बर्क्ली, जॉर्ज : (१२ मार्च १६८५-१४ जानेवारी १७५३). प्रसिद्ध आयरिश चिद्वादी तत्तवेत्ता. ब्रिटीश अनुभववादी परंपरेच्या मूलभूत तत्त्वांचा विकास आणि मांडणी ⇨जॉन लॉक (१६३२-१७१४), जॉर्ज बर्क्ली आणि ⇨ डेव्हिड ह्यूम (१७११-७६) ह्या त्रिमूर्तिने केली, असे सर्वसामान्यपणे मानण्यात येते आणि ते योग्य आहे.

जॉर्ज बर्क्ली

जीवन : आयर्लंडमधील किल्केनी या गावी बर्क्लीचा जन्म झाला. त्याचे पूर्वज इंग्लिश होते. डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याने १७०० मध्ये प्रवेश घेऊन १७०४ मध्ये पदवी घेतली. १७०७ मध्ये तो ट्रिनिटीचा ‘फेलो’ झाला. १७१३ मध्ये बर्क्ली लंडनला गेला आणि तेथे त्याचा ॲडिसन, स्विफ्ट, पोप, स्टील इ. त्या वेळेच्या प्रसिद्ध साहित्यिकांशी परिचय झाला. स्टीलने चालविलेल्या गार्डियन ह्या नियतकालिकात त्याचे काही लेखही प्रसिद्ध झाले. १७१३-१४ मध्ये त्याने यूरोपचा प्रवास केला. ह्या प्रवासात त्याने मालब्रांश ह्या देकार्तचा अनुयायी असलेल्या तत्त्ववेत्त्याची गाठ घेऊन त्याच्याशी तत्त्वज्ञानातील काही समस्यांवर चर्चा केली असा तर्क आहे. १७१६-२० मध्ये त्याने परत यूरोपचा प्रवास केला. १७२४ मध्ये त्याची डेरीचा डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ह्या सुमाराला बर्म्यूडा येथे एक महाविद्यालाय काढावे आणि अमेरिकेत वसाहत केलेल्या गोऱ्या लोकांच्या मुलांना तसेच रेड इंडियन आणि निग्रो मुलांना व्यवस्थितपणे शिक्षण देऊन, ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून काम करण्यासाठी त्यांची तयारी करून घ्यावी, अशी योजना त्याने हाती घेतली. ह्या महाविद्यालयास आर्थिक अनुदान देण्याला ब्रिटिश संसदेने संमती दिली होती. त्याप्रमाणे बर्क्ली १७२८ मध्ये ऱ्होड आयर्लँड येथे गेला. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या अन्नपुरवठ्याची तजवीज करण्यासाठी तेथे शेती सुरू करण्याची त्याची योजना होती. यासाठी न्यूपोर्ट येथे बर्क्लीने वास्तव्य केले. पण सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे जे अनुदान मिळायचे होते ते मिळणार नाही, हे उघड झाल्यानंतर १७३१ मध्ये बर्क्ली स्वदेशी परतला.

बर्क्लीला १७३४ मध्ये आयर्लंडमधील क्लॉइनेचा बिशप नेमण्यात आले. हा आयर्लंडचा दुर्गन आणि अविकसित भाग होता. आपल्या अधिकारक्षेत्रातील लोकांची आर्थिक दुःस्थिती कशी दूर करता येईल, याविषयी विचार करून त्याने एक योजना पुढे मांडली. सार्वजनिक कामे सुरू करून लोकांचे उत्पन्न वाढवावे आणि शिक्षणाचा प्रसार करून रोजगार करण्याची त्यांची क्षमता वाढवावी, असे या योजनेचे साध्य होते. लोकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे त्यांच्या आरोग्याविषयीही बर्क्लीला आस्था होती. बिशप म्हणून त्याने मन लावून आणि आपली शक्ती वेचून चांगले काम केले. ऑक्सफर्ड येथे त्याचे एकाएकी निधन झाले.

