बरुआ, हेमचंद्र :(१० डिसेंबर १८३५-२८ एप्रिल १८९६). प्रसिद्ध असमिया कोशकार, आद्य औपरोधिक-विनोदी लेखक व आधुनिक असमिया गद्याचे शिल्पकार. जन्म सिबसागर जिल्ह्यातील रजाबाहर नावाच्या गावी. वडिलांचे नाव मुक्ताराम. मुक्ताराम व्युत्पन्न संस्कृत पंडित व वैद्य म्हणून प्रख्यात होते. हेमचंद्रांनी १८४७ पर्यंत घरीच वडिलांजवळ संस्कृतचे तसेच बंगालीचे व प्राचीन असमिया साहित्याचे अध्ययन केले. तथापि १८४७ मध्ये वडिलांच्या निधनानंतर हेमचंद्रांचे काका लक्ष्मीनाथ बरुआ यांनी त्यांना सिबसागर येथे आणले. तेथे हेमचंद्रांनी चरितार्थासाठी मासिक चार रूपये वेतनावर न्यायालयातील एका लिपिकाच्या हाताखाली उमेदवार म्हणून नोकरी पतकरली. फावल्या वेळात त्यांनी खाजगी रीत्या संस्कृतचे तसेच कॅप्टन ब्रॉडी ह्या उप-आयुक्ताच्या घरी हिंदी व ब्रजबुलीचे देवनागरी लिपीतून अध्ययन केले. ब्रॉडीच्या सहवासात तसेच बॅप्टिस्ट मिशनमध्ये ते घरचा विरोध असूनही गुप्तपणे इंग्रजीचे अध्ययन करीत. हळूहळू इंग्रजी भाषेवर त्यांनी चांगले प्रभुत्वही मिळवले. अरुणोदय ह्या मिशनरी नियतकालिकातही त्यांनी महत्वपूर्ण लेखन केले. न्यायालयातील नोकरीत विविध पदांवर त्यांची बढती होत गेली. सिबसागर येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात त्यांनी काही काळ दुय्यम शिक्षक म्हणूनही काम केले. १८६२ मध्ये गौहाती येथे त्यांची न्यायालयातील भाषांतरकार म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांना आयुक्तांच्या कार्यलयात पर्यवेक्षक म्हणून बढती मिळाली. या जागेवर ते सेवानिवृत्त होईपर्यंत (१८८१) होते. सेवानिवृत्तीनंतर ते गौहाती येथे स्थायिक झाले. दोन वेळा त्यांची उप-आयुक्तपदीही नेमणूक होत होती पण आपल्या साहित्यनिर्मितीत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी ते पद नाकारले. गौहाती येथे ते निधन पावले.

कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी अनेक भाषांचे सखोल ज्ञान मिळविले, हे त्यांचे वैशिष्टय होय. इंग्रजीवर व संस्कृतवर तर त्यांचे प्रभुत्वच होते. असमिया भाषाप्रवेश म्हणून त्यांनी आदिपाठ (१८७३) हे पाठ्यपुस्तक तयार केले आणि त्याला ५०० रुपयांचे पहिले पारितोषिकही मिळाले. वे टू हेल्थ ह्या सरकारी पुस्तपत्राचे असमिया स्वास्थ्यर नियम हे असमिया भाषांतरही त्यांनी केले. त्यांना त्यासाठी १,१०० रुपयांचे बक्षिस सरकारने दिले. बाबू राजेंद्रलाल मित्र यांना प्राचीन संस्कृत हस्तलिखिते जमविण्याच्या कामात मदत करण्यासाठी सहायक म्हणूनही त्यांना सरकारने मान्यता दिली.

अरुणोदयमध्ये हेमचंद्रांनी विविध लेख लिहिले. त्यांचे असमिया व्याकरण (१८५९) बॅप्टिस्ट मिशनने प्रसिद्ध केले. त्याचीच सुधारित आवृत्ति असमिया लरार व्यकरण (१८८६) नावाने निघाली.

