिस येथे मृत्यूपावले.

जमदाले, ज. वि. घाटे, रा. वि.