ग्रंथरचना : बर्क्लीचा पहिला मह्त्वाचा ग्रंथ ॲन एसे टोवर्ड्‌स अ न्यू थिअरी ऑफ व्हिजन (म. शी. दर्शनाविषयीची एक नवीन उपपत्ती मांडू पाहणारा निबंध) हा होय. हा १७०९ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढच्या वर्षी अ ट्रीटीज कन्सर्निंग द प्रिन्सिपल्स ऑफ ह्यूमन नॉलेज पार्ट-१ (मानवी ज्ञानाच्या तत्त्वांविषयीचा प्रबंध भाग -१) हा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला. ह्याचा दुसरा भाग बर्क्लीने कधीच प्रसिद्ध केला नाही. यूरोपमध्ये दुसऱ्या वेळी प्रवास करीत असताना ह्या दुसऱ्या भागाचे हस्तलिखित गहाळ झाले व बर्क्लीने ते परत लिहून काढले नाही. पण प्रिन्सिपल्समधील सिद्धांतांची अधिक सुगम रीतीने मांडणी करणारे थ्री डायलॉग्ज बिट्‌वीन हिलास अँड फिलोनस (हिलास आणि फिलोनस यांच्यामधील तीन संवाद) हे पुस्तक त्याने १७१३ मध्ये प्रसिद्ध केले. १७२१ मध्ये लॅटिन भाषेत लिहिलेले डि मोटु (गती) हे पुस्तक त्याने प्रसिद्ध केले. ह्यात न्यूटनने प्रतिपादन केलेल्या निसर्गस्वरूपाच्या संकल्पनेवर आणि त्याचप्रमाणे ⇨जी. डब्ल्यू. लायप्निट्स (१६४६-१७१६) याने प्रतिपादन केलेल्या शक्तीच्या संकल्पनेवर त्याने टीका केली आहे. त्यानंतरचे त्याचे पुस्तक म्हणजे ॲल्सिफ्रॉन ऑर मायन्यूट फिलॉसॉफर हे होय. हे त्याने न्यूपोर्ट येथे राहत असताना लिहिले आणि १७३२ मध्ये प्रसिद्ध केले. हे पुस्तक म्हणजे संवादांची एक मालिका आहे आणि त्यात बर्क्लीने ख्रिस्ती धार्मिक सिद्धांतांना विरोध करणाऱ्या पाखंडी तत्त्ववेत्त्यांवर टीका केली आहे. १७३४ मध्ये बर्क्लीने द ॲनलिस्ट (विश्लेषक) आणि १७३५ मध्ये अ डिफेन्स ऑफ फ्री थिंकिंग इन मॅथेमॅटिक्स (गणितातील पाखंडी विचारांचे समर्थन) ही पुस्तके प्रसिद्ध केली. भैतिकीमध्ये त्या काळी वापरण्यात येणारे जे ‘कॅल्क्युलस’ होते त्याच्या मूलभूत संकल्पना आत्मविसंगत होत्या आणि इतर रीतींनीही सदोष होत्या, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात करण्यात आला आहे.बर्क्लीचे शेवटचे पुस्तक सिरिस हे होय. ह्याचे स्वरूप काहीसे विचित्र आहे. त्याच्यात डांबराच्या पाण्याच्या (टार वॉटर) औषधी गुणांचे विवेचन आहे. अनेक आजारांवर हे डांबराचे पाणी उपयुक्त ठरते असा बर्क्लीचा विश्वास होता. पण ह्याबरोबरच तत्त्वज्ञानातील महत्वाच्या प्रश्नांचा ऊहापोहही ह्या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेषतः भौतिक घटनांचे कारण ह्या घटनांमध्ये असू शकणार नाही. ते ईश्वरी चैतन्यात शोधले पाहिजे, हा सिद्धांत त्यात मांडण्यात आला आहे. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १७४४ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या आवृत्तीत पुस्तकाचे नाव अ चेन ऑफ फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन्स अँड इन्क्वायरीज कन्सर्निंग द व्हर्च्यूज ऑफ टार-वॉटर अँड डायव्हर्स अदर सब्जेक्ट्स कनेक्टेड टुगेदर अँड अराइझिंग फ्रॉम वन-अनदर असे होते. ह्याचा अर्थ असा : ‘तात्त्विक चिंतनशृंखला आणि डांबरा-पाण्याच्या औषधी गुणांविषयीचे व परस्परांशी संबंधित असलेल्या आणि परस्परांपासून उद्‌भवणाऱ्या विविध विषयांचे अन्वेषण.’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुढील वर्षीच निघाली व तिच्यात त्याचे नाव सिरीस असे ठेवण्यात आले.


ह्याशिवाय १७०७-८ मध्ये बर्क्लीने लिहिलेल्या तत्त्वज्ञानात्मक प्रश्नांवरील टीपा ए. सी. फ्रेझर यांनी १८७१ मध्ये कॉमनप्लेस बुक ऑफ ऑकेजनल मेटॅफिझिकल थॉट्स (प्रासंगिक तत्त्वमीमांसक विचारांची टिपण वही) ह्या नावाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांच्यावरून ॲन एसे टोवर्ड्‌स अ न्यू थिअरी ऑफ व्हिजन हे आपले पहिले पुस्तक लिहिण्यापूर्वीच जड वस्तू असे काही असू शकत नाही, ह्या भूमिकेला बर्क्ली आला होता, असे दिसून येते.

जर जडद्रव्य किंवा भौतिक वस्तू असे काही असत नाही तर जड-द्रव्य, त्याचे गुणधर्म किंवा त्याचे कार्यकारणनियम हा भौतिकीसारख्या विज्ञानांचा विषय असू शकणार नाही मग त्यांचा विषय काय असू शकेल ? बर्क्लीचे म्हणणे असे आहे. की जे इंद्रियगम्य गुण आपल्याला साक्षात प्रतीत होतात ते नियमाने एकत्र वसणारे असे आपल्याला प्रतीत होतात किंवा नियमबद्ध क्रमाने आपल्याला प्रतीत होतात. तेव्हा इंद्रियगम्य गुणांच्या सहास्तित्वाचे किंवा क्रमाचे नियम शोधून काढणे, हे निसर्गविज्ञानांचे उद्दिष्ट असते. एका विशिष्ट इंद्रियगम्य गुणानंतर दुसरा विशिष्ट गुण जेव्हा आपल्याला  नियमाने प्रतीत होतो, तेव्हा पहिला गुण दुसऱ्या गुणाचे कारण नसते किंवा त्या दोहोंत आंतरिक किंवा अनिवार्य असा संबंध नसतो. त्यांच्यातील संबंध केवळ यादृच्छिक असतो. तो ईश्वराने जोडून दिलेला असतो म्हणून असतो. एक गुण दुसऱ्या गुणाची केवळ खूण असते. बर्क्लीचे म्हणणे असे आहे, की ह्या इंद्रियगम्य गुणांच्या द्वारा ईश्वर आपल्याशी बोलत असतो. ही ईश्वरी भाषा आहे. ज्याप्रमाणे एक इंद्रियगम्य गुण ही दुसऱ्या गुणाची खूण असते, त्याप्रमाणे त्यांची जी सबंध, नियमबद्ध अशी रचना आहे ती ईश्वरी प्रयोजनाची खूण आहे तिच्या द्वारा ईश्वराच्या प्रयोजनांचे आपल्याला आकलन होते.

