बरोक कला : पश्चिमी कलेतिहासातील एक प्रमुख संप्रदाय. सतराव्या शतकात पश्चिम यूरोप आणि लॅटिन अमेरिका या प्रदेशांमध्ये बरोक कला उदयाला आली. वास्तू, मूर्ती व चित्र यांच्या पूर्वापार स्वरूपात व संकेतांत तिने अंतर्बाह्य बदल घडवून आणला. ‘Barroco’ या पोर्तुगीज शब्दावरून ‘बरोक’ (Baroque) अशी संज्ञा रूढ झाली असावी. मूळ पोर्तुगीज शब्दाचा अर्थ ‘खडबडीत, अनियमित आकारचा मोती’ असा असून प्रबोधनकालीन कलेशी बरोक कलेची तुलना केल्याने ही दोषव्यंजक संज्ञा रूढ झाली. विक्षिप्त, चमत्कारीक यांसारखी विशेषणे या कलानिर्मितीला लावण्यात आली. तथापि बरोक कलावंतांची विचारसरणी स्वतंत्र असून रचना, रंगसंगती आणि तंत्र यांचा विविध प्रकारे वापर करून त्यांनी कलाक्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी करून दाखविले.
रोमन कॅथलिक चर्चसंस्था, राजे-सरदार, तत्कालीन श्रींमंत वर्ग यांच्यासाठी तसेच काही वेळा स्वतःची अभिव्यक्ती म्हणून बरोक कलाकार कलानिर्मिती करताना आढळतात. धार्मिक-पौराणिक कथा, दंतकथा, व्यक्तिचित्रे, शाही जीवन, सामान्यांचे खाजगी जीवन, स्थिर-वस्तुचित्रण आणि निसर्ग अशी विविध विषयांवर या काळात कलाकृती निर्माण झाल्या. मुद्रणतंत्राचा उपयोग करून अम्लरेखनासारखा प्रकारही हाताळण्यात आलेला दिसतो. प्रबोधनकालीन कलेशी तुलना करता बरोक चित्र-शिल्पांमधून अनिश्चित व अनियमित आकारांच्या रचना आढळतात. परंतु नाट्यमय चित्रण, छायाप्रकाशाचा प्रभावी परिणाम, माध्यमाचा सर्जनशील वापर, विषय वैविध्य यांमुळे बरोक कला रसिकाला विशेष मोहविणारी ठरली. मानवी जीवनाच्या अनेक पैलूंचे प्रतिबिंब बरोक कलेमध्ये दिसते. एव्हढेच नव्हे, तर मानवी जीवन अधिक प्रकर्षाने तीत अभिव्यक्त झालेले आढळते.
बोवलेकर, अनंत
वास्तुकला :बरोक कलेतील गतिमानतेचा व चैतन्यशीलतेचा प्रभावी आविष्कार प्रायःवास्तुकलेमध्ये दिसून येतो. जेझुइट धर्मपंथाचे, रोम येथे १५६८-१५७५ या कालावधीत उभारलेले ‘इल जेझू’ चर्च (मराठी विश्वकोश : २ :चित्रपत्र ४३) हे बरोक वास्तुशैलीचे सर्वात आद्य उदाहरण होय. ह्या चर्चचा वास्तुकल्प व्हीन्यॉला (१५०७-७३) या वास्तुविशारदाने केला आणि त्याचा दर्शनी भाग देल्ला पॉर्ता (सु. १५४१-१६०२) याने उभारला. प्रबोधनकालीन वास्तुकारांनी वास्तूमध्ये समतोल व सौंदर्य साधण्यासाठी प्रमाणशीर आयत-चौकोनाकृतींचा वापर केला तर बरोक वास्तुकारांनी नाट्यमयतेचा परिणाम साधण्यासाठी प्रवाही वक्राकारांचा अवलंब केला. तद्वतच वास्तूंच्या सजावटीत चित्रशिल्पांचा वापर विशेषत्वाने करण्यात आला. अलंकरण-प्राधान्य हा बरोक शैलीचा एक प्रमुख विशेष होय. वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला यांच्या त्रिवेणी संगमातून भव्य व भपकेबाज, अलंकरणसमृद्ध व भावनात्मक असा एकात्म प्रत्यय साधण्यावर बरोक कलावंतांनी भर दिला. वास्तू व तिच्या सभोवतीचा परिसर यांच्यातील अन्योन्यसंबंधांची एक नवीन जाणीव या कालखंडात निर्माण झाली व परिणामी नगररचना व स्थलशिल्पयोजन या शास्त्रांवर विशेष भर देण्यात आला. साधारणतः १६०० नंतर यूरोपमध्ये चर्चवास्तू, राजवाडे, किल्ले, पूल, कारंजी, नाट्यगृहे, उद्यानगृहे, मूर्ति, फर्निचर प्रकार, नित्य वापराच्या शोभिवंत वस्तू अशा अनेक कलाप्रकारांमध्ये बरोक शैलीचा अवलंब केल्याचे दिसून येते. रोम, व्हिएन्ना, म्युनिक, माद्रिद, वॉर्सा व प्राग ही बरोक कलानिर्मितीची प्रमुख केंद्रे होत. १६०० ते १६६० हा बरोक कलेचा उत्कर्षकाल मानला जातो. अनेक उत्तमोत्तम कलाकृती या कालखंडात निर्माण झाल्या.