हेमकोशाची रचना हे त्यांचे सर्वांत महत्वाचे व मूलभूत स्वरूपाचे काम होय. तथापि हा ‘कोश’ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला (१९००). त्यांनी त्याची शालेय आवृत्ति पऱ्हासलिझ अभिधान नावाने १८९२ मध्ये आणि नंतर संक्षिप्त हेमकोश या नावाने १८९४ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांनी आयुष्यभर घेतलेल्या परिश्रमाचे फल म्हणजे हा हेमकोश. वेब्स्टरच्या इंग्रजी शब्दकोशाचा आदर्श त्यांच्यापुढे होता. डॉ. जॉन्‌सनप्रमाणेच एकहाती केलेले हे प्रचंड काम आहे. त्यात एकूण २२,३४६ शब्द आहेत. शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचे इंग्रजी प्रतिशब्द व असमिया अर्थ त्यात त्यांनी दिले आहेत. असमियात यापूर्वी रचलेल्या ब्रॉन्सनच्या कोशापेक्षा हा कोश खूपच व्यापक असून शास्त्रीय पद्धतीने रचलेला आहे. आजही हेमचंद्रांचे व्याकरण व कोश हे आसाममध्ये प्रमाणभूत मानले जातात.

पाठमाला (१८८८) शालेय पाठ्यपुस्तकासारखी असून तीत त्यांनी इंग्रजी, संस्कृत भाषांतील कथा तसेच शास्त्रीय व इतर विषयांवरील पाठ दिलेले आहेत. कानियार किर्त्तन (म. शी. अफूबाजांच्या गोष्टी-१८६१) ह्या सामाजिक प्रहसनात त्यांनी अफूच्या व्यसनाचे दुष्परिणाम उपरोधिक विनोदाने उघड केले आहेत. बाहिरे रंग-चंग मितरे कोआ-भातुरि (१८७६) ह्या ललित गद्य ग्रंथात त्यांनी अनिष्ठ सामाजिक रूढी व दांभिक सनातनी लोकांची धर्मभ्रष्टता यांवर उपरोध-उपहासाच्या आधारे कठोर प्रहार केले आहेत. त्यांचा हा ग्रंथ काटेकोर अर्थाने कादंबरीका वा कादंबरी या सदरात टाकता येणार नाही. उपरोधिक-विनोदी ललित गद्यातच त्याची गणना करावी लागेल. विधवाविवाहाचे ते कडवे पुरस्कर्ते होते.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गौहाती येथून प्रसिद्ध होणाऱ्या आसाम न्यूज ह्या इंग्रजी-असमिया साप्ताहिकाचे संपादकत्व स्वीकारले व ते समर्थपणे सांभाळलेही. आसाम न्यूजचा प्रभाव अनेक असमिया लेखकांवर पडला.

हेमचंद्र हे त्यांच्या काळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. समाजातील सर्व प्रकारची दांभिकता, ढोंग, अनिष्ट रूढी व परंपरा यांची त्यांना मनस्वी चीड होती आणि त्यांनी त्यावर व्यक्तिशः व आपल्या उपरोधप्रचुर धारदार लेखणीनेही कठोर प्रहार केले. त्यांनी जे थोडेफार लेखन केले, ते कसदार आहे. एक प्रभावी गद्यलेखक म्हणून असमिया साहित्यात त्यांचे स्थान विशेष महत्वाचे ठरते. कानियार किर्त्तन आणि बाहिरे रंग-चंग मितरे कोआ-भातुरी हे त्यांचे ग्रंथ या दृष्टीने मौलिक ठरतात. जोनाकीत १८९२ मध्ये ‘आत्मजीवन चरित’ शीर्षकाने प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्रपर टिपणही उल्लेखनीय आहे. विचारप्रतिपादनातील गांभीर्य, तर्कशुद्धता व प्रसन्न शैली ही त्यांची वैशिष्टये असमिया गद्यात अनुकरणीय ठरली.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)