दर्शनाविषयीची एक नवी उपपत्ती : आपल्या पहिल्या ग्रंथामध्ये बर्क्लीने आपला अजडवादाचा सिद्धांत मांडलेला नाही तथापि ज्या युक्तिवादांवर हा सिद्धांत आधारला आहे, त्यांतील कित्येकांचा उपयोग ह्या ग्रंथामध्ये मांडलेल्या मुख्य मताचे समर्थन करण्यासाठी बर्क्लीने केला आहे. हे मत असे, की ज्या वस्तू आपण पहातो, त्यांचे आपल्या पासून जे अंतर असते, त्याचे आपल्याला साक्षात दर्शन होत नाही. हे दर्शन आपण प्रत्यक्ष पहात नाही. पण वस्तू पहाण्यासाठी आपल्या डोळ्यांना कराव्या लागणाऱ्या हालचालींमुळे आपल्याला जी वेदने लाभतात त्यांच्यामुळे आणि दृश्य वेदने आणि स्पर्शवेदने यांच्यामध्ये असलेल्या साहचर्यामुळे हे अंतर सूचित होते. आपण पहातो ती वस्तू आणि आपण यांच्यामधील अंतर म्हणजे ती वस्तू आणि आपला डोळा यांना जोडणारी रेषा असते पण ही रेषा आपल्याला दिसू शकत नाही कारण तिची दोन्ही टोके आपल्याला दिसू शकत नाहीत फक्त एकच टोक दिसते. म्हणजे अंतर आपल्याला साक्षात दिसू शकत नाही. हा युक्तिवाद स्वीकारला तर असा निष्कर्ष निघतो, की आपल्याला दिसणाऱ्या वस्तू आपल्यापासून कमीअधीक अंतरावर असलेल्या दिसत नाहीत. सर्व वस्तू एका द्विमितीय पडद्यावर रंगविल्याप्रमाणे एकमेकींच्या बाजूला किंवा वर-खाली असल्यासारख्या दिसतात. पण त्या जशा दिसतात, म्हणजे त्यांच्या संबंधातील जी दृश्य वेदने असतात त्यांच्याकडून त्यांची आपल्यापासून अंतरे सूचित होतात. एखाद्या वस्तूचा आकार आणि आकारमान आपण स्पर्शाने, तिच्यावरून हात फिरवून ग्रहण करतो. त्याच वेळी तिचा द्दश्य आकार व आकारमान आपण ग्रहण करीत असतो. त्या वस्तूपासून आपण क्रमाने दूर गेलो, की तिचा साक्षात दिसणारा आकार आणि आकारमान यांच्यात बदल होत जातो. अशा रीतीने वेगवेगळ्या अंतरावरून साक्षात दिसणारे वस्तूचे आकार, आकारमान, तिचे स्पष्टपणे किंवा अंधुकपणे दिसणे इ. अनुभव आणि ती वेगवेगळी अंतरे यांच्यात साहचर्य प्रस्थापित होते आणि ह्याच्या बळावर एखाद्या वस्तूकडून लाभणाऱ्या दृश्य वेदनांपासून ती वस्तू किती अंतरावर आहे, हे ज्ञान आपल्याला प्राप्त होते.

बर्क्लीच्या ह्या यक्तिवादाला आधारभूत असलेला सिद्धांत असा, की दृश्य आकार व आकारमान, जो आकार आणि आकारमान आपण पहातो त्या गोष्टी आणि स्पर्श आकार व आकारमान, जो आकार आणि आकारमान आपल्या स्पर्शाला जाणवतात त्या गोष्टी ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. तोच आकार आपण पाहू शकतो आणि त्याला स्पर्शही करू शकतो असे असणे अशक्य आहे. जी गोष्ट आपण पहातो तिला आपण स्पर्श करू शकत नाही आणि जिला आपण स्पर्श करू शकतो ती आपण पाहू शकत नाही. पण दृश्य आकार आणि इतर दृश्य वेदने ही स्पर्श आकाराच्या आणि इतर स्पर्श्य वेदनांच्या खुणा होऊ शकतात आणि ह्या संबंधाच्या जोरावर दृश्य वेदने अंतर सूचित करू शकतात.

बर्क्लीचा चिद्वाद किंवा अजडवाद : बर्क्लीची ही उपपत्ती समजण्यासाठी जडद्रव्याच्या ज्या संकल्पनेच्या विरोधात त्याने ती प्रस्थापित केली आहे, तिची माहिती करून घेणे आवश्यक आहे. जडद्रव्याची ही संकल्पना गॅलिलीओ (१५६४-१६४२), बॉइल (१६२७-९१), न्यूटन इ. वैज्ञानिकांनी विकसित केली होती आणि जॉन लॉक ह्या तत्त्ववेत्याने तिची तात्त्विक मांडणी केली होती. ही संकल्पना अशी, की जडद्रव्य-जडवस्तू-ह्या ‘बाह्य’ वस्तू असतात, त्यांचे अस्तित्व मनाबाहेर आणि स्वतंत्र असते. अवकाश आणि काल यांची मिळून एक चौकट सिद्ध झालेली आहे आणि कोण्त्याही जडवस्तूला ह्या चौकटीत अनिवार्यपणे स्थान असते. ह्या चौकटीत जडवस्तू भ्रमण करू शकतात. म्हणजे त्या एका स्थानापासून दुसऱ्या स्थानी जातात. ही त्यांची गती. अवकाश आणि काल यांच्यामुळेच गती शक्य होते. अवकाशातील स्थान, आकार, आकारमान, भार किंवा वजन हे धर्म वस्तूच्या ठिकाणी असतात. गणिताच्या परिभाषेत मांडता येतील, म्हणजे मापता येतील असे हे धर्म आहेत. उलट रंग, स्वाद, ध्वनी, गंध इ. धर्म हे जडवस्तूच्या स्वतःच्या ठिकाणी नसतात. जे धर्म स्वतः जडवस्तूच्या ठिकाणी असतात त्यांना प्राथमिक गुण म्हणण्यात येत असे. कित्येक प्राथमिक गुण असे असतात, की ते योग्य ती ज्ञानेंद्रिये असलेल्या प्राण्यांना रंग, ध्वनी इत्यांदींचे अनुभव प्राप्त करून देतात. ह्या प्रकाराच्या प्राथमिक गुणांना दुय्यम गुण म्हणण्यात येत असे.


