बर्बर : उत्तर आफ्रिकेतील लिबियन जमातींतील बर्बर भाषा बोलणाऱ्या विविध आदिवासी गटांना बर्बर ही संज्ञा देतात. त्यांचे लहान मोठे २९ गट असून गटवार अनेक पोटजातीही आढळतात. बर्बर भाषिकांची लोकसंख्या सु. १ कोटी होती (१९७१). हे लोक प्राचीन काळापासून भूमध्य समुद्र ते सहाराचे वाळवंट (नायजर नदीपर्यंत) आणि ईजिप्त ते अटलांटिक महासागर या प्रदेशांत विखुरलेले आढळतात. आधुनिक काळात त्यांची वस्ती मुख्यतः अल्जीरिया, लिबिया, मोरोक्को या देशांत आणि उत्तर आफ्रिकेच्या दुर्गम पर्वतश्रेणींत व वाळवंटी प्रदेशांतील मरूद्यानांत आढळते.
हॅमिटिक भाषा समूहातील बर्बर भाषा ते बोलतात. तिच्या काही प्रमुख उपभाषा असून तदुत्पन्न अनेक बोलीभाषाही आहेत. त्यांत स्थलपरत्वे काही फरक असले, तरी व्याकरणदृष्टया अनेक बाबतीत साम्य आढळते. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. ईजिप्तमधील थडग्यातील चित्रकलेवरून ते इ. स. पू. २४०० मध्ये पूर्व भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातून उत्तर आफ्रिकेत आले असावेत तर काहींच्या मते हे त्यांचे आप्रवासन इ. स. पू. २००० मध्ये घडले असावे. पुढे ते कानेरी बेटापर्यंत पोहोचले. तेथे स्पॅनिश लोकांनी इ. स. १५०० मध्ये त्यांना जिंकले. हे लोक कॉकेशिअन वंशातील असून दक्षिण यूरोपमधील भूमध्य सागरी हवामानातील लोकांच्या उपसमूहातील गौर वर्ण, काळेभोर केस, तपकिरी डोळे आणि रूबाबदार अंगयष्टी ही शारीरिक वैशिष्टये त्यांत आढळतात. फिनिशियन, ग्रीक, रोमन, व्हँडॉल, अरब, फ्रेंच आणि स्पॅनिश लोकांनी त्यांच्यावर निरनिराळ्या काळांत त्यांच्यावर निरनिराळ्या काळांत आक्रमणे केली तथापि अरबी संस्कृतीची त्यांच्यावर अधिक छाप असून त्यांच्यातील बहुतेकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. बर्बर भाषिकांवर अनेक आक्रमणे होऊनही सांस्कृतिक दृष्टया त्यांची मूळ संस्कृती अनेक बाबतींत टिकून राहिली. कलाकुसरयुक्त रजई व गालिचे, चांदीचे व कोरलचे दागिने आणि सुरेख मृत्पात्रे यांतील त्यांची पारंपरिक कला अजूनही टिकून आहे. या वस्तूंतून विविध प्रकारचे भौमितिक आकृतिबंधही आढळतात.
इ. स. नववे ते अकरावे या काळात बर्बरांनी उत्तर आफ्रिकेच्या मोहिमेत फातिमी खलीफांना सक्रिय मदत केली. नंतरच्या अंदाधुंदीच्या काळात ॲल्मॉरव्हिड्झ (इ. स. अकरावे-बारावे शतक) व ॲल्महॅड्झ (इ. स. तेरावे शतक) या बर्बर वंशांनी मोरोक्को व स्पेन यांवर राज्य केले. अब्दुला इब्न-यासीन हा ॲल्मॉरव्हिड्झ वंशाचा संस्थापक असून त्याने लष्करी बळावर सहारा वाळवंटातील अनेक जमाती एकत्र आणल्या व मोरोक्को पादाक्रांत केला. त्यानंतर ॲल्महॅड्झ वंशातील इब्न-तृमर्त याने १२१० मध्ये ॲटलास पर्वतश्रेणीतील जमातींना एकत्र आणून ॲल्मॉरव्हिड्झ सत्तेवर प्रभुत्व मिळविळे. पुढे मेरेनीड वंशापुढे त्यांची सत्ता टिकली नाही आणि बर्बर लोक अरबांमध्ये मिसळून गेले. मात्र बर्बरांपैकी काहींनी आउरेस, कवलिया, रिफ ॲटलास यांसारख्या दुर्गम पर्वतश्रेणींचा आश्रय घेतला व आपला लढाऊ बाणा आणि परंपरागत संस्तृती यांची जोपासना केली. फ्रेंच व स्पॅनिश वसाहतवादाला सोळाव्या व सतराव्या शतकांत त्यांनी कडवा विरोध केला. फ्रेंचांची अल्जीरियातून १९६२ मध्ये कायमची हकालपट्टी करण्यात बर्बरांचा फार मोठा वाटा आहे.