बरोक शैलीच्या जडणघडणीमध्ये ⇨ जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी (१५९८-१६८०), बोर्रोमीनी (१५९९-१६६७) व प्येअत्रो दा कोर्तोना (१५९६-१६६९) ह्या तिघा इटालियन वास्तु शिल्पज्ञांचा वाटा मोठा आहे. बेर्नीनी हा बरोक कालखंडातील श्रेष्ठ वास्तुकार व शिल्पकारही होता. बरोक कलेचे सारभूत चैतन्यच त्याच्या निर्मितीमधून प्रकट झालेले दिसते. सेंट पीटर्सनजीक ‘स्काला रेजिया’ हा जिन्यासारखा अभिनव प्रकार त्याने रूढ केला. बोर्रोमीनीच्या वास्तूंचे दर्शनी भाग वक्राकारांतील सौंदर्याचा प्रत्यय आणून देतात. प्येअत्रो दा कोर्तोनानेही वास्तूच्या दर्शनी भागाच्या बहिर्वक्र रचनेचा अभिनव प्रयोग केला. इटलीच्या प्रभावातून फ्रान्समध्ये बरोक वास्तुशैलीचा उदय सतराव्या शतकात झाला. फ्रान्समधील बरोक वास्तुशैलीवर अभिजाततेचे व प्रमाणशीरतेचे संस्कार आढळतात. सालॉमाँ द ब्रॉसच्या पॅरिस येथील सेंट गर्व्हाइस चर्चचा (१६१६) दर्शनी भाग तसेच झाक लमेर्स्येचे सॉरबॉन चर्च (१६३५) ही बरोकची आद्य उदाहरणे होत. झ्यूल-आर्दवँ मांसारने (१६४६-१७०८) पॅरिस येथील ‘चर्च ऑफ द इनव्हॅलिड्स’च्या(१६८०-१७०९) रचनेत बरोक शैलीचा आविष्कार घडविला. ऑस्ट्रिया, स्पेन व लॅटिन अमेरिका येथील बरोक वास्तूंमध्ये समृद्ध अलंकरण व सफाईदारपणा दिसून येतो. ऑस्ट्रियन फिशर फोन एऱ्लाख (१६५६-१७२३), वव्हेरियन कोस्मास डामीआन (१६८६-१७३९) व एजीट क्विरीन (१६९२-१७५०) हे बंधू आणि जर्मन बाल्टाझार नॉइमान (१६८७-१७५३) या वास्तुशिल्पज्ञांच्या वास्तूंमध्ये उत्तरकालीन बरोक शैलीचे उत्कृष्ट दर्शन घडते. इंग्लंडमध्ये ⇨इनिगो जोन्स व ⇨ सर क्रिस्टोफर रेन यांच्या वास्तूंमध्ये बरोक प्रवृत्तींचा आढळ होतो.
इनामदार, श्री. दे.