 लॉकच्या मताप्रमाणे मनोबाह्य असलेल्या जडवस्तूचे आपण साक्षात अबधारण करू शकत नाही. ती वस्तू आपल्या इंद्रियांवर कार्य करून आपल्या मनात एक कल्पना-आयडिया- निर्माण करते. ही कल्पना (वेदनांचा समूह) आपल्या मनात असते. तिची साक्षात जाणीव आपल्याला असते आणि ती त्या बाह्य जडवस्तूचे प्रतिनिधित्व करते. ह्या कल्पनेद्वारा बाह्य जडवस्तूच्या अस्तित्वाचे आणि गुणांचे ज्ञान आपल्याला होते. उदा., मी प्रत्यक्ष पहात असलेले गुलाबाचे फूल ही माझ्या मनातील कल्पना असते आणि ते बाह्य वस्तूचे प्रतिनिधित्व करते. आता ह्या कल्पनेच्या, मी प्रत्यक्ष पहात असलेल्या वस्तूच्या ठिकाणी असलेले काही गुण हे बाह्य वस्तूच्या ठिकाणी असलेल्या गुणांसारखेच असतात. उदा., तिचा आकार, वस्तुभार इत्यादी. ह्यांना त्या कल्पनेच्या ठिकाणचे प्राथमिक गुण म्हणतात. उलट तिच्या ठिकाणी कित्येक गुण असे असतात, की त्यांच्यासारखे गुण बाह्य वस्तूत असत नाहीत. उदा., रंग, गंध इत्यादी. ह्यांना कल्पनेच्या ठिकाणचे दुय्यम गुण म्हणतात. बाह्य वस्तूच्या ठिकाणी असलेले प्राथमिक आणि दुय्यम गुण, आणि तिच्या कल्पनेच्या ठिकाणी असलेले प्राथमिक आणि दुय्यम गुण,  यांच्यात भेद केला पाहिजे.

आता लॉकच्या ह्या भूमिकेवर बर्क्लीने दोन आक्षेप घेतले आहेत : एक असा की बाह्य, भौतिक वस्तूचे साक्षात अवधारण जर आपल्याला करता येत नसेल, जर मनात असलेल्या कल्पनेच्या द्वारा भौतिक वस्तूच्या अस्तित्वाचे आणि गुणांचे ज्ञान आपल्याला होत असेल, तर भौतिक वस्तू आहेत असे निश्चित ज्ञान आपल्याला होऊ शकणार नाही. भौतिक वस्तूंचे अस्तित्व नेहमीच संशयास्पद राहील. भौतिक वस्तूंच्या गुणांचेही निश्चित ज्ञान आपल्याला होऊ शकणार नाही. भौतिक वस्तूचे साक्षात अवधारण आपण करू शकत नसल्यामुळे, भौतिक वस्तू आणि तिची प्रतिनिधी असलेली मनातील कल्पना यांची तुलना आपण करू शकणार नाही व कोणत्या गुणांच्या बाबतीत भौतिक वस्तू कल्पनेसारखी असते आणि कोणत्या बाबतीत वेगळी असते, हे आपण निश्चितपणे ठरवू शकणार नाही. म्हणजे भौतिक वस्तूंचे अस्तित्व आणि गुण यांविषयीचे आपले ज्ञान नेहमी संशयास्पद राहील.

बर्क्लीचा दुसरा आक्षेप प्राथमिक आणि दुय्यम गुण यांच्यामध्ये करण्यात आलेल्या भेदाविषयीचा आहे. थोडक्यात असे म्हणता येईल, की प्राथमिक गुण हे भौतिक वस्तूच्या स्वतःच्या ठिकाणी असतात. रंग, ध्वनी, उष्णता इ. दुय्यम गुण हे भौतिक वस्तूच्या स्वतःच्या अंगी नसतात, तर तिची प्रतिनिधी असलेल्या कल्पनेच्या ठिकाणी असतात. प्राथमिक आणि दुय्यम गुण यांच्यामधील भेद दुय्यम गुणांच्या प्रेक्षकसापेक्षतेवर आधारला आहे. उदा., वस्तूंचे रंग रंगांधाला जसे आहेत तसे दिसत नाहीत, रंगीत वस्तूंचे रंग काळोखात दिसत नाहीत, तेच पाणी त्याच वेळी एका हाताला अधिक उष्ण व दुसऱ्या हाताला कमी उष्ण लागते इत्यादी. तेव्हा रंग, उष्णता इ. दुय्यम गुण हे वस्तूच्या ठिकाणाचे गुण नसून ज्ञात्याच्या मनातील कल्पनेच्या ठिकाणी असलेले गुण आहेत असा निष्कर्ष काढण्यात येतो. याला पोषक असा युक्तिवाद असा, की अतिशय गरम स्पर्श, उबदार स्पर्श यांच्यामध्ये दुःखद किंवा सुखद वेदना मिसळलेली असते. आता वेदना मनात असते, भौतिक वस्तूच्या ठिकाणी नसते हे स्पष्ट आहे. तेव्हा उष्णतेच्या अनुभवात जर वेदना मिसळलेली असेल, तर उष्णता हा बाह्य वस्तूचा गुण असणार नाही, ती एक मानसिक संवेदना असली पाहिजे असा निषकर्ष प्राप्त होतो.