भटके ट्यूराग वगळता बहुतेक बर्बर शेती व पशुपालन करतात. त्यांची मुख्य पिके बार्ली व गहू असून डोंगराच्या उतारावर ते सोपान पद्धतीची शेती करतात. याशिवाय काही बर्बर लोक खाणींतून मजुरी करतात. अनेक बर्बर स्थानिक उद्योगांकडे वळले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या कापड विणणे, भरतकाम, कुंभारकाम यांसारख्या हस्तकलाही काही बर्बर टोळ्यांतून अजून टिकून आहेत. साधारणतः भटक्या बर्बरांमध्ये तंबूसारखी घरे असतात तर स्थानिक जमातींत दगडांची किंवा कच्च्या विटांची घरे आढळतात. क्वचित लाकडी घरेही आढळतात.
प्राचीन काळी बर्बर लोकांत मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित असावी, असे ग्वांचे जमातीतील काही चालीरीतींवरून दिसते मात्र नंतर पित्तृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ झाली. मुलाकडे वारसाहक्काने संपत्ती येते. मुले व मुली वयात आल्यानंतर त्यांचे विवाह होतात. वधूमूल्य देण्याची प्रथा असून ते जनावरांच्या अथवा रोख रकमेच्या स्वरूपात दिले जाते. सेवा-विवाहाची चाल रूढ आहे. आते-मामे भावंडांतील विवाहास प्राधान्य असून काही पोट जमातींत चुलत बहिणीशीही विवाह होतात. राजघराण्यातील कुटुंबात सख्ख्या बहीण-भावांत विवाह होतात. बर्बर लोक इस्लाम धर्मीय असूनही बहुतेक बर्बरांमध्ये एकविवाहपद्धती रूढ आहे. काही सधन कुटुंबांत व पोटजातींत मात्र बहुपत्नीत्वाची चाल आढळते. बहुतेक बर्बरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती आढळते. पुरूषाला कोणत्याही सबबीबर पत्नीकडून घटस्फोट घेता येतो. वांझ स्त्रीचा त्याग करण्याची रूढीही आढळते.
बर्बरांचे प्रत्येक खेडे हा एक स्वतंत्र घटक आहे. गावाचा कारभार जेम्मा नावाचे प्रौड लोकांचे मंडळ पाहते. त्या मंडळाच्या अध्यक्षास मुकाद्दम म्हणतात. युद्धकाळात अमघर नावाचा एक स्वतंत्र अधिकारी नेमतात. शरीयतप्रमाणे कारभार चालतो. दोन किंवा अधिक गावांचे संघ बनतात. हे संघ एकत्र झाल्यावर त्यास थकेलविट म्हणतात.
बर्बरांच्या काही पोटजातींतून जडप्राणवाद व पिशाच्चा पूजाही रूढ आहे. मोरोक्कोतील काही बर्बर ज्यू धर्मीय आहेत.
संदर्भ : 1. Murdock, G. P. Africa : Its Peoples and Their Culture History, New York, 1959.
2. Watesbury, John, North For the Trade : The Life & Times, California, 1972.
मांडके, म. वा.
“