चित्रकला व मूर्तिकला :बरोक कलेमध्ये कलावंतांनी चित्र-अवकाशाला कर्णामध्ये छेदणाऱ्या आकारांच्या रचना साधून गतिशीलता आणली. तसेच द्विमितीय चित्रपृष्ठभूमी खास कौशल्याने त्रिमितीय भासवण्याचा यशस्वी प्रयत्न या कलाकारांनी केला. मानवी शरीराची विविध प्रकारची वळणे त्यांच्या चित्रांमध्ये अभिव्यक्त होताना दिसतात. यामुळे चित्ररचनेत अधिक लवचिकपणाही आलेला आढळतो.
राजवाड्यांच्या छतांवर रंगविलेली चित्रे फारच अवघड अशा कोनांतून रंगविलेली आढळतात. प्रेक्षकांच्या डोक्यावर खूप उंच जागी घटना घडत आहे, अशी योजना करून तसा यथायोग्य परिणाम साधलेला दिसतो. अशा विविध योजनांमुळे कलाकृती अधिक वास्तवपूर्ण वाटू लागल्या. लोभस रंगसंगती, छाया-प्रकाशाचा प्रभावी खेळ, कल्पित दंतकथेतील किंवा पुराणातील देवदूत वा ऐतिहासिक व्यक्ती आणि प्रत्यक्ष वास्तव जीवनातील व्यक्ती यांचा एकाच वेळी नाट्यमय समन्वय घडवल्यामुळेही बरोक कलाकृती वैशिष्टपूर्ण ठरल्या. रंग-गुणधर्म, पोत आणि तंत्र यांच्या साहाय्याने चित्रकारांनी रंगमाध्यम पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे वापरलेले आढळते. तसेच शिल्पकारांनी संगमरवरी दगडासारखा जड पदार्थ विविध प्रकारे हाताळून सहज नाट्यमय शिल्पे घडविली.
बरोक कलेमधील उत्कट अभिव्यक्ती पूर्वीच्या काळातील कलाकृतींमधूनही आढळते. ग्रीक अभिजात कलेतील परगेमम या मंदिरावरील शिल्पाकृती तसेच प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार मायकेलअँजेलो याच्या चित्र-शिल्पाकृती यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. पण बरोक कलेमध्ये उत्कट अभिव्यक्ती सातत्याने आणि विविध अंगांनी नटून साकार झालेली आढळते. समाजाच्या विविध थरांतील लोकांना भावेल असेच तिचे स्वरूप होते.
विशेष म्हणजे, मध्य आणि उत्तर यूरोपमध्ये भरभराटीस आलेल्या बरोक कलेची सुरुवात इटलीमध्येच झाली. आन्नीबाले कारात्ची (१५६०-१६०९), काराव्हाद्जो (१५७३-१६१०), ग्वीदो रेनी (१५७५-१६४२), गाउल्ली (१६३९-१७०९), त्येपलो (१६९६-१७७०) इ. चित्रकारांनी बरोक शैली प्रभावीपणे हाताळली. कारात्चीची धार्मिक चित्रे बरोक शैलीची निदर्शक आहेत. काराव्हाद्जोने पौराणिक व धार्मिक चित्रे रंगविताना गडद पार्श्वभूमिवर प्रखर प्रकाशात उजळून दिसणारी माणसे रंगवून नाट्यमय परिणाम साधला. दाव्हिद विथ द हेड ऑफ गोलायथ (सु. १६०५) या चित्रावरून त्याचा प्रत्यय येईल. दाव्हिदच्या शरीराचा उभटपणा घालविण्यासाठी त्याची थोडी कललेली मान आणि उजव्या हातातील तिरकस पकडलेली तलवार यांचा सहेतूक वापर केलेला दिसतो. त्याचप्रमाणे ग्वीदो रेनीचे अरोरा हे चित्र, तसेच प्येअत्रो दा कोर्तोनाने रंगविलेली रोमच्या बार्बेरिनी प्रासादातील भित्तिलेपचित्रे ही बरोक शैलीची अन्य उल्लेखनीय उदाहरणे होत.