आता बर्क्लीचा युक्तिवाद असा की रंग, उष्णता इ. गुण जर ज्ञातृसापेक्ष असल्यामुळे दुय्यम ठरत असतील म्हणजे ते भौतिक वस्तूंच्या ठिकाणी असलेले गुण नसून जर केवळ कल्पनांच्या अंगचे गुण असतील, तर आकार, गती इ. प्राथमिक गुणही ज्ञातृसापेक्ष असल्यामुळे तेही दुय्यम गुण ठरले पाहिजेत. त्याच वस्तूचा आकार वेगवेगळ्या अंतरांवरून आणि वेगवेगळ्या दिशांनी पाहिला असता वेगवेगळा दिसतो. त्याच गतिमान वस्तूची गती वेगवेगळ्या प्रेक्षकांना वेगवेगळी दिसते. शिवाय उष्णता आणि सुखदुःखादी वेदना यांच्यात फारकत करता येत नाही, ह्या आधारावर जर उष्णता हा दुय्यम, मानसिक कल्पनांच्या अंगचा गुण आहे असे मानणे योग्य ठरते, तर प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण यांचीही एकमेकांपासून फारकत करता येत नसल्यामुळे प्राथमिक गुण हे भौतिक वस्तूंच्या ठिकाणचे गुण नसून. कल्पनांच्या अंगचे गुण आहेत असे मानावे लागते. म्हणजे आपण अनुभवत असलेल्या संवेदनांच्या आशयाच्या अंगी असलेले गुण आहेत असे मानावे लागते.

आतापर्यंतचा बर्क्लीचा निष्कर्ष असा मांडता येईल : (१) आपल्या ज्ञानाचे विषय असलेल्या वस्तू ह्या मनोबाह्य ज्यांचे आपण साक्षात अवधारण करू शकत नाही, पण आपल्या मनातील कल्पनांद्वारा ज्यांचे ज्ञान आपल्याला होते अशा भौतिक वस्तू असतात ही भूमिका गैर आहे कारण ती ⇨संशयवादाला जन्म देते. ह्या भूमिकेप्रमाणे वस्तूंचे ज्ञान नेहमी संशयास्पद राहते. (२) भौतिक वस्तूंच्या स्वतःच्या अंगी असलेले प्राथमिक गुण आणि आपल्या मनात असलेल्या कल्पनांच्या (संवेदनांच्या आशयांच्या) ठिकाणी असलेले, पण भौतिक वस्तूंच्या अंगी नसलेले दुय्यम गुण, असा गुणांमध्ये भेद करता येत नाही. प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण अनिवार्यपणे एकमेकांत गुंतलेले असतात व म्हणून दुय्यम गुण जर केवळ कल्पनांच्या ठिकाणी असलेले गुण असतील, तर प्राथमिक गुण हेही केवळ कल्पनांच्या ठिकाणी असलेले गुण असतात असे मानणे भाग आहे. आता बर्क्लीचा पुढचा मुद्दा असा, की कल्पना म्हणजे आपल्या जाणिवेचे साक्षात विषय असलेले पदार्थ, इंद्रियगम्य गुण. हे असे पदार्थ असतात, की त्यांना जाणिवे-बाहेर, जाणिवेहून पृथक् आणि स्वतंत्र असे अस्तित्व असू शकत नाही. रंग आहे पण तो पाहिला जात नाही, ध्वनी आहे पण तो ऐकला जात नाही, असे असू शकत नाही, आपल्याला असे वाटेल, की एखाद्या निर्जन ठिकाणी जे कुणीही पहात नाही असे एक झाड आहे, अशी कल्पना आपण करू शकतो. ही कल्पना म्हणजे जी कुणाच्याही जाणिवेचा विषय नाही अशा वस्तूची कल्पना होय. पण ही कल्पनाच आत्मविसंगत आहे. कारण जे कुणाच्याही जाणिवेचा विषय नाही अशा झाडाची कल्पना करताना आपण त्या झाडाला आपल्या जाणिवेचा विषय बनविले आहे. तेव्हा आपल्या जाणिवेचे साक्षात विषय असलेले पदार्थ, इंद्रियगम्य गुण यांना आपल्या जाणिवे-बाहेर अस्तित्व असू शकत नाही, त्यांचे अस्तित्व जाणिवेवर अवलंबून असते. [⟶ गुण].

तेव्हा झाडासारखी जी वस्तू आपण पहातो किंवा स्पर्शितो तिचे स्वरूप बर्क्लीच्या मताप्रमाणे काय असते? (१) ती वस्तू आपल्या जाणिवेचा साक्षात विषय असते (२) ती वस्तू म्हणजे इंद्रियगम्य गुणांचा एक संमिश्र समूह असतो. (३) ह्या गुणसमूहाचे म्हणजे त्या झाडाचे अस्तित्व त्याची जाणिव होण्यावर अवलंबून असते. जाणिवे-बाहेरचे स्वतंत्र असे अस्तित्व झाडाला नसते. ह्या अर्थाने ते झाड म्हणजे एक कल्पना असते. झाड, पुस्तक, टेकडी इ. वस्तूंना कल्पाना म्हणणे विचित्र आहे हे बर्क्ली मान्य करतो परंतु ह्या पदार्थांचे सबंध स्वरूप ध्यानात घेतले, तर ते विचित्र वाटणार नाही असा त्याचा अभिप्राय आहे.


आता बर्क्लीच्या निष्कर्षांनी ज्यांना अस्वस्थ वाटते ते असा युक्तिवाद करू शकतील : मी जे झाड साक्षात पहातो ती जरी माझ्या मनातील कल्पना असली आणि तिचे अस्तित्व जरी माझ्या जाणिवेवर अवलंबून असले, तरी ह्या झाडासारखे असलेले असे एक भौतिक झाड असते आणि ते मनाबाहेर व स्वतंत्रपणे अस्तित्वात असते. हा युक्तिबाद बर्क्ली खोडून काढतो. कल्पनेसारखी असलेली भौतिक वस्तू ही कल्पनाच विपरीत आहे. एका कल्पनेसारशी दुसरी कल्पना असू शकेल. पण भौतिक वस्तू कल्पनेसारखी असू शकत नाही. तेव्हा आपल्या जाणिवेचे विषय असलेले सर्व पदार्थ ह्या कल्पना असतात, त्यांचे अस्तित्व त्यांची जाणीव होण्यावर अवलंबून असते आणि जड पदार्थ (भौतिक वस्तू) असे काही असत नाही, हा बर्क्लीचा सिद्धांत सिद्ध होतो. ही बर्क्लीची अजडवादी भूमिका.

पण यावर एक प्रश्न उपस्थित होतो. जे झाड मी पहात आहे ती माझ्या मनातील कल्पना आहे हे मान्य करू या. आता मी तेथून गेल्यानंतर ते झाड मला दिसत नाही. माझ्या मनातील कल्पना संपुष्टात येते. म्हणजे जे झाड मी पहात होतो ते संपुष्टात आले असे होते का? मी त्या ठिकाणी परतलो तर तेच झाड मला परत दिसते असे मी म्हणतो. परंतु मला पहिल्यांदा जे झाड दिसले तेच मला फिरून दिसते, की पहिल्यांदा जे झाड मला दिसले ते माझी पहाण्याची कृती संपण्याबरोबर संपले आणि नंतरचे माझे पहाणे जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याचा विषय असलेले झाड पहिल्या झाडाहून वेगळे, हुबेहूब त्याच्यासारखे पण वेगळे होते? आपण पहिला पर्याय स्वीकारला. तर दोन पहाण्यांच्या कृतीमध्ये झाड टिकून राहिले होते असे मानावे लागेल. बर्क्ली पहिला पर्याय स्वीकारतो. ‘वस्तू प्रत्येक क्षणी नष्ट होतात आणि त्यांची परत निर्मिती करण्यात येते, किंवा त्यांना पहाण्याच्या मध्यंतरात त्या असतच नाहीत’ हे तो नाकारीत आहे.

आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंना सातत्यपूर्ण अस्तित्व असते आणि त्यांचे अस्तित्व त्यांचा अनुभन घेण्यावर अवलंबून असते, ह्या दोन सिद्धांतांत सुसंवाद साधणे आवश्यक आहे. जेव्हा झाड, टेबल ह्यांसारख्या टिकून राहणाऱ्या पदार्थांचे माणसे अवधारण करीत नसतात, तेव्हा ईश्वर त्यांचे अवधारण करीत असतो असे मानून बर्क्ली हा सुसंवाद साधतो. हा युक्तिवाद असा : झाड, टेबल इ. आपल्या जाणिवेचे साक्षात विषय असलेल्या वस्तूंचे अस्तित्व त्यांची जाणीव होत असण्यावर अवलंबून असते. पण ह्या वस्तूंच्या माणसांना असणाऱ्या जाणिवेमध्ये मधेमधे खंड पडलेले असतात. पण ह्या मध्यंतरांतही ह्या वस्तूंचे अस्तित्व टिकून असते. तेव्हा ह्या मध्यंतरात मानवी मनाहून किंवा मानवी चैतन्याहून अन्य अशा चैतन्याकडून अवधारण होत असले पाहिजे. हे अन्य चैतन्य म्हणजे ईश्वर. ही मध्यंतरे भरून काढणे एवढेच ईश्वरी चैतन्याचे कार्य आहे असे नाही. जर  झाड, टेबल इ. वस्तूंचे अस्तित्व सातत्यपूर्ण असेल, तर हे अस्तित्न माणसांना त्यांची जाणीव होण्यावर अवलंबून असणार नाही, त्याचा आधार म्हणून त्यांचे सातत्यपूर्ण रीतीने अवधारण करणारे चैतन्य असले पाहिजे. हे चैतन्य म्हणजे ईश्वर.

आपल्या जाणिवेचे साक्षात विषय असलेल्या वस्तू-म्हणजे कल्पना-यांचा आणि ईश्वराचा दुसऱ्या प्रकारे संबंध पोहोचतो. बर्क्लीच्या मते कल्पना अक्रिय किंवा उदासीन असतात. त्या परिणाम घडवून आणू शकत नाहीत. आपल्या काही कल्पना आपण निर्माण केलेल्या असतात. मी मुक्तपणे अनेक गोष्टींची कल्पना करू शकतो. जेव्हा मी उदा., सुवर्णपर्वताची कल्पना करतो, तेव्हा माझ्या मनात असलेली सुवर्णपर्वताची प्रतिमा मी निर्माण केलेली असते. ह्यावरून चैतन्य क्रियाशील असते आणि ते कल्पना निर्माण करते हे सिद्ध होते. आता जेव्हा मी एखाद्या विशिष्ट ठिकाणी पहातो तेव्हा ज्या वस्तूंची जाणीव मला होते, म्हणजे ज्या कल्पना लागतात, त्या माझ्या इच्छेवर अवलंबून नसतात, त्या मी निर्माण केलेल्या नसतात हे उघड आहे. तेव्हा त्या दुसऱ्या कोणत्यातरी चैतन्यकडून निर्माण झालेल्या असणार. हे चैतन्य म्हणजे ईश्वर. शिवाय ह्या कल्पना माझ्या आणि इतर सान्त मनांमध्ये सुव्यवस्थित आणि सुसंगत अशा क्रमाने निर्माण होतात. ह्यावरून ईश्वर हे कल्याणकर असे अनंत चैतन्य आहे हे सिद्ध होते.

तेव्हा ‘अस्तित्वात काय आहे’? ह्या प्रश्नाचे बर्क्ली असे उत्तर देईल : जड द्रव्य किंवा भौतिक पदार्थ अस्तित्वात नसतात. क्रियाशील अशी सान्त चैतन्ये आणि त्यांच्या कल्पना आणि क्रियाशील असे अनंत चैतन्य आणि ते निर्माण करीत असलेल्या कल्पना यांनाच अस्तित्व आहे. कल्पना चैतन्यामध्ये अस्तित्वात असतात आणि त्यांचे अस्तित्व त्यांच अवधारण होण्यावर अवलंबून असते. ‘अस्तित्व म्हणजे प्रेक्षित असणे किंवा प्रेक्षण करणे’ (एक्झिस्टन्स इज पर्सिपी ऑर पर्सिपर) ह्या बर्क्लीच्या वचनात ह्या मताचे सार आले आहे.