बेर्नीनीनेही त्याच्या शिल्पाकृतींतील देह सरळसोट न दाखविता विविध कोनांतून दाखविले. त्याच्या द एक्स्टसी ऑफ सेंट तेरेसा (१६४५-५२) या शिल्पामध्ये त्याने अतिरंजितता साधली आहे. वास्तू, चित्र व शिल्प यांच्या मनोज्ञ संगमातून एकात्म परिणाम साधल्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. सेंट तेरेसाला प्रत्यक्ष देवदूत येऊन आपल्या हृदयात ईश्वरी प्रीतीचा बाण खुपसतो आहे, असा भास होत असे. या विषयावर आधारित प्रस्तुत शिल्प घडविताना बेर्नीनीने सेंट तेरेसा ढगावर आरूढ झालेली दाखविली असून, तिची वस्त्रे वाऱ्याने फडफडताना दिसत आहेत. ती समाधिस्थ अवस्थेत असून, पंख असलेला एक देवदूत तिच्या दिशेने रोखलेला एक बाण हातात धरून तिच्याकडे सस्मित मुद्रेने पाहताना दाखविला आहे. शिल्पाच्या वर घुमटातून दैवी प्रकाश येत आहे, हे दाखविण्यासाठी सोन्याचा मुलामा दिलेल्या अनेक नलिका योजल्या आहेत. या नलिकांवरून येणाऱ्या प्रकाशामुळे शिल्प उजळून दिव्य वाटू लागते. तसेच हे दिव्य दृश्य आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, अशीही भावना होते. पांढऱ्या संगमरवरातून एवढा जिवंतपणा साधणारा तो एक श्रेष्ठ शिल्पकार होता. [⟶ इटलीतील कला].
प्रवास, व्यपार आणि राजकीय घडामोडी यांमुळे मध्य यूरोपचा इटलीशी सतत संबंध येतच होता. त्यामुळे थोड्याच अवधीत बरोक कलेचा प्रसार सर्व यूरोपभर झाला. फ्लँडर्समधील ⇨ पीटर पॉल रूबेन्स (१५७७-१६४०) हा बरोक कालखंडातील एक श्रेष्ठ चित्रकार होय. त्याचे तैलरंगतंत्र फारच प्रगल्भ होते. तो मानवी देहाचे पोत एवढ्या उत्कृष्टपणे सांभाळत असे, की चित्रातील माणसे खरीखुरी, जिवंत वाटत. नाट्यमय प्रसंग, पौराणिक किंवा दंतकथेतील व्यक्ती एकाच वेळी दाखवून तो अधिकच नाट्यपूर्ण करीत असे. द रेप ऑफ द डॉटर्स ऑफ ल्यूसिपस (सु. १६१९ पहा : मराठी विश्वकोश : ७ चित्रपत्र ४२) या चित्रामध्ये ल्यूसिपसच्या दोन्ही मुलींची नग्न शरीरे आणि त्यांचे अगतिक चेहेरे दाखवून चित्र भावपूर्ण केले आहे. फ्रान्समध्येही बरोक शैलीच्या चित्रकारांनी लक्षणीय निर्मिती केली. निकोलस पूसँ(१५९३-१६६५) व ⇨क्लोद लॉरँ (१६००-८२) यांचा या संदर्भात खास निर्देश करावयास हवा. पूसँची बाखानॅल (१६३० नंतर) व रेप ऑफ द सबिना विमेन (१६३७-३९) हा चित्रे प्रसिद्ध आहेत.
स्पेनमधील बरोक शैलीचा प्रतिनिधी सुप्रसिद्ध चित्रकार व्हेलात्थ्केथ (१५९९-१६६०) हा होय. द सरंडर ऑफ ब्रेडा (१८३५) यासारखी त्याची चित्रे या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.
बरोक चित्रकलेचे खरे वैविध्य व समृद्धी नेदर्लंड्समध्ये मध्ये पाहावयास मिळते. ⇨ रेम्ब्रँट (१६०६-६९), व्हरमेर (१६३२-७५) इ. चित्रकारांची वैभवशाली कारकीर्द याची निदर्शक होय. हॉलंडमधील रेम्ब्रँट या चित्रकाराने व्यक्तिगत अभिव्यक्तीवर भर देऊन चित्रनिर्मिती केली. त्याच्या कलासामर्थ्याने बरोक शैलीला वैश्विक महत्ता प्राप्त करून दिली. छायाप्रकाशाचा गूढ खेळ दाखविणारा तो जादूगार होता. व्यक्तिगत जीवनातील सुखदुःखांचे पडसाद त्याच्या कलाकृतींमध्ये उमटलेले दिसतात. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने रंगविलेली चित्रे त्याचे सारे जीवनच पूर्णपणे अभिव्यक्त करतात. विविध विषयांवरील तैलरंगचित्रांप्रमाणेच त्याची अम्लरेखनेही उत्कृष्ट आहेत.
जाड आणि पातळ रंगांचे थर दिलेल्या त्याच्या चित्रांत अनेक प्रकारचे पोत, प्रसन्न रंगयोजना आणि छायाप्रकाशाचा गूढरम्य खेळ यांचा मनोहारी प्रत्यय येतो. त्याने १६४२ च्या सुमारास रंगवलेले नाइटवॉच (पहा: मराठी विश्वकोश: ५ चित्रपत्र ६६)हे चित्र बरोक शैलीचा श्रेष्ठतम आविष्कार मानला जातो. तसेच द ॲनॅटोमी लेसन ऑफ डॉ.टल्प (१६३२), ॲन ओल्ड मॅन इन थॉट (१६५२ मराठी विश्वकोश : ७ चित्रपत्र ४२) द रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन (१६६८-६९) इ. चित्रेही त्याच्या कलागुणांचा समर्थ प्रत्यय देतात.
विविध गुणांनी नटलेल्या बरोक कलेने उत्तरकालीन कलानिर्मितीला अनेक दिशा मिळवून दिल्या. विशेषतः मानवी जीवनाशी कलेचे निकटचे नाते या काळात निर्माण झाले. बरोक कलेच्या अंतिम पर्वामध्येच अठराव्या शतकाच्या प्रारंभी फ्रान्समध्ये ⇨ रोकोको कलेचा उदय झाला.
बोवलेकर, अनंत
संगीतःबरोक संगीताचा काळ सामान्यपणे १६०० ते १७५० असा मानण्यात येतो. प्रबोधनकाळानंतरच्या या संगीताला ‘थरो बेस’ म्हणूनही संबोधले जाते. ‘थरो बेस’ किंवा ‘फिगर्ड बेस’ किंवा ‘बेसो कंटिन्यो’ ही स्वरलेखनाची लघुलिपी असून ती या बरोक काळात अतिशय रूढ होती. त्यामुळे कित्येकदा बरोक काळाचा निर्देश त्या संज्ञेने केला जातो. या काळात मोनोडी, ऑपेरा, ऑरॉटोरियो, कँताता, रेसिटॅटीव्ह इ. संगीतप्रकारांचा उगम व विकास झाला. खर्ज संगीतधारा, संगीतरचनेत विरोधसंबंधावर देण्यात येणारा भर- उदा., ऑर्गन व कंठसंगीतातील ‘प्रतिध्वनी’ तंत्र तसेच अलंकरण व तत्कालस्फूर्तता आणि षड्ज-पंचम स्थानांचे स्वरसंवादातील मह्त्व स्थापित करणे हे बरोक संगीताचे लक्षणीय विशेष होत. श्रेष्ठ दर्जाच्या बरोक संगीतकारांमध्ये इटलीतील क्लाउद्यो मोन्तेव्हेर्दी (१५६७-१६४३) व आलेस्सांद्रो स्कारलात्ती (१६६०-१७२५) आणि जर्मनीमधील ⇨ योहान झेबास्टिआन बाख (१६८५-१७५०) जॉर्ज एफ्.हँडल (१६८५-१७५९) यांचा अंतर्भाव होतो.
संदर्भ : 1. Bazin, Germain Trans. Griffin, Jonathan, Baroque and Racoco, London, 1964.
2. Kitson, Michael, The Age of Baroque, London, 1966.
3. Huyghe, Rene, Ed. Larousse, Encyclopedia of Renaissance and Baroque Art, London.1964.
रानडे, अशोक
“