पण ह्यातून एक प्रश्न उद्‌भवतो. एखादे झाड मी अधूनमधून पहातो आणि झाडाची कल्पना त्या त्या वेळी ईश्वराने माझ्या मनात निर्माण केलेली असते. पण ते झाड अस्तित्वात असेपर्यंत त्याची कल्पना ईश्वरी मनात सातत्याने असते. तेव्हा ईश्वरी मनातील कल्पना आणि सान्त मनातील कल्पना यांचा परस्परसंबंध काय असतो, असा प्रश्न उपस्थित होतो. सान्त मने शरीरांशी संलग्न असतात आणि त्यांच्यात वस्तूंच्या ज्या कल्पना असतात त्यांचे स्वरूप शरीर कोणत्या स्थानापासून कोणत्या अवस्थेत आणि परिस्थितीत वस्तूचे अवधारण करीत असेल, यावर अवलंबून राहते. ईश्वरी मनातील वस्तूची कल्पना अशी सापेक्ष असत नाही. शिवाय आपण पाहिल्याप्रमाणे सान्त मनातील कल्पनांत सुखदुःखादी वेदना मिश्रित असतात. ईश्वर सुखदुःखापासून मुक्त असतो. ह्यामुळे बर्क्ली असा निष्कर्ष काढतो, की ईश्वरी मनातील कल्पना आणि सान्त मनातील कल्पना यांच्यात तादात्म्य नसते, ईश्वरी मनातील कल्पना ही मूलकृती असते आणि सान्त मनातील कल्पना ही तिची प्रतिकृती असते. पण असे मानाण्यात एक अडचण आहे. सातत्याने टिकून राहणाऱ्या वस्तू ह्या ईश्वरी मनातील कल्पना असतात, हे आपण पाहिले आहे. ह्या कल्पना माझ्या मनात कधी अवतरत नाहीत, त्यांचे अवधारण मी करू शकत नाही, त्यांच्या प्रतिकृतीचे अवधारण मी करतो असे असेल, तर वस्तूंचे साक्षात अवधारण मी करू शकत नाही, असा ह्याचा अर्थ होईल आणि भौतिक वस्तूंचे साक्षात अवधारण करता येत नाही म्हणून त्या संशयास्पद ठरतात, हा बर्क्लीचा आक्षेप ईश्वरी मनातील कल्पनांविषयी घेता येईल. ह्या अडचणीला बर्क्लीकडे समाधानकारक उत्तर नाही.


विज्ञानाचे तत्त्वज्ञान : नास्तिकवाद आणि ⇨जडवाद यांचे खंडन करण्यासाठी बर्क्लीने तत्कालीन विज्ञानाला आधारभूत असलेल्या कित्येक संकल्पनांवर टीका केली आहे. ही टीका प्रामुख्याने ज्या तत्त्वावर आधारलेली आहे ते तत्त्व असे, की अमूर्त संकल्पना असत नाहीत. अनेक तत्त्ववेत्ते असे मानतात-उदा.,लॉक-की काही बाबतीत समान आणि काही बाबतीत असमान असलेल्या विशिष्ट वस्तू आपण घेतो, ज्या गुणांच्या बाबतीत त्या एकमेकींपासून भिन्न असतात ते गुण वगळून, ज्या गुणांच्या बाबतीत त्या समान असतात तेवढेच ध्यानी घेऊन त्यांची एक संकल्पना बनवितो आणि मग ह्या संकल्पनेविषयी जी विधाने आपण सिद्ध करतो, ती ह्या वर्गातील सर्व वस्तूंविषयी सत्य असतात. उदा., त्रिकोण अनेक बाबतीत परस्परांहून भिन्न असतात-रेषांची लांबी, कोनांची परिमाणे इत्यादी-पण एका विशिष्ट बाबतीत ते समान असतात-तीन रेषांनी बंदिस्त असणाच्या बाबतीत- ह्या समान गुणाच्या साहाय्याने आपण त्रिकोणाची सामान्य संकल्पना बनवितो आणि ह्या संकल्पनेविषयी जी विधाने आपण सिद्ध करतो, ती सर्व विशिष्ट त्रिकोणांविषयी सत्य असतात.

बर्क्लीचे म्हणणे असे, की अशा अमूर्त, सामान्य संकल्पनांना अनुरूप असे काही अस्तित्वात असते असे मानणे हा तर्कदोष आहे. जो केवळ त्रिकोण आहे, पण काटकोन त्रिकोण नाही किंवा विशालकोन त्रिकोण नाही वा लघुकोन त्रिकोण नाही, असा त्रिकोण अस्तित्वात असू शकत नाही. विशिष्ट त्रिकोणच अस्तित्वात असतात आणि जे जे अस्तित्वात असते ते ते विशिष्ट असते. पण एखाद्या विशिष्ट त्रिकोणाला आपण सर्व त्रिकोणांचा प्रतिनिधी म्हणून येऊ शकतो. अशा त्रिकोणांचा प्रतिनिधी म्हणून मानलेल्या विशिष्ट त्रिकोणाविषयीचे एखादे सत्य विधान जर त्याच्या, सर्व त्रिकोणांशी समान असलेल्या, गुणावर आधारलेले असेल तर ते विधान सर्व त्रिकोणांविषयी सत्य असते. तेव्हा अमूर्त, सामान्य संकल्पना असत नाहीत आणि त्यांना अनुरून अशी सामान्ये असत नाहीत. मूर्त आणि विशिष्ट अशा वस्तूच असतात आणि अशी वस्तू म्हणजे इंद्रियसंवेद्य गुणांचा मिश्र समूह असतो. अशा वस्तूची प्रतिमा आपण बनवू शकतो. पण ही प्रतिमाही मूर्त वस्तूची प्रतिमा असते. सामान्य कल्पना असा कल्पनांचा प्रकार नसतो. पण एखाद्या विशिष्ट वस्तूचा किंवा प्रतिमेचा जेव्हा काही बाबतीत तिच्याशी समान असलेल्या वस्तूंची प्रतिनिधी म्हणून आपण उपयोग करतो,  तेव्हा तिचा सामान्य कल्पना म्हणून आपण वापर करीत असतो.

ह्या तत्त्वाचा उपयोग करून बर्क्लीने जडद्रव्य ही संकल्पान त्याज्य ठरविली. कारण जडद्रव्य म्हणजे केवळ स्थान, आकारमान, गती, वजन इ. प्राथमिक गुण जिच्या ठिकाणी असतात पण रंग इ. दुय्यम गुण जिच्या ठिकाणी नसतात अशी वस्तू. पण अनुभवाचे साक्षात विषय असलेल्या ज्या वस्तू असतात त्यांच्या ठिकाणी प्राथमिक आणि दुय्यम असे दोन्ही गुण असतात. केवळ प्राथमिक गुण जिच्या ठिकाणी असतात अशा वस्तूची कल्पना ही अमूर्त कल्पना आहे आणि तिला अनुरूप अशी वस्तू प्रत्यक्षात असू शकत नाही. जडद्रव्याची संकल्पना बर्क्लीने ज्याप्रमाणे त्याज्य ठरविली त्याचप्रमाणे न्यूटनच्या भौतिकीला आधारभूत असलेल्या केवल अवकाश, केवल काल आणि केवल गती ह्या संकल्पनाही अप्रमाण ठरवल्या. ⇨ अवकाशाचा साक्षात अनुभव आपल्याला येतो, पण इंद्रियगम्य पदार्थांनी अधूनमधून व्यापलेल्या आणि उरलेल्या जागी रिकाम्या असलेल्या अवकाशाचा अनुभव येतो. तसेच ⇨कालाचा आपला जो मूर्त अनुभव असतो तो संवेदना, प्रतिमा, भावना इ. गोष्टींचा आपल्याला कालिक क्रमाने येणारा अनुभव ह्या स्वरूपाचा असतो. गतीचा आपल्याला येणारा अनुभव हा निदान दोन इंद्रियगम्य पदार्थांच्या संदर्भात येतो. अशा दोन पदार्थांची स्थाने परस्परांच्या अपेक्षेने बदलत जात आहेत. ह्या आशयाचा तो अनुभव असतो. तेव्हा केवल अवकाश (म्हणजे वस्तू वगळून उरलेला शुद्ध अवकाश), केवल काल (प्रक्रिया आणि क्रमाने घडणाऱ्या घटना वगळून उरलेला काल), केवल गती (म्हणजे ज्या इतर वस्तूंच्या अपेक्षेने गती संभवते त्यांच्या निरपेक्ष, वस्तूच्या स्वतःच्या ठिकाणी असलेली गती) ह्या संकल्पना अमूर्त ठरतात आणि त्यांना अनुरूप असे पदार्थ प्रत्यक्षात असतात असे मानणे गैर आहे.

बर्क्लीच्या मताप्रमाणे केवळ चैतन्य हे क्रियाशील असते आणि चैतन्याचे विषय असलेल्या कल्पना अक्रिय आणि उदासीन असतात. विज्ञान इंद्रियगम्य पदार्थ आणि घटना यांच्याविषयी असते. म्हणजे ते कल्पनांविषयी असते. वैज्ञानिक जे निसर्गनियम शोधून काढतो, ते घटना कोणत्या क्रमाने घडतात हे सांगणारे नियम असतात. घटना कोणत्या कारणांमुळे घडून येतात हे सांगणारे ते कारण-नियम नसतात. घटना का घडतात हे वैज्ञानिक नियम सांगू शकत नाहीत ते घटनांचा उलगडा करू शकत नाहीत. घटना कशा घडतात ह्यांचे केवळ वर्णन करणारे ते नियम असतात. ह्या नियमांमुळे एक घटना ही दुसऱ्या घटनेची खूण आहे हे आपल्याला कळते. पण ती तिचे कारण आहे असे होत नाही. फक्त चैतन्य हे कारण असू शकते आणि म्हणून घटना का घडतात ह्याचे स्पष्टीकरण पाहिजे असेल, तर ज्या प्रयोजनांच्या सिद्धीसाठी चैतन्य घटना घडवून आणते त्यांच्या द्वारा ते लाभू शकेल. म्हणजे निसर्गामध्ये ईश्वराचे जे प्रयोजन आहे ते समजून घ्यावे लागेल.

समारोप : नास्तिकवादाचे आणि जडवादाचे खंडन करणे आणि ईश्वरनिष्ठ चिद्वादाचे समर्थन करणे हे बर्क्लीचे मुख्य उद्दिष्ट असले, तरी बर्क्लीने जे युक्तिवाद पुढे केले त्यांच्यामुळे लॉकच्या अस्थिर ⇨अनुभववादाला अधिक सुसंगत असे स्वरूप लाभले. आधुनिक ⇨ रूपविवेचनवाद त्याचप्रमाणे विज्ञानाच्या स्वरूपांविषयीची ⇨एर्न्स्ट माख (१८३८-१९१६) आणि त्याचे अनुयायी यांनी प्रसृत केलेली कल्पना यांची बीजे बर्क्लीच्या तत्त्वज्ञानात आढळतात.

पहा : चिद्वाद.

संदर्भ :     1. Luce, A. A. The Life of George Berkeley, Bishop of Cloyne, London, 1949.

            2. Luce, A. A. , Jessop, T. E. Ed. The Works of George Berkeley, Bishop of Cloyne, IX Vols., London, 1948-57.

            3. Warnock, G. J. Berkeley, London, 1953.

            4. Wild, J. George Berkeley : A Study of His Life and Philosophy, New York, 1962.

रेगे, मे